अमेरिकेतील स्वातंत्र्य, लोकशाही आफ्रिकन-अमेरिकनांसाठी एक मिथकच?

डॉ. श्रीधर पवार - 9619195198

25 मे 2020 रोजी वीस डॉलरचे बनावट बिल वापरल्याच्या आरोपाखाली मिनेसोटामधील मिनियापोलीस येथे जॉर्ज फ्लॉइड या 46 वर्षीय काळ्या व्यक्तीच्या अटकेनंतर डेरेक शोविन या गोर्‍या पोलीस अधिकार्‍याने फ्लॉइड जेरबंद असतानाही त्याच्या मानेवर सतत नऊ मिनिटे गुडघा दाबून ठेवला; परिणामी फ्लॉइडचा मृत्यू झाला. तत्पूर्वी तो वारंवार पोलीस अधिकार्‍यांना, ‘मला श्वास घेता येत नाही,’ असे म्हणत व सतत विनंती करीत असतानाही पोलीस अधिकार्‍याने त्याची विनंती मान्य केली नाही. घटनास्थळी जमलेल्या जमावाने त्याचा जीव वाचवण्याचा केलेला आग्रहसुध्दा डेरेक शोविनने (प्रमुख आरोपी) धुडकावून लावला होता. आता तर या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी डेरेक शोविन याने ही हत्या हेतुपुरस्सर केलेली नाही, असे दुसर्‍या सुधारित आरोपपत्रात नोंदवले गेले आहे. थॉमस लेन, जे. अलेक्झांडर कुएंग, तौ थाओ या इतर त्या घटनेप्रसंगी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकार्‍यांना सहआरोपी करण्यात आले आहे. जॉर्ज फ्लॉइडच्या खुनातील एका पोलिसाला 75,000 डॉलरचा जामीन मिळाला असून प्रमुख आरोपीला 1.5 मिलियन डॉलर भरल्यास विनाशर्त व 1.25 मिलियन डॉलर भरल्यास सशर्त बेल मिळेल, असे जाहीर करण्यात आले आहे,

जॉर्ज फ्लॉइडचा जन्म 14 ऑक्टोबर 1973 साली झाला. त्याचे बालपण ह्युस्टन येथे गेले. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते. तो चार वर्षे कारावासात होता. 2014 साली मिनियापोलिस येथे तो वाहनचालक व उपाहारगृहाबाहेर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. पण सध्याच्या ‘कोविड’ काळात त्याला सुरक्षारक्षकाची नोकरी गमवावी लागली होती. तो क्रीडा क्षेत्रात सक्रिय होता व ‘हिप-होप’ही करीत असे. त्याला पाच मुले आहेत, पैकी सर्वांत लहान सहा वर्षांची मुलगी आहे.

