गुणवत्ताशाहीतून उफाळून येणारा असंतोष

प्रताप भानू मेहता -

प्रताप भानू मेहता

आपल्या देशाचाच विचार केल्यास मेरिट व आरक्षण हे एकमेकाच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत की काय असे वाटू लागते. तत्त्वतः ते तसे नाहीत, हे हळूहळू लक्षात येईल. मुळात आरक्षण धोरण कसे राबविले जाते व त्यातून आपल्याला नेमके काय अपेक्षित असते यावर सर्व काही अवलंबून असते. आपण आरक्षणाचे समर्थकनिदान त्याला विरोध न करणारेअसलो तरी समाजातील कुठल्या समूहासाठी ही धोरणं राबविली जात आहेत, का म्हणून राबविली जात आहेत आणि कुणी राबवायला हवी या तीन प्रश्नांची उत्तरं शोधणे गरजेचे ठरेल. या प्रश्नांची समर्पक उत्तरं न शोधताच ही धोरणं आजकाल राबवली जात आहेत. घटनाकारांना अपेक्षित असल्याप्रमाणे समाजाच्या तळागाळातील दलित, वंचितांसाठी हे धोरण राबवायला हवे होते. परंतु धोरण राबविण्यातील कुचराईमुळे घटनाकारांचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही, हेही तितकेच खरे.

मेरिट व सकारात्मक कृती

विचारसरणी म्हणून मेरिटोक्रसी (गुणवत्ताशाही) ही संकल्पना अतिशय गुंतागुंतीची आहे. नात्यातील संबंध, मैत्रीतील घनिष्ठता, घराण्याचा इतिहास, उमेदवाराचे सुरेख वा प्रसन्न व्यक्तिमत्व, त्याची/तिची वा पालकांची समाजात असलेली पत (व भारतातील जातीव्यवस्था) इत्यादीसारख्या गोष्टींचा विचार न करता केवळ उमेदवाराच्या (तथाकथित) योग्यतेनुसार पद वा पदासाठी संधी उपलब्ध करून देणे हे मेरिटोक्रसीत अपेक्षित असते. मेरिटोक्रसीचा विचार प्रामुख्याने एखादी लठ्ठ पगाराची नोकरी देताना व/वा अशा पगारासाठी उच्च शिक्षणासाठीच्या संधीच्या वेळी योग्य व्यक्तीच्या निवडीसाठी केला जातो. परंतु योग्यतेचे मापन करत असताना दोन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. एक, बौद्दिक क्षमतेचे मोजमाप कसे केले जाते? आणि दोन, या नोकरी वा संधीसाठी ठरवलेल्या बौद्धिक क्षमतेच्या निकषांच्या मर्यादा काय असू शकतील?

एक वेळ या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी मेरिट व सकारात्मक कृती (आरक्षण धोरण) यांच्यातील संबंधाचे काय या प्रश्नाचे उत्तरही आपल्याला शोधावे लागेल. आपल्या देशाचाच विचार केल्यास मेरिट व आरक्षण हे एकमेकाच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत की काय असे वाटू लागते. तत्त्वतः ते तसे नाहीत, हे हळूहळू लक्षात येईल. मुळात आरक्षण धोरण कसे राबविले जाते व त्यातून आपल्याला नेमके काय अपेक्षित असते यावर सर्व काही अवलंबून असते. आपण आरक्षणाचे समर्थक- निदान त्याला विरोध न करणारे- असलो तरी समाजातील कुठल्या समूहासाठी ही धोरणं राबविली जात आहेत, का म्हणून राबविली जात आहेत आणि कुणी राबवायला हवी या तीन प्रश्नांची उत्तरं शोधणे गरजेचे ठरेल. या प्रश्नांची समर्पक उत्तरं न शोधताच ही धोरणं आजकाल राबवली जात आहेत. घटनाकारांना अपेक्षित असल्याप्रमाणे समाजाच्या तळागाळातील दलित, वंचितांसाठी हे धोरण राबवायला हवे होते. परंतु धोरण राबविण्यातील कुचराईमुळे घटनाकारांचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही, हेही तितकेच खरे.

