खेळाचे मानसशास्त्र

डॉ. नरेंद्र दाभोलकर -

या लेखात आम्ही डॉक्टरांच्या एका वेगळ्याच पैलूकडे लक्ष वेधले आहे.ते कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू होते हे बहुतेकांना माहित आहेच पण त्यांनी कबड्डीवर 261 पानी पुस्तक लिहिले आहे आणि ते महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने 1980साली प्रकाशित केले आहे. हे फारच कमी जणांना माहित असेल. त्यात त्यांनी कबड्डी खेळाचा किती खोलवर, बारकाईने आणि सर्वांगीण विचार केला होता हे नुसती अनुक्रमणिका जरी डोळ्याखालून घातली तरी समजून येईल. आता या खेळाच्या नियमात, स्वरूपात बरेच बदल झाले असले तरी या पुस्तकातून एका पट्टीच्या तज्ञ खेळाडूबरोबरच एका विवेकवादी कार्यकर्त्याचेही दर्शन व्हावे या दृष्टीकोनातून आम्ही त्या पुस्तकातील खेळाचे मानसशास्त्रहे प्रकरण अनिवाच्या वाचकांसाठी दिले आहे.

लढणार्‍याच्या हातातील शस्त्र किती प्रभावी आहे, यापेक्षाही त्याचा जिंकण्याचा निर्धार किती पक्का आणि पोटतिडकीचा, आत्मविश्वासपूर्वक आहे, यावर लढाईचा निकाल अवलंबून असतो. याचाच अर्थ असा आहे की, लढ्याचे शारीरिक शास्त्र वेगळे आणि त्यासाठी सैनिकांच्या मनाची तयारी करण्याचे शास्त्र वेगळे. ‘लढता-लढता मरा, नाही तर कड्यावरून उड्या टाकून मरा; पण पाठ दाखवून परतू नका,’ असे सांगणारा शेलारमामा; ‘गड काबीज होत नसेल, तर माझे डोके तोफेच्या तोंडावर बांधा आणि तोफेबरोबर ते तरी गडावर जाऊन पडू दे,’ असे बोलून सैनिकांना चेतविणारा चिमाजीअप्पा किंवा लढाई हरता-हरता ‘हर हर महादेवा’च्या घोषाने स्फुरण पावून शत्रूला चारी मुंड्या चीत करणारी मराठी पलटण, ही सारी युद्धातली मानसशास्त्राची उदाहरणे आहेत.

जिंकण्याची इच्छा तर स्पर्धेत उतरणार्‍या सर्वांनाच असते. त्यासाठी काहीजणांनी तरी परिश्रमपूर्वक तयारीही केलेली असते; परंतु तरीही मनाच्या कोपर्‍यात सामान्यांबद्दल कोठे तरी कमी-जास्त प्रमाणात अदृश्य काळजी असणे, समोरच्या संघातील उत्तम खेळाडूबद्दल मानसिक दडपण, या गोष्टी खेळाडूच्या मनात असणे मानवी स्वभावाला धरूनच आहे. अत्याधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने चंद्रावर जाणारे आकाशवीरही चर्चमध्ये प्रार्थना करून निघतात; तर नशिबाचा फासा (नाणेफेकीपासून ते सामना संपेपर्यंत) आपल्या बाजूने कसा पडेल, त्या नियतीचा काहीच अंदाज नसलेला खेळाडू; विशेषत: अटीतटीच्या सामन्यात मनात कोठेतरी काही प्रमाणात धास्तावलेला असणे स्वाभाविक आहे. त्यांची ही धास्तावलेली स्थिती कमीत कमी होईल, त्यांना जास्तीत जास्त उमेद वाटेल, आत्मविश्वास येईल, जिंकण्याची खात्री उत्पन्न होईल, यासाठी आपल्या संघातील; विशेषत: घाबरट मनोवृत्तीच्या खेळाडूंना कसे हाताळावयाचे, याचा वेगळा विचार व्यवस्थापक, संघनायक व संघातील जुन्या जाणत्या खेळाडूंनी करावयास हवा.

