पँथर अजूनही जागा आहे…

ज. वि. पवार -

दलित पँथर’च्या स्थापनेला पुढील वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने याच चळवळीतून उदयास आलेले ‘दलित पँथर’चे संस्थापक, साहित्यिक, कवी, स्तंभलेखक, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक ज. वि. पवार यांच्याशी राजीव देशपांडे व सुबोध मोरे यांनी साधलेला संवाद

1960-1980 पर्यंतचा कालखंड देशाच्या; तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक चळवळीत फारच महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर दलित समाजातील शिक्षितांमध्ये एक नवीन वैचारिक जाणीव निर्माण होऊ लागली होती. गौतम बुद्ध, क्रांतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जगभरातील परिवर्तनवादी, क्रांतिकारक चळवळी आणि व्यक्तिमत्त्वे यातून प्रेरणा घेत दलित आणि परिवर्तनवादी तरुण प्रस्थापित सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक मापदंडांना झुगारून देत लघुनियतकालिक चळवळीच्या माध्यमातून; तसेच ‘अस्मितादर्श’, ‘विद्रोह’, ‘निकाय’, ‘सनद’, ‘मागोवा’ यांसारख्या मासिकातील कविता, कथा; तसेच वैचारिक लेखनातून व्यक्त होऊ लागला होता. पण हा तरुण केवळ साहित्यिक साहित्यकृतीपुरता मर्यादित नव्हता. या कालखंडात महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील दलितांवर अत्याचार, दलित स्त्रियांवरील बलात्कार यात खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात होणारी वाढ त्याला अस्वस्थ करत होती आणि प्रस्थापित शासनव्यवस्था आणि रिपब्लिकन नेतृत्व काहीच प्रतिक्रिया देत नसल्याने प्रचंड संताप, असंतोष त्यांच्या जहाल शब्दांतून व्यक्त होत होता. यात बाबूराव बागुल, दया पवार, प्रल्हाद चेंदवणकर, नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगळे, ज. वि. पवार ही नावे प्रामुख्याने होती. पण केवळ जहाल शब्दांतून त्या अत्याचारी प्रवृत्तीला जरब बसणार नाही; तर त्यासाठी अत्याचारी प्रवृत्तीला जरब बसवणारी व शासनव्यवस्थेला जाब विचारणारी प्रबळ शक्ती निर्माण केली पाहिजे, या विचारांतून नामदेव ढसाळ आणि ज. वि. पवार यांनी आंबेडकरी चळवळीत नवचैतन्य निर्माण करणारी दलित पँथर संघटनेची स्थापना 29 मे, 1972 साली केली; ज्यात नंतर राजा ढालेही सहभागी झाले. संघटनेचे रूपांतर उसळत्या चळवळीत झाले जिने व्यवस्थेशी टक्कर देत अत्याचारी प्रवृत्तीची नांगी ठेचत समाजाला, राजकीय पक्षांना भानावर आणले. यातील नेत्यांनी महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडल्या, त्या-त्या गावात प्रत्यक्ष जाऊन तेथील पीडितांना न्याय, दिलासा, संरक्षण देण्याचे काम केले व दलित पँथरचा सामुदायिक दरारा निर्माण केला. या चळवळीतून भाई संगारे, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे, जयदेव गायकवाड, मुरलीधर जाधव यांच्यासारखे नेतृत्व उदयास आले.

‘दलित पँथर’च्या स्थापनेला पुढील वर्षी – 2022 साली – 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने याच चळवळीतून उदयास आलेले; पण बँकेतील नोकरी सांभाळत ढाले-ढसाळ यांच्या तुलनेत मागे व प्रसिद्धीपासूनही दूर राहिलेले, तरीही चळवळीशी बांधिलकी आणि सक्रियता आजतागायत टिकविणारे ‘दलित पँथर’चे संस्थापक, साहित्यिक, कवी, स्तंभलेखक, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक ज. वि. पवार यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या‘पँथर’पर्यंतच्या व्यक्तिगत प्रवासाबद्दल आम्ही त्यांना बोलते केले…

