विवेक मॉन्टेरो -
दहा वर्षापूर्वी, २० ऑगस्ट २०१३ ला आयसान धूमकेतू संदर्भात जनप्रबोधन मोहिमेच्या राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यशाळेचे आयोजन बेंगलुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स विज्ञान संस्थेत करण्यात आले होते. तेथे ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क (एआयपीएसएन)चे देशभरातील कार्यकर्ते जमले होते. तेथेच डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाची धक्कादायक बातमी येऊन थडकली. त्याच संध्याकाळी आम्ही खालील ठराव संमत केला.
“आम्ही डॉ. दाभोलकरांच्या जीवनापासून स्फूर्ती घेत त्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार आणि प्रसाराचे व सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा व धर्मांधतेविरोधातील कार्य आणि त्यांचे आदर्श पुढे नेण्याची प्रतिज्ञा करत आहोत. आज देशातील विविध भागात धर्मांध फासिस्ट आणि दहशतवादी शक्ती धर्माच्या नावाखाली कार्यरत आहेत. त्यांना पायबंद घालण्यासाठी आणि भारतीय घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, समानता आणि लोकशाही या मूल्यांसाठी ठामपणे उभे राहात डॉ. दाभोलकरांचा संदेश देशातील प्रत्येक शाळा, शहर आणि खेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची आम्ही प्रतिज्ञा करत आहोत.
ज्यांनी गांधीजींचा खून केला ते त्यांच्या मूल्यांनां आणि विचारांना रोखू शकले नाहीत, त्याचप्रमाणे डॉ. दाभोलकरांचा भ्याडपणे खून करणारेही त्यांच्या मूल्यांनां आणि विचारांना रोखू शकणार नाहीत. आपल्या देशातील धर्मांध आणि फासिस्ट शक्तींना पराभूत करून हा मूल्यांचा लढा जिंकण्यासाठी आम्ही जनविज्ञान चळवळीत काम करणारे सर्वजण विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जनतेच्या व्यापक विभागापर्यंत पोहोचविण्यासाठी निष्ठापूर्वक आणि जोमदारपणे काम करू.”
जसा २८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून साजरा केला जातो तसाच प्रत्येक वर्षाचा २० ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनदिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा ठराव एप्रिल २०१८ मध्ये भुवनेश्वर येथे एआयपीएसएनच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला. अडघ थकध घोषवाक्य घेत २०१८ मध्ये एआयपीएसएन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी संयुक्तपणे साजरा केला गेला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा करणार्यात भर पडत असून आज देशभरातील सर्वच राज्यात हा दिवस साजरा होत आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनावरील दोन महत्वाची भाषणे याच लेखकाने इंग्रजीत भाषांतरीत केली आहेत आणि आता तीच भाषणे तामिळ, तेलगु, मल्याळम, बंगाली आणि आसामी अशा भाषांसहित इतरही अनेक भारतीय भाषात भाषांतरीत होत आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आता वैज्ञानिक दृष्टिकोनाचे राष्ट्रीय प्रतीक झाले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी दिलेल्या योगदानाचे अनेक कंगोरे आहेत. मी त्यातील काही कंगोर्यावरच प्रकाश टाकणार आहे. डॉ. दाभोलकरांचे हे महत्वाचे योगदान खालीलप्रमाणे त्यांच्याच शब्दात…