सामन्याआधी केवळ हा विचार करावयाचा नसून सामना सुरू असतानाही याबाबतचे अवधान संघनायकाने राखावयास हवे. याबाबतची दुसरी बाजू म्हणजे समोरच्या संघाचे मानसिक अवसान कसे ढासळेल किंवा विनाकारण फुशारून जाऊन ते कसे ढिले राहतील, याचाही विचार व बंदोबस्त शक्य तेवढ्या प्रमाणात करावयास हवा. एकंदरीत, हे विवेचन पाहता सर्वच खेळांतील खेळाडू व सामन्याबाबत खरे आहे; परंतु तरीही कबड्डी खेळाडूची कल्पना मध्यवर्ती धरून आपण विचार करणे श्रेयस्कर ठरेल.

एक गोष्ट प्रथमत: स्पष्ट करावयास हवी की, ज्या गोष्टींमुळे खेळाडूंच्या श्रद्धा सुखावल्या जातात, त्यांना धीर येतो, विजयी होऊ, असा आत्मविश्वास येतो, त्या बर्‍याचशा संकल्पना या अंधश्रद्धेत मोडतात. आधुनिक वैज्ञानिक युगात त्यांना विनाकारण बळकटी आणणे चुकीचे व अयोग्य नव्हे काय? खेळाचा सराव, खेळातील कौशल्य, खेळाचा दर्जा, यावर त्या खेळाचा निकाल अवलंबून असतो, अशी स्पष्ट वैज्ञानिक जाणीव खेळाडूंना का देऊ नये? प्रस्तुत लेखक हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कट्टर पुरस्कर्ता असल्याने ही जाणीव सातत्याने देणे व खेळाडूचे मन घडविणे, हेच योग्य व इष्ट असे त्यालाही वाटते; परंतु ज्यावेळी संघातील सर्व खेळाडू इहवादी नसून निदान काही खेळाडू (आणि बहुधा सर्वच खेळाडू) श्रद्धावादी, नियतीवादी असतात. त्यावेळी विजय मिळविण्यासाठी या शस्त्राचा उपयोग जमेल तेवढा करावाच लागतो. युद्धातील शस्त्राचा तो एक भाग असतो आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते. (बरोबर नव्हे) या नात्याने या बाजूचा उपयोग कौशल्याने करणे गैर नव्हे, याची काही गमतीदार उदाहरणे मी मुद्दा स्पष्ट करण्यासाठी देत आहे. या स्वरुपाची उदाहरणे अक्षरश: असंख्य असू शकतील, ती आपापल्या संघातील खेळाडूंच्या संदर्भात माहिती करून घेऊन त्याचा योग्य वापर करणे, हे अर्थातच त्या-त्या प्रसंगावर व व्यक्तीवर अवलंबून आहे.

(1) नाणेफेक जिंकणे वा हरणे यावर सामन्याच्या निकालाचे सूचन होते, अशी कल्पना बरेच खेळाडू बाळगून असतात. वस्तुत: याला काहीही आधार नाही. नाणेफेक जिंकूनही सामना हरल्याचे अनेक प्रसंग दाखविता येतील. (नाणेफेक जिंकण्यामुळे बाद पद्धतीच्या सामन्यात चाळीस मिनिटे समान गुण झाल्यास मिळणारा बोनस गुण हा वेगळा. वरील श्रद्धेशी त्याचा संबंध जोडता येणार नाही.) परंतु एखादा संघनायक एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेत पहिल्यापासून सतत नाणेफेक जिंकत गेला, तर नाणे न जिंकलेले अपशकुनी, असा विचार त्याच्या व खेळाडूंच्या मनात कळत-नकळत असतोच. अशावेळी उपांत्य व अंतिम सामन्यात तो नेमका नाणेफेक हरल्यास खेळाडूंच्या मनात कोठेतरी पाल चुकचुकते. अशा प्रसंगी संघनायकाने शक्य त्या पद्धतीने आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास ढासळणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.

(2) ज्या सामन्यांसाठी दोन ते तीन क्रीडांगणे आखलेली असतात, त्यापैकी एका क्रीडांगणावर एका बाजूला जाऊन एक संघ उभा राहतो. त्या संघाने तो सामना जिंकला, तर या क्रीडांगणाच्या या बाजूला आपण सामन्याच्या पूर्वार्धात असणेच शुभशकुनी आहे, असा ग्रह खेळाडूंच्या डोक्यात तयार होतो. ही कल्पना बहुसंख्य संघातील खेळाडूंत आढळते. दुसर्‍या सामन्याच्या वेळी त्या क्रीडांगणावर गेल्यावर त्याच बाजूला जाऊन तो संघ उभा राहतो. ते शक्य नसल्यास (प्रतिस्पर्धी संघ आधीच त्या बाजूस आला असल्यास) जर नाणेफेक या संघाने जिंकली, तर त्या संघातले बहुसंख्य खेळाडू आपण मैदानाचा हा भाग सोडून पलिकडच्या भागात जावे, (ज्या भागात आपण आधीचा सामना सुरू करून जिंकला होता) या मताचे असतात. अशावेळी सामना जिंकणे व क्रीडांगणाची कोणती बाजू आपण घेतो, त्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसला, तरी खेळाडूच्या मनात ती भावना असल्याने संघनायकाने संघ उतरावयाचा तो त्या भागात उतरवावा किंवा नाणेफेक जिंकल्यास बाजू बदलून घ्यावी.

याचीच दुसरी बाजू म्हणजे एखादा संघ एखाद्या मैदानात सामने जिंकत असतो. योगायोगाने प्रत्येक वेळेस त्यांना सुरुवातीस क्रीडांगणाची हवी असलेली बाजू (त्या संघाच्या दृष्टीने नशीबवान बाजू) मिळत असते. अशा संघाबरोबर नाणेफेक जिंकल्यास हुशार कर्णधाराने आपली बाजू बदलावी. त्याचा अप्रत्यक्ष; परंतु निश्चित परिणाम समोरच्या संघातील काही श्रद्धाळू, कमकुवत खेळाडूंच्या मनावर नक्की होतो. अर्थात, बाजू बदलताना सूर्याची दिशा, मैदानाच्या दोन्ही बाजूंची स्थिती यालाही पुरेसे महत्त्व द्यावे; परंतु त्यांचा अडथळा नसल्यास बाजू मानसिक परिणामासाठी अवश्य बदलावी.

(3) ज्या वेळी एखादा संघ नावारुपाला येत असतो, त्या वेळी नाव कमविण्यापूर्वी काही बलाढ्य संघांचा पराभव त्यांना करावा लागतोच. खेळातील कौशल्याने तो करावा लागतो, यात वादच नाही; परंतु इतरही काही गोष्टी त्याला मदतीच्या ठरतात. छत्रपती शिवरायांचा धडा या ठिकाणी आदर्श ठरावा. अफझलखानाचा पराभव त्यांनी कुशल युद्धनेतृत्वाने केला, हे खरे; परंतु त्या आधी स्वत: घाबरल्याचे भासवून जावळी खोर्‍यापर्यंत त्याला गाफीलपणे आणणे, हेही महत्त्वाचे आहे. ज्या वेळी एखादा संघ आपल्यापेक्षा निश्चितपणे बलाढ्य अशा संघाशी सामना खेळणार असतो, त्या वेळेस त्या बलाढ्य संघातील खेळाडू मनात असे धरून चाललेले असतात की, काही फारसा त्रास न घेता, झटापट न होता आपण जिंकणारच आहोत. त्यांच्या या निश्चित मन:स्थितीचे थोड्याशा निष्काळजी मन:स्थितीत रूपांतर करणे, जरी जमले तरी खूप झाले. त्या संघातील कोणीही खेळाडू ज्या वेळी आपणास गावात हिंडताना, जेवताना, खोलीवर कुठेही भेटतील त्या ठिकाणी त्यांचा संघ किती उत्तम आहे, आपला संघ कसा कमकुवत आहे, आपल्या संघातील चांगला खेळाडू कसा आजारी आहे वा त्याला कशी दुखापत झाली आहे. त्याचे रसभरीत (खोटे) वर्णन चालू ठेवावे; मात्र त्याला ते खरे वाटले पाहिजे, असे बेमालूमपणे साधले पाहिजे. नेमके दुसरे टोक म्हणजे प्रत्यक्षात खासगीत फक्त आपल्याच खेळाडूंना घेऊन बोलताना त्यांचे मनोधैर्य टिकविण्यास सांगावे, जिंकण्याचा आत्मविश्वास उत्पन्न करावा, प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक खेळाडूच्या खेळातील प्रत्येक कृतीची तपशीलवार चर्चा करून; त्यावर काय प्रतिउपाय योजावयाचे ते ठरवावे. सामना सुरू होण्यापूर्वी, ज्या वेळी नाणेफेकीसाठी संघनायक पुढे जातो व प्रतिस्पर्धी संघनायकही हस्तांदोलन करतो, त्या वेळेस देखील ‘सांभाळून खेळ, पोरं छोटी आहेत, मार लागेल,’ असे बोलावयास विसरू नये; मात्र प्रत्यक्षात अर्थातच अत्यंत आत्मविश्वासाने, तडफेने जिंकण्याच्या जिद्दीने खेळावे.

