राजीव देशपांडे -
मागील दशकभर आपण भारतातील तमाम प्रसारमाध्यमांतून जगातील तिसर्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या विकसित भारताच्या जाहिराती पहात असतो. फक्त भौतिकच नव्हे, तर भारताच्या आध्यात्मिक शक्तीचा प्रभावही भारताला विश्वगुरुच्या पदाला कसा पोहोचवणार आहे याची रसभरीत वर्णने ऐकत असतो. तेवढ्यात २ जुलै रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे ‘भोलेबाबा’ नावाने प्रसिद्ध असलेल्या बाबाच्या तथाकथित सत्संगाच्या वेळेस त्या बाबाची पायधूळ मस्तकाला लावण्यासाठी उधळलेल्या झुंडीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येते आणि या भौतिक, आध्यात्मिक पुढारलेपणाच्या भ्रामक प्रचाराचा फुगा फुटून जातो आणि भारतीय जनमानसातील बुवाशरण मानसिकतेचे भीषण वास्तव लख्खपणे पुढे येते.
तसे हे चेंगराचेंगरीचे प्रकार आपल्या देशात अपवादात्मक आहेत असेही नाही. प्रयागराज, नाशिक कुंभमेळा, रतनगडाचा नवरात्र उत्सव, गोदावरी पुष्कर, शबरीमला, चामुंडादेवी, मांढरदेवी, नैनादेवी, खारघर येथे झालेला पुरस्कार वितरण सोहळा यांसारखी अनेक उदाहरणे देता येतील. अशा आयोजनांच्या वेळेस पाळावयाच्या अटी, नियम, उपाययोजना आयोजकांना किती कडकपणे प्रशासनाने पाळावयास लावल्या वगैरे बाबी गैरलागू ठरतात. कारण, प्रशासकीय व्यवस्थेवरही या बुवाशरण मानसिकतेचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे प्रशासनाने परवानगी कशी दिली, वगैरे प्रश्न गैरलागू ठरतात. एखाद्या मानव अधिकारासंदर्भात किंवा राजकीय, सामाजिक प्रश्नांवर सभा असेल तर प्रशासन अगदी त्रासदायक ठरेल इतके लक्ष ठेवते. कोण बोलणार, काय बोलणार? संविधानाविरोधी काही बोलले जाते काय? मात्र या बुवा-बाबांच्या अशा सत्संगात अनेक अवैज्ञानिक अंधश्रद्धा पसरविणारे दावे केले जातात जे संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार या मूल्याच्या विरोधात असतात. हे सत्संग म्हणजे जनतेची मठ्ठ, सनातनी मानसिकता निर्माण करणारे कारखानेच आहेत. पण याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.
हा भोलेबाबा पूर्वी पोलीस दलात होता. त्याच्यावर फसवणूक, विनयभंगाचे गुन्हे होते, त्याचे आलिशान आश्रम, चैनबाज राहणी, त्यांना कोण, कसे पैसे पुरविते, त्यांची खासगी सेना, ते बाळगत असलेली गुप्तता, त्यांचे राजकीय लागेबांधे वगैरेबद्दल या बुवाशरण मानसिकतेला काहीच देणे-घेणे नसते. भारतातील आसाराम, रामरहीमसारख्या बहुसंख्य बुवा-बाबाची पार्श्वभूमी अशीच आहे हे अगदी सिद्ध होऊनही त्यांचे लाखो भक्त त्यांची पायधूळ मस्तकी लावण्यासाठी आपला जीव पणाला लावत असतात.
