डॉ. हमीद दाभोलकर -
आधुनिक उपचारांवर टोकाची टीका करणारी, केवळ ध्यानधारणेने आजार दूर होऊ शकतात, असे दावे करणारी व्यक्ती स्वत: आजारी पडल्यावर आधुनिक वैद्यकशास्त्राची मदत घेत असेल, तर या दाव्यांची सार्वजनिक चिकित्सा करणे आपले कर्तव्य ठरते…
‘सद्गुरू’ नावाने ओळखले जाणारे जग्गी वासुदेव यांना १७ मार्च रोजी मेंदूत रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागले. रक्तस्राव होण्याच्या जवळपास एक आठवडा आधीपासून रक्तदाब वाढल्यामुळे त्यांचे डोके दुखत होते. त्यांनी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. दुखणे बळावल्यामुळे त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केल्याची माहिती ‘ईशा फाऊंडेशन’ने दिली. दिल्लीमधील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शस्त्रक्रिया आणि इतर औषधोपचारांनी त्यांचा त्रास आटोक्यात आणण्यात आला. चांगली गोष्ट अशी की, आता त्यांची प्रकृती उत्तम आहे आणि त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
एखाद्या व्यक्तीचे आजारपण ही त्याची खासगी बाब आहे. त्याविषयी सार्वजनिक चर्चा करू नये, असा संकेत आहे, पण जर हे आजारपण आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून मिळणार्या उपचारांवर टोकाची टीका करणार्या, डॉक्टरकडे जाण्याची काहीही गरज नाही, केवळ ध्यानधारणेने मेंदूचे आजार दूर पळवले जाऊ शकतात असे दावे करणार्या व्यक्तीचे असेल आणि त्या व्यक्तीला आपल्या शिष्यांना दिलेल्या सल्ल्याच्या विरोधात स्वत:च आधुनिक वैद्यकशास्त्राची मदत घ्यावी लागत असेल, तर मात्र त्याची सार्वजनिक चिकित्सा करणे आपले कर्तव्य ठरते.
माणूस जसजसा सुशिक्षित होईल, तशा अंधश्रद्धा आपोआप गळून पडतील, मग अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य स्वतंत्रपणे करण्याची गरज काय, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जग्गी वासुदेव आणि त्यांचे पाठीराखे यांच्यावर नजर टाकली तर या प्रश्नाचे उत्तर सहज मिळते. जग्गी वासुदेव यांचे बहुतांश शिष्य हे उच्चशिक्षित आहेत. स्वत: जग्गी वासुदेव अस्खलित इंग्रजी बोलतात. एवढेच नव्हे, इंग्रजी भाषेत ज्याला स्लँग म्हणजे शिवराळ भाषा म्हणतात त्यातील काही शब्दही ते अनेकदा वापरतात. ते थेट चमत्कारांचा दावा करत नसले, तरी जागोजागी अशास्त्रीय विधाने करताना दिसतात. ही विधाने करताना ते भाषा मात्र आधुनिक विज्ञानातील वापरतात. ब्रेन, हार्मोन, न्युरॉन अशा आधुनिक विज्ञानातील अनेक संज्ञा त्यांच्या बोलण्यात येतात. हे शब्द केवळ वैज्ञानिकतेचा आभास निर्माण करण्यासाठी वापरलेले असतात. जसे विज्ञानाच्या नावावर अंधश्रद्धा पसरविणारे ‘छद्मविज्ञान’ हे केवळ विज्ञानाची परिभाषा वापरते, पण विज्ञानाची कार्यपद्धती वापरत नाही, तसेच जग्गी वासुदेव यांचे बोलणे असते.
आपण सांगत असलेल्या ध्यान पद्धतीने मेंदूतील पेशींचे २४० टके अधिक पुनर्निर्माण होते, असा दावा ते करतात. ज्या ध्यानधारणा पद्धती ते सांगतात त्या वापरल्यास शरीर स्वत:च स्वत:ला बरे करते, डॉक्टरकडे जाण्याची वेळ येत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. आता यातील प्रत्येक दाव्यात थोडेबहुत तथ्य आहे. जसे, मानवी शरीराची स्वत:ची प्रतिकारशक्ती असते आणि सौम्य दुखणी बरी करण्यासाठी केवळ त्या प्रतिकारशक्तीला बळ देणे उपयोगी पडते, हे खरेच आहे. अगदी तीव्र आजारातदेखील कसलेले डॉक्टर या मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीचा उपयोग रुग्णाला बरे करण्यासाठी करून घेण्याचा प्रयत्न करतात, पण याचा अर्थ मानवी शरीर स्वत:चे स्वत: बरे होते आणि डॉक्टरकडे जाण्याची गरज भासत नाही, असा होत नाही!
सद्गुरू इंग्रजीत संभाषण करतात, सर्वज्ञानी असल्याचा आव आणतात, त्यामुळे भारावून गेलेले लोक मग सद्गुरू सांगतील ते खरे मानून चालतात. या सगळ्याचा तोटा असा होतो की, शारीरिक त्रासाची लक्षणे असूनही तज्ज्ञ डॉक्टरला दाखवण्याची गरज असतानादेखील केवळ सद्गुरूंनी सांगितले आहे म्हणून अनेक लोक आपले दुखणे अंगावर काढतात. परिणामी आजार बळावतो. आजाराचे दुष्परिणाम संबंधित व्यक्तींना भोगावे लागतात. स्वत: जग्गी वासुदेव यांनीदेखील त्यांचे दुखणे अंगावर काढल्याने ते बळावले, असे त्यांच्या ईशा फाऊंडेशनने सांगितले आहे, पण अशा वेळी मेंदूतील पेशी ध्यानाच्या माध्यमातून स्वत:ला दुरुस्त करतील हा लोकांसाठी सांगितलेला मार्ग न अनुसरता जग्गी वासुदेव यांनी आधुनिक वैद्यकीय उपचार घेतले.
