विवेकवादाचा इतिहास आणि महत्त्व

टी. बी. खिलारे -

‘अंनिस’च्या सर्व कार्यकर्त्यांनी विवेकवाद समजून घेतला पाहिजे, यासाठी सतत आग्रही राहिलेले, त्यासाठी अभ्यास शिबिरे आयोजित करणारे, ‘अंनिवा’चे सहसंपादक, शास्रज्ञ टी. बी. खिलारे यांचे दु:खद निधन झाले. त्यांनी 8 वर्षांपूर्वी विवेकवादाची ओळख करून देणारा हा लेख वार्तापत्रात लिहिला होता. आज वार्तापत्र विभागाचा आमचा एक सच्चा साथी आमच्यातून निघून गेला, याचे आम्हास अतिव दु:ख होत आहे. खिलारे यांना आदरांजली म्हणून हा त्यांचा लेख… – संपादक मंडळ

‘रॅशनॅलिझम’ (Rationalism) या शब्दाचा शब्दकोषातील अर्थ आहे, आपले विचार, मत, समजुती आणि आपली कृती, वर्तणूक या गोष्टी धार्मिक श्रद्धा, धर्मग्रंथ, धर्मगुरू किंवा थोर व्यक्ती व भावना यांच्या आधारे न स्वीकारता त्या ‘रीझन’च्या (Reason) आधारावर स्वीकारण्याची सवय किंवा तत्त्व.

मानवामध्ये सत्य-असत्य, चांगले-वाईट, चूक-बरोबर, न्याय-अन्याय इत्यादींमध्ये भेद ओळखण्याची शक्ती आहे, त्यास आपण ‘रिझनिंग पॉवर’ (तर्कशुद्ध विचार करण्याची शक्ती) म्हणतो. ‘रॅशनॅलिझम’चा म्हणजेच विवेकवादाचा अर्थ स्पष्ट करण्याचा सुलभ उपाय म्हणजे ‘रीझन’च्या म्हणजेच विवेकाच्या विरुद्ध कोणत्या गोष्टी आहेत, ते पाहणे.

विवेकाचा पहिला विरोध आहे श्रद्धेला-धर्मश्रद्धेला-धर्मग्रंथांना, ज्यात सत्य असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. कोणतेही विधान सत्य आहे, याची खात्री त्या विधानाला कितपत वैज्ञानिक पुरावा आहे, हे करून करावी. ज्याच्या विरुद्ध पुरावा आहे, ते विधान असत्य मानावे आणि त्याचा त्याग करावा. धार्मिक गोष्टींना (उदा. चमत्कार, मृत्यूनंतरचे जीवन किंवा पुनरागमन – जसे येशू ख्रिस्ताचा पुनर्जन्म, प्रार्थनेचे सामर्थ्य इत्यादी) विवेकाचा आधार मिळत नसल्याने अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये.

विवेकाचा दुसरा विरोध ‘फिलिंग्ज’ किंवा भावना यांना आहे, असे म्हटले जाते. मानवी जीवनात भावनांचे महत्त्व फार आहे, हे विवेक नाकारत नाही. तो फक्त एवढेच म्हणतो की, भावना हे आचार-विचारांचे नियामक तत्त्व होऊ शकत नाही. भावनांना आपल्या विचारांचे-जीवनाचे स्वामित्व देणे योग्य नाही. क्रोध, भय, प्रेम आदी भावनांना आवरणारी शक्ती म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची शक्ती. केव्हा, कोणत्या भावनेला वाव द्यायचा, याचा निर्णय विवेकाने घ्यावा. पेरियार यांच्या मतानुसार दयाळूपणा, इच्छा, प्रेम, वासना, मैत्री, लैंगिक आकर्षण, सेक्सची आवड-नावड इत्यादी गोष्टी व्यक्तीच्या खाजगी बाबी आहेत. या गोष्टींबद्दल चर्चा करू नये, त्या कुणी कुणावर लादू नयेत किंवा त्याबद्दल तिसर्‍या व्यक्तीने काही ठरवू नये. प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार, वृत्तीनुसार व त्याला वाटणार्‍या समाधानानुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.

