वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हेच खर्‍या अर्थाने संविधान पाळणे आहे

-

जगभरातच निर्माण होत असलेल्या अशांत, अस्थिर, हिंसक, पर्यावरणीय संकटांच्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारीला भारतीय प्रजासत्ताकास ७६ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने देशभर ध्वजारोहण, संचलन, भाषणे मोठ्या उत्साहात झाली. संविधानाबद्दल, संविधानातील कलमांबद्दल बोलले गेले. पण संविधान ज्या मूल्यांवर उभे आहे त्या स्वातंत्र्य, समता,  बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या आजच्या स्थितीबद्दल फारसे बोलले गेले नाही. जबाबदारीची जाणीव ठेवत संवैधानिक मार्गाने, विवेकाने आपल्या प्रश्नांसाठी अभिव्यत होण्याचे स्वातंत्र्यही हिरावून घेतले जात आहे. सामजिक पातळीवर वाढते धार्मिक ध्रुवीकरण, जातीय ताणतणाव, असहिष्णुता, द्वेष वाढविणारी वृत्ती, भ्रष्टाचार, बेरोजगारी, पर्यावरणाचा होत असलेला विनाश, सण समारंभ, कर्मकांडे, रूढी, परंपरा, बुवाबाजी, शिक्षण, आरोग्य अशा प्रत्येक गोष्टींचे होत असलेले धर्मांधिकरण, बाजारीकरण आणि त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेली आर्थिक विषमता यामुळे आजची परिस्थिती आणि संवैधानिक मूल्ये यातील अंतर वाढत असल्याचे दिसत आहे. ही मूल्ये अमलात आणण्यासाठी जी लोकशाही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचे जे चार स्तंभ ज्यांना या संवैधानिक मूल्यांचे राखणदार मानले जाते, ज्यांनी मूल्यर्‍हासाविरोधात आवाज उठवायला पाहिजे ते कायदेमंडळ, प्रशासन, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे या धर्मांध आणि बाजारू वृत्तीच्या दबावाखाली वावरत असल्याचे दिसत आहे. दर पाच वर्षांनी होणार्‍या निवडणुका पैसा, सत्ता, प्रलोभने याचा अमर्याद वापर करत जिंकणे म्हणजेच लोकशाही एवढाच संकुचित अर्थ बिंबवला जात आहे अशा वेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, न्याय, सहिष्णुता ही संवैधानिक मूल्ये प्रत्यक्षात अमलात येणे म्हणजे लोकशाही हा विचार रुजविण्यासाठी विवेकी मार्गाने विज्ञानाच्या साहाय्याने संघर्ष करत राहणे हाच प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा मार्ग आहे.

२८ फेब्रुवारीला विज्ञान दिन आहे. हा दिवसही साजरा करताना आज विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल काय परिस्थिती आहे, याचा विचार केला पाहिजे. डॉ. दाभोलकर नेहमी म्हणत, आपल्या समाजाने विज्ञानाची सृष्टी घेतली आहे, पण दृष्टी घेतलेली नाही. त्यांचे हे म्हणणे आजच्या परिस्थितीला तंतोतंत लागू पडत आहे. आजच्या सत्ताधारी वर्गाकडून एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय), अंतराळ संशोधन यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानात जागतिक शती बनण्याच्या वल्गना होत असतात. आणि दुसर्‍या बाजूला देशाच्या शैक्षणिक, विज्ञान संशोधन, प्रसार माध्यमांच्या धोरणातच असे बदल करायचे की त्यामुळे  विवेकी विचारधारा, विज्ञानाची चिकित्सक, प्रश्न विचारण्याची, सत्य जाणून घेण्याची पद्धत, वैज्ञानिक दृष्टिकोन याबद्दलच प्रश्नचिन्हे उभी राहतील. तर तिसर्‍या बाजूला  सर्वोच्च पदावरील राजकीय, धार्मिक नेतृत्वाकडून सतत भ्रामक, अवैज्ञानिक दावे करत कालबाह्य परंपरा, बाजारू कर्मकांडे, अघोरी रूढी, गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेल्या आणि समाजात द्वेष, दुही पसरवणार्‍या बुवा, बाबांना प्रतिष्ठा देत वैज्ञानिक दृष्टिकोनावर हल्ले चढविले जात आहे. गणेशजींची प्लॅस्टिक सर्जरी, डार्विनच्या सिद्धांतालाच नकार, मोर आपल्या अश्रूपासून प्रजनन करतो (एका न्यायमूर्तीचा दावा), गोमूत्र, गोबर, गाईचे दूध, दही, तूप (पंचगव्य) यावरील संशोधनावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचे प्रकरण, संजीवनी बुटीचा शोध, पेशंटवर मंत्रांचा काय परिणाम होतो असे संशोधन प्रकल्प, कोणत्याही विषयात तज्ज्ञता नसणारे बाबा, बुवा लोकांची शैक्षणिक समित्यावर नियुक्ती. अशी अलीकडील काळातील अनेक उदाहरणे देता येतील.  

या आधीही हे नव्हते असे नाही, स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही असे दावे करणारे अनेक होते. या दाव्यांचा प्रतिवाद होत होता, त्याची चिकित्सा होत होती. ते दावे खोडून काढले जात होते. पण आज त्याला राजकीय, धार्मिक सत्ताधारी वर्गाचे बळ मिळत आहे. समाजाकडून प्रतिष्ठा मिळत आहे. त्यामुळे खर्‍याखुर्‍या वैज्ञानिक संस्कृतीच्या ऐवजी एक भ्रामक विज्ञानाची संस्कृती निर्माण होत आहे. परिणामी, प्रश्न विचारण्याची विवेकी चिकित्सक वृत्तीच समाजातून हद्दपार करण्याचे प्रयत्न आज चालू आहेत. 

भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य मानले गेले आहे. पण संविधानाची इतर मूल्ये आणि प्रत्यक्ष व्यवहार यात जसे अंतर पडले आहे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलही झाले आहे. त्यामुळेच हे अंतर कमी करण्यासाठी समाजातील सर्व स्तरांवर वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार, प्रसारासाठी आवाज उठवणे, कार्यरत राहणे यातच विज्ञान दिनाचे साजरेपण आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]