प्रभाकर नानावटी -
‘गुणवत्ताशाहीचे अवडंबर’ या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या विशेषांकाचे अतिथी संपादक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी यांचे प्रास्ताविक…
मान्यवर व मित्रांनो, नमस्ते!
आपण सर्व मुख्य अतिथी डॉ. सुखदेव थोरात यांचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात. त्यामुळे या प्रास्ताविकात आपला फार वेळ न घेता ‘गुणवत्ताशाहीचे अवडंबर’ या विशेषांकाविषयी थोडक्यात सांगतो…
जून – जुलै महिना हा विविध परीक्षांच्या निकालांचा. मेडिकल, इंजिनिअरिंगच्या अॅडमिशनचा. या वेळी गुणवत्ता आणि आरक्षण यासंबंधी समाजात उलटसुलट चर्चा सुरू होते. गुणवत्तेबद्दल (व त्यातून मिळणार्या फायद्याबद्दल) अनेक प्रकारचे भ्रम आहेत. हा भ्रमाचा भोपळा नेमका काय आहे याची चर्चा करत असताना या विषयावर एक विशेषांकच काढण्याचा निर्णय अंनिवा संपादक मंडळाने घेतला. त्याचेच फलित म्हणजे हा विशेषांक होय. तथाकथित गुणवत्ता आणि आरक्षण या संदर्भात शास्त्रीय माहिती देणारा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा विशेषांक मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध होत आहे. हा अंक वाचकांना नकी आवडेल अशी आशा करतो.
दहावी-बारावी व पदवी परीक्षांच्या परिणामानंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पानभर झळकणार्या कोचिंग क्लासेसच्या जाहिराती (व एकाच पानात बसवलेले अंगठ्याच्या आकारातील तथाकथित प्रतिभावंतांचे शेकडो फोटो), रावचे आयएस क्लासेस, कोटा फॅक्टरी, लातूर पॅटर्नसारख्या स्पर्धा परीक्षेत हमखास यशाची गॅरंटी देणार्या खर्या-खोट्या (व पेरलेल्या) बातम्या इत्यादींना भुलून आपापले नशीब आजमावण्यासाठी खेड्यातून येणारा नवशिक्षितांचा लोंढा जवळच्या शहराकडे धाव घेतो. अनेक जण जमेल तसे, जमेल तितके राजपत्रित-अराजपत्रित सेवा परीक्षांची तयारी करू लागतात. या स्पर्धा परीक्षांमधून खरोखरच गुणवत्तेची पारख होऊ शकते का, हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. या अनुषंगाने मेरिटोक्रसीचा भूलभुलय्याची कल्पना देणारे हे लेख या अंकात आहेत. सुज्ञ वाचक लेख वाचून आपले मत बनवतील, ही अपेक्षा.
समाजशास्त्रज्ञांच्या मते, कुठलेही स्तरीकरण, मूल्ये, नीती–अनीतीच्या कल्पना, सौंदर्य आणि गुणवत्तेच्या कल्पना तसेच निकष हे त्या त्या समाजातील वर्चस्ववादी वर्गाच्या सोयीनुसार केलेले असतात. वर्चस्ववादी वर्गाने प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी वा ते टिकवण्यासाठी केलेल्या त्या क्लृप्त्या असतात. सध्याचे गुणवत्ता हे निकष त्या क्लृप्त्यांपैकीच!
हॉवर्ड गार्डनर या मानसशास्त्रज्ञाने ही बुद्धिमत्तेची समजूत चुकीची ठरवली आहे. त्याने बुद्धिमत्तेचे मुख्य आठ प्रकार पाडले. Visual-Spatial, Linguistic-Verbal, Logical-Mathematical, Body-Kinesthetic, Musical, Interpersonal, Intrapersonal, Naturalistic) कुठल्याही व्यक्तीमध्ये या प्रकारांपैकी एक किंवा अधिक बुद्धिमत्तांचं कमी-अधिक प्रमाण असतं, असा त्याचा निष्कर्ष होता. इथल्या विशेष अधिकारप्राप्त वर्गाची गुरुकुल शिक्षणपद्धती ही पाठांतराची. त्या कारणे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी पाठांतर तथा स्मरणशक्ती म्हणजे गुणवत्ता हा निकष एके काळी रूढ होता. व अजूनही आपल्या परीक्षा पद्धती स्मरणशक्तीलाच महत्त्व देतात. परंतु नैसर्गिक बुद्धिमत्तेबरोबरच प्रतिकूल परिस्थितीमुळे येणारे उपजत शहाणपण, उत्पादक कामाच्या निरीक्षणातून येणारे शहाणपण, सृजनता, विषयाचं आकलन, विश्लेषण या बाबी वर्चस्ववाद्यांच्या निकषात बसत नाहीत. म्हणून तर मेरिटचं प्रस्थ वाढत गेलं. कारण गुणवत्ताशाहीत सर्व समान आहेत व त्यातून योग्य निवड होऊ शकते, हा भ्रम जोपासला गेला आहे.
मेरिटचे कौतुक करणारे नेहमीच आरक्षणाला विरोध करत असतात. आरक्षणामुळे गुणवत्तेचा र्हास होतो या गृहीतकाच्या मुळाशी ‘गुणवत्ता’ या बाबींवर केवळ उच्चवर्णीय जातींचा मक्ता आहे, हे गृहीतक आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारप्राप्त अभिजित बॅनर्जी आरक्षणासंदर्भात म्हणतात की, आरक्षणामुळे गुणवत्तेचा र्हास होतो याचा अद्यापपर्यंत कोणताही पुरावा उपलब्ध नाही. हे विधान मी माझी पत्नी अँस्थर डुफ्लो आणि या विषयातील अनेक तज्ज्ञांनी आरक्षण आणि गुणवत्ता या संदर्भात केलेल्या संशोधनातून करत आहे.
