जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी हवी!

-

एका उच्चशिक्षित दांपत्याला एका महिला मांत्रिकाकडून १४ कोटी रुपयांना गंडा घालण्याची घटना पुण्यात नुकतीच घडली. त्या दांपत्याच्या दोन्ही मुली दुर्धर मानसिक आजाराने त्रस्त होत्या. “माझ्या अंगात शंकर महाराज येतात, त्यातून तुमच्या मुलींना बरे करू”, असे सांगत या दांपत्याची फसवणूक करत त्यांचे सर्वस्व लुटले गेले. मुंबईत पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत एका म्हातार्‍या माणसाला लुटले गेले. अहिल्यानगर येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ केंद्राच्या नावाखाली मनशक्तीच्या जोरावर चमचे वाकवण्याचा दावा करणार्‍या माधव गवई या भोंदूने ‘आर्ट ऑफ लिव्हिंग इन्ट्युशन’ कोर्स केल्यावर मुलांची अंत:शती वाढते आणि ती मुले चमच्याशी बोलून त्याला वाकायला सांगतात असा दावा केला आहे. अशा आधुनिक विज्ञानाची भाषा वापरत अवास्तव दावे करणार्‍या छद्म विज्ञानी त्याचबरोबर देवी अंगात येणे, भूत, भानामती, करणी, दैवी चमत्काराचे दावे करत बुवाबाजी करणार्‍या घटना आजकाल देशभरात सर्रास घडताना दिसत आहेत. या सर्व घटना सारख्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार करणार्‍या चळवळीचे महत्त्व अधोरेखित करत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायद्याची निकड देशभरात किती आहे हेही दाखवत आहे.

महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळीचा प्रभाव, दबावही आहे पण कायदा होऊन या कायद्यांंतर्गत गेल्या १२ वर्षांत दोन हजारांपेक्षा अधिक गुन्हे महाराष्ट्रात नोंदवले जाऊन,  शेकडो सर्वधर्मीय बाबा-बुवांना तुरुंगाची हवा खावी लागून, २० पेक्षा अधिक नरबळीच्या घटना वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे टळल्या जाऊनही  गेल्या १२ वर्षांत कोणत्याही सरकारला याचे नियम करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. त्याचे नियम व्हावेत आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एक सर्वसमावेशक राष्ट्रीय कायदा देशभरात व्हावा ही मागणी अंनिसने सातत्याने लावून धरली आहे. त्याच अनुषंगाने या वार्षिक अंकात आम्ही नितीश नवसागरे यांचा राष्ट्रीय पातळीवरील कायद्याची आवश्यकता व त्याचे स्वरूप कसे असावे याचे प्रतिपादन करणारा लेख देत आहोत.

आपल्याकडे चार्वाक, बुद्धापासून ते फुले आंबेडकर, डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यापर्यंत धर्मचिकित्सेची समृद्ध परंपरा आहे. त्याच परंपरेचा वारसा घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपल्या कार्यक्रमात धर्माची कृतिशील विधायक चिकित्सा हे सूत्र समाविष्ट केलेले आहे. धर्माची कृतीशील विधायक चिकित्सा म्हणजे धर्मावरील टीका, टिंगल नव्हे, तर आजच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीशी सुसंगत असलेला पारंपारिक दृष्टिकोनापेक्षा वेगळा, आधुनिक  वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे धर्मातील रूढी, प्रथा, परंपरा, कर्मकांडे, सण समारंभ यांचा गांभीर्याने आणि जबाबदारीने केलेला  विचार आणि त्याप्रमाणे केलेली कृती. देव आणि धर्माला विरोध न करता संविधानिक मूल्यांसाठी आवश्यक ती धर्मचिकित्सा अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आलेली आहे. आजकाल धर्म, धार्मिक भावना यांना फारच महत्त्व आलेले आहे. धर्मासंबंधाची कठोर जाऊ देत पण विधायकपणे केलेली चिकित्साही मान्य केली जात नाही. धार्मिक भावना दुखावल्याच्या नावाखाली प्रचंड गदारोळ माजवला जात आहे. धार्मिक भावनांचे रूपांतर धर्मांधतेत होत आहे. पारंपरिक धार्मिक प्रथा, परंपरा, अनिष्ट रूढी, अवैज्ञानिक कर्मकांडांचे उदात्तीकरण यांना अक्षरश: ऊत आलेला आहे. सण, समारंभाच्या बाजारीकरणाने कळस गाठलेला आहे. धर्म आणि शासनसंस्था यातील सीमारेषा पुसट होत चाललेली आहे. त्यामुळे धर्मचिकित्सेला खीळ बसलेली आहे. अशा वेळेस आपण ज्या समाजसुधारकांचा वारसा मानतो त्यांनी अशाच परिस्थितीला तोंड देत आपले विचार मांडले होते. म्हणूनच आम्ही या समाजसुधारकांच्या धर्मचिकित्सेच्या विचारांचा मागोवा घेण्यासाठी परिसंवाद आयोजित केला आहे. यात म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, आगरकर, हमीद दलवाई यांच्यासह ख्रिश्चन धर्मातील समाजसुधारकांनी केलेल्या धर्मचिकित्सेचा मागोवा मान्यवर अभ्यासक, लेखक, कार्यकर्ते यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका मांडणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा लेखही संपादित स्वरूपात आम्ही देत आहोत. आजच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा परिसंवाद वाचकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]