अॅड. देविदास वडगांवकर -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेहमीच कालविसंगत रूढी, परंपरा, सणांना विधायक पर्याय देत आलेली आहे. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास वडगावकर यांनी मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाबाबत लिहिलेले टिपण आम्ही देत आहोत. अंनिवाच्या वाचकांनी व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया अथवा प्रतिसाद अवश्य वार्तापत्रास कळवावा. – संपादक मंडळ
हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण ‘मकर संक्रांत’ इंग्रजी तारखेनुसार येतो. तो हिंदू पंचांगानुसार नसतो. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवास करतो, तेव्हा उत्तरायण सुरू होते. त्या दिवशी मकर संक्रांत येते. ही भौगोलिक घटना महत्त्वाची आहेच. संक्रांतीनंतर दिवस मोठा होतो, रात्री छोटी होते. उन्हाची तीव्रता वाढत जाते. ही भौगोलिक लक्षणे अनुभवास येतात. निसर्गातील हा बदल सण म्हणून साजरा करणे ही हिंदूंची चांगली पद्धत आहे. मकर संक्रांतीचे सांस्कृतिक स्वरूप, धार्मिक स्वरूप एकमेकांना “तीळगूळ घ्या, गोडगोड बोला” हा संदेश देणे हे आहे. स्त्रियांनी एकमेकांना हळदीकुंकू देणे, मकर संक्रांतीला सुरू झालेले तीळगूळ देणे व हळदीकुंकू देणे घेणे हे कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतात. १९९१ नंतर सर्वच धार्मिक वातावरणाला बाजारपेठीय स्वरूप आले आहे. तसे स्वरूप मकर संक्रांती या सणालाही आले आहे. ते जसे सादरीकरणात आले आहे, तसे ते तात्त्विक भूमिकेतसुद्धा आले आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सौभाग्यवती हिंदू स्त्रिया एकमेकांच्या घरी हळदी कुंकू घेण्यासाठी जातात. आपल्या घरी महिला सौभाग्यवती हिंदू स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलवतात. हळदीकुंकवाच्या निमित्ताने काही वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. त्याला वाण असे म्हटले जाते. देण्याची भावना वृद्धिंगत व्हावी, ही कदाचित त्यामागची भूमिका असावी; पण या हळदी कुंकवाच्या निमित्ताने आता श्रीमंतीचे प्रदर्शन, खाण्यापिण्याचे पदार्थ देणे असे प्रस्थ वाढले आहे. ते दिवसेंदिवस वाढतच आहे. ही सर्व सणांच्या बाजारूपणाचीच लक्षणे आहेत.
हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम ज्या महिलांचे नवरे जिवंत आहेत, त्यांच्यासाठी होतो. त्यामुळे हा धार्मिक सण विशिष्ट महिलावर्गासाठीच साजरा होतो. त्याला मिरवणे, हौसेचे स्वरूप असते. याचवेळी “तीळगूळ घ्या गोड गोड बोला” असे जेव्हा सांगत असतो, तेव्हा ज्यांचा नवरा अकाली गेला, ज्यांना वैधत्व आले त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात. त्यांच्यासमोर आपण एखाद्या कार्यक्रमात नटून थटून जातो, मिरवतो याचा, घरातील किंवा समाजातील विधवा स्त्रियांवर काय परिणाम होत असेल याचा विचार सुवासिनी स्त्रिया करत असतील असे मला वाटत नाही. उलट विधवा बाई ही एक घरातील अडगळच राहते. तिच्या यावेळेला काय भावना होत असेल? मनात काय घालमेल चालू असेल. याचा विचार “तीळगूळ घ्या गोड गोड बोला” असा संदेश देणार्या महिलांनी करायला हवा. संक्रांतीचे स्वरूप “तीळगूळ घ्या गोड गोड बोला” हा सांस्कृतिक संदेश देण्याइतकेच मर्यादित राहायला हवे. विधवा स्त्रियांच्या भावभावनांचा प्रश्न मग येणार नाही. किमान पक्षी या काळात सुवासिनी स्त्रियांनी वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रियांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे. पण आजची स्थिती अशी आहे की, या विधवा स्त्रियांकडे कोणीही बघत नाही. हा त्यातला वाईट भाग आहे. म्हणजे सुमारे तीन आठवडे या महिलांना दररोज भावनिक यातनांना सामोरे जावे लागत असणार. त्यांच्या यातना समजून घेण्याचा प्रयत्न धर्म म्हणून, समाज म्हणून कोणीच करत नाही. ही त्यातली खेदाची बाब आहे.