आपल्या येथील आकडेवारीसुद्धा याच निष्कर्षाला अधोरेखित करते. रेमा नागराजन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’साठी ४०९ वैद्यकीय महाविद्यालयांतील ५७ हजार विद्यार्थ्यांच्या माहितीद्वारे केलेले संशोधनही गुणवत्तेचा सनातन भ्रम दूर करणारे आहे. वैद्यकीय क्षेत्राची गुणवत्ता आरक्षणामुळे नाही तर अनिवासी आणि व्यवस्थापन कोट्यामुळे ढासळली आहे, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे. या विशेषांकातील काही लेखातील आकडेवारी अद्ययावत नसली, तरी त्यात फार मोठा फरक पडला आहे असे जाणवत नाही. परंतु ही गोष्ट व आकडेवारी फक्त आजची नसून मागच्या शतकातसुद्धा होती.
मॅट्रिक परीक्षेत पहिले आलेले आणि नंतर बी.ए. व एम.ए.ला पहिल्या वर्गात आलेले भास्करराव जाधव यांना कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी १८९५ साली साहाय्यक सरसुभा म्हणून नेमणूक केल्याचे ऐकताच, त्या वेळी धुळ्याला जिल्हा न्यायाधीश असलेल्या रानडे यांनी त्यांचे सहकारी सबनीस यांना म्हटले, “सबनीस, आपण जितके चांगले काम करू तसे जाधव करू शकतील काय?” शाहू महाराजांनी या गोष्टी कशा हाताळल्या याबद्दलचा डॉ. विलासराव पोवार यांचा लेख या विशेषांकात असून अत्यंत वाचनीय आहे.
बाजारीकरणात अमाप भांडवलाबरोबर मेरिटचेही फार मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात असते. बौद्धिक क्षमता, परिश्रमातील सातत्य व इनोव्हेटिव्ह माइंड ज्याच्याकडे आहे त्यांनाच कुठल्याही स्पर्धेतील यशाची किल्ली मिळू शकते, याबद्दल कुणाचेही दुमत नसते. याचा परिणाम जीवघेण्या स्पर्धेत होत आहे व बहुतेकांना या रॅट रेसमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे ज्यांना संधी मिळते वा जे संधीच्या शोधात आहेत त्यांचेच हे जग आहे. आणि इतरांना येथे स्थान नाही.
परंतु वास्तव फार वेगळे आहे. ही रॅट रेस सर्वांना समान संधी देऊ शकत नाही. काही (मोजके चाणाक्ष) स्मार्ट अगोदरच या शर्यतीच्या विनिंग लाइनजवळ उभे आहेत. व शिट्टी वाजवली की तेच सर्वांच्या अगोदर पोचतात व शर्यत जिंकतात. बाजारावरील नियंत्रण दूर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली तेव्हापासूनच समान संधी नाकारली गेली हे विसरता येत नाही. उत्कर्षाच्या शिडीच्या खालच्या पायरीपाशीच बहुतेक जण घुटमळत आहेत, एकमेकांचे पाय ओढत आहेत. व यातूनही काहींना वरच्या पायरीवर जाणे शक्य झाले तरी त्यांना वर येऊ न देण्यासाठी काही अडथळे उभे करणारे ठिकठिकाणी आहेत. खरे पाहता उदारीकरणाच्या सिद्धांतानुसार विलक्षण बुद्धिमत्ता, सर्जनशीलता किंवा अविश्रांत परिश्रम असलेल्यांच्याकडेच संपत्ती हवी. परंतु यापैकी कुठलेही गुणविशेष श्रीमंतांजवळ नसते. प्रतापभानू मेहता यांनी आपल्या लेखात याची छानपैकी मांडणी केली आहे. या जीवघेण्या रॅट रेसला कारणीभूत ठरणार्या मेरिटोक्रसी (गुणवत्ताशाही) विषयीचे काही लेख वाचकांच्या विचारार्थ ठेवलेले आहेत.
बुद्धिमत्ता वा परिश्रमांची फळंसुद्धा फार काळ टिकत नाहीत. पहिल्या पिढीतील उद्योजकांनी स्वतःच्या हिकमतीवर व इनोव्हेशनच्या जोरावर उद्योगधंदे उभारून संपत्ती गोळा केली असली तरी नंतरच्या कालखंडात स्पर्धेची झळ लागणार नाही याची शाश्वती देता येत नाही. इनोव्हेशन्स सतत होत असतात. त्यामुळे नवीन उद्योगधंदे उदयास येत काही उद्योगधंद्यांना कालबाह्य ठरवतात. त्यामुळे बापाच्या पैशाच्या जोरावर उद्योजकांची पुढली पिढी टिकून राहील याची खात्री देता येत नाही.
अर्थात, जातिश्रेष्ठत्वाची भावना, वृत्ती ही गुणसूत्रातून कमी व कौटुंबिक व सामाजिक संस्कारांतून जास्त येते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पिढ्यान्पिढ्यांमुळे घट्ट झालेल्या अन्यायांचा मुकाबला करण्यासाठी सोपी उत्तरे नाहीत. परंतु संविधानातील मूल्ये मने बदलणारी आणि हिंसेशिवाय सामाजिक बदल घडवू शकणारी आहेत, यावर दृढ विश्वास ठेवत त्यानुसार मार्गक्रमण करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
संयोजकांचे व तुम्हा सर्वांचे आभार मानून मी येथेच थांबतो.
– प्रभाकर नानावटी,
(अतिथी संपादक, गुणवत्ताशाहीचे अवडंबर विशेषांक)
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र