या वंचित असलेल्या समूहांना वगळून हे धोरण आता राजकीय दबावाखाली भलतीकडेच वळण घेत आहे. सकारात्मक कृतीच्या नावाने सक्तीच्या अस्मितेला कुरवाळत आहोत व त्याच्या क्रूरपणाला सामोरे जात आहोत. खरे पाहता सकारात्मक कृतीची मेरिटोक्रसीशी कधीच वाकडे नव्हते व नाही. एवढेच नव्हे तर सकारात्मक कृतीसाठी मेरिटोक्रसीची अत्यंत गरजही आहे. मेरिटोक्रसी म्हणजे (त्या पदासाठी) सर्वात योग्य व्यक्तीची निवड व त्याला/तिला दिलेली एक चांगली संधी. परंतु ही संधी देत असताना पारदर्शिकतेला तिलांजली दिली जाते, हेही आपण विसरू शकत नाही.

पारदर्शक नसणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. सूर्यकिरण जंतुनाशक असले तरी त्याच्या तीव्रतेतून चटके बसू शकतात व अंग भाजून निघू शकते. म्हणून सूर्यकिरणच नको असे कुणीही म्हणणार नाही. पारदर्शकतेची खिल्ली उडवता येत असले तरी मेरिटोक्रसीत योग्य निर्णयाची गरज असते व योग्य निर्णय न घेण्यामागे अनेक कारणं असू शकतात. काहीवेळा यात काहीतरी काळेबेरे आहे अशी वाटण्याची शक्यता असली तरी मुळात निवड करणार्‍या प्रोफेशनल्सच्या टीममध्येच निर्णय घेण्याची कुवतच नसते, असे म्हणावयास वाव आहे. एकत्र जमलेले प्रोफेशनल्स कुठलेही निर्णय न घेता त्यांच्यातील वरिष्ठावर वस्तुनिष्ठ निर्णय घेण्याची जबाबदारी ढकलून देतात. मेरिटमध्ये निर्णयाला फार महत्व असते. परंतु प्रशासनासारख्या गुंतागुंतीच्या ठिकाणी तर सर्व निर्णय वरिष्ठ अधिकारीच घेतात. कारण निर्णय घेण्याची जबाबदारी घेण्यास इतर तयार नसतात. कारण स्वतःहून निर्णय घेतल्यास त्यांच्या हितसंबंधाला धक्का पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मेरिटोक्रसीच्या विचारसरणीतील वैशिष्ट्ये

मेरिटोक्रसीच्या विचारसरणीतील कुठल्या वैशिष्ट्यांना अधोरेखित करता येईल? त्याचे संभाव्य धोके कोणते असतील? याचाही विचार करावा वागेल. सामान्यपणे मेरिटोक्रसीत खालील वैशिष्ट्ये व धोके अंतर्भूत असण्याची शक्यता आहे.

…मेरिटोक्रसीच्या एका स्तरावर समानतेचा आभास होऊ शकतो. या विचारसरणीत कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला स्थान नाही. वर्ग, जात, लिंग वा वंश यासारख्या गोष्टीवरून लोकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही, अशी हमी येथे दिली जाते. (परंतु भेदभाव न केले जाणे म्हणजेच मेरिटोक्रसी असा अर्थ काढता येत नाही.) त्यामुळे ही एक आकर्षक संकल्पना ठरते.

…मेरिटोक्रसी हक्कांची जाणीव करून देते. एखाद्या विशिष्ट परिस्थितीतील लोकांना काय मिळायला हवे याचे निकष ठरवते. यातून एका प्रकारची निष्पक्षता व्यक्त होते.

…गुणवत्ता व कार्यक्षमता यांच्यात सांगड घालत येते. गुणवत्ता असलेल्यांना पद मिळाल्यास समाजाचे भले होईल, उत्पादकता वाढेल अशा अपेक्षेला मेरिटोक्रसीचा आधार असतो. खरे पाहता मेरिटोक्रसी व कार्यक्षमता यांच्यात कायमचा तणाव आहे हे आपण विसरू शकत नाही. कार्यक्षमता काही तरी करत राहण्याचे व/वा कार्य तडीस नेण्याचे एक गुणविशेष आहे, परंतु ते नैतिकदृष्ट्या योग्य असेलच याची खात्री देता येणार नाही. कार्यक्षमता कमी म्हणून सगळ्यात जास्त गुणवत्ता असलेल्या व्यक्तीला नाकारणे कदाचित नैतिक अपराध असणार नाही. परंतु त्या कामासाठी सर्वात जास्त कार्यक्षम व्यक्तीला न घेणे हा मात्र नैतिक अपराध असू शकेल. ते अन्यायकारक असेही म्हणता येईल.

