सौरभ बागडे -
“मी पितृसत्ताक व्यवस्थेविरुद्ध स्त्रीत्वाच्या लढ्यावर विश्वास ठेवते. बहुतेक वेळा पुरुष भोंदू वैद्यच महिलांना ‘डाकीण’ ठरवतात.”
– पद्मश्री बिरुबाला राभा, परिवर्तनवादी कार्यकर्त्या
येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिन आहे. बाजारात महिलांच्या खरेदीवर विशेष ऑफर्स असतील. अनेक छोटे-मोठे समारंभ आयोजित केले जातील. एक उत्सवाचे वातावरण असेल. अशा माहोलमध्ये अंधश्रद्धेमुळे बळी पडणार्या महिलांबद्दल लिहिणे, अनेकांना औचित्यभंग वाटू शकतो. मात्र स्त्रीमुक्ती चळवळीच्या इतिहासावर एक नजर फिरवली असता असे दिसेल की, हरएक प्रकारच्या अत्याचाराच्या विरोधात बोलणे, आंदोलन करणे – मग ते स्त्रीच्या कुटुंब, समाज, धर्म, राजकारण यातील स्थानाबद्दल असो- आणि पुढे समतावादी समाजाचे चित्र मांडणे, त्यासाठी आग्रही राहणे, हा स्त्रीमुक्ती चळवळीच्या गाभ्याचा विषय आहे. त्यामुळे महिला दिनी अंधश्रद्धेच्या बळी पडणार्या महिलांबद्दल बोलणे औचित्यभंग करणारे ठरत नाही.
मागील लेखात आपण ओडिशाचा डाकीण प्रथा विरोधी कायदा पाहत असताना, डाकीण प्रथा म्हणजे काय, तिची कारणे व परिणाम पहिले. सध्याच्या घडीला देशातील झारखंड, आसाम, बिहार, राजस्थान, छत्तीसगड, आणि ओडिशा या सहा राज्यामध्ये डाकीण प्रथा विरोधी कायदा आहे. यावरून देशात डाकीण प्रथेची समस्या किती व्यापक आणि भीषण आहे, याची कल्पना वाचकांना येईल. प्रस्तुत लेखात आपण आसामचा डाकीण प्रथा विरोधी कायदा पाहणार आहोत. आसाममधील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीबद्दल बोलताना बिरुबाला राभा यांचा आवर्जून उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते.
बिरुबाला राभा यांचा जन्म आसाम-मेघालयाच्या सीमेवरील ठाकूरविला या दुर्गम भागात झाला. वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांना आईसोबत काम करावे लागले. शिक्षण थांबले. त्यांचे वयाच्या पंधराव्या वर्षी शेतकर्याशी लग्न झाले. त्यांचा मोठा मुलगा धर्मेश्वरला टायफॉइड झाला होता, तेव्हा त्यांचे कुटुंब उपचारासाठी एका भोंदूकडे गेले. त्याने हा आजार अलौकिक शक्तीमुळे झाल्याचे सांगितले आणि मुलाचा मृत्यू होईल असे भाकीत केले. परंतु धर्मेश्वर ठणठणीत बरा झाला. या प्रसंगातून त्यांच्या मनात श्रद्धा-अंधश्रद्धांबद्दल प्रश्न पडायला सुरवात झाली. त्यांना बुवाबाजी, मांत्रिक-तांत्रिक, अलौकिक शक्ती यातील फोलपणा, लबाडी आणि शोषण दिसले. पुढे त्या आसाममधील अंधश्रद्धांच्याविरोधातील लढ्यातील अग्रणी नेत्या बनल्या. परिवर्तनाचा लढा लढत असताना, त्यांच्या चारित्र्यावर शंका घेतली गेली. मानहानी केली गेली पण त्या खचल्या नाहीत. परिवर्तनाचा लढा नेटाने पुढे नेला. आसाममध्ये संघटनात्मक काम उभे केले. त्यांनी ‘ठाकूरविला महिला समिती’ स्थापन केली. महिलांना संघटित करून अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवण्याचे बळ दिले. अनेक पीडितांना कायदेशीर व पुनर्वसनासाठी मदत केली. २०११ साली त्यांनी ‘मिशन बिरुबाला’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. बिरुबाला राभा यांनी आसाममधील डाकीण प्रथा व अंधश्रद्धांच्या विरोधात लढण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या या कार्यासाठी भारत सरकारने २०२१ साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. त्यांचं नोबेल शांतता पुरस्कारासाठी २००५ साली नामांकनही झालेलं होतं.