जॉर्ज फ्लॉइडच्या शरीरातून शेवटचा श्वास गेला; मात्र त्याने जगभर लोकांच्या आंदोलनात प्राण फुंकले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये संतापाचा उद्रेक झाला. अमेरिकेत एका शहरापुरता हा उद्रेक मर्यादित न राहता अटलांटा, शिकागो, डेन्वर, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, सीएटल व अधिक शहरात आणि अनेक राष्ट्रांत पसरला. अनेक निदर्शकांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. निदर्शनात सहभागी असलेल्या दोन युवती बेपत्ता होत्या. त्यांचे मृतदेह आढळले आहेत. मार्टिन गुगिनोसारखे आंदोलनात सहभागी झालेले, जायबंदी झालेले व सतत जीवे मारण्याच्या धमक्यानंतर आता अज्ञात ठिकाणी दहशतीखाली जगत आहेत. एका विदुषीने मुलाखतीत म्हटले आहे, ‘असे वारंवार निदर्शने करण्याचाही आम्हाला संकोच वाटतो. मात्र गोर्‍या वर्चस्ववादी लोकांचा अहंकार आणि पोलिसांचे पक्षपाती वर्तन बदलत नसल्याचेच दिसत आहे.’ ‘मी श्वास घेऊ शकत नाही,’ हे जॉर्ज फ्लॉइडचे शेवटचे वाक्य आता निषेधाचे घोषवाक्य झाले आहे. अत्यंत प्रगत व आधुनिक अमेरिकेत ब्लॅक, कलर्ड व इतर अल्पसंख्याक लोकांना मुक्त श्वास घेणे अशक्य झाले आहे, हे त्याचेच द्योतक आहे. तथापि, वर्तमान आंदोलनास 54 टक्के लोकांचा पाठिंबा आहे (31 मे ते 1 जून काळातील एक सर्वेक्षण). या आंदोलनात काळे, गोरे आणि कलर्ड असे सर्व वर्णांचे लोक सामील झाले आहेत. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’, ‘आय कान्ट ब्रिथ’ आणि ‘न्याय नाही तर शांतता नाही’ अशा अनेक घोषणा सर्वत्र दुमदुमत आहेत. जगातील 400 शहरांतून निदर्शने होत आहेत. चित्रकला व दृश्यकला यातून आदरांजली वाहिली जात आहे. जॉर्ज फ्लॉइड हा सर्वसामान्य ब्रदर असला, तरी त्याने आगामी विराट परिवर्तनाची सुरुवात केली आहे, असे बोलले जात आहे.

अमेरिकेत ‘कोविड’ साथरोगाने संत्रस्त लोक, नोकरी गमावणार्‍यांची वाढती संख्या, कोणत्याही निश्चित आश्वासनाचा अभाव, वर्णभेदी व्यवहाराचे वाढती संकटे, यामुळे सर्वत्र स्फोटक स्थिती निर्माण झाली. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून द्वेषमूलक गुन्ह्यांचे (Hate Crime) प्रमाण अधिक झाले आहे. काळ्या लोकांवरील अशा गुन्ह्यांत 17 टक्क्यांनी वाढ झाली (त्यात 45 टक्के हे हिंदू, शीख, बुद्धिस्ट हे लोकसमूहसुद्धा आहेत.) पोलीस चकमकीत आफ्रिकन-अमेरिकन लोकांचे मारले जाण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. अमेरिकेत 1.3 दशलक्ष लोक कारावासात आहेत. त्यात आफ्रिकन-अमेरिकन लोक गोर्‍या लोकांपेक्षा 5.1 पटींनी जास्त आहेत. आफ्रिकन-अमेरिकन आणि गोर्‍या लोकांचे कारावासातील प्रमाण हे 10:1 असे आहे. 12 राज्यांत कारावासातील काळ्या लोकांची संख्या 50 टक्के आहे (अलाबामा, डेलावेर, जॉर्जिया, इलिनॉय, लुईझियाना, मेरीलँड, मिशिगन, मिसिसिपी, न्यू जर्सी, उत्तर कॅरोलिना, दक्षिण कॅरोलिना आणि व्हर्जिनिया, मेरीलँड); तर 11 राज्यांत 20 पैकी 1 ब्लॅक पुरुष कारावासात आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ जस्टीस, जस्टीस कार्यक्रम कार्यालय, ब्यूरो ऑफ जस्टिस स्टॅटिस्टिक्स यांच्या 1978 ते 2014 या दरम्यान राष्ट्रीय कैदी आकडेवारीनुसार अमेरिकेतील एक लाख लोकसंख्येमागे काळे, हिस्पॅनिक व गोरे यांचे कारावासातील प्रमाण अनुक्रमे 1408, 378, 275 इतके होते. वरील आकडेवारी वरून वर्णभेदाचे भीषण स्वरूप लक्षात येते. अमेरिकेत ‘निव्वळ गोर्‍या’ लोकांचे प्रमाण 60.4 टक्के आहे. पण काही जनगणनेच्या अंदाजात वर्ष 2045 पर्यंत अमेरिकेत गोरे अल्पसंख्याक होतील, अशा भीतीमुळे श्वेत लोकांत इतरांबाबत; विशेषतः स्थलांतरितांविरुद्ध द्वेषमूलकता वाढीस लागली आहे.

