प्रभाकर नानावटी -

जगभरातील सर्व प्राणिमात्रांमध्ये माणूसप्राणी हा इतर प्राणिवंशावर वर्चस्व गाजवित असला, तरी शारीरिकरित्या तो अत्यंत कमजोर प्राणी समजला जातो.
स्वतःच्या बुद्धिशक्तीच्या जोरावर माणूसप्राणी इतर प्राणी व वनस्पतींसकट सर्व सजीवसृष्टीवर अधिराज्य करत असला, तरी त्याच्यावरसुद्धा वरचढ ठरणारे विषाणू (व्हायरस) वातावरणात घर करून आहेत. विषाणूमधील वैविध्य, त्यांच्यातील गतिमानता व प्राणिमात्रांच्या जीवपेशीवरच हल्ला करून जीवित हानी करण्याची त्यांची कुशलता, इत्यादीमुळे विषाणू हे नेहमीच वैद्यकशास्त्राला आव्हानात्मक ठरत आहेत.
विषाणूंची रचना जनुकातील ‘डीएनए’ व ‘आरएनए’ या मूलद्रव्यापासून होत असून त्यांची वाढ व पुनरुत्पादन सजीवातील जिवंत पेशीत होत असते. त्यांच्या कायमच्या अस्तित्वासाठी पोशिंद्याच्या स्वरूपात परजीवी जिवंत पेशींचा आश्रय त्या घेत असतात व बघता-बघता काही कालावधीत लाखो-करोडोंनी त्यांची वाढ होऊ लागते. त्यांचे अस्तित्व पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच जाणवत असून त्यांच्या अस्तित्वानंतर लाखो-करोडो वर्षांनी इतर प्राणिसृष्टी पृथ्वीवर अस्तित्वात आली, असा अंदाज आहे. एक मात्र खरे की अतिसूक्ष्म रोगाणू किंवा विषाणू हे पृथ्वीवरील पहिले जीव असावेत. विषाणूतूनच प्राथमिक पेशिकांची निर्मिती झाली. पर्यावरणातील विविध द्रव्यांच्या सहाय्याने या प्राथमिक पेशीतूनच क्रमाक्रमाने आधुनिक पेशींची निर्मिती झाली, असे मानले जाते.
सजीवांतील कित्येक आजारांचे मुख्य कारण म्हणून विविध विषाणू आणि अतिसूक्ष्म रोगाणू यांच्याकडे निर्देश करता येईल. हे रोगजंतू इतके सूक्ष्म असतात की, साध्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून ते दिसू शकत नाहीत. त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचाच सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो. हे रोगाणू शरीरात शिरलेल्या व्यक्तीतील रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास, ती व्यक्ती सर्दी-पडशापासून इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्ल्यू, कांजिण्या, गालगुंड, मलेरियासारख्या रोगांना लगेच बळी पडते. असे रोगाणू केवळ जिवंत पेशींमध्येच नव्या रोगजंतूंची निर्मिती करू शकतात. या रोगजंतूंचा प्रसार अत्यंत वेगाने होत राहिल्यास त्या रोगाची साथ पसरून शेकडोंनी माणसं दगावतात. या रोगजंतूंमुळे प्राणी दगावला, तर त्या रोगजंतूंचाही नाश होतो; पण प्राणी फक्त आजारी झाला आणि रोगी व्यक्तीचा दुसर्या व्यक्तींशी संबंध आला किंवा त्याचे रक्त डास आदींच्या चाव्यांमुळे इतरांच्या शरीरात गेले आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असली, तर त्याही व्यक्ती रोगाला बळी पडतात आणि अशा प्रकारे या रोगजंतूंचे अस्तित्व अबाधित राहून समाजात रोगराई फैलावू लागते.