मेरिटोक्रसीच्या संदर्भात आपल्याला मेरिटोक्रसी व स्पर्धा या अजून एका प्रश्नाचा विचार करावा लागेल. सैद्धांतिकरित्या विचार करत असल्यास मेरिटोक्रसीला प्राधान्य देणार्‍या समाजात स्पर्धेला पर्याय नाही, असेच वाटू लागते. मानवाच्या आजपर्यंतच्या वाटचालीच्या मुळाशी स्पर्धाच आहे. परंतु हीच स्पर्धा मानसिकरित्या त्याला अधोगतीला नेणारी ठरत आहे. गुणवत्ताशाही समाजातील ताण वाढतच जाणार आहे, कमी होणार नाही. तणावग्रस्तांची वाढती संख्या हेच दाखवत आहे. आपली शिक्षण व्यवस्था अजूनही सर्वापर्यंत पोहोचली नाही असेच आपल्याला वाटत आहे. परंतु जेव्हा लाखो विद्यार्थी एकाचवेळी बुद्धिवंताच्या रांगेतील जागा पटकावण्यासाठी एकमेकाच्या (गळेकापू) स्पर्धेत उतरतात, तेव्हा त्यांच्या मनावरील तणावाची कल्पनाच आपण करू शकणार नाही. फक्त हे आपल्या देशातच नव्हे, तर चीनमध्येसुद्धा विश्वविद्यालयातील जागेसाठी राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेत लाखो विद्यार्थी भरडले जात आहेत, तणावग्रस्त आयुष्य जगत आहेत. कदाचित ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्वाप्रमाणे विश्वविद्यालयांच्या वा व्यावसायिक शिक्षण संस्थांच्या संख्येत वाढ केल्यास ही परिस्थिती निवळू शकेल, असे वाटेल. परंतु स्पर्धा जिंकण्यासाठीचा ताण-तणाव मात्र कमी होणार नाही. या रॅटरेसमध्ये वरच्या क्रमांकांसाठी धडपड करत राहण्याला पर्याय नाही. कारण या स्पर्धेत जिंकल्यास (मोठ्या प्रमाणात) आर्थिक लाभ होणार याची शाश्वती असते. आर्थिक लाभ होत नसल्यास कुणीही वरच्या क्रमांकासाठी धडपड केली नसती व नोकर्‍यांचा मनोरा लोकशाही पद्धतीवर उभा राहिला असता. सामाजिक व्यवस्थेत समतेला मूल्य म्हणून काही किंमत असल्यास जीवघेण्या स्पर्धेला कुणीही बळी पडले नसते. यावरून शिक्षण व्यवस्थेमुळे ताण येत नसून आर्थिक लाभासाठी आहे, हे लक्षात येईल. त्यामुळे आर्थिक लाभ देणारी पदं व प्रचलित शिक्षण व्यवस्था यांच्यातील संबंधांचा उलगडा करणे गरजेचे आहे. विषम सामाजिक व्यवस्थेत मेरिटोक्रसी समाजाला आणखी अधोगतीला नेईल याबद्दल संशय नको.

न्यूनगंडाची भावना

वैयक्तिकरित्या स्पर्धेत यशस्वी झालेले मागे राहिलेल्या अयशस्वी स्पर्धकांच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण करतात. स्पर्धेत हरल्यामुळे ते स्वतःला दोषी ठरवू लागतात व कायमचे मानसिकरित्या ताण-तणावात वावरू लागतात. मानसिक आधार नसल्यास आत्महत्येसारख्या टोकाचे उपाय वा व्यसनाच्या आहारी जातात. मानसिक ताण-तणावाबरोबरच मेरिटोक्रसी समाजातील विषमतेला खतपाणी घालते. खरे पाहता बौद्धिकरित्या सक्षम असलेले पुढे जात असल्यास समाजाला फायदाच होऊ शकतो. परंतु समाजाला फायदा होण्याऐवजी विषमतेतील वाढ समाजाचे न भरून येणारे नुकसान करते. गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी वाढत जाते. उच्चपदावर पोहोचलेल्यांना व जास्तीत जास्त आर्थिक लाभ पदरी पाडून घेत असताना आपले काही तरी चुकते आहे ही अपराधी भावना त्यांच्यात येत नाही. नवीन स्वरूपातील ही सरंजामशाही वृत्ती मेरिटोक्रसीचे अपत्य आहे.