गेली अनेक वर्षे विशेषत: 2012 नंतर आफ्रिकन-अमेरिकन लोकांवर; प्रामुख्याने तरुणांवर पोलिसी दहशतीच्या अनेक घटना घडल्या. त्यामध्ये अनेक तरुणांचा मृत्यू झाला. तथापि, मुलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांची न्यायालयात निर्दोष सुटका होत असल्याने आफ्रिकन-अमेरिकन लोकांत कमालीचा असंतोष आहे व त्याचे रूपांतर अनेक निदर्शने व आंदोलनांतून व्यक्त होत आहे. तत्पूर्वी 1954 ते 65 या काळातही विद्यमान परिस्थितीसारखीच स्थिती होती आणि अशाच हिंसक व दहशतीच्या काळात ब्लॅक पँथर पार्टीची स्थापना झाली होती. वर्तमानातील दहशतीच्या काळात सुध्दा अशीच आंदोलने निर्माण होत आहेत व त्याची लाट संपूर्ण अमेरिकेत विस्तारित आहे. ही आंदोलने प्रारंभी समाजमाध्यमांद्वारे सुरू होत असली तरी ही आंदोलने केवळ तिथपर्यंत सीमित न राहता अमेरिकेच्या अनेक शहरांचा भौतिक अवकाशही व्यापत आहेत. अनेकदा ही आंदोलने ‘हॅशटॅग’च्या रुपाने सोशल मीडियावर सुरू होऊन त्यांना प्रचंड प्रतिसाद प्राप्त होत आहे आणि प्रत्यक्षातही विराट निदर्शनांत रुपांतरित झाली आहेत. आफ्रिकन-अमेरिकनांचे आंदोलन निरंतर सुरू असताना व त्याची आवश्यकता निरंतर असल्याने त्यांना एक स्थिरत्व प्राप्त झाले आहे. आफ्रिकन-अमेरिकन जनतेची सतत होणारी कुचंबणा, अस्तित्वाचे होणारे अवमूल्यन, अन्नपुरवठ्याचा अभाव, मानवी हक्काची होणारी सतत गळचेपी, पूर्वापार व सध्याच्या काळात अधिक तीव्रपणे पोलिसी अत्याचारास सामोरे जाण्याच्या घटना वाढत असल्याने आफ्रिकन-अमेरिकन लोकांच्या समस्या अधिक तीव्र होत आहेत. राज्यसत्तेच्या अधिक हिणकस रुपाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. अत्यंत सुसंघटित अशा तुरुंग औद्योगिक संकुलाने त्यांना अक्षरशः जेरबंद केले आहे. राज्यसत्तेद्वारा पोलिसांकरवी होणार्‍या दहशतीविरुद्धच्या आंदोलनास नवीन परिमाणे निर्माण होत आहेत. 2012 मध्ये पंधरावर्षीय ट्रायव्हॉन मार्टीन याची गोळी घालून हत्या करण्यात आली. त्या विरोधात प्रचंड आक्रोश आफ्रिकन-अमेरिकन जनतेने नोंदविला. अशीच घटना 1954 मध्ये इमेट टिल या 14 वर्षीय मुलाचे शिकागोमध्ये ‘लिंचिंग’ करण्यात आले होते. त्या वेळेसही आफ्रिकन-अमेरिकन जनतेत प्रचंड असंतोष पसरला होता; परिणामी ‘ब्लॅक पँथर’ची स्थापना झाली होती. या दोन्ही साम्य असलेल्या प्रातिनिधिक घटना असून त्यांनी आफ्रिकन-अमेरिकन जनतेला लढायला उद्दीपित केले आहे. त्या वेळेसही नागरी हक्क चळवळीचे नवे पर्व सुरू झाले होते आणि आजही वर्तमानातील ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या चळवळीने अधिक व्यापक स्वरूप प्राप्त केले आहे व पुन्हा एक नवीन पर्व सुरू केले आहे.

