अंनिवा -

पावसामध्ये प्रत्येकाच्या घराच्या छपरावरून अंगणात पडणारी पागोळी न्याहाळणं ही आबालवृद्धांच्या मनाला कायम आनंद देणारी गोष्ट राहिली आहे. परंतु कवितेचं सौंदर्य लाभलेल्या आणि मानवी मनाला लुभावणार्या याच पागोळीवर मानवी आयुष्याचं भवितव्य सांभाळण्याची जबाबदारी येईल असा कोणी कधी विचारही केला नव्हता. परंतु मनुष्याच्या कर्माने ती वेळ आता आली आहे. पागोळी केवळ घरांच्या किंवा इमारतींच्या छपरावरूनच खाली जमिनीवर पडते असं नाही. पावसाळ्यात हरएक पर्वत, डोंगरावरून वाहणारे आणि खाली कोसळणारे पाण्याचे प्रवाह ह्या विविध प्रकारच्या पागोळ्याच आहेत. या सर्व पागोळ्यांचा प्रभावी उपयोग करून वेगाने दुरावस्थेकडे जाणार्या पर्यावरणातील पाणी आणि जमीन या दोन अत्यंत महत्वाच्या घटकांची निगराणी आणि संवर्धन अगदी सहजपणे कसं करावं याबद्दलची माहिती पागोळी वाचवा अभियान आपल्याला सांगतं.
पागोळी वाचवा अभियान यासाठी आपल्यापुढे रेनवॉटर फार्मिंग म्हणजेच पावसाच्या पाण्याची शेती ही नाविन्यपूर्ण, अभिनव, प्रभावशाली, अत्यंत परिणामकारक आणि कालसुसंगत अशी संकल्पना मांडतं आणि त्याची सहज सोपी अंमलबजावणी कशी करायची तेही सांगतं. रेनवॉटर फार्मिंग (rainwater farming) म्हणजेच पावसाच्या पाण्याची शेती ही एक अभिनव संकल्पना आहे. जमिनीच्या लहानात लहान, म्हणजे केवळ एक चौरस मीटर, पृष्ठभागाच्या माध्यमातून लाखो करोडो लिटर पावसाचं पाणी कोणत्याही तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय पूर्णपणे नैसर्गिकरित्या अत्यंत वेगाने जमिनीमध्ये जीरवण्याची ही पद्धत आहे.
पावसाचं घरांच्या, इमारतींच्या छपरांवर तसंच उताराच्या जमिनींवर, टेकड्या, डोंगर, पर्वतांवर पडून वाहणारं पाणी त्या त्या ठिकाणी एकत्र करून किंवा दिशादर्शीत करून त्या त्या ठिकाणीच तयार केलेल्या एक घनमीटर, म्हणजे एक मीटर (लांबी) एक मीटर (रुंदी) एक मीटर (खोली), मापाच्या, आतून पूर्णपणे मोकळा असलेल्या आणि केवळ भूपृष्ठावर त्याच्या चारही कडांवर, पाणी इतरत्र वाहून जाऊ नये म्हणून एक फूट उंचीचं पक्कं बांधकाम केलेल्या खड्ड्यामध्ये बांधकामाच्या किमान एक फूट उंचीवरून जमिनीमध्ये जिरण्यासाठी सोडणं या एका वाक्यात मावणारी ही पद्धत आहे. ‘जमिनीचा पाणी धारण क्षमतेचा नियम’ (water absorption capacity of land) आणि ‘जमिनीमध्ये पाणी जिरण्याच्या वेगाचा नियम’ (rate of water percolation) या निसर्गाच्या दोन्ही नियमांवर मात करून बारमाही केव्हाही पडणारं पावसाचं पाणी एकही थेंब इतरत्र वाहू न देता अत्यंत वेगाने जमिनीमध्ये जिरवणारी, निसर्गाच्याच ‘पाण्याच्या पातळीच्या नियमा’वर आधारित अशी ही पद्धत आहे.
भूगर्भातील खाली गेलेली पाण्याची पातळी वेगाने वर येण्याच्या बरोबरीनेच मोठ्या प्रमाणावर वाळवंटीकरणाकडे झुकलेल्या जमिनींमध्ये पुन्हा ओलावा निर्माण होऊन जमिनी सजीव आणि वनस्पती यांच्या निर्मितीसाठी आणि पोषणासाठी पुन्हा सुस्थितीमध्ये याव्यात यासाठी सर्वसामान्य माणसांना सहजरित्या अवलंबिता येईल अशाप्रकारच्या व्यवस्थेच्या किंवा पद्धतीच्या शोधाची आणि तिची व्यापक स्वरूपातल्या अंमलबजावणीची गरज ही मानवजातीच्या भविष्याची गरज आहे. पागोळी वाचवा अभियान ही गरज पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतं.
https://www.facebook.com/Pagoli-Wachawa-bhiyan-108250177466500/