The Assam Witch Hunting (Prohibition, Prevention and Protection) Act, 2015 या कायद्याला जून २०१८ मध्ये राष्ट्रपतींनी संमती दिली. हा कायदा होण्यामध्ये बिरुबाला राभा यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. अर्थात हा कायदा होण्यासाठी उच्च न्यायालयाची पायरी चढावी लागली. गुवाहाटी उच्च न्यायालयात वकिली करणारे राजीब कलिता यांनी डिसेंबर २०१३ मध्ये डाकीण या अमानुष प्रथेवर बंदी घालण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात म्हणून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने आसाम सरकारला कायदा करण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशांचे पालन करण्यासाठी सरकारच्या बाजूने अनेकदा विलंब झाला. उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. आणि अखेरीस कायदा झाला.
ही झाली आसामच्या डाकीण प्रथा विरोधी कायद्याची पार्श्वभूमी. आता आपण या कायद्यातील तरतुदी पाहू.
शिक्षा :
१.जो कोणी एखाद्या व्यक्तीला ‘डाकीण’ असल्याचा आरोप करून तिच्यावर/त्याच्यावर हल्ला करतो किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करतो किंवा असा हल्ला/बळाचा वापर घडवून आणतो आणि त्यातून त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्याला Indian Penal Code च्या कलम ३०२ अन्वये शिक्षा करण्यात येईल.
कलम ३०२ हे खुनाच्या गुन्ह्यासाठीचे आहे.
२. जो कोणी एखाद्या व्यक्तीला ‘डाकीण’ म्हणून ओळखणे, हाक मारणे, कलंकित करणे, बदनाम करणे किंवा आरोप करतो आणि अशी कोणतीही कृती करतो ज्यामुळे त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त किंवा बाध्य केले जाते, त्याला शिक्षा अशी असेल:
कैद : किमान ७ वर्षे, परंतु आयुष्यभरपर्यंत वाढू शकते.
दंड : किमान रु. १,००,०००, परंतु रु. ५,००,००० पर्यंत वाढू शकतो.
३. जो कोणी एखाद्या व्यक्तीला ‘डाकीण’ म्हणून ओळखणे, हाक मारणे, कलंकित करणे, बदनाम करणे किंवा आरोप करतो आणि त्या व्यक्तीवर गुन्हेगारी बळाचा वापर करतो आणि/किंवा त्या व्यक्तीला घर, जागा किंवा मालमत्तेतून दूर करण्यास प्रवृत्त किंवा भडकवतो, ज्यावर त्या व्यक्तीचा कायदेशीर हक्क आहे किंवा त्याच्या जमिनी किंवा ठिकाणांवरील हक्कात हस्तक्षेप करतो किंवा त्या व्यक्तीला त्याच्या योग्य हक्काच्या भागातून किंवा स्थानी, जिथे तो मालक, रहिवासी किंवा पाहुणा आहे, बाहेर जाण्यास जबरदस्ती करतो, त्याला शिक्षा अशी असेल:
कैद : किमान ५ वर्षे, परंतु १० वर्षांपर्यंत वाढू शकते.
दंड : किमान रु. १,००,०००, परंतु रु. ५,००,००० पर्यंत वाढू शकतो.
४. जो कोणी एखाद्या व्यक्तीला ‘डाकीण’ म्हणून ओळखणे, हाक मारणे, कलंकित करणे, बदनाम करणे किंवा आरोप करतो आणि त्या व्यक्तीवर हल्ला करतो किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करून तिच्या/त्याच्या शरीरावरील कपडे काढतो आणि त्याला/तिला नग्न किंवा अशा ‘अल्पकपड्यात’ दाखवतो आणि मांडतो, ज्यामुळे तिच्या/त्याच्या लज्जेचे संरक्षण होत नाही, त्याला शिक्षा अशी असेल:
कैद : किमान ५ वर्षे, परंतु १० वर्षांपर्यंत वाढू शकते
दंड : किमान रु. १०,०००, परंतु रु. ५०,००० पर्यंत वाढू शकतो.