26 फेब्रुवारी 2012 या दिवशी ट्रॅव्हॅन मार्टिन 15 वर्षांचा तरुण आपल्या वडिलांच्या निवासस्थानी जात असताना जॉर्ज झिमरमन या पोलिसाने त्याला अडविले. कोणतीही गंभीर चौकशी न करता त्यावर गोळीबार केला. त्यात मार्टिनचा मृत्यू झाला. पुढे न्यायालयात झिमरमन याने आपण स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे सांगितले. अंततः झिमरमन यास न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. जुलै 2013 मध्ये अनेस्तिया गारझा हिने आपल्या ‘फेसबुक’च्या ‘वॉल’वर उद्ग्विन होत लिहिले, love not to black people… d nwT>o {b{hbo, black people, I love you. I love us..our lives matter… गारझाच्या या ‘फेसबुक’वरील संदेशनास प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिच्या एका मैत्रिणीने ट्वीटरवर एक ‘पोस्ट’ लिहिली व ती होती – blacklivesmatter … पुढे ही ‘पोस्ट’ चळवळीचे घोषवाक्य झाले.

यानंतर अशीच एक घटना; ज्यात अठरा वर्षांचा तरुण मायकल ब्राउन याचीही पोलिसांद्वारे निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर ‘फर्ग्युसन’चे आंदोलन निर्माण झाले. मात्र हे आंदोलन केवळ ‘फर्ग्युसन’पर्यंत मर्यादित न राहता अमेरिकेतील 18 शहरांत सत्वर पसरले. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये न्यूयॉर्क, बोस्टन, लॉस एंजेलिस, फिलाडेलफिया, मिसिसिपी, डेट्रॉईट होस्टेन, सॅन फ्रान्सिस्को, पोर्टलँड आदी ठिकाणी हे आंदोलन तीव्र स्वरुपात झाले. आंदोलक हातात blacklivesmatter याचे फलक हातात उंचवीत शांतपणे निदर्शने करीत; मात्र पोलीस अशा आंदोलकांवर मुद्दामहून चिथावणी देत, शांत जमावावर बेछूट हल्ले करत होते.

‘फर्ग्युसन’ची घटना ही एकमेव सुटी घटना नव्हती, पूर्वीसुद्धा अशा घटना होत होत्या. ‘फर्ग्युसन’मधील घटनाही उत्स्फूर्त म्हणता येणार नाही. कारण यामागे अनेक दिवसांचा संताप कारणीभूत ठरला होता. वर्तमानात अनेक आर्थिक, सामाजिक व राजकीय अरिष्टांतून निर्माण झालेली विषमता, दारिद्र्य, वर्णभेद, पोलिसी दहशत, पोलिसांचे झालेले सैनिकीकरण अशी अनेक कारणे महत्त्वाची आहेत. वर्तमानात सर्वत्र अवलंबविलेल्या नवउदारवादी धोरणामुळे जगातील बहुतांश देशांत आर्थिक अरिष्ट विपुल प्रमाणात वाढले आहे. अमेरिकाही त्यास अपवाद नाही. जागतिकीकरणानंतर व आर्थिक पुनर्रचनेचे गंभीर परिणाम व त्याचे स्वरूप उघड होऊ लागले आहे. अमेरिकेत बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. 2000 च्या आसपास असलेले बेरोजगारीचे प्रमाण 5 टक्क्यांवरून आता 13 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. 