व्ही. अनबुराज -

द्रविड कळघमचे जनरल सेक्रेटरी, पेरियार एज्युकेशन रिसर्च सेंटरचे संचालक आणि के. वीरमणी सरांचे चिरंजीव व्ही. अनबुराज देखील द्रविड कळघमच्या चळवळीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांची आणि आमची धावती भेट झाली. प्रथमतः जेव्हा आम्ही आमचे तिथे येण्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी आमचे मनापासून स्वागत केले आणि आमच्याशी अनौपचारिक गप्पा मारत विचारांची देवाणघेवाण केली.
अनबुराज यांच्या बोलण्याचा जोर लहान मुलांच्या प्रबोधनावर जास्त होता. ते म्हणाले की, मुलांवर घरून जे संस्कार होतात. त्याचे स्वरूप घराघरातून वेगवेगळे राहते. घरातली मोठी माणसे त्यांच्या पद्धतीने मुलांना घडवतात. मग त्यामध्ये खुद्द त्या माणसांच्या वैचारिक जडणघडणीवर सगळे अवलंबून असते. साधे उदाहरण आहे, मुलांना सांगितले जाते दारामध्ये उभे राहून पाणी पिऊ नये. मुले ही गोष्ट पाळत नसतील तरीही, शिस्तीच्या नावाखाली ही अंधश्रद्धा लहानपणापासून मनावर बिंबवून मुलांना मनाने दुबळे आणि विचारहीन बनवले जाते.
खरेतर काही ठिकाणी वेगळे पण घडू शकते. लहान मुलीला केस मोकळे सोडले म्हणून दरडावणार्या आजीला, नात प्रतिप्रश्न करू शकते कि तुझ्याकडच्या फोटोमधल्या देवीचे पण केस मोकळे आहेत, ती केस मोकळे ठेवू शकते, तर मग मी का नाही ठेवू शकत? यामधून आपल्या लक्षात घेतले पाहिजे की, मुलं खरंतर जन्माने तर्कवादी असतात. त्यांच्या मध्ये निसर्गतः प्रश्न आणि प्रतिप्रश्न करण्याची आणि त्यानुसार विचार करण्याची प्रवृत्ती असते. जी शिस्त आणि संस्कार यांच्या नावाखाली दाबून टाकली जाते.
सद्याचे बाल संस्कार वर्ग हे असेच एक फॅड आहे. ज्यामध्ये मुलांकडून नुसती पोपटपंची करवून घेतली जाते. त्यातून नक्की कसले संस्कार होतात? याचे त्यांनी एक स्पष्टीकरण खरे तर दिले पाहिजे. मला या लोकांना सांगावेसे वाटते, मुलांची तरल मने अशाप्रकारे दूषित करू नका. कुतूहल, जिज्ञासा असे त्यांचे उपजत गुण दाबून टाकू नका. त्यांना प्रश्न विचारू द्या. नैतिक कथांमधून तयार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवताना त्यांना स्वतः तर्क करायला आणि विचार करायला पण सुचवा.
अनबुराज पुढे म्हणाले की, मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे फार गरजेचे आहे. ते आम्ही द्रविड कळघमच्या माध्यमातून करतोय. त्या दृष्टीने आम्ही तसे कार्यक्रम घेतो आहे. मुलांमध्ये विज्ञान रुजवण्यासाठी त्यांना जागरूक बनवण्यासाठी शालेय शिक्षणामध्येच तसे बदल करणार्यांच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय.
आम्ही पेरियार १००० प्रश्नोत्तरे नावाने एक परीक्षा घेतो. ज्यामध्ये प्रत्येकवर्षी हजारो शालेय विद्यार्थी भाग घेतात. यामध्ये पेरियार यांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या कार्यावर १००० प्रश्नोत्तरीचे पुस्तक आहे. ज्याचा अभ्यास विद्यार्थी परीक्षेच्या निमित्ताने करतात. त्यातून आपोआपच पेरियार विचारांची आणि तत्वज्ञानाची ओळख होते. त्यासाठी मुलांना आम्ही मुलांना रोख बक्षिस आणि प्रमाणपत्र बहाल करतो.
व्ही. अनबुराज (जनरल सेक्रेटरी, द्रविड कळघम)
पेरियार परीक्षा

द्रविड कळघम पेरियार १००० प्रश्नोत्तरे नावाने एक परीक्षा घेते. यामध्ये पेरियार यांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या कार्यावर १००० प्रश्नोत्तरे या पुस्तकात आहेत. ज्याचा अभ्यास मुलंमुली परीक्षेच्या निम्मिताने करतात. या परीक्षेस जर वर्षी हजारो विद्यार्थी बसतात.