आता हा तपशील देण्याच्या आधी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, हे जर सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगायचं असेल, तर एका वाक्यात असे म्हणता येईल, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे, ‘जेवढा पुरावा तेवढा विश्वास’ म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील वैज्ञानिक दृष्टिकोन वापरतच असतो. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला आरमोरीला जायचं आहे आणि ‘आरमोरी’ हे गाव गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुठे आहे आणि तिथं कसं पोहोचायचं ?’, असा प्रश्न तुम्हांला पडला आहे. म्हणून तुम्ही एकाला विचारलंत, “काय रे, मला आरमोरीला जायचंय. कसं जाऊ?” यावर तो जर म्हणाला, “तू असं असं जा. म्हणजे आरमोरीला पोहोचशील”. त्यावर तुम्ही त्याला विचारलंत, “कशावरनं?” त्यावर समजा तो म्हणाला की, “सहा महिन्यांपूर्वी मला या मार्गाचं स्वप्न पडलं होतं आणि त्या मार्गाने मी आरमोरीला पोहोचलो होतो.” मग तोच प्रश्न तुम्ही दुसर्याला विचारलात आणि दुसरा माणूस म्हणाला, “तुम्ही असं असं गेलात, तर आरमोरीला पोहोचाल,” तुम्ही त्याला विचारलंत, “कशावरनं?” त्यावर तो म्हणाला, “दोन महिन्यांपूर्वी एस.टी. स्टँडवर एकजण़ दुसर्याशी बोलत असताना तो आरमोरीला कोणत्या मार्गाने जाऊन आला, ते सांगत होता. ते मला आत्ता जसं आठवतंय, तसं मी तुम्हांला सांगितलं.” मग तुम्ही तिसर्याला आरमोरीचा रस्ता विचारलात आणि त्याने आणखी एक मार्ग सांगितला. तुम्ही विचारलंत, “कशावरनं?” त्याने सांगितलं की, “महिन्यापूर्वी माझा एक मित्र या मार्गाने आरमोरीला जाऊन आला.” मग ज्यावेळी तुम्ही चौथ्याला आरमोरीच्या रस्त्याबद्दल विचारलंत, त्यावेळी त्याने तुम्हांला सगळा मार्ग तपशीलवार सांगितला. त्यावेळी तुम्ही त्याला म्हणालात, “बरोबर आहे. पण आरमोरीला जायचा हा मार्ग आहे, हे तुम्हांला कसं कळलं?” त्यावर तो म्हणाला की, “माझं आरमोरीला एक तातडीचं काम निघालं आणि म्हणून चार दिवसांपूर्वी या मार्गाने आरमोरीला जाऊन आलो.” आता मला सांगा, आरमोरीच्या रस्त्यासाठी तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास या चौघांपैकी कुणावर ठेवाल आणि सगळ्यात कमी विश्वास कुणावर ठेवाल? ज्याने सहा महिन्यांपूर्वी स्वप्नामध्ये आरमोरीला जाण्याचा रस्ता बघितलेला होता, त्याच्यावर तुम्ही सगळ्यात कमी विश्वास ठेवाल. एस. टी. स्टँडवर एकाने दुसर्याला आरमोरीचा मार्ग सांगताना ज्याने ऐकलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही पहिल्या माणसापेक्षा जास्त, पण तरीही कमी विश्वास ठेवाल. ज्याचा मित्र आरमोरीला जाऊन आलेला आहे, त्याच्यावर तुम्ही दुसर्यापेक्षा जास्त, पण तरीही कमी विश्वास ठेवाल. मात्र जो चार दिवसांपूर्वी स्वतःच एका विशिष्ट मार्गाने आरमोरीला जाऊन आलेला आहे, त्याच्यावर तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास ठेवाल. म्हणजे, ‘जेवढा पुरावा तेवढा विश्वास’ ही जी बाब आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो, हाच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा आहे.
या वरील उतार्यावरून नोंद घेण्यासारखी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हे त्यांचे सांगणे पूर्णत: सर्वसामान्य माणसासाठी आहे. उदाहरण प्रत्येकाला समजेल अशा भाषेत आहे. यात कुठेही विज्ञान हा शब्द नाही. सामान्यपणे विज्ञान विषय म्हणून जो समजला जातो तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. तर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आपण योग्य निष्कर्षापर्यंत कसे यावे याच्याशी संबंधित हा विषय आहे. तिसरी गोष्ट म्हणजे यातील विज्ञानाच्या पद्धतीची अतिशय सुरेख आणि संक्षिप्त अशी एका वाक्यातील व्याख्या, जेवढा पुरावा तेवढा विश्वास.