2000 ते 2010 या दहा वर्षांत गरिबीच्या प्रमाणात दुप्पट वाढ झाली आहे. एक चतुर्थांश लोक (फेडरल) दारिद्र्याच्या रेषेखाली गेले आहेत. दारिद्र्य, बेरोजगारी व पोलिसी दहशतीमुळे आफ्रिकन-अमेरिकन लोकात मोठा असंतोष खदखदत होता. पोलिसांद्वारा आफ्रिकन-अमेरिकन जनतेवर विशेष निरीक्षण, पोलिसांच्या वाढत्या सैनिकीकरणाद्वारा आफ्रिकन-अमेरिकन जनतेला शत्रुत्वाची वर्तणुक देण्यात येत आहे; परिणामी त्यांच्यासोबत पक्षपाती व्यवहार केला जात आहे, असे सर्वसामान्य निरीक्षण आहे. ‘फर्ग्युसन’मध्येही अशा पक्षपाती घटना घडल्या होत्या. ‘फर्ग्युसन’मध्ये पोलिसांद्वारा आफ्रिकन-अमेरिकन लोकांवरील छळाच्या अनेक घटना होत होत्या. बर्‍याचदा क्षुल्लक कारणावरून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत किंवा त्यांच्याकडून भरमसाठ दंड वसूल करण्यात येत असे. उदाहरणार्थ – मोटर वाहने नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या प्रमाणावर दंड वसुली होत असे. त्याचे प्रमाणही प्रचंड आहे. इथल्या एकूण महसुलापैकी 21 टक्के महसूल हा फक्त मोटर वाहने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणार्‍या दंडात्मक कारवाईतून वसूल करण्यात येतो व ही रक्कम स्थानिक पोलिसांच्या वेतनाच्या 81 टक्के एवढी आहे. अशा दंडाची रक्कम विहित वेळेत भरली नाही तर सत्वर अटक वॉरंट काढण्यात येते. 2014 या एका वर्षात 16 हजार अटक वॉरंट पारित करण्यात आले होते. ‘फर्ग्युसन’मधील आफ्रिकन-अमेरिकन जनता अशा पोलिसी कारवाईचे दैनंदिन बळी ठरते आहे. पोलिसांच्या या पक्षपाती धोरणाची शिकार ठरलेली ही जनता आपल्या आंदोलनात या पक्षपाती वर्णवादी धोरणाचा व गैरवर्तनाचा मुद्दा नेहमी केंद्रस्थानी आणीत राहिली आहे. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’च्या आंदोलनात पोलिसांचे वर्णवादी धोरण व कृत्याविरुद्धचा मुद्दा मुख्य असला तरी आफ्रिकन-अमेरिकन जनतेच्या विविध समस्या हेही मुद्दे असत. नजीकच्या काळात पोलिसांकरवी पुरुष तरुणांच्या हत्या झालेल्या घटनांचा मुद्दा उत्स्फूर्तपणे या आंदोलनात समाविष्ट झाला असला, तरी अनेक स्त्रियाही पोलिसी व वर्णवादी व्यवहारात बळी पडल्या होत्या. मात्र त्यांच्या बाबतीतील पुरुषांच्या घटनांप्रमाणे केंद्रस्थानी आल्या नव्हत्या. मारिसा अलेक्झांडर, रेकिया बॉयड, शेली फ्रेय, मिरियम केरी, अल्बर्टा स्प्रिविल आदी अनेक आफ्रिकन-अमेरिकन मुलीही पोलिसी अत्याचाराच्या बळी ठरल्या होत्या. त्यांच्यासाठी आंदोलने झाली नसली, तरी स्त्रियांची या आंदोलनात अग्रणी भूमिका होती.