“महाराष्ट्रातील हजारो खेड्यांपैकी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील पिलवली (तोंडली) या एका छोट्याशा खेड्यातला माझा जन्म. इतर लाखो खेड्यांसारखे हे खेडेही जातिप्रथेचा उकिरडा असलेले. चाकरमान्यांकडून आईने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव ऐकलेले. भटा-बामणांना त्यांनी केवळ आपल्या शिक्षणाच्या बळावर जेरीस आणलेले आहे, हे तिला पटलेले. त्यामुळे पोराला शिकवायचे म्हणून गावातल्या जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळेत नाव घातले. गुरुजींनी दाखल्यावर जन्मतारीख लिहिली, 15 जुलै, 1944. त्या काळातील गावगाड्यानुसार अस्पृश्यतेचे अनुभव घेत, स्पृश्यांची गुरे वगैरे राखण्याची हलकी कामे करीत पहिली ते चौथी पार पडली. मग 1956 मध्ये मुंबईत. मेट्रो सिनेमाजवळ धोबी तलाव भागातील गल्लीतील एका इमारतीत आमच्या गावातील चाकरमान्यांबरोबर माझे वडील राहायचे. त्यांनी त्या इमारतीसमोरच्या फुटपाथवर माझी जागा ठरवून दिली. माझ्या मोठ्या भावाने माझे नाव जनाबाई आणि माधवराव रोकडे शाळेत टाकले. 6 डिसेंबर, 1956 ला दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाल्याची बातमी आमच्या शाळेत आली व शाळेला सुट्टी देण्यात आली. घरी परतताना इतरही शाळा सुटलेल्या बघितल्या. घरी आलो तर सर्व चाकरमाने कामावरून परतत होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दु:खाची कळा. हातात ‘सांज मराठा’ किंवा ‘संध्याकाळ’ माझ्याकडून ते वाचून घेऊ लागले आणि ऐकताना घरातील एखादा माणूस गेला आहे, असे ढसाढसा रडत होते. मी आपला निर्विकारपणे वाचत होतो; पण त्यांचे रडणे पाहून मलाही रडायला यायला लागले आणि जाणवू लागले कोणीतरी मोठा माणूस गेला आहे, आपला रक्षणकर्ता गेला आहे. माझी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी ओळख झाली ती अशी हुंदक्यांच्या पार्श्वभूमीवर. पुढे आम्ही कामाठीपुर्‍याच्या सिद्धार्थनगरमध्ये राहायला गेलो. हा सगळा परिसर म्हणजे चळवळीतील कार्यकर्ते, कलावंत यांनी भारलेला. अशा या सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या भागात मी राहायला गेल्यामुळे रिपब्लिकन चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांशी अल्पवयातच संबंध येऊ लागल्याने माझी राजकीय जाण वाढू लागली. वडिलांना कर्ज झाल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व मग मला नोकरी करत ‘मराठा मंदिर’च्या ठाकूरद्वार रात्रशाळेत शिकण्याची पाळी आली. मग मी भांड्याना बफ करण्याच्या कंपनीत काम करू लागलो. तेवढ्यात बॉम्बे टेलिफोनमध्ये ऑफीसबॉयची नोकरी, त्यात बढती मिळून ऑफिस प्यून. त्या काळातील माझे वाचन अधाशासारखे होते. वि. स. खांडेकर आवडायचे. त्यांच्या ‘वि. स.’ या आद्याक्षरासारखीच मी ‘ज. वि.’ अशी आद्याक्षरे घेतली. 1963 मध्ये मी एसएससी झालो, ऑफिस बॉयचा क्लार्क झालो. नंतर या केंद्र सरकारच्या नोकरीतून बँकेतही नोकरीला लागलो. कॉलेजच्या दिवसात मला साहित्याची गोडी लागली. मुंबई मराठी साहित्य संघाच्या परीक्षा देत मी ‘आचार्य’ही झालो. माझी पहिली ‘फुटपाथ’ कविता ‘सत्यकथे’ने नाकारली; पण ‘अस्मितादर्श’मध्ये छापून आली. 1969 मध्ये माझी पहिली कादंबरी ‘बलिदान’ प्रकाशित झाली. अनेक साहित्यिक, चळवळीतले कार्यकर्ते मित्र झाले. लेखक, कवी म्हणून लोक ओळखू लागले. एका कविसंमेलनात नामदेव ढसाळची आणि माझी ओळख झाली. आमच्या दररोज भेटी होऊ लागल्या.