याचाच दुसरा अर्थ स्पष्ट आहे की, शहाण्या संघाने आपला संघ कितीही उत्तम असला, तरी गाफील राहू नये. बेसावधपणे, बेफिकिरीने खेळू नये. कबड्डीमध्ये एकदा थोडी आघाडी जरी प्रतिस्पर्ध्याकडे गेली आणि त्यांनी अंतिम रेषेवरील बचावाचे धोरण स्वीकारले, तर भल्याभल्यांचे हाल होतात, याची जाणीव ठेवावी.

(4) मैदानात येण्यापासून प्रत्येक हालचाली ठाम आत्मविश्वासाच्या असाव्यात, हसतमुख चेहर्‍याने कराव्यात. क्रीडांगणाला नमस्कार करून मैदानात यावे. प्रथम चढाई करतानाही मध्यरेषा नमस्कार करून ओलांडावी. या सर्वांचा परिणाम प्रतिस्पर्ध्याच्या मनावर तुमचा प्रभाव वाढविण्यात होतो, हा प्रस्तुत लेखकाचा अनुभव आहे.

(5) संघनायकाने गरजेनुसार खेळाडूस मध्यरेषेपर्यंत पोचवावयास जावे. त्याला योग्य त्या सूचना द्याव्यात. विशेषत: खेळ ज्यावेळी गतिमान होतो, सामना अटीतटीचा सुरू असतो, त्या वेळी परिस्थिती सारखी बदलत असते. अशा वेळी आपल्या खेळाडूंच्या ध्यानात सर्व परिस्थिती आणून देण्यासाठी, तर ही गोष्ट आवश्यक आहेच; परंतु समोरच्या संघातील खेळाडूही त्यामुळे सहजासहजी पकड करू शकत नाहीत. कारण त्या सूचना देताना (त्या कोणत्या हे त्यांना ऐकू आले नसले तरी) त्यांनी पाहिलेले असते. त्यामुळे कदाचित आपल्याला पकडावयाच्या योजनेचीही त्याला सूचना दिली गेली असेल काय, या मन:स्थितीत पकडण्याचा ठामपणा निश्चितच थोडा कमी होतो व त्याचा परिणाम हा पकडीवर होतो.

