शशिकांत बामणे -
ढवळी (ता. वाळवा) येथील श्री बाळूमामा मंदिरात जिवंत नागाची पूजा करून नाग सोडण्यासाठी जाणारा मंदिरातील पुजारी संशयित जितेंद्र ऊर्फ विशाल बबन पाटील (वय ३४) यास शिराळा वनविभागाने नागासह ताब्यात घेतले. त्यांचेवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हाही दाखल केला आहे. वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, की सोमवारी ता. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ढवळी येथील श्री बाळूमामा या मंदिरात जिवंत नागाची पूजा केली जात असल्याचा व्हिडिओ वनविभागाला मिळाला. उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजने, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक भिवा कोळेकर, वनपाल डी. बी. बर्गे, प्राणिमित्र ओंकार पाटील, निवास उगळे, विक्रम टिबे, विजय पाटणे, शंकर रकटे, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्या ठिकाणी कोणी आढळून आले नाही. मात्र, चौकशी केली असता पुजारी जितेंद्र पाटील नाग सोडण्यासाठी पोखर्णीच्या डोंगराकडे गेला असल्याची माहिती मिळाली. ढवळी-भडकंबे रस्त्यावर सायंकाळी जिवंत नागासह मिळून आला. पुजारी जितेंद्र पाटील यास नागासह सांगली येथे वनविभागाच्या कार्यालयात सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजने यांच्यासमोर चौकशी केली. इस्लामपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वंजारी यांनी नागाची तपासणी केली. त्यानंतर नाग व्यवस्थित असल्याने नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी न्यायालयात नाग हजर करून परवानगी मागण्यात आली. न्यायालयात नाग व्यवस्थित असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळल्याने त्यास न्यायालयाने नैसर्गिक अधिवासात सोडण्यास परवानगी दिली. नागास नैसर्गिक अधिवासात सोडले.
– शशिकांत बामणे, इस्लामपूर