ललित मौर्य -
नदी केवळ जलस्त्रोत असत नाही तर जगभरात त्या त्या देशाच्या सांस्कृतिक ओळखीची आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीकही ती असते. लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबरोबर सिंचन, उद्योग या सारख्या मानवी गरजा पूर्ण करणारी जलव्यवस्थासुद्धा आहे. अशा प्रकारे नदीच्या या व्यवस्थेत इतकी प्रचंड जीववैविध्यता सामावलेली असते की ती संपूर्ण परिस्थितीची एक यंत्रणाच उभी करते, ज्यावर अगणित जीव तगून असतात. पण वाढत्या मानवी लोभाचे विष प्रदूषण आणि हवामान बदलाच्या रूपात या जीवनधारांना विषारी बनवत आहे.
‘रिव्हर्स ऑफ लाईफ’ या चळवळीचे कार्यकर्ते व ‘लुईसियाना स्टेट युनिव्हर्सिटी’ तर्फे जगातील विविध नद्यांचे सर्वेक्षण ऑक्टोबर २०२३ मध्ये केले गेले. या जागतिक सर्वेक्षणात १४ देशांतील ६६४५ लोकांना नद्या आणि हवामान बदल यांच्या संदर्भात विविध मुद्यांवर त्यांचे मत विचारले गेले. या सर्वेक्षणाचा हेतू जगातील नद्यांची स्थिती आणि लोकांचे त्याबाबतचे मत जाणून घेण्याचा होता.
या सर्वेक्षणानुसार ८१ टके लोक आजही नद्यांना आपल्या खाद्यप्रणालीचा एक महत्त्वाचा हिस्सा मानत असून ९४ टके लोक नद्या शेतीसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत असेच मानतात. तरीही बहुसंख्य लोक आपल्या स्थानिक नदीतील मासे खाण्यास तयार नाहीत.
या पाहणीनुसार प्रादेशिक आणि सांस्कृतिक मतभेदापलीकडे जात जगातील ८६ टके लोकांनी नद्यांमध्ये होणारे प्रदूषण मानवी आरोग्याला घातक असल्याचे मान्य केले आहे. एवढेच नव्हे, तर या पाहणीनुसार २०२४ सालात हवामान बदलाच्या बाबत कारवाईची अत्यंत जरुरी असल्याचे जगातील ९१ टके लोक मानतात, तर दहामधील नऊ लोक हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यात नद्या महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतील असे मानतात. पण त्यातील अर्ध्याहून अधिक ५७ टके लोकांना यांची अजिबात माहिती नाही की हे प्रदूषण कसे थांबवता येईल. पण पर्यावरण, नद्या यांना वाचविण्यासाठी कशा प्रकारे मदत करता येईल हे जाणून घेण्यास ते उत्सुक असल्याचेही पाहणीतून दिसून आले आहे. ७४ टके लोकांचे म्हणणे आहे की नद्यातील प्रदूषणाबाबत लोकांना जागरूक केले पाहिजे, कारण या मुद्यावर योग्य प्रमाणात लक्ष न देणे ही जलप्रदूषण कमी करण्यातील मोठी अडचण आहे. उत्तर अमेरिका आणि युरोप यांच्या तुलनेत दक्षिण अमेरिका आणि आशियामधील लोक नद्यातील प्रदूषणाबाबत जास्त चिंतित असल्याचे या पाहणीतून दिसून आले आहे.
जेव्हा लोकांना नद्या प्रदूषित करण्यास सर्वांत जास्त जबाबदार कोण आहे? असे विचारले तेव्हा आशियामधील ४२ टके आणि दक्षिण अमेरिकेतील ३६ टके लोकांनी सर्वसामान्य माणसांना याबाबत सर्वांत दोषी मानलेले आहे. उत्तर अमेरिकेतील ४१ टके आणि युरोपातील ४२ टके लोकांनी प्रशासनाला याबाबत दोषी धरलेले आहे.
एकूण ७६ टके लोकांचे म्हणणे आहे की, जलप्रदूषण नियंत्रित करण्यात मानवी व्यवहार हा सर्वांत मोठा अडथळा आहे. जेव्हा कारवाईची गोष्ट येते तेव्हा आशियातील ७५ टकेलोक आपल्या स्थानिक नद्या साफ करायला मदत करतात, दक्षिण अमेरिकेतील ४६ टके, उत्तर अमेरिकेतील २७ टके तर युरोपात केवळ १८ टके. सर्वांनाच मान्य आहे की उपाय शोधले पाहिजेत पण जेव्हा काही उपाय शोधण्याची गोष्ट निघते तेव्हा हितसंबंध आड येतात. तर १० टके लोकच यांच्याशी सहमत आहेत की त्यांचे राजकीय नेतृत्व नद्यांच्या स्वच्छतेबद्दल काही विचार करते.
या सर्वेक्षणानुसार, जगभरातील ७२ टके लोकांनी नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी ठोस धोरण आणि कडक नियम बनवून त्यांच्या कडक अंमलबजावणीची गरज असल्याचे सांगितले आहे. तसेच ८८ टके लोकांनी नदीत सोडल्या जाणार्या मैल्याबाबत कडक कायदा बनविला पाहिजे असे सांगितले. तसेच ५५ टके लोकांनी नद्या कशा साफ ठेवल्या पाहिजेत याबाबत प्रबोधनाची गरज असल्याचे सांगितले.
नद्यांच्या प्रदूषणाबाबत जगभरातील लोक निश्चितच चिंतित आहेत, पण ते या जीवनदायिनी असलेल्या नद्यांना साफ करायला मदत करण्यासही तयार आहेत. जगभरातील ५९ टके लोक २०२४ मध्ये आपल्या स्थानिक नद्या साफ करण्याच्या योजना बनवत आहेत. त्यांना त्याची सुरुवात करण्यासाठी मदतीची गरज आहे.
(‘डाऊन टू अर्थ’च्या सौजन्याने)
मराठी अनुवाद – राजीव देशपांडे