(6) ज्या वेळी आपण बाद असतो व प्रतिस्पर्धी खेळाडू चढाईला आलेला असल्याने त्या संघातील खेळाडू एकमेकांत चर्चा करत असतात वा ज्या वेळेस आपला खेळाडू चढाई संपवून परतलेला असतो व समोरचा खेळाडू त्याच्या जागेहून निघून मध्यरेषा ओलांडून आपल्या बाजूची निदान रेषा ओलांडून आत येतो, त्या मधल्या वेळेत समोरच्या संघ न्याहाळण्याची संधी खेळाडूला मिळते. समोरच्या संघातील खेळाडूंचा खेळ माहीत असू शकतो. परंतु त्यांचा या सामन्यात या वेळी घेतला जाणारा पवित्रा कसा समजणार? हा पवित्रा मधल्या काही क्षणांच्या मोकळ्या वेळेत (ज्या वेळी त्यांचा खेळाडू चढाईला येत असतो) त्यांनी एकमेकांशी केलेली चर्चा, त्यांच्या चेहर्‍यांच्या हावभावावरून व हातवार्‍यावरून ताडणे, हे काही प्रमाणात मनकवडेपणाचेच; पण शक्य असे काम आहे. खेळाडूंच्या जागेत तात्पुरता केलेला बदल हा काही वेळा दृश्य स्वरुपात समजून येतो; पण काही वेळेला हा बदल होतोच, असे नाही. अनेक सामन्यांत खेळणे, असंख्य सामन्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि स्वत:ची बुद्धिमत्ता व दुसर्‍याचे मन ओळखण्याची प्रतिमा यावरूनच हे शक्य होते.

(7) सामना कधी गतिमान करावा आणि कधी धीमेपणाने खेळ करावा (कबड्डीच्या भाषेत कधी तापवावा व कधी थंड करावा), हे एक शास्त्र आहे. खेळात शिल्लक राहिलेला वेळ, आपली व प्रतिस्पर्ध्याची गुणसंख्या, आपल्याकडे प्रत्यक्ष मैदानात उपलब्ध असलेले खेळाडू अशा अनेक गोष्टींवर हा निर्णय अवलंबून असतो. काही वेळा आपला संघ पिछाडीवर असताना अचानकपणे आपल्या संघातील एखादा खेळाडू प्रतिस्पर्धी संघातील तीन-चार खेळाडू एकदम बाद करतो आणि समोरच्या संघात तीनच खेळाडू राहतात. ते बाद केले, तर सामन्याचे पारडे फिरणार असते. सामना संपायला पाच ते दहा मिनिटे (म्हणजे 10 ते 20 चढाया आपल्याकडे) बाकी असतात, अशा वेळेस नेमके काय करावयाचे, याचा अचूक निर्णय घेणे व त्या पद्धतीने तो घेऊन सामना जिंकणे, याचा अर्थ सामन्याची गती नेमकी पकडता येणे, हा खेळाच्या शास्त्राच्या विचाराचा भाग आहे. त्यामध्ये खालील शक्यता आहेत –

(अ) एकदम तीन-चार खेळाडू बाद झाल्याने व सामन्यातील आघाडी गेल्याने समोरचा संघ घाबरला आहे. याचा फायदा घेऊन पुढच्या दोन चढायात लोण मारणे व चार गुणांची आघाडी मिळविणे.

(ब) समोरच्या संघात आत उरलेले तिघेही चांगले पकडीत तयार असलेले खेळाडू आहेत. ते स्थिर मनाचे आहेत. तुलनेने चांगला चढाईपटू आपल्याकडे नाही. आपण लोण मारण्याचा प्रयत्न केल्यास व आपला खेळाडू सापडल्यास चौघात लोण मारणे अवघड होईल.

(क) लोण समजा मारू शकलो; परंतु नंतर समोरचा सर्व संघ आत येईल व त्यांची चढाई वा निदान रेषेवरील पकड उत्तम असल्यामुळे व पाच मिनिटे बाकी असल्यामुळे आपण अडचणीत येऊ, त्यापेक्षा दोन मिनिटे उरेपर्यंत वेळ काढावा. शेवटच्या दोन मिनिटांत आपल्याला वेळ कमी राहिल्यामुळे पकड घेणार्‍या खेळाडूंच्या मनावरही अप्रत्यक्ष दडपण वाढत असते. शेवटच्या दोन मिनिटांत चार चढाया मिळतात, त्या वेळी सामन्याला निर्णायक वळण देण्याचा प्रयत्न करावा. प्रतिस्पर्ध्याचे दोन खेळाडू बाद झाल्यास विजय मिळेल. आपला एखादा खेळाडू सापडल्यास कमी कुणांनी पराभव होईल.