विवेकाचा तिसरा विरोध आहे, चुकीच्या वर्तणुकीला, अयोग्य कृतीला. चोरी, हिंसा, खून, शोषण, अन्याय, अत्याचार, कर्मकांड-रूढी-परंपरा यानुसार केलेली कर्मेआदी गोष्टींना विवेकाचा विरोध आहे. परंपरेने प्रस्थापित झालेली सांस्कृतिक मूल्ये विवेकवादी व्यक्तींना स्वीकारणीय वाटत नाहीत. जी मूल्ये स्वीकारणीय वाटतात, ज्या नैतिक परिमाणाप्रमाणे ते जगतात व जी नैतिक परिमाणे (moral standards) दुसर्‍याच्या पसंतीस उतरताना ती मूल्ये विवेकावर आधारित असली पाहिजेत. एखादी कृती चांगली की वाईट, याचा निर्णय तिचे अंतिम परिमाण विचारात घेऊन घेतला जावा. अशा कृतींचा मानवीय गरजा भागविण्यात कितपत सहभाग आहे किंवा सर्वसाधारण सुख (happiness) व आनंदी जीवनाची पातळी (well-being) वाढते आहे की नाही, हे ठरवून निर्णय घेतला जावा. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त हित पाहून आपली कृती ठरवावी.

विवेकवादाचे हे तत्त्व आज जे प्रस्थापित झाले आहे, त्यामागे बराचसा इतिहास आहे. आधुनिक विज्ञानाच्या जन्मानंतर (16 व 17 वे शतक) हळूहळू ही तत्त्वे प्रस्थापित झालेली आहेत. ती प्रस्थापित होण्यामागे बर्‍याच तत्त्वज्ञांचा, सुधारकांचा व वैज्ञानिकांचा हिस्सा आहे. विवेकवादाच्या विचारधारेचे दोन प्रमुख काळ इतिहासात होऊन गेले – 18 व्या शतकातला इंग्लंड आणि फ्रान्समधला काळ व 19 व्या शतकातील सुरुवातीचा जर्मनीमधील काळ. आधुनिक विज्ञानाच्या अभ्यासाला खरी सुरुवात 16 व्या शतकात झाली; 17 व्या शतकात ती रूजली. याच काळात अनेक विचारवंत सत्य शोधण्याच्या पद्धतीचा विचार करू लागले. ख्रिश्चन धर्माचा पगडा युरोपमध्ये जबरदस्त होता. पारंपरिक ख्रिश्चन जग हे अविवेकी (irrational) आहे, या निष्कर्षापर्यंत काही विचारवंत आले. वैज्ञानिक शोध लावण्यासाठी पूर्वीच्या आधारभूत ग्रंथांचा आश्रय घेतला जात असे. फ्रान्सिस बेकन (1561-1626) याने वैज्ञानिक तपासणीतून या आधारभूत मानल्या गेलेल्या ग्रंथांना वगळले व प्रयोगातून निष्कर्ष काढण्याची पद्धत शोधून काढली. रेने देकार्त (1596-1650) या तत्त्ववेत्त्याने तत्त्वज्ञानात आधारभूत मानल्या गेलेल्या ग्रंथास वगळून विवेकाला महत्त्व दिले. त्या काळी बुद्धिवंतांमध्ये सर्वसाधारण प्रवृत्ती अशी होती की, धर्मगुरू, धार्मिक ग्रंथ, मूलभूत मानले गेलेले इतर संदर्भग्रंथ यांच्या जागी विवेकाची स्थापना करणे. 18 व्या शतकाच्या सुरुवातीला ‘निसर्ग हा नियमबद्ध आहे आणि यातील व्यवहार हे नियमानुसार यांत्रिकी पद्धतीने चालतात,’ या रेने देकार्त व आयझॅक न्यूटन (1642-1727) यांनी पूर्वी काढलेल्या निष्कर्षाला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळाली. याचा परिणाम म्हणून चमत्कार म्हणजे ‘निसर्गात अतिनैसर्गिक शक्तीने केलेला हस्तक्षेप’ ही कल्पना विचारी माणसांना स्वीकारणे कठीण होऊ लागले. नैसर्गिक घटनांचे स्पष्टीकरण निसर्गनियमांनी देता येते, तर हाच नियम धर्माचा उगम, धार्मिक ग्रंथातील लिखाण आणि चर्च यांनाही का लावण्यात येऊ नये? विवेकवादी व्यक्तींना वाटले की, होय, याही क्षेत्रात निसर्गनियमाद्वारे स्पष्टीकरण मिळवले पाहिजे. ईश्वराने प्रेषितापुढे ज्ञान प्रकट केले असून त्याच्या शब्दांचा श्रद्धेने स्वीकार केला पाहिजे, ही पूर्वीची कल्पना मागे पडली आणि प्रत्येक गोष्टीची reason च्या सहाय्याने शहानिशा करून तिला पटेल अशाच गोष्टी स्वीकारणीय आहेत, ही कल्पना हळूहळू प्रस्थापित झाली. नैसर्गिक घटनांचे कारणांनी स्पष्टीकरण करणे, ही मानवाने आतापर्यंतच्या इतिहासात घेतलेली मोठीच झेप होती. धार्मिक ग्रंथात सांगितलेल्या, आधारभूत मानल्या गेलेल्या गोष्टींना विवेकवादी लोकांचा विरोध होता. परंतु निसर्गातील घटनांमध्ये ईश्वर हस्तक्षेप करीत नसला, तरी सृष्टीचा निर्माता व सृष्टीमध्ये नियमबद्धता ठेवणारा म्हणून त्यांचा ईश्वरावर विश्वास होता, असे मत असणार्‍यांमध्ये इंग्लंडमधील जॉन टोलंड (1670-1722) आणि मॅथ्यू टिंडल (1657-1733) बायबलमधील चमत्कार आणि गूढता नाकारली; तर फ्रान्समध्ये व्होल्टेअर (1694-1778) हे विवेकवादी होते. परंतु त्यांचा ईश्वराविषयीचा विश्वास थोड्याच काळात नाहीसा झाला. ब्रिटनमध्ये डेव्हिड ह्युम (1711-1776) आणि फ्रान्समध्ये पॉल हेन्री हॉलबाख (1723-1789) यांनी ईश्वरावरील श्रद्धेला विवेकाचा आधार मिळत नाही, असा युक्तिवाद केला. होलबाख याने 1770 मध्ये सिस्टिम ऑफ नॅचर (System of Nature) हा ग्रंथ लिहिला. त्यात त्याने ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व नाकारले.