गेली महिनाभर सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांवर चर्चेचा विषय झालेला ‘कोरोना व्हायरस’ हा संसर्गजन्य विषाणू जगभरात हल्लकल्लोळ माजवत आहे. ठिकठिकाणी जीवितहानी होत आहे, चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरत असलेला कोरोना व्हायरस आता जगभरातील अनेक देशापर्यंत पोचला आहे. ‘कोरोना व्हायरस’मुळे जगभरात ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या विषाणूचे रुग्ण चीनमध्ये पहिल्यांदा आढळल्यामुळे चीनहून येणार्या प्रवाशांची जास्त काळजी घेतली जात आहे. भारतातील विमानतळांवर सुद्धा प्रवाशांची ‘स्क्रीनिंग’ केली जात आहे. तपासणीत प्रवाशांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांना विशेष उपचार केंद्रांमध्ये पाठवण्यात येणार आहे. काही ठिकाणी विशेष वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते ‘चिनी नोव्हेल कोरोना व्हायरस’ हा रहस्यमय व्हायरस असून त्याच्यामुळे सीव्हियर अॅक्युट रेस्पायरेटरी सिंड्रोम (सार्स- एसएआरएस) होतो. यामध्ये फुफ्फुसांना गंभीर प्रकारचा संसर्ग होतो. ‘सार्स’ विषाणूंप्रमाणे आता नवीन चिनी ‘कोरोनो’ विषाणूला शेकडो संक्रमण झाले आहेत. त्यामुळे ‘सार्स’ रोगासारखे थंडी-ताप, सर्दी-खोकला, घशात दुखणे, श्वास घेण्यास अडचण इत्यादी प्रकार ‘कोरोना व्हायरस’ बाधित रुग्णामध्येसुद्धा आढळत असले तरी त्यासाठी नेमकी प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध नाही. त्यामुळे या साथीच्या रोगाविषयीची धास्ती वाढत आहे.
जरी कोरोना विषाणूंच्या संक्रमणाच्या भीतीने संपूर्ण जग धास्तावलेले असले, तरी ऋतुमानबदलामुळे होत असलेले वा वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंमधून पसरत असलेले सर्दी-पडसे, फ्ल्यू, इन्फ्लुएन्झा, न्यूमोनिया, आस्थमासारख्या रोगामुळेसुद्धा जगभर लाखो लोक मृत्युमुखी पडतात. फ्ल्यूच्या विविध प्रकारच्या रोगाणूंमुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, ‘स्वाइन फ्ल्यू’ व ‘इन्फ्लुएन्झा’सारख्या रोगप्रकारामुळे होणार्या मृत्यूची संख्या तुलनेने जास्त आहे. गेल्या शंभर वर्षांत या बाबतीतील भारतातील परिस्थितीत अजिबात सुधारणा नाही. मोठ्या प्रमाणात ही साथ पसरल्यास त्याच्या नियंत्रणाचे आपत्ती व्यवस्थापन आपण हाताळू शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या अलिकडील अहवालात जगाला भेडसावणार्या पहिल्या दहा रोगाच्या यादीत फ्ल्यू या रोगाचा वरचा क्रमांक लागतो. भारतासकट उत्तर आफ्रिकेतील राष्ट्रे, युरोप व एशिया खंडातील बहुतांश भागात ही साथ मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता त्या अहवालात वर्तविली आहे. 2009 साली सुमारे 28 हजार रुग्ण नोंदवले गेले व त्यापैकी हजार जण मृत्युमुखी पडले. गेल्या वर्षभरात सुमारे 7000 जणांचा मृत्यू ‘स्वाइन फ्ल्यू’मुळे झाला आहे. राजस्थान, दिल्ली, गुजरात राज्यात जास्त प्रमाणात माणसं या रोगामुळे मरत आहेत. इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत भारतातील मृत्यूचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. सुमारे 1 ते 2 कोटी लोक या प्रकारच्या रोगाचे बळी ठरत आहेत. जागतिक आकडेवारीनुसार हे प्रमाण सुमारे 5 टक्के आहे.
या प्रकारच्या साथीच्या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी व प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण सर्वांत उपयुक्त ठरतेे. परंतु आपल्या देशात फ्ल्यूच्या लसीकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. जागतिक आरोग्य संघटना अतिमागसलेल्या देशांना फ्ल्यूच्या लसीकरणासाठी लागणारे लस उपलब्ध करून देते. परंतु आपला देश आता मागासलेला न राहिल्यामुळे बाजारभावाने लस विकत घ्यावी लागते. अनेक वेळा जास्त किंमत देऊनही ती उपलब्ध होऊ शकत नाही; शिवाय सार्वजनिक आरोग्य हा त्या-त्या राज्याच्या अखत्यारितील विषय असल्यामुळे हवे त्या प्रमाणात लसीकरण होत नाही. देशव्यापी लसीकरण अभियान घेतल्यास फ्ल्यूमुळे बळी जाणार्यांचे; विशेषकरून गर्भिणी, बाळंतिणी व लहान मुलांचे – मृत्यूचे प्रमाण नक्कीच कमी होईल. केंद्र शासनाच्या ‘इंद्रधनुष‘ अभियान या योजनेप्रमाणे काही तुटपुंजे प्रयत्न होत आहेत. परंतु ते पुरसे नाहीत.