(ड) समोरच्या संघात उरलेले तिघेजण चांगले चढाईपटू आहेत. त्यांना क्षेत्ररक्षण सांभाळणे फारसे जमत नाही. परंतु त्यामुळे ते (त्यांच्या हातात आघाडी असूनही) खोलवर चढत्या टाकू लागले. कारण पकडण्याच्या प्रयत्नात मरण्यापेक्षा चढाई करून मरण्यात वा मारण्यात त्यांना फायदा वाटतो. अशा वेळी ताबडतोबीने खेळाचा फायदा घेऊन लोण मारले पाहिजे.

(इ) उरलेले तिघे चांगले पकड घेणारे; पण कच्चे चढाईपटू आहेत, त्यांना चढाईने मारण्यापेक्षा निदान रेषेवर पकडले तर…?

आपला संघ, समोरील संघ, आपल्या व त्यांच्या खेळाडूंची कौशल्ये, गुणसंख्या, सामना विभागीय आहे की बाद पद्धतीतील (तसे असल्यास तिघांच्यातील एकच खेळाडू बाद करून समसमान गुण ठेवल्यास फायदा आहे का?) वगैरे अनेक गोष्टींवर सामना संथ ठेवावा का गतिमान करावा, खेळाडू चटकन बाद करून घ्यावेत की नकोत? किंवा निदानरेषा बंद करावी का करू नये, हे निर्णय अवलंबून आहेत. हे शास्त्र समजणे, उमजणे, प्रभावीपणे अमलात आणणे म्हणजे कबड्डीचे मानसशास्त्र समजणे. अशा असंख्य वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळा वेळ असताना वेगवेगळ्या खेळाडूंनी कसे पवित्रे घ्यावेत, याचा चाणाक्षपणे केलेला अभ्यास हा कबड्डीचा मानसशास्त्रीय आत्मा आहे. कारण याची उत्तरे गणिती पद्धतीने मिळत नाहीत; ती परिस्थितीसापेक्ष असतात.

कबड्डीच्या सामन्यात चांगल्या संघाला हमखास कधी-कधी अनुभवास येणारी गोष्ट म्हणजे तुलनेने कमकुवत संघाबरोबर जो सामना आपण जिंकू, अशी कल्पना असते. तो अटी-तटीचा होऊ लागतो. चांगल्या संघाकडे आघाडी राहिली, तरी एखाद्या गुणाची निसटती आघाडी राहते. याचाच अर्थ असा की, समोरच्या सामान्य संघातील खेळाडू तुमच्या संघातल्या चांगल्या खेळाडूंना उत्तमपणे पकडतात. यामध्ये बहुसंख्य वेळेला असे होते की, त्यांच्यातील एक वा दोनच खेळाडूंनी एका विशिष्ट पद्धतीने केलेल्या पकडी, उदाहरणार्थ साखळीपट हमखास यशस्वी होतात आणि चांगल्या संघातील चांगले खेळाडू या पकडीत फसतात.

समोरच्या संघातला खेळाडू आपल्या पकडी यशस्वी होतात, म्हणून त्या प्रकारच्या पकडी भराभर घेऊ लागतो. याचाच अर्थ तो थोड्याशा उतावीळपणे या पकडी घेतो. त्याच्या प्रतिस्पर्धी संघातील अकलेने हुशार असलेल्या चढाईपटूचे हे काम आहे की, अशा वेळी तो ज्या पद्धतीने पकडी घेतो (उदाहरणार्थ पट काढणे), तशा प्रकारची पकड घेण्यास त्याला नुसते वर-वर खेळून उद्युक्त करणे आणि त्याच्या उतावीळपणाचा फायदा घेऊन त्याला बाद करणे. असा गडी बाद करण्याने समोरच्या संघाचा त्या सामन्यातला आधारच नाहीसा होतो आणि आपले खेळाडू निर्धास्त बनतात. हे गडी बाद करणे हे कौशल्यापेक्षा मानसशास्त्रीय अभ्यासावर अधिक अवलंबून असते. कारण त्या प्रतिस्पर्ध्याच्या कमीपणापेक्षा त्याला त्याच्या कौशल्याचा जो फाजील आत्मविश्वास त्या सामन्यात वाटू लागलेला असतो, त्याचा उपयोग या ठिकाणी केलेला असतो.

(साभार : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]