पण ही बुवाशरण मानसिकता काही आपोआप घडत नसते. त्यापाठी अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय, मानसिक कारणे आहेत. आज प्रत्येक वस्तू, सेवांचे होत असलेले अनिर्बंधित बाजारीकरण आणि त्यातून निर्माण होणारे जनतेच्या आरोग्याचे, शिक्षणाचे, रोजगाराचे प्रश्न. प्रत्येक प्रश्नाचे, सण, समारंभ, सांस्कृतिक परंपरा यांचे होत असलेले धर्मांधीकरण यातून परधर्माबद्दल निर्माण केला जात असलेला पराकोटीचा द्वेष. (या संदर्भात नुकत्याच घडलेल्या दोन घटनांचा उल्लेख करायला पाहिजे… विशाळगडावरील अतिक्रमण हटाव आंदोलनाप्रसंगी या अतिक्रमणाशी कोणताही संबंध नसलेल्या गजापूर गावातील मुसलमानांच्या घरावर केलेले हल्ले आणि उत्तर प्रदेशातील कावड यात्रेच्या मार्गावरील हॉटेल, खाण्यापिण्याच्या स्टॉलबाहेर त्यांच्या मालकाच्या नावाच्या पाट्या लावण्याचा उत्तर प्रदेश, उत्तराखंड सरकारचे आदेश… हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्थगित ठेवला.) अशा प्रकारच्या घटनातून समाजात कमालीची असहाय्यता, असुरक्षितता निर्माण होत आहे, जी या बुवाशरण मानसिकतेला पोषक ठरत आहे. आजच्या सत्ताधार्यांचे वर्तनही या मानसिकतेला खतपाणी घालणारेच आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपती नव्हत्या, पण अनेक बुवा, महाराज, धार्मिक नेते मात्र ठळकपणे चमकत होते. रामरहीमसारख्या खुनाची शिक्षा भोगत असलेल्या बाबाला वारंवार मिळत असलेले पॅरोल. भोलेबाबाने आयोजित केलेल्या सत्संगात १२३ बळी जाऊनही त्याच्यावर कारवाई तर नाहीच, पण त्याचे नावही ‘एफआयआर’मध्ये नाही. सरकार आणि हे बुवा-बाबा यांच्या अशा साट्यालोट्यामुळे या बुवा लोकांची हिंमत भलतीच वाढली आहे आणि हे स्वत:ला कायद्यावर समजू लागले आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजातून ही बुवाशरण मानसिकता नष्ट करण्यासाठी सततच बुवाबाजीविरोधात प्रत्यक्ष संघर्ष, प्रबोधन करत आलेली आहे. आता महाराष्ट्रात शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या अथक प्रयत्नाने करण्यात आलेला जादूटोणा विरोधी कायदाही आहे. इतर सामाजिक, आर्थिक राजकीय प्रश्न तसेच ठेवत केवळ कायद्यामुळे ही मानसिकता नष्ट होईल असा डॉक्टर दाभोलकरांचाही कधी दावा नव्हता. आव्हान खूप मोठे आणि व्यापक आहे याची त्यांना कल्पना होतीच. आज त्याहूनही मोठे आव्हान अंनिससमोर उभे आहे. पण बुवाबाजी विरोधातील संघर्षातील कायदा एक हत्यार तर नकीच आहे. त्याचा नकीच फायदा होतो असा प्रत्यक्ष अनुभव अंनिसचे कार्यकर्ते आज घेत आहेत. हाथरस प्रकरणानंतर राज्यसभेतील चर्चेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करावा, अशी मागणी केली आहे. देशभरातील डाव्या आणि पुरोगामी संघटनांना साथीला घेत या मागणीचा पाठपुरावा करत जादूटोणा विरोधी कायदा देशभर लागू करावा यासाठी प्रयत्न करण्याची प्रतीज्ञा करणे हीच शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त वाहिलेली आदरांजली ठरेल…
प्राचार्य व. न. इंगळे यांचे देहदान
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे माजी जनरल सेक्रेटरी व माजी प्राचार्य व. न. इंगळे सर यांचे दिनांक २५ जुलै २०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बार्शी शाखेचे स्थापनेपासूनचे मार्गदर्शक व सल्लागार होते.
अंनिसच्या सुरुवातीच्या काळापासून भोंदूबुवा यांच्या विरुद्धच्या मोहिमेमध्ये ते नेहमी अग्रेसर असायचे. प्राचार्य व. न. इंगळे सरांनी आपला मृतदेह मेडिकल कॉलेज साठी दान दिलेला आहे. इंगळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या दुःखामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहभागी आहे.
शिवमती अलका प्रकाश भोईटे यांचे निधन
गडहिंग्लज येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. प्रकाश भोईटे यांच्या पत्नी अलकाताई यांचे बुधवार दिनांक ३ जुलै रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.
त्या अनेक वर्षांपासून गडहिंगलज विभागातील सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय सहभाग घेणार्या, अत्यंत लढाऊ वृत्तीच्या रणरागिनी होत्या. जिजाऊ ब्रिगेडच्या माजी जिल्हा अध्यक्षा, केंद्रीय सदस्या आणि माजी विभागीय अध्यक्षा होत्या. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीत फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भावपूर्ण आदरांजली. आम्ही सर्व कार्यकर्ते भोईटे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.