सेल्फ रिस्पेक्ट चळवळीची शंभरी

-

पेरियार इ व्ही रामासामी यांनी सुरू केलेल्या ‘सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट’ला २०२५ साली शंभर वर्षे पूर्ण झाली. जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात ‘द्रविड कळघम’च्या मुंबई शाखेने भांडुप येथे या शतकपूर्ती वर्षाचा सांगता समारंभ आयोजित केला होता. सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे गेली पन्नास वर्षे नेतृत्व करणार्‍या ९४ वर्षांच्या के वीरमणी यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. के वीरमणी आणि सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाबद्दल आस्था आहे. जातीव्यवस्थेला विरोध करण्यासोबत तर्कशुद्ध विचार हा दोन्ही संघटनांना वैचारिकदृष्ट्या जोडणारा धागा आहे. द्रविड राजकारणाचा पाया घालणार्‍या सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट मधील ‘सेल्फ रिस्पेक्ट’ म्हणजेच स्व सन्मानासाठी उभे राहण्याची कल्पना प्रेरणादायी आहे. मनुष्यत्वाची खूण असलेल्या विवेकापासून माणसाला दूर नेणारी बुवाबाजी आणि इतर अंधश्रद्धा त्या व्यक्तीला नुसते आर्थिकदृष्ट्या लुबाडत नाहीत, तर तिचा आत्मसन्मान देखील लुबाडतात. किंबहुना माणूसपणाला अप्रतिष्ठा आणणार्‍या प्रथा, अघोरी अपाय यांचा अवलंब करण्याआधी व्यक्तीला स्वतःची अप्रतिष्ठा होणार आहे, हे मनोमन स्वीकारूनच मग त्या वाटेने जावे लागते. कोणत्याही परिस्थितीत स्व प्रतिष्ठा राखण्याची संकल्पना ही प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या उपयोगाची आहे. समाजातील स्त्री-पुरुष असमानतेमुळे स्त्रियांच्या वाट्याला अप्रतिष्ठा होण्याचे अधिक अनुभव येतात, त्यामुळे सर्वांगीण स्व प्रतिष्ठेबद्दल स्त्रियांनी अधिक जागरूक असले पाहिजे. पुढील घटनेवरून हे अधिक स्पष्ट होईल.

पुणे जिल्ह्यातील एका गावातील एका विशिष्ट समाजात मुलगा झालेल्या स्त्रीने मुंडण करण्याची प्रथा आहे. ही माहिती कळल्यावर महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाने यात हस्तक्षेप करायचे ठरविले. गावातील लोकांशी संवाद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक बैठक आयोजित केली. महाराष्ट्र अंनिसचे नंदिनी जाधव आणि दत्तात्रय जाधव हे कार्यकर्ते देखील शासनाच्या  निमंत्रणावरून त्या बैठकीला उपस्थित राहिले. अंगणवाडी सेविका किंवा शिक्षिका यांच्यासारख्या नोकरी करणार्‍या महिला केसांची एक बट कापून ही प्रथा पार पाडतात, पण सामान्य महिला मात्र संपूर्ण मुंडण करून घेतात. या प्रथेची पाठराखण करणार्‍यांनी ही प्रथा मान्य असल्याचे सांगणार्‍या काही महिलांदेखील सोबत आणल्या होत्या. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की या महिला अन्यथा पारंपरिक वेष धारण करणार्‍या आहेत आणि मुंडण केलेले डोके झाकूनच त्या वावरतात. मुंडण केलेल्या डोक्याने वावरण्याचा आपल्या स्वप्रतिष्ठेवर काय परिणाम होतो हा प्रश्न मोकळेपणाने स्वतःला विचारण्याची मुभा या महिलांना आहे का? कुटुंबाच्या आणि जातीच्या बाहेर स्वतःचे व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठा जोपासण्याची मुभा त्यांना आहे का? असा प्रश्न या प्रथेची पाठराखण करणार्‍या प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. कालबाह्य प्रथांचे निर्मूलन करताना सेल्फ रिस्पेक्ट किंवा स्व सन्मान हा मुद्दा तार्किक विचाराइतकाच महत्त्वाचा आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]