जग्गी वासुदेव यांनी उपचार घेऊन बरे होणे योग्यच होते, पण या पार्श्वभूमीवर जसे विज्ञान आपल्या चुकांची कबुली देऊन पुढील धोरण दुरुस्त करते, तसे जग्गी वासुदेव करतील याची फारशी शक्यता नाही. आताच त्यांच्या पाठीराख्यांनी- जग्गी वासुदेव हे खरे तर जगाचे कल्याण करण्यात प्रचंड मग्न असतात, त्यांच्या अनुयायांवर येणारे संकट त्यांनी स्वत:वर घेतले, त्यामुळे त्यांना त्रास झाला, असे दावे करण्यास सुरुवात केली आहे. जग्गी वासुदेव यांनी आधुनिक विज्ञानाचा आधार घेतला असला, तरी ते त्यांच्या आंतरिक शक्तीनेच बरे झाले, असेदेखील सांगण्यास सुरुवात केली आहे.
तंत्र-मंत्र, गंडेदोरे, ताईत, क्रॉस देणारे बाबा, फकीर, पाद्री यांच्या दाव्यांची चिकित्सा करणे आणि त्यातील फोलपणा दाखवणे हे तुलनेने खूपच सोपे असते, तरीही खूप लोक त्याला फसतात. जग्गी वासुदेव यांच्यासारखे खरे आणि खोटे यांचे बेमालूम मिश्रण करणारे, आधुनिक विज्ञानाची भाषा वापरून वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे अशांच्या फसवणुकीविरोधातील लढाई अधिकच अवघड आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
दुसर्या बाजूला आधुनिक विज्ञानाधारित वैद्यकीय व्यवसायातदेखील सगळे आलबेल आहे असे अजिबात नाही. रुग्ण आणि डॉक्टर यांचे संबंध कधी नव्हे इतके ताणले गेले आहेत. वैद्यकीय उपचारांचा खर्च अनेक ठिकाणी सामान्य माणसांना परवडत नाही. आधुनिक उपचार पद्धतींमध्ये अनेकदा रुग्णांच्या सांस्कृतिक जाणिवा, त्यांच्या वैद्यकीय मदत घेण्याच्या पद्धती, वैद्यकशास्त्राविषयी त्यांच्या मनात असलेले समज-गैरसमज समजून घेण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत. रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाला न हिणवता संवाद साधणे यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठा वाव आहे. पण छद्मविज्ञान आणि त्याच्या नावावर चालणारी भोंदूगिरी आणि आधुनिक विज्ञान यातील सर्वांत मोठा फरक म्हणजे आधुनिक विज्ञान हे सर्वज्ञान असल्याचा दावा करत नाही! आपल्याकडे काही विशेष शक्ती आहे किंवा ‘लाख दुखों की एक दवा आहे’ असादेखील दावा करत नाही. आधुनिक विज्ञानाच्या प्रत्येक दाव्याची चिकित्सा कोणाच्याही भावना न दुखावता करता येते जे जग्गी वासुदेव, रामदेव बाबा यांच्यासारख्या लोकांच्या बाबतीत शक्य होत नाही. अशा स्वयंघोषित बाबा-बुवांमधील रामपाल, रामरहीम, आसाराम हे आज तुरुंगात आहेत. रामदेव बाबा यांच्यावर दर आठवड्याला सर्वोच्च न्यायालय ताशेरे ओढत आहे, हे आपण विसरता कामा नये.
सरतेशेवटी अशा परिस्थितीत एक सामान्य व्यक्ती म्हणून आपण काय करावे, हा प्रश्न शिल्लक राहतो. आपण हे समजून घेतले पाहिजे की जीवनातील प्रत्येक जटिल प्रश्नाची उत्तरे विज्ञानाकडेदेखील नाहीत, पण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे आपल्या बुद्धीच्या माध्यमातून त्या गोष्टीमागचा कार्यकारण भाव समजून घेणे, ही उत्तरे शोधण्याची मानवाला उपलब्ध असलेली सर्वांत उपयुक्त आणि प्रभावी पद्धत आहे. यापलीकडे मानवी बुद्धीला जी कोडी आज सुटत नाहीत, अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात आणि आजूबाजूला शिल्लक राहतात. त्यांना जादुई उत्तरे शोधण्याऐवजी शास्त्रीय दृष्टीने जितके शक्य आहे तितके करणे आणि जे शक्य नाही त्याचा आहे तसा स्वीकार करणे हे कौशल्य शिकणे आपल्यातील प्रत्येकाला शक्य आहे. गाडगेबाबा म्हणत त्याप्रमाणे, ‘माह्या कोणी गुरू नाही आणि मी कुणाचा चेला नाही!’ हे वाक्य थोडे कठोर वाटले तरीदेखील आपण ते विसरता कामा नये. ‘सद्गुरूवाचून सापडेना वाट’ ही उत्तरे शोधण्यासाठी असलेली वहिवाट सोडून विंदा करंदीकर म्हणतात, त्याप्रमाणे ‘सद्गुरूवाचून सापडेल सोय!’ हा विश्वास मनात ठेवला पाहिजे. दासाचे दासपण नष्ट होण्याचा तोच एक हुकमी मार्ग आहे.