सद्यकालीन आफ्रिकन-अमेरिकन चळवळीचे ध्येय व्यापक होत आहे. केवळ वर्णभेद या अस्मितावादी राजकारणापलिकडे जात, विविध गंभीर समस्यांकडेही ही आंदोलने आपले लक्ष वेधत आहेत. वेतनवाढीचा प्रश्नही या चळवळीत समाविष्ट करण्यात आला. ‘फास्ट फूड’चे जाळे सर्वत्र पसरले आहे. या क्षेत्रात काम करणार्‍या बहुसंख्य युवकांना तटपुंज्या पगारात काम करावे लागते. या क्षेत्रात 20 टक्के तरुण आफ्रिकन-अमेरिकन आहेत. उदाहरणार्थ – न्यूयॉर्कमध्ये 50 टक्के तर शिकागोमध्ये हे प्रमाण 43 टक्के आहे. 68 टक्के लोकांचे वेतन हे 7.26 डॉलर ते 10.09 डॉलर प्रतितास आहे. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या चळवळीने वेतनवाढीचा प्रश्नही उपस्थित केला व किमान 15 डॉलर प्रतितास असावा, असा आग्रह केला. ‘वॉलमार्ट’चे जाळेही अमेरिकेभर सर्वत्र पसरले आहे, 21 टक्के ‘वॉलमार्ट’ दुकानात 1.4 दशलक्ष आफ्रिकन-अमेरिकन लोक काम करीत आहेत. सबब, ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या चळवळीत युवकांच्या जीवनाशी निगडित वेतनवाढीचा प्रश्न हा केंद्रीय मुद्दा आहे. वेतनवृद्धीसोबतच शिक्षणासाठीची संधी मिळणे, हा मुद्दा पुन्हा महत्त्वाचा मानण्यात आला. शिक्षण न्याय्य हक्क चळवळ (Education Justice Movement) हे सुद्धा एक महत्त्वाचे आंदोलन म्हणून रुपास आले आहे. शिक्षण हे सर्वार्थाने राजकारणविरहित करण्याचे धोरण सरकारने गंभीरपणे राबविण्याचे धोरण आखण्यात आले. तदनुसार ‘झीरो टॉलरन्स’ धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेतून निलंबित करण्यात येत आहे. अशा निलंबनाचा दर लक्षणीय आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. 1970 मध्ये सर्वत्र उत्कट राजकीय वातावरण असतानाही विद्यार्थी निलंबनाचा दर 6 टक्के होता, आता विद्यार्थी निलंबनचा हा दर 15 टक्के आहे, म्हणजे शिस्त लावण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांना सरळ कारावासाचाच मार्ग खुला करण्यात आला आहे. तळातील अनेक विद्यार्थ्यांसाठी ‘स्कूल ते प्रिजन’ हाच मुक्त मार्ग निर्माण केला आहे. पोलिसांची दहशत ही आता सामान्य समाज इथंपर्यंत न राहता ती शाळांतूनही तीव्र व्यापकरित्या विस्तारली आहे. शिक्षण क्षेत्रात या विस्तारित पोलिसी हस्तक्षेपाविरुद्धचे आंदोलन या चळवळीत समाविष्ट झाले आहे. ‘फर्ग्युसन’च्या आंदोलनात असे विद्यार्थीही सामील झाले. ‘फर्ग्युसन’च्या घटनेतील जेव्हा संबंधित पोलीस निर्दोष मुक्त करण्यात आले, त्याच्या विरोधात सीएटलमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शाळांवर बहिष्कार टाकला. ‘फर्ग्युसन’च्या घटनेत प्रथमत: संबंधित पोलीस अधिकारी झिमरमन याच्यावर कोणताही आरोप करण्यात आला नव्हता. परंतु लोकक्षोभामुळे त्याच्यावर मानवी खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता. पुढे न्यायालयात त्याची निर्दोष सुटका झाली. न्यायालयाच्या या आदेशाचा परिणाम लोकांवर झाला व त्यांनी उत्स्फूर्तरित्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे पुढे ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’चे स्वरूप विस्तारित होत गेले. याच काळात पोलिसांच्या कस्टडीत तीन आफ्रिकन-अमेरिकन स्त्रिया मृत झाल्या. 