हिंदू धर्मात नवर्याने टाकून दिलेल्या परित्यक्ता स्त्रियांची संख्या वाढते आहे. कारणे काहीही असोत. पण नवर्याने टाकून दिलेली, नवर्याने सोडून दिलेली, नवरा विचारत नसलेल्या अशा बायकांची संख्या हिंदू समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येते. पण जसे विधवा स्त्रियांच्या बाबतीत त्यांना या हळदीकुंकूवाच्या समारंभात कुठेही सामील करून घेतले जात नाही, तसेच या टाकून दिलेल्या, परित्यक्ता असलेल्या नवरा जिवंत आहे इतपत मर्यादित त्यांचे अस्तित्व असलेल्या महिलांची परिस्थिती काय असणार? याचाही विचार करायला हवा. यात कदाचित त्या परिस्थितीत त्या बाई दोषी असू शकतील. पण तिच्या भावनेची कदर आपण करायला हवी. त्या समजून तरी घ्यायला हव्यात.
अलीकडे हळदी कुंकवाचे प्रस्थ बाजारी पद्धतीने वाढले आहे. अनेक ठिकाणी सामूहिकरीत्या महिलांचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. राजकीय पक्ष, राजकीय नेते त्यात प्रायोजक असतात, पण त्यात दखल घेण्यासारखी गोष्ट मला जाणवते ती ही की, आता जातीनिहाय महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. म्हणजे स्त्री म्हणून केवळ ती विशिष्ट जातीची स्त्री म्हणून तिला हळदीकुंकवाला बोलावले जाते त्यात स्त्रियांचे जातीनिहाय संघटन प्रबळ होत जाते. याचाही जाती निर्मूलनाच्या दृष्टीने गांभीर्याने विचार होणे आवश्यक वाटते.
परिवर्तनवादी कार्यकर्ता म्हणून आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती धर्माने घालून दिलेल्या प्रथा परंपरांना विधायक पर्याय शोधून देण्याचा प्रयत्न करत असतो. तसे पर्याय आपण काही सणांना दिले. असे पर्याय समाजात बर्यापैकी स्वीकारले जातात असा अनुभव आहे; पण संक्रांतीच्या बाबतीत आपण अजून तसा पर्याय देऊ शकलेलो नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही शाखा या विधवांसाठी तीळगुळाचा कार्यक्रम आयोजित करतात. आम्ही धाराशिव जिल्ह्यात दर २६ जानेवारीला असा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीपर्यंत घेत होतो. आता तो बंद झाला आहे. पण हा कार्यक्रम सार्वत्रिक व्हावा. शाखा शाखांमधून व्हावा. म्हणजे निदान परित्यक्ता, विधवा महिलांना सार्वजनिकरीत्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा कार्यक्रमात सहभागी होता येईल. त्यांच्या समस्यांना, त्यांच्या दुःखाला काहीतरी पर्याय देता येईल. याचा विचार समितीतील कार्यकर्त्यांनी करावा. हा कार्यक्रम सार्वत्रिकरीत्या आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा म्हणून तो कार्यक्रम व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. यासाठी शाखा पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. असे प्रयत्न होतील अशी अपेक्षा आहे. आपण स्त्री पुरुष समानतेच्या चळवळीशी आपले बांधिलकीचे नाते सांगतो. तर एका विशिष्ट धर्मातील स्त्रियांविषयीच असलेला दुजाभाव उघडपणे पाळल्या जाणार्या या सणांना आपण पर्याय देऊ शकलो. अशा प्रकारचा धार्मिक अंगाचा पर्याय देऊन ‘आम्ही या भगिनींच्या भावभावनांची कदर करतो,’ असा संदेश त्या निमित्ताने समाजात पसरेल.
याचा जरूर विचार व्हावा इतके!
–अॅड. देविदास वडगांवकर
संपर्क : ९४२३० ७३९११