५. जो कोणी दुर्भावनापूर्ण हेतूने एखाद्या व्यक्तीला त्रास देतो, तिच्या/त्याच्या प्रतिष्ठा आणि सन्मानाला हानी पोहोचवतो, किंवा लैंगिक शोषण करण्याच्या हेतूने, किंवा पैसे किंवा मालमत्ता हडपण्याच्या हेतूने, किंवा इतर कोणत्याही अपकारक हेतूने एखाद्या व्यक्तीला ‘डाकीण’ म्हणून ओळखतो, हाक मारतो, कलंकित करतो, बदनाम करतो किंवा आरोप करतो, त्याला शिक्षा अशी असेल:
कैद : किमान ३ वर्षे, परंतु ७ वर्षांपर्यंत वाढू शकते
दंड : किमान रु. १०,०००, परंतु रु. ५०,००० पर्यंत वाढू शकतो
६. जो कोणी एखाद्या व्यक्तीला ‘डाकीण’ म्हणून ओळखतो, हाक मारतो, कलंकित करतो, बदनाम करतो किंवा आरोप करतो आणि त्या व्यक्तीला आपल्या गाव/भाग/स्थानिक समुदायात घडणार्या कोणत्याही अपशकुनाचे कारण ठरवतो, ज्यात नैसर्गिक आपत्ती जसे की दुष्काळ, पूर, पिकाची हानी, आजार किंवा गावातील कोणत्याही मृत्यूचा समावेश असू शकतो, त्याला शिक्षा अशी असेल:
कैद : तीन वर्षांपर्यंत वाढू शकते
दंड : किमान रु. १०,०००, परंतु रु. ५०,००० पर्यंत वाढू शकतो
७. जर या कायद्याअंतर्गत घडलेल्या गुन्ह्यात समुदायाचा सहभाग सिद्ध झाला, तर सामील असलेल्या प्रत्येक समुदाय सदस्याला शिक्षा म्हणून दंड ठोठावला जाऊ शकतो, जो किमान रु. ५,००० असावा पण रु. ३०,००० पर्यंत वाढू शकतो. जो कोणी हा दंड भरण्यात अपयशी ठरतो, त्याला न्यायालयाने ठरवलेल्या इतर शिक्षा व्यतिरिक्त अतिरिक्त एक वर्ष कैद भोगावी लागेल.
या कायद्याने ठरवलेले सर्व गुन्हे हे अजामीनपात्र, दखलपात्र आणि समझोता न करता येण्याजोगे आहेत.
विशेष न्यायालय :
या कायद्यांतर्गत घडणार्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचा सल्ला घेऊन विशेष न्यायालये स्थापन करायची आहेत. आणि विशेष न्यायालयाने या कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या प्रकरणाची सुनावणी पोलिस अहवाल दाखल झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.
पोलिसांची जबाबदारी :
जेव्हा पोलिस अधिकार्याला माहिती किंवा अहवाल मिळतो की डाकीण ठरवले जाणार आहे किंवा एखाद्या व्यक्तीला डाकीण ठरवले असल्याची तर्कसंगत शंका आहे, तेव्हा त्याने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन जादूटोणा टाळण्यासाठी आणि पीडित/संभाव्य पीडिताला संरक्षण देण्यासाठी सर्व योग्य उपाय करावेत, ज्यामध्ये त्या व्यक्तीला राहण्याचे ठिकाण नसेल तर त्याला/तिला मान्यताप्राप्त संरक्षण किंवा आश्रयगृहात दाखल करणे याचा समावेश आहे.
जेव्हा या कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीविरुद्ध घडलेला गुन्हा ज्याच्या क्षेत्राधिकारात गुन्हा घडला आहे, त्या पोलिस अधिकार्याला कळवला जातो, तेव्हा संबंधित अधिकार्याने FIR नोंदवावी आणि कायद्याप्रमाणे कारवाई करावी. कोणतीही चूक किंवा अपयश असे करण्यास, संबंधित पोलिस अधिकार्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा म्हणून गणले जाईल.
– अॅड. सौरभ बागडे
(लेखक अंनिसचे कार्यकर्ते असून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतात.)
मो. नं. ७८२१९५७१४७
(क्रमशः भाग २ एप्रिल २०२६ च्या अंकात.)