परंतु केवळ लसीकरणामुळे ही समस्या सुटणार नाही. कारण या रोगाचा प्रसार स्पर्श व श्वासोच्छ्वास यातूनही होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी हाताचा स्पर्श झाला तरी रोगाणू आपल्या शरीरात जाऊ शकतात. उघड्यावर खोकल्यास वा शिंकल्यास रोगाणूंची लागण होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक व वैयक्तिक आरोग्याबाबत जागृती हेही महत्त्वाचे ठरत आहे. साबण व पाणी यांचा वापर करून स्वच्छपणे हात धुणे, हा साधा उपायसुद्धा रोगप्रतिबंधक ठरू शकतो. डासांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी मच्छरदाण्यांचा वापर, हाही एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो.
आपल्या देशात कोरोनाची साथ नाही म्हणून स्वस्थ बसण्यापेक्षा ऋतुबदलामुळे होणार्या रोगांबाबत जागृत असणे व लहान-मोठ्या शारीरिक तक्रारींबाबत वेळीच उपचार करणे हितकारक ठरू शकेल. त्याचबरोबर प्रदूषण, जीवनशैली व दुर्बल रोग प्रतिकार शक्ती यासुद्धा विषाणूंच्या प्रसारात हातभार लावू शकतात, हेही लक्षात ठेवण्याची गरज आहे.
‘कोरोना व्हायरस’ची लक्षणे आणि उपाय
नवीन वर्षाच्या सुरुवातीस एक नवीन आव्हान जगासमोर उभे ठाकले आहे, एक व्हायरल इन्फेक्शन, ज्याला ‘कोरोना व्हायरस’ असे म्हटले जाते. आजूबाजूच्या देशातील सी-फूड मार्केटपासून सुरू झालेला संसर्गजन्य संसर्ग, ज्याचा डझनहून अधिक लोकांवर परिणाम झाला; तसेच छातीच्या संसर्गाच्या अज्ञात कारणामुळे नऊ जणांवर परिणाम झाला आहे. ही संख्या झपाट्याने वाढत गेली आणि डोळे मिटायच्या आत दोनशे जणांना संक्रमण झाले. त्यातील काही गंभीर अवस्थेत आहेत, तर काहींना आपला प्राण गमवावा लागला आहे.
कोरोना व्हायरस ‘सार्स’मध्ये (SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळले. सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सी-फूडपासून हा व्हायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपरिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करते, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे, तरीही आतापर्यंत यावर कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत.
संसर्गजन्य रोगांच्या पहिल्या तत्त्वांमध्ये, सर्वांत वाईट बग्स मानवी संपर्काचे चक्र तोडून किंवा निर्जंतुकीच्या स्थितीत संपर्क राखून असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला एखाद्या संसर्गाची सुरुवात झाली आहे, तर तुम्ही डॉक्टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन भेट देणे गरजेचे आहे. निदान होईपर्यंत किंवा लक्षणांचे निराकरण होईपर्यंत स्वत:ला इतरांपासून दूर ठेवा. प्रभावित क्षेत्रांचा प्रवास करणे किंवा त्या भागातील लोकांशी संपर्क साधणे केवळ सरकारी सल्लामसलत किंवा तपासल्यानंतरच करावे.
ही एक विकसित होणारी घटना आहे : आम्ही या विषयी काही ऐकले जास्त नव्हते, तसेच कोरोना व्हायरसबद्दल पुरेशी माहिती ही नाही. सावधगिरी बाळगणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे.
–डॉ. ओम श्रीवास्तव (संचालक संसर्गजन्य रोग विभाग, जसलोक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र) ‘लोकसत्ता’च्या सौजन्याने