१९८१ च्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या निवेदनातही वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याख्या करण्यात आली आहे, जी आपण नंतर पाहू. डॉ. दाभोलकर वैज्ञानिक दृष्टिकोन हे स्वतंत्र माणसाचे आत्मभान आहे यावर भर देत आपल्या व्यापक आणि सर्वसमावेशक पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे स्पष्ट करतात. म्हणजेच आपले जीवन समर्थपणे जगण्यासाठी आपल्या जीवनाचा अधिकार आपल्याकडे घेतला पाहिजे. हा त्यांचा दृष्टिकोन हेच त्यांचे विलक्षण आणि मुख्य योगदान आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी खालील सर्वच गोष्टी आवश्यक आहेत.
याच्यासाठी प्रश्न न विचारण्याची मानसिकता दूर करणं, कुटुंबातली एकाधिकारशाही संपवणे, महापुरुषांचं कथित उदात्तीकरण, रूढी-परंपरेची पकड ढिली करणं, ब्रह्म आणि माया या स्वरूपात विचार न करता रोकड्या वास्तवाचा विचार करणं आणि जातव्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना तिलांजली देणं या सर्व गोष्टींची गरज आहे. परंतु हे सर्व करत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनाने काय करायला पाहिजे, हे १९५३ साली भारताचं विज्ञानविषयक धोरण देशाच्या लोकसभेमध्ये मांडताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं आहे. या स्वरूपाचं विज्ञानविषयक धोरण फार कमी देशांनी अधिकृतरित्या आपापल्या संसदेत मांडलेलं आहे. त्या वेळेला नेहरूंनी जे भाषण केलं, त्या भाषणामधल्या पाच ओळी अशा आहेत —
Scientific temperament is a process of thinking, method of action, search of truth, way of life, spirit of a free man. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आहे? It is a process of thinking.
म्हणजे आपण बघितल्याप्रमाणे, निरीक्षण, अनुमान, तर्क, प्रचिती, प्रयोग. पण ही नुसतीच प्रोसेस ऑफ थिंकिंग आहे का? नाही. It is a method of action. म्हणजे तुम्ही कृती कशी करावी, तुमची कोणती कृती अचूक आणि फलदायी होईल, हेदेखील वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हांला सांगतो. परंतु तेवढंच आहे का? नाही. t is search of truth. सत्य काय आहे, ही सत्यान्वेषणाची प्रक्रिया तुम्हांला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवतो.
परंतु तेवढंच आहे का? मला असं वाटतं की, पंडित जवाहरलाल नेहरूंनी उच्चारलेली शेवटची दोन वाक्यं अत्यंत महत्त्वाची आहेत. It is way of life, It is a spirit of a free man. म्हणजे मी माझं आयुष्य कसं जगावं, याचं दिशादिग्दर्शन वैज्ञानिक दृष्टिकोन करतो. म्हणजे यशपालांसारखे भारतीय पातळीवरचे नामवंत शास्त्रज्ञ म्हणतात की, ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आकलनाची परिपक्वता निर्माण करतो’. या देशातले अनेक प्रश्न आकलनाच्या परिपक्वत्तेच्या अभावी निर्माण झालेले आहेत. जर वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे सामान्य माणसाच्या जीवनात आकलनाची परिपक्वता वाढवण्यात आली तर त्याच्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं तो स्वतः अधिक समर्थपणे शोधू शकेल.
डॉ. दाभोलकरांचे तिसरे महत्वाचे योगदान आहे, फलज्योतिषाला मोडीत काढण्याचे! फलज्योतिषावर त्यांचे अनेक लेख आणि व्याख्याने आहेत. पनवेल येथील एका शिबिरात त्यांनी एका भावी वधूच्या पित्याबरोबर झालेल्या शनी ग्रहाच्या प्रभावामुळे होणार्या दुष्परिणामांच्या चर्चेबद्दल सांगितले होते. त्यांनी त्या भावी वधूच्या पित्याला विचारले, सूर्य पृथ्वीपासून किती अंतरावर आहे? शनी ग्रह किती कोटी किमी अंतरावर आहे? इतक्या दूरवर असणारा शनी ग्रह पृथ्वीवरील कोट्यवधी माणसातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीवरच आपली वक्रदृष्टी का वळवेल? शनी ग्रह एखाद्या व्यक्तीवर वाईट परिणाम करू शकत नाही याची इतकी साधकबाधक कारणे दिल्यावर त्या भावी वधूचे वडील म्हणाले, ठीक आहे डॉक्टर, हे सगळे बरोबरच आहे पण कशाला उगाच रिस्क घ्या? त्यामुळेच फलज्योतिषाला मोडीत काढण्यासाठी एका वेगळ्याच दृष्टिकोनाची गरज आहे.
