रमेश वडणगेकर - 9764836994

डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर कॉ. गोविंद पानसरे यांचाही 2015 रोजी सकाळी जात असताना अनोळखी व्यक्तीने खून केला. लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून शहराच्या विविध भागात ‘निर्भय वॉक’ करण्याचे ठरले. कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास व्हावा, यामागील सूत्रधारांना अटक व्हावी, यासाठी आंदोलनाचा एक भाग म्हणून हे आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले. मग दर महिन्याच्या वीस तारखेला हा ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ शहराच्या विविध भागातून निघू लागला. या वॉकमध्ये एन. डी. सर नेहमीच यायचे. ‘शहीद कॉम्रेड पानसरे अमर रहे!’ ‘शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अमर रहे!’ ‘खुन्याच्या पाठीशी राहणार्या प्रशासनाचा निषेध असो…’ या घोषणामध्ये एन. डी. सरही सहभागी झाले होते. या ठिकाणी मोठ्या सभांना त्यांनी संबोधित केले होते. कारण कोल्हापूर म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला.
एन. डी. सर कोल्हापूरचे आमदार होते; पण काळ झपाट्याने बदलत गेला. आजच्या ‘मॉर्निंग वॉक’मध्ये मोजकीच मंडळी उपस्थित होती, तरी एन. डी. सरांनी काही त्रागा केला नाही. आपले आंदोलन सनदशीर मार्गाने चालावे, कार्यकर्त्यांना पोलिसांचा कोणताही त्रास होऊ नये, म्हणून ते नेहमी दक्ष असायचे. त्यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. एन. डी. सरांनी विविध आंदोलनांत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष केला. कोल्हापुरातील काही मंडळींनी विश्वशांतीसाठी यज्ञाचे आयोजन केले. या यज्ञामध्ये तूप, तांदूळ, दूध यांची नासाडी होणार होती. यज्ञसमर्थक व यज्ञविरोधक असे गट पडले. एन. डी. सर म्हणाले, “यज्ञ म्हणजे पुराणातली वांगी.” यज्ञाच्या समोर पानसरे, एन. डी. यांनी ‘ज्ञानाचा यज्ञ’ सुरू केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर कोल्हापुरातील बिंदू चौक येथे अभिवादन सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते म्हणाले, “आपण पृथ्वीमोलाचा माणूस गमावला.” सत्ताधारी मंडळींना भेकड म्हणूनही सुनावले. हे सुनावण्याची धमक फक्त एन. डी. सरांमध्ये होती. एन. डी. सर, कॉ. पानसरे यांचा चळवळीतील कार्यकर्त्यांना आधार होता; तसेच सत्ताधारी मंडळी दबकून असायची. आजच्या काळातील आव्हाने कठीण आहेत. जाती-धर्माच्या नावावर सत्ता काबीज करणारी मंडळी सत्तेवर आहेत. लोकांच्या मूलभूत प्रश्नावर आंदोलन करणारी काही मंडळी प्रयत्न करतात; पण त्यांची ताकद क्षीण होत जात आहे. लोकांचे मूलभूत प्रश्न, शिक्षण, आरोग्य, रोजगार मिळणे दिवसेंदिवस भीषण होत आहे. निवडून येण्यासाठी धनशक्ती, गुंडशक्ती प्रभावी होत आहे. जनजागृती, लोकसहभाग, राजकारणात सक्षम पर्याय यासाठी प्रयत्न करणे, हेच एन. डी. पाटील यांना अभिवादन ठरेल.
– रमेश वडणगेकर, कोल्हापूर संपर्क : 9764836994