जे वरच्या पदापर्यंत पोहोचले आहेत त्या सर्वांना आपल्या बुद्धिमत्तेमुळेच आपण इथपर्यंत पोहोचल्याचा वृथा अभिमान वाटत असतो. त्यामुळे त्या पदासोबत येणार्‍या सर्व व्यक्तिगत फायद्याचे (प्रिव्हलेजेसचे) ते हकदार आहेत, याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्र शंका नसते. खरे पाहता यातील काही मंडळीना सरंजामी वृत्तीच्याबद्दल तिटकारा असला तरी (स्वतःच्या) मेरिटबद्दल मात्र सार्थ अभिमान वाटतो. कदाचित शिक्षणाच्या वेळी मिळालेल्या संधीमुळेच आपण इथपर्यंत पोचू शकलो याची जाण असते. मात्र ही संधी कशी मिळाली याचा विचार करायला त्यांना फुरसद नसते. उच्च वर्गातील तथाकथित मेरिटमुळे वरपर्यंत पोहोचलेल्यांच्यात समानतेला पूरक अशी कुठलीही कृती करण्यास ते तयार होत नाहीत. कदाचित शिक्षणातील त्यांच्या अचीव्हमेंटमुळे ते इतरापासून स्वतःला वेगळे समजून घेत असावेत. सरंजामशाहीतील माणूस एकवेळ कदाचित आपल्या बापजाद्याकडून मिळालेल्या श्रीमंतीबद्दल न्यूनगंड बाळगू शकेल, परंतु स्वतःला मेरिटोरियस म्हणवून घेणारे मात्र कायदेशीररित्या मिळालेली ही श्रीमंती भोगण्याचा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असेच समजून समाजात वावरतील. याबद्दल ना खेद ना खंत. आपल्या श्रीमंतीत कुणी वाटेकरी असणेसुद्धा (अगदी खेड्यातील आई-वडीलसुद्धा) त्यांना सहन होणार नाही. व्यावसायिकतेला प्राधान्य देणार्‍या उगवत्या मध्यमवर्गाला शिक्षणाचा विस्तार व्हावासा वाटत असला तरी (चांगल्या) शिक्षणातून मिळणार्‍या संपत्तीत इतरांचाही वाटा असू शकतो याची जाण नसते. खरे पाहता समाजातील विषमतेबद्दल फारच टोकाची सहिष्णुता बाळगणारी लोकशाही व्यवस्थाच मेरिटोक्रसीच्या भ्रमाला कायदेशीरपणाचे कवच देत आहे, असे म्हणण्यास वाव आहे.

मेरिटोक्रसी कमनशीबी लोकांना दोन प्रकारे शक्तिहीन करू शकते. एका प्रकाराला ‘एस्केप रूट इफेक्ट’ असे म्हटले जाते. झाडाची मुळं जिथे पाणी मिळेल तिथे पसरण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच दुर्भागी आपल्या दुरवस्थेतून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. एकेकाळच्या बहिष्कारासारख्या बंदिस्तपणातून समाज व्यवस्था मुक्त होत गेल्यामुळे या वर्गातील बुद्धिवंत निवडप्रक्रियेला सामोरे जात उपलब्ध असलेले पद मिळवून सामाजिक स्तर बदलण्यास प्रयत्न करत असतात. इथपर्यंत अभिजनांचीच मक्तेदारी असलेल्या पदावर आपलाही हक्क आहे व ते आपण गुणवत्तेच्या बळावर मिळवू शकतो, हा एक आशावाद त्यामागे असतो. हे होत असल्यास त्याला उत्तेजन देण्यात गैर काही नाही. अशा प्रकारे गुणवत्तेच्या जोरावर उच्च पदावर पोहोचलेल्यांची अनेक सुरस व चमत्कारीक कथा आपण वृत्तपत्रात वाचून अचंबित होत असतो. परंतु यामुळे समाजाच्या संरचनेत बदल करण्यास दीर्घकाळ लागतो. सामाजिक विषमता असलेल्या समाजातील ‘जैसे थे’ स्थिती स्वीकारून जगावे लागते. यावरून मेरिटोक्रसीतून आर्थिक विषमता दूर होत नाही हे लक्षात येते.