जगात कोठेही न झालेला फलज्योतिषाचा परिणामकारक भांडाफोड करणार्या टीमचे डॉ. दाभोलकर भाग होते. डॉ. दाभोलकर, डॉ. जयंत नारळीकर, सुधाकर कुंटे आणि प्रकाश घाटपांडे यांनी ‘फलज्योतिषाची अंकशास्त्रीय चाचणी’ नावाचा पेपर नामांकित विज्ञान मासिकात प्रसिद्ध करून खूपच महत्वाचे काम केले होते. (Current Science, 10 March, 2009) त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांनी साधी वैज्ञानिक चाचणी देऊन फलज्योतिषावर आधारित त्यांनी केलेले दावे सिद्ध करून दाखविण्याचे भरघोस रकमेचे आव्हानही दिलेले आहे. भारतातील अगर जगभरातील एकही ज्योतिषी चाचणी देऊन हे आव्हान स्वीकारण्यासाठी पुढे आलेला नाही.जो शास्त्राचे दावे करतो त्यांनी वैज्ञानिक चाचणीसाठी पुढे आले पाहिजे. चाचणी नसेल तर कोणताही दावा शास्त्रीय असू शकणार नाही. थोडक्यात, या चार लेखकांनी निर्णायकरित्या सिद्ध केले आहे की, फलज्योतिष शास्त्रीय असण्याचा दावा करू शकत नाही.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारण्यास भारतातील अगर इतरत्र कोठूनही ज्योतिषी पुढे आलेला नाही याची फारशी प्रसिद्धी झालेली नाही. याला व्यापक प्रसिद्धी देऊन ही माहिती लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजे. या प्रयोगामुळे फलज्योतिषाचा पायाच उखडला गेला आहे. तुम्हाला फलज्योतिषावर विश्वास ठेवायचा आहे तर ठेवा पण त्याला शास्त्रीय म्हणू नका आणि कोणीही फलज्योतिष ‘शास्त्रीय’ आहे असा दावा करू शकत नाही.
गेल्या दहा वर्षात भारत एक वेगळेच स्थळ बनले आहे, तसेच जगही. आधीची आव्हाने तशीच आहेत त्यात नवीन तातडीच्या आव्हानांची भर पडली आहे.
२०१४ नंतरच्या केंद्र सरकारची बोलती वैज्ञानिक दृष्टिकोनास बढावा देण्याची पण कृतीत मात्र विज्ञान प्रसार सारख्या संस्था बंद करण्याची. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय शिक्षणमंत्री आणि खुद्द प्रधानमंत्री सार्वजनिकरित्या पुराणकथांची भलावण विज्ञान म्हणून करत आहेत. भ्रामक विज्ञान, भ्रामक इतिहासाच्या रचनेद्वारे भ्रामक राष्ट्रवादाची पायाभरणी केली जात आहे. फूट पाडणारे द्वेषाचे राजकारण आणि जातीयवादी धर्मांध तत्वज्ञान कॉर्पोरेट नियंत्रित मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे प्रसारीत करत आहेत. विविध पातळ्यावरील अधिकृत वातावरण वैज्ञानिक दृष्टिकोनविरोधी आणि बाधा आणणारे आहे.
वैज्ञानिक विचारसरणीची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जर शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारणी करायची असेल तर आपल्याला आज आपल्या देशात वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मार्गात जे अडथळे उभारण्यात आलेले आहेत त्याची दखल घेतली पाहिजे.
– वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल वैज्ञानिक मंडळीसह लोकांच्यात असलेले अपुरे आकलन.