इंग्लंडमध्ये 18 व्या शतकात विवेकाच्या आधारे सर्व गोष्टींकडे पाहण्याचे तत्त्व इतक्या घट्टपणे रूजले की, ईश्वराचा अभ्यास करणारे देखील आपला युक्तिवाद श्रद्धेऐवजी विवेकाच्या आधारे करू लागले. विवेकाच्या आधारे युक्तिवाद करण्याच्या या प्रक्रियेमुळे सामान्य लोकांमध्ये असलेल्या चेटूकविद्येसारख्या विषयावरही त्याचा बदल जाणवला. सुशिक्षित व विचारी लोकांमध्ये असलेली चेटकिणीबद्दलची समजूत नाहीशी व्हायला लागली. अनेक चेटकिणींना चेटकीण समजून जाळण्यात येत असे. फ्रान्स आणि हॉलंडमध्येही चेटकिणीवरचा विश्वास कमी व्हायला लागला. आधुनिक विज्ञान आणि आधुनिक तत्त्वज्ञानामध्ये जसजशी सुधारणा होऊ लागली, तसतशा लोकांमधील या प्रकारच्या अंधश्रद्धा कमी व्हायला लागल्या. 17 व्या शतकातील इंग्लिश विचारवंत थॉमस हॉब्ज (1588-1679) याने विवेकवादी विचाराला चालना दिली. त्याने नीतीला धर्मापासून वेगळे केले. फ्रान्समध्ये दिदेरो (1713-1784) याने पहिल्या विश्वकोशाची (Encyclopedia) रचना केली. त्या काळातील सर्व विचारवंतांनी विश्वकोष लिहिण्यात आपले योगदान दिले. ज्ञानाचे वर्गीकरण केले. अंधश्रद्धा आणि ज्ञान यात फरक केला. दिदेरोला 17 पुस्तकांचा संच लिहिण्यास व संपादित करण्यास (1751-1772) 21 वर्षे लागली. (मजकुरासाठी 14 वर्षे, नंतर चित्रे व पुरवणी मजकूर जोडण्यासाठी 7 वर्षे). विवेकवादाचा अर्थ 18 व्या शतकात फ्रान्समध्ये विश्वकोषकार म्हणून प्रसिद्ध पावलेल्या तत्त्वज्ञानाच्या लिखाणात व्यक्त झाला. या तत्त्वज्ञांपैकी व्होल्टेअर, दिदेरो, एलेंबर्ट आणि होलबाख हे प्रमुख असून ते सर्व स्थूलमानाने जडवादी, विज्ञानवादी आणि श्रद्धाविरोधी होते.

दुसरी विवेकवादाची लाट 19 व्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनीमध्ये आली. या चळवळीमध्ये अग्रभागी होते जॉर्ज हेगेल (1770-1831). हेगेलच्या प्रभावाखाली काही विचारवंतांच्या संघांनी बायबलवर जोरदार टीका केली. डेव्हिड स्ट्रॉस (1808-1874- The Life of Jesus, critically examined-3 volumes) व फर्डिनंड बाऊर (1792-1860;- Paul- postle of Jesus Christ; History of Christian Church- 5 volumes) यांनी बायबलमधील नैसर्गिक घटनांचे व्यवस्थित स्पष्टीकरण करून त्या पुराणकथा आहेत, हे दाखवून दिले. यामुळे ख्रिश्चन जगतात एकच खळबळ उडाली. कारण बायबलमधील घटना म्हणजे ऐतिहासिक सत्य मानले जायचे. स्ट्रॉसच्या विचारधारेला पुढे अशीच चालना मिळत गेली आणि लुडवी फ्युईरबाख (1804-1872- Essence of Christianity) यांनी सांगितले की, ईश्वराची कल्पना ही माणसाच्या इच्छेतून आणि गरजेतून निर्माण झालेली आहे. ‘मनुष्याची उत्पत्ती ही ईश्वराने केली आहे,’ या बायबलमधील कल्पनेवर विवेकवाद्यांनी टीका केली होती. या टीकेला डार्विनच्या ‘ओरिजीन ऑफ स्पेशीज’ (Origin of Species) या 1859 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाने बळकटी मिळाली. पृथ्वीवरील माणसाच्या उत्पत्तीचे कारण ईश्वर नसून, तो इतर लहान-लहान पेशींपासून उत्क्रांत होत होत बनला आहे, असे त्याचे नैसर्गिक स्पष्टीकरण मिळाले.

जेरेमी बेंटम (1748-1832) व जॉन स्टुअर्ट मिल (1806-1873) यांनी एथिकल रॅशनॅलिझमचा (Ethical rationalism) पाया रचला. ही तत्त्वे ‘उपयोगितावाद’ या नावाने तत्त्वज्ञानात प्रसिद्ध आहेत. 19 व्या शतकाच्या अखेरीस व 20 व्या शतकाच्या सुरुवातीस विवेकवाद हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जाऊ लागला. आजचे विवेकवादी जेव्हा विवेकाचा वापर दैनंदिन जीवनात करावा, असे म्हणतात, तेव्हा त्यांचा विरोध व्यक्तिसापेक्षता, गूढवाद, अधिकारी व्यक्ती (धर्मगुरू, बुवा-बाबा-माता यांनी सांगितलेले उपदेश-प्रवचन), धर्मग्रंथात सांगितलेले ज्ञान, रुढी-परंपरा व धर्मश्रद्धांना असतो. आपल्या समजुती, आपले विचार हे पुराव्यावर (evidence) आधारलेले पाहिजेत. ते व्यक्तीचे पूर्वग्रह, भावना, इच्छा किंवा परंपरा-रुढी, धर्मश्रद्धा यावर आधारलेले नसावेत, असा विवेकवाद्यांचा आग्रह असतो. आपले कर्तव्य काय आहे व आपल्या कृतीचा अंतिम परिणाम जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख साधण्यात आहे का, हे पाहून आपली कृती व वर्तणूक ठरवावी. विवेकी मनुष्य न्यायनिष्ठ व वैज्ञानिक दृष्टी असलेला असतो.

(अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, फेब्रुवारी 2012 अंकातून साभार.)