मुंबई अंनिसची मुलांसाठी ‘गंमत जंमत कार्यशाळा’ उत्साहात संपन्न

सई सावंत -

विज्ञान हा विषय शाळेत जरी शिकवला जात असला, तरी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागा ठेवण्याची गरज ओळखून अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गोरेगाव शाखेने ‘गंमत जंमत’ कार्यशाळेचे आयोजन केले होते.

१३ एप्रिल २०२४ रोजी श्रावस्ती बुद्धविहार, मोतीलाल नगर, गोरेगाव, मुंबई येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये ३४ विद्यार्थी आणि तीन शिक्षक सामील झाले होते.

मुलांचा वयोगट साधारण चौथी ते आठवी असा होता, त्यामुळे अधेमध्ये अनेक खेळांचे नियोजन केले होते.

उमा पंडित यांनी सुरुवातीला कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व गटाचे आपापसातील बंध बळकट करणारे खेळ घेऊन सर्वांचा उत्साह वाढवला. त्यानंतरचे सत्र अंधश्रद्धांची आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तोंडओळख यावर होते. मुलांशी छान गप्पा मारत, त्यांना गोष्टी सांगत, ‘बोंबा मारी शेंबडं’ हे गाणं म्हणून घेत नितांत पेडणेकर यांनी ते सत्र घेतले. त्यानंतर सई सावंत यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोनावर’ आधारित सत्र घेतलं. याचेही स्वरूप चर्चा आणि गप्पागोष्टी रूपात असल्यामुळे मुलांचा प्रतिसाद चांगला होता. संगीता पांढरे यांनी चमत्कार सादरीकरण केले. या सत्राला मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वांना सामील करत, त्यांची जिज्ञासा वाढवत संगीता पांढरे यांनी हे सत्र रंगवले. या सत्राच्या शेवटी मुलांमध्ये ‘का?’ हा प्रश्न विचारण्याचा आत्मविश्वास जाणवू लागला होता. त्यानंतर सुनिता देवलवार, उमा पंडित आणि प्रीती गाडगीळ यांनी ‘नवा युग’ हे गाणं सादर केलं. मग जेवणाची सुट्टी घेतली.

दुपारी पुन्हा एकदा मुलांचे लक्ष टिकून राहण्यासाठी नितांत पेडणेकर यांनी एक खेळ घेतला.त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी मुलांचे तीन गट पाडून वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण केले. ज्वालामुखीचा प्रयोग, हवेचा दाब, आम्ल-आम्लारी, विद्युत चुंबकत्व, बर्फाचा द्रावणांक अशा अनेक वैज्ञानिक बाबींवर आधारित प्रयोग करून दाखवले; किंबहुना सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रयोग करता येतील असा प्रयत्न केला. मुलांनाही ते प्रयोग मनापासून आवडले. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन त्यांनी स्वतःच केले. त्यानंतर गटांमध्ये ही मुलं सर्वांसमोर प्रयोगांचे स्पष्टीकरण देऊ शकली. त्यांच्या वयाप्रमाणे त्यांनी उत्तम अनुमाने बांधली होती. अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रात्यक्षिकही साध्य झाले.

चहापानानंतर अमित फोंडेकर यांनी ‘क्यू क्यू लडकी’ या कथेचे वाचन केले. प्रश्न विचारण्यावर आधारित ही कथा मुलांना आवडली.

त्यानंतर सुनिता देवलवार यांनी खेळांमध्ये जिंकलेल्या मुलांना प्रोत्साहनात्मक बक्षिसे दिली. मुलांकडून चित्ररूपात अभिप्राय गोळा केले गेले. यांमधून असं समजलं की मुलांना स्वतः प्रयोग करून पाहणे फार आवडले होते. खेळ तर साहजिकच आवडले होते. त्यानंतर ‘हम होंगे कामयाब’ या गीतगायनाने कार्यक्रमाचा समारोप केला.

एकूणच पाहता चर्चात्मक सत्रांमुळे मुले त्यांच्या आसपासच्या परिस्थितीवर मोकळेपणाने बोलू शकली, प्रश्न विचारू शकली. चमत्कार सादरीकरण, वैज्ञानिक प्रयोग यांमुळे विज्ञानाचे प्रात्यक्षिकही त्यांना अनुभवता आले. आणि दिवसाच्या शेवटी ‘का’ हा प्रश्न विचारण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागा झाला होता. उत्साह आणि प्रतिसाद दिवसभर उत्तम होता.

सई सावंत, उमा पंडित


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]