– भ्रामक विज्ञान आणि सरकारी पातळीवर असलेले विज्ञान विरोधी प्रोत्साहन.
– जातीयवादी धर्मांध संघटना उजव्या विचारसरणीस पुरवत असलेले बळ. मिथ्य कथा आणि इतिहासाची सरमिसळ आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी निवडक कथांचा प्रचार, प्रसार.
– जातीयवादी धर्मांध कार्यक्रमांचे कॉर्पोरेट प्रसार माध्यमातून प्रसारण, चुकीची आणि दिशाभूल करणार्या फेक बातम्या.
– शिक्षणाची असमाधानकारक परिस्थिती आणि मठ शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली प्रतिगामी शिक्षण.
– सार्वजनिक क्षेत्राची मोडतोड आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा ताबा कॉर्पोरेट क्षेत्राकडे सोपविण्यासाठी स्वयंपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची पुनर्व्याख्या.
– पोषण, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांची अत्यंत दारुण परिस्थिती.
वर उल्लेखिलेले मुद्दे हे राष्ट्रीय धोरणांवर उजव्या विचारसरणी कडून पद्धतशीरपणे विविधांगी मार्गाने होणार्या हल्ल्याचेच काही भाग आहेत. मजेशीर गोष्ट ही आहे, उजव्या विचारसरणीच्या व्यवस्थेच्या मर्यादांचे देखील ते दर्शक आहेत कारण हेच मुद्दे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या वाढीसाठी प्रवेशद्वार ठरू शकतात.
वैज्ञानिक विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अशाच परिस्थितीत विकसित होऊ शकतो आणि भ्रामक विज्ञान आणि भ्रामक इतिहास आणि कॉर्पोरेट धर्मांध विचारसरणीच्या विरोधातील संघर्षात आघाडीची भूमिका पार पाडू शकतो. भारत बहुधा एकमेव देश असावा ज्या देशाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कायदेशीर हक्क आपल्या तरुण नागरिकांना दिलेला आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे सांगितले आहे, मग तो तरुण असो अगर वयस्क! २०१० पर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणे हे फक्त मूलभूत कर्तव्य असल्याचे भारतीय घटनेचे कलम ५१(अ) सांगत होते. पण २०१० मधील आर टी ई कायद्याच्या अंमलबजावणीनंतर उत्कृष्ट प्रतीचे शिक्षण हा सर्व तरुण भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार बनला. वैज्ञानिक दृष्टिकोन हा उत्कृष्ट प्रतीच्या विज्ञान शिक्षणाचा आवश्यक भाग असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन सर्व तरूण भारतीयांचा कायदेशीर हक्क बनला. आर टी ई २००९ च्या कायद्यामुळे ६ ते १४ वयोगटातील नागरिकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सार्वत्रिकीकरण कादेशीरपणे अनिवार्य ठरले.
आर टी ई कायद्याच्या उद्दिष्टांची अमलबजावणी होण्यासाठी शाळातील विज्ञान शिक्षणाशी निगडीत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे सार्वत्रिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बीज अगदी तळागाळापर्यंत पेरले जाईल. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये जरी नमूद केले नसले तरी निश्चितपणे या धोरणातून आरटीई चे उत्कृष्ट प्रतीच्या शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाला वगळले जात आहे. या कमजोरीचे प्रतिबिंब केंद्र सरकारचे उपक्रम असणार्या निपुण आणि एफ एन एल यांच्या अत्यंत मर्यादित उद्दिष्टांत पडलेले दिसून येते जी उद्दिष्टे आर टी ई च्या आसपासचीही नाहीत.