समाजातील ताणतणावात वाढ

मेरिटोक्रसी समाजघटकांमध्ये फक्त विषमताच नव्हे तर समाजातील ताण-तणाव वाढवू शकते. ही एका वेगळ्या प्रकारच्या विषमतेला जन्मास घालते. ही विषमता फक्त वरवरची नसून उपभोगवादाला उत्तेजन देणारी आहे. उपभोगता पैशाच्या भोवती फिरत असते. तत्वज्ञानाच्या गप्पा मारत पैसा नाकारत असलो तरीही पैसा सगळ्यांनाच हवा असतो. मेरिटोक्रसी व लोकशाही एकत्र नांदत असलेल्या समाजात उपभोगतावादाला थांबविणारी कुठलीच ताकत उपलब्ध नसते. इतिहासाकडे डोकावल्यास अन्याय, अत्त्याचार, शोषण यांची शेकडो उदाहरणं आपल्याला वाचायला मिळतील. परंतु पैशामुळे होणार्‍या मानसिक स्थित्यंतरांचे व त्यातून होणार्‍या धोक्यांची कल्पना देणारे साहित्य फार कमी प्रमाणात आहे. फ्रॉयडच्या मते पैसा हा फक्त पैसा नसतो. तो नेहमीच महत्वाचा आहे. परंतु सामाजिक बदलाच्या काळात तो वेगवेगळ्या गोष्टींचे संकेत देतो. प्रथम, तो सामाजिक गतिशीलतेचे साधन आणि चिन्ह आहे. सामाजिक स्थित्यंतराचा तो एक महत्त्वाचा मार्ग आहे. दुसरे, पैशाची सत्ता लोकशाहीकरणाच्या प्रकाराशी घनिष्ठपणे जोडलेली आहे. उच्च श्रेणी, कनिष्ठ श्रेणी आधारित सामाजिक स्थितीबद्दल आता कोणालाही खात्री देता येत नाही; त्याच्या जोरावरील सर्व दावे अनिश्चित ठरत आहेत. आर्थिकरित्या आपण किती स्वतंत्र आहोत हाच शेवटी निर्विवाद मूल्याचा एकमेव निश्चित मुद्दा आणि स्रोत बनतो.

खासगी व्यावसायिक व मेरिटोक्रसी

खासगी व्यवसाय करणारे इंजिनिअर्स, डॉक्टर्स, वकील इत्यादी प्रोफेशनल्सचा मूळ स्रोतसुद्धा हा पैसाच असतो. जे कार्यक्षम आहेत तेच तेवढे या प्रकारच्या व्यवसायात टिकून राहतात. व त्यामुळे ते स्वतःला मेरिटोरियस समजून घेतात. परंतु यांच्या मेरिटचे निकष ठरविले कुणी, हाही प्रश्न या संबंधात विचारावासा वाटतो. परंतु सर्वात महत्वाचा वा एकमेव निकष हा पैसे कमविण्याची कार्यक्षमता असते. व्यवसायामुळे समाधान मिळते म्हणून जाहीरपणे सांगणारेसुद्धा जबर फी घेऊनच व्यवसाय करतात हे ते नाकारू शकत नाहीत. गंमत अशी आहे की जगभरातील सर्व व्यावसायिक स्वतःला मेरिटोरियस म्हणवून घेत असले तरी पैसा कमविणे या एका समान सूत्राचा ते अवलंब करत असतात. कुठलाही व्यावसायिक धर्मादाय म्हणून व्यवसाय करत नाही, हेही तितकेच खरे. पैशाच्या विरोधात हल्ला करणे सोपे आहे परंतु त्याबद्दल काय करावे हे जाणून घेणे कठीण आहे. पैशाचा हाव कुणालाही सुटत नाही. पैसा हा एक प्रशंसनीय प्रेरणा स्रोत आहे. त्यामुळे प्रोफेशनल्स होण्यासाठी ‘मध्यमवर्गीय’ धडपडत असतात व जे त्या शिडीवर अगोदरच आहेत ते तेथे टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. लोकशाहीमुळे केवळ गतिशीलतेचे मार्ग उघडतो असे नसून त्यांच्याकडे जे आहे ते गमावण्याची भीतीचा अंशही त्यात असतो. त्यातून एकप्रकारे मध्यमवर्गीयामधील चिंता कमी होण्याऐवजी वाढतच जाते.