2014 मध्ये मायकेल ब्राऊन याची पोलिसांद्वारा हत्या झाली. नंतर अनेक कार्यकर्ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले व मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमातून प्रचंड प्रचारही सुरू केला गेला. ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ या प्रचारासोबतच ‘आय कान्ट ब्रिथ’ हे घोषवाक्य मुख्य रस्त्यांवर निनादू लागले. ही आंदोलने प्रामुख्याने आफ्रो-अमेरिकन जनतेची प्रचाराची मोहीम न राहता तिला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले व त्याचे लक्ष्य हे न्यायासाठी, पोलिसी दहशतीविरुद्ध; तसेच आंतरक्षेत्रीय स्त्रीवादाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न म्हणून करण्यात आला. दहा जुलै 2015, ज्या दिवशी सॅन्ड्रा ब्लाँड या स्त्रीने वाहतुकीचा नियमभंग केला म्हणून तिला अटक करण्यात आली. परंतु काही दिवसांनंतर ती पोलीस कस्टडीत मृतावस्थेत आढळली. 16 जुलै 2015 नंतर सर्वत्र मोहीम सुरू करण्यात आली, ज्यात प्रथमच सेहरनेम हे घोषवाक्य ‘आफ्रिकन-अमेरिकन पॉलिसी फोरम’ या संघटनेद्वारे सुरू करण्यात आले. अमेरिकन स्त्रियांच्या पोलिसांकरवी झालेल्या क्रूर हत्यांचा अहवालच प्रसिद्ध करण्यात आल्याने जनक्षोभ वाढला. वरील दोन्ही प्रचार मोहिमा व आंदोलनांनी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण केला व त्याचे परिणाम रस्त्यावर व समाजमाध्यमांतून उमटत राहिले. या काळातील (2015 मे ते जुलै 2016) डाटाबेस पाहता या आंदोलनाच्या समर्थनासाठी आठ दक्षलक्ष लोकांनी ट्विट केले होते. ‘फर्ग्युसन’च्या आंदोलनात प्रथमपासून स्त्रियांचा सहभाग अग्रणी; किंबहुना हा सहभागच अधिक होता.

निष्कर्ष : अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन लोक कष्टप्रद जीवन व्यतीत करीत आहेत. जनतेला प्रचंड विषमतेला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकन समाजातील विविध अंतर्विरोधाच्या केंद्रस्थानी आफ्रो-अमेरिकन जनता आहे, उन्नतीचे अनेक प्रयत्न करीत असताना त्यांना मात्र सतत दडपले जात आहे व ते शोषणाची शिकार होत आहेत. अमेरिकेचे वर्तमानातील सरकार वर्ण अंधत्वाच्या (colour blindness) राजकीय आयुधाचा वापर करीत आहे. त्यामुळे एका बाजूस मुक्त बाजारपीठीय भांडवलशाही (free market capitalism), नवउदारतावाद (neo-liberalism) या धोरणांमुळे राज्यसंस्थाद्वारा आफ्रिकन-अमेरिकन जनतेला त्यांचे जीवन उन्नत करण्याच्या संधीपासून वंचित ठेवण्यात येत आहे, म्हणून एकदा पुन्हा प्रश्न उपस्थित होतो की, अमेरिकेतील जनता मुक्त होईल का? की स्वातंत्र्य, लोकशाही व अनंत संधींचा अवकाश असलेली अमेरिका हे मिथकच राहील? तथापि आफ्रो-अमेरिकनांची आंदोलने चिरडली जात असतानाच सध्या उद्भवलेल्या अनेक आंदोलनातून पुन्हा नव्याने नव्या उमेदीची उभारी व नव्या जगाच्या जाहीरनाम्याचा शोध आफ्रिकन-अमेरिकन जनता घेत असल्याचे दिसत आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]