परंतु शिक्षण हा विषय भारतीय घटनेनुसार केंद्र सरकार व राज्य सरकारच्या एकत्रित यादीतील विषय असल्याने महाराष्ट्रासारख्या राज्याला एफ एन एल च्या पलीकडे जाऊन आर टी ई कायद्याच्या उद्दिष्टांशी पक्की बांधिलकी ठेवण्यास कोणीच आडकाठी आणू शकत नाही.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणण्यामागे आणि प्रत्येक तरुण भारतीयाला उत्कृष्ट प्रतीचे शिक्षण मिळण्याच्या हक्कापासून रोखण्याच्या मागे कॉर्पोरेट हितसंबंध आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार अभ्यासक्रमात बदल केले जात आहेत, सरकारी शाळांना कमी लेखले जात आहे. व्यापक धर्माध कॉर्पोरेट कार्यक्रमाच्या भाग असलेल्या फेक बातम्या देशातील सर्वच भागात आव्हान बनत आहेत. कॉर्पोरेट धर्मांधांचा वैज्ञानिक दृष्टिकोनावरील ह्या हल्ल्याविरोधात संघर्ष करण्यासाठी आपल्याला १९८१ च्या वैज्ञानिक दृष्टिकोनावरील निवेदनावर गांभीर्याने नजर टाकणे आवश्यक आहे.
१९८१ च्या निवेदनात वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याख्या चार निकषाद्वारे केली आहे.
अ) विज्ञानाची पद्धती ज्ञान संपादन करण्याची योग्य पद्धत पुरवते.
ब) विज्ञानाची पद्धती वापरून मिळविलेल्या ज्ञानाद्वारे मानवी समस्यांचे आकलन व निराकरण होऊ शकते.
क) विज्ञानाच्या पद्धतीचा पुरेपूर वापर दैनदिन जीवनात आणि मानवी आयुष्यातील प्रत्येक अंगात नैतिकता ते राजकारण आणि अर्थकारण यात करणे यासाठी आवश्यक आहे की त्यामुळे माणसाचे जगणे आणि प्रगत होणे सुकर होते.
ड) याची चर्चा आपण येथे करणार नाही आहोत.
विज्ञानाच्या पद्धतीची डॉ. दाभोलकरांनी केलेली सुरेख आणि संक्षिप्त व्याख्या कॉर्पोरेट धर्मांधतेच्या आव्हानाला हाताळण्यासाठी अपुरी आहे. त्या व्याख्येचा १९८१ च्या निवेदनातील (क) कलमाबरोबर मेळ जुळत नाही. हा महत्वाचा भाग आहे. हा इतका महत्वाचा आहे की व्यावसायिक नैसर्गिक शास्त्रज्ञ हा मुद्दा जाणीवपूर्वक टाळतात. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सजग नागरिकांचीच गरज आहे जे गांभीर्याने विचार करून राजकारणाशी निगडीत राहतात.
अनेक व्यावसायिक शास्त्रज्ञाचा समज असतो त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. ते राजकीय प्रश्न टाळतात आणि त्यांना वैज्ञानिक समजासाठी राजकीय परीक्षेची गरज असते. त्यांच्या मते वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे केवळ भ्रामक विज्ञान आणि अंधश्रद्धाची चिकित्सा. पण हेच शास्त्रज्ञ राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नाकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करतात. त्यांच्या मते राजकारण आणि अर्थकारण वैज्ञानिक विषय नाहीत.
कोविडच्या महामारीतील या संदर्भातील उदाहरण बघण्यासारखे आहे. क्युबा आणि अमेरिकेतील फ्लोरिडा एकमेकापासून केवळ १५० किमी अंतरावर आहेत. फ्लोरिडाची लोकसंख्या क्युबापेक्षा दुप्पट आहे पण फ्लोरिडातील कोविड मृत्यूंची संख्या क्युबापेक्षा चौपट होती. का? कारणे केवळ शारीरिक नाहीत तर सामाजिक आहेत. या महामारीने दाखवून दिले औषधे नैसर्गिक विज्ञान नाहीत तर सामाजिक विज्ञानही आहेत. कोविड महामारीने जी आव्हाने पुढे आणली होती ती हाताळण्यासाठी केवळ शारीरिक नैसर्गिक विज्ञान अपुरे आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कामाला लागल्या आणि परिस्थिती सावरली गेली. या ठिकाणी खासगी आरोग्य व्यवस्था पूर्णत: अपयशी ठरली. या महामारीने आरोग्य व्यवस्थेतील समाजवाद आणि भांडवलशाहीतला फरक अधोरेखित केला. पण अनेक व्यावसायिक जीवशास्त्रज्ञ या मुद्द्यावर चर्चा करण्यास अगर विचार करण्यास अजिबात तयार होत नाहीत. ते कोविड मृत्यूच्या सामाजिक कारणांना वैज्ञानिक संशोधनाच्या योग्यतेची मानण्यास तयार नाहीत.
कोविड मृत्यूंच्या बाबतीत गुजरात आणि केरळ या राज्यातही लक्षणीय फरक आहे. गुजरातमधील कोविड मृत्यूंचा अधिकृत आकड्यांची सखोल शास्त्रीय तपासणी होण्याची गरज आहे. श्री. गिरीश जालीहाळ, तपस्या आणि नितीन सेठी या रिपोर्टर्स कलेक्टीव्हच्या पत्रकारांनी गुजरातमधील १७० नगरपालिकांच्यापैकी ६८ नगरपालिकांतील कोविड मृत्यूंची प्राथमिक आकडेवारी गोळा केली. या नगरपालिकांत कोविडच्या पहिल्या लाटेच्या काळात मार्च २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान कोविडपूर्व वर्षाच्या तुलनेत १६,८०२ अतिरिक्त मृत्यूंची नोंद आढळली. ह्या आकडेवारीवरून अंदाज बांधत त्यांनी संपूर्ण राज्यातील या दोन महिन्यातील कोविड मृत्यूंचा आकडा शोधला, तो होता २.८१ लाख! या काळातील कोविड मृत्यूंचा सरकारी आकडा होता केवळ १०,०७५! म्हणजे एकूण कोविड मृत्यूंच्या २७०० टक्के मृत्यू नोंदवले गेलेच नव्हते.
हे एक पुराव्यावर आधारित तर्क वापरून निष्कर्षाप्रत येण्याचे आणि विज्ञानाची पद्धत सामाजिक प्रश्नासाठी वापरून अव्यवस्था आणि आकडेवारीतील खोटेपणा उघडा पाडण्याचे चांगले उदाहरण आहे. पुरावा शोधून एकत्र करणे आणि तो तर्कशुद्ध पद्धतीने मांडून निष्कर्षाप्रत येणे हे शास्त्रशुद्ध तपासाचे काम व्यावसायिक निसर्गशास्त्रज्ञांनी नाही केले तर ते काम पत्रकारांनी केलेले आहे. आज शास्त्रज्ञ नव्हे तर पत्रकारच वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संरक्षणाच्या मोहिमेची आघाडी सांभाळत आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सार्वत्रिकीकरण ही आजच्या काळाची गरज आहे. कोणतीही भीती न बाळगता प्रश्न विचारण्याचे भारतीय नागरिकाचे घटनादत्त मूलभूत कर्तव्य आहे. प्रश्न विचारणे हे देशविरोधी नाही, तर देशभक्तीचे लक्षण आहे. ‘एनएसटीडी’ची ASK WHY मोहीम याचीच जाणीव करून देत आहे.
तरुण भारतीय नागरिकांच्या पिढ्यांना चिकित्सक बनण्यासाठी, का? हा प्रश्न विचारण्यासाठी, कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी पुरावा आधारित तर्कावर विसंबून योग्य आहे तेच स्वीकारण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सार्वत्रिकीकरणाचे शाळा शाळांमध्ये होणारे प्रयत्न साधन बनतील. या साधनात कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही रंगाचा मूलतत्ववाद जो त्यांच्या तरुण मनात रुजवला गेला आहे तो बाजूला सारण्याची कुवत आहे कारण मूलतत्ववाद चिकित्सा न केलेल्या धर्मग्रंथावरील श्रद्धेवर आधारित आहे. भ्रामक इतिहास आणि भ्रामक विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या चिकित्सक चाळणीतून सुटू शकत नाही. म्हणूनच धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी पाया आणि घटनात्मक मूल्ये मजबूत करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची भूमिका खूपच महत्वाची आहे.
– विवेक मॉन्टेरो
मराठी अनुवाद : राजीव देशपांडे