खरे पाहता कायदा, न्याय, व्यवस्थापन, उच्च शिक्षण, अभियांत्रिकी, मेडिसिन, अकौंटन्सी इत्यादी प्रोफेशन्स समाजाला व बाजारव्यवस्थेला गरजेचे असतात. डॉक्टर्स जीव वाचवितात, व्यवस्थापक उद्योगातील उत्पादनात वाढ करतात, अकौंटंट्स करचुकवेगिरीला आळा घालतात, वकील न्यायव्यवस्थाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात. इ.इ. या सर्वांच्या कार्यक्षमतेमुळे समाजाचा गाडा व्यवस्थितपणे चालू शकतो. यासाठी त्या त्या व्यवसायाचे काही ठराविक नियम असतात, कार्यपद्धती असते व ते व्यवसाय करणार्‍यावर बंधनकारक असतात. परंतु या सर्व गोष्टी सैद्धांतिकपणे योग्य वाटत असले तरी व्यावहारिक पातळीवर अगदी वेगळेच चित्र दिसते. आयआयएमसारख्या उच्च शिक्षण संस्थेतून मेरिटोरियस म्हणून बाहेर पडलेले व्यवस्थापक व अकौंटंट्स एन्रॉनसारख्या मल्टिनॅशनल कंपनीचे दिवाळे काढतात. डॉक्टरांच्या चुकीमुळे रोगी दगावतात, वकील मंडळी न्यायव्यवस्थेची बूज न राखता कायद्यातील पळवाटा शोधून गुन्हेगारांना साथ देतात. यातील प्रत्येक प्रोफेशन्सची स्वतःची नियामक समिती असते. परंतु ही समिती नेहमीच कुचकामाची ठरते, असा अनुभव आहे. एखाद्या प्रोफेशनमुळे कोसळलेल्या संकटाचे विश्लेषण करणे अत्यंत गुंतागुंतीचे ठरेल. त्यात जबाबदार व्यक्तींची शैक्षणिक गुणवत्तेपासून कंपनीतील अंतर्गत राजकारणापर्यंत अनेक पदर असू शकतात. परंतु समाजहिताच्या दृष्टीने या प्रोफेशनल्संना पर्याय नाही असेच म्हणावे लागेल. तरीसुद्धा या प्रोफेशनल्सवर कितपत विश्वास ठेवावे, हा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. व त्याची मुळं शोधल्यास मेरिटोक्रसीपर्यंत पोहोचता येते.

या प्रकारच्या समस्यांचा विचार करताना केवळ प्रोफेशन्सला दोषी ठरविण्यापेक्षा काही प्रमाणात शासनाचाही यात वाटा आहे, हे विसरता येत नाही. कार्यक्षमता हवी असल्यास जास्त मोबदला द्या हा मंत्र सर्रासपणे सर्व ठिकाणी, विशेष करून नोकरशाही व प्रोफेशन्समध्ये जपला जातो. अनेक संस्थांना आता फक्त इन्सेंटिव्ह (मोबदल्या) शिवाय दुसरे काही दिसत नाही. आजकाल पदावर असलेली व्यक्ती फक्त इन्सेंटिव्हच्या मागे धावते. त्यामुळे येथे सचोटीचा अभाव दिसू लागतो. इन्सेंटिव्ह नसल्यास सचोटी नाही, कार्यक्षमता नाही असे समीकरण रूढ होत आहे. त्यामुळे व्यक्तीचा प्रामाणिकपणा केवळ त्याला किती पैसे मिळतात यावर अवलंबून असते, असे म्हणण्यास वाव आहे.

(अशोका विश्वविद्यालयाचे माजी उपकुलपती, प्रताप भानू मेहता यांनी कोलकता येथील National University of Juridical Sciences च्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने Meritocracy and its Discontents या विषयावरील केलेल्या भाषणाचा गोषवारा.)

(स्वैर अनुवाद : प्रभाकर नानावटी)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]