हा झाला तुमचा पँथरपूर्व व्यक्तिगत प्रवास; पण पँथरपूर्व आंबेडकरी चळवळीची; तसेच एकूणच राजकीय, सामाजिक स्थिती काय होती?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. गांधींचा शब्द अंतिम मानण्याच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकाकीपणे त्याविरोधात आपली बाजू लावून धरण्याचा संघर्ष केला. त्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाचे संविधान लिहिले, केंद्रीय मंत्रिमंडळात गेले, हिंदू कोड बिलावरून मतभेद झाले तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर आले. त्यांनी गुलामगिरी, व्यवस्था या विरोधात लढा दिला. सत्ताधारी काँग्रेसला बांधील राहिले नाहीत; आपल्या मूल्यांना बांधील राहिले. त्यामुळे अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविरोधात आणि त्यांनी निर्माण केलेल्या पोलादी संघटनेविरोधात तत्कालीन राज्यकर्त्यांना ते जिवंत असेपर्यंत कुरघोडी करता आली नाही; तसेच त्यांच्या संघटनेतील सहकार्‍यांतही ज्या कुरबुरी होत्या, त्याही डॉ. बाबासाहेबांच्या कणखर नेतृत्वामुळे उघड झाल्या नाहीत. पण 6 डिसेंबर, 1956 ला त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 1957 साली रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली तरी सुरुवातीपासूनच नेतृत्वासाठी चढाओढ सुरू होती.

सत्ताधारी काँग्रेसच्या कुटिल डावपेचामुळे रिपब्लिकन पक्षाचे काही मोहरे सरळ काँग्रेसच्या घरात घुसले, तर रिपब्लिकन नेतृत्वातील अंतर्गत लाथाळी या कारणामुळे समाज दुभंगला, ताकदीने क्षीण झाला; परिणामी धनदांडग्या आणि जातीयवादी अत्याचारी प्रवृत्तींनी आपला मोहरा खेड्यांकडे वळवला व खेड्यापाड्यांत क्षुल्लक कारणांमुळे अन्याय, बहिष्कार वाढले. ज्यांच्यावर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ते आपापसांतील कुरघोड्या करण्यात व्यग्र किंवा सत्ताधार्‍यांच्या वळचणीला. पण त्यावेळेस विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी प्रबळ होता, वृत्तपत्रमाध्यमे सजग होती. शेवटच्या पानावर का होईना; पण या क्रूर अत्याचाराच्या बातम्या येत होत्या. नाथ पै, मधु लिमयेंसारख्यांनी हे अन्याय-अत्याचार लोकसभेसमोर प्रभावीपणे मांडले. याच्या परिणामी एलिया पेरूमल या दाक्षिणात्य खासदाराच्या अध्यक्षतेखाली अत्याचारांचा मागोवा घेण्यासाठी पेरूमल कमिटीची स्थापना केंद्र सरकारने केली.

त्यात महाराष्ट्रातील खासदार व तत्कालीन ज्येष्ठ रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड होते. या कमिटीने आपला अहवाल 30 जानेवारी, 1970 रोजी सरकारला सादर केला. पण विरोधी पक्षांनी बरीच आदळआपट केल्यावर तो संसदेच्या पटलावर 10 एप्रिल, 1970 मध्ये ठेवण्यात आला आणि तो अहवाल म्हणजे केवळ अत्याचारांच्या हिमनगाचे टोक असले तरी एखाद्या बॉम्बस्फोटामुळे कानठळ्या बसाव्यात, कानाचे पडदे फाडले जावेत, तसे त्या अहवालाचे वृत्तांत वाचल्यावर झाले. या अहवालात स्त्रियांवर बलात्कार, त्यांची नग्न धिंड, सामुदायिक बहिष्कार, विहिरीत विष्ठा टाकणे, नरबळी, खून, झोपड्या जाळणे, स्मशानभूमी नाकारणे, दगडाने ठेचून मारणे, जिवंत जाळणे, डोळे फोडणे, चप्पल घातली म्हणून चपलेने तोंड फोडणे असे अनेक प्रकार नोंदवण्यात आले होते. अत्याचाराच्या सुट्या-सुट्या बातम्या वाचताना फारसा परिणाम होत नाही; पण त्या अहवालातील एकत्रित अत्याचार वाचताना अंगावर सरसरून काटा आला, रक्त उसळून आले आणि आता आपण लेखण्या मोडून आंदोलनासाठी रस्त्यावरच उतरले पाहिजे, असे आम्हा लेखकांना वाटू लागले व आम्ही ‘दलित युवक आघाडी’ वडाळ्याच्या ‘सिद्धार्थ विहार वसतिगृहा’त स्थापन केली व तिच्या वतीने त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना राजा ढाले, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, भीमराव शिरवाळे, उमाकांत रणधीर, गंगाधर पानतावणे, वामन निंबाळकर, मोरेश्वर वहाणे आणि ज. वि. पवार अशा नऊ साहित्यिकांच्या सह्या असलेले व दलितांवरील अत्याचारास पायबंद घालण्यास शासन असमर्थ ठरल्यास आम्ही कायदा हातात घेऊ, असे स्पष्ट करणारे पत्रक दिले.

ही झाली दलित पँथरच्या स्थापनेपूर्वीची पीठिका. मग दलित पँथरची स्थापना कशी झाली? ‘पँथर’ हे नाव देण्यामागची काय प्रेरणा होती?

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बावडा येथे एका दलिताने निवडणुकीचा अर्ज भरला म्हणून स्पृश्यांनी अस्पृश्यांवर पुकारलेल्या बहिष्कारामुळे महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय वातावरण चांगलेच घुसळून निघत असतानाच 14 मे, 1972 रोजी परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथे तहानेने व्याकुळ झालेल्या दोन दलित स्त्रियांनी सोपान दाजीबा या गावगुंडाच्या विहिरीतील पाणी पिण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्या स्त्रियांची गावातून नग्न धिंड काढण्यात आली. त्यांच्या गुप्तांगावर बाभळीच्या काट्याचे फटके मारत गावभर फिरविण्यात आले. याचा निषेध करण्यासाठी जी सभा ‘दलित युवक आघाडी’, ‘युक्रांद’ वगैरे समाजवादी आणि डाव्या विद्यार्थी, युवक संघटनांनी घेतली होती, त्यात ब्राह्मणगावात जाऊन त्या नग्न धिंड काढलेल्या महिलांना साडी-चोळी देऊन सन्मान करण्याचे ठरविण्यात आले. पण ज्यांची नग्न धिंड काढली गेली आहे, त्यांनाच सर्वांसमक्ष साडी-चोळी देत त्याच या बायका, असे सांगत त्यांची बदनामी होऊ नये, अशा भूमिकेतून मी व नामदेवने या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. पण आमच्या इतर सहकार्‍यांनी हा कार्यक्रम मान्य केला. आम्ही दोघेही खूपच ‘अपसेट’ झालो. रात्र तळमळतच काढली.

दुसर्‍या दिवशी (29 मे, 1972) सकाळी मी आणि नामदेव नेहमीप्रमाणे भेटलो. तेव्हा प्रथम नामदेवच्या मनात भूमिगत संघटना काढण्याची कल्पना आली. पण नामदेव स्वत:ला ‘लुम्पेन’ वर्गाचा समजत असला तरी मी बँक नोकरदार ‘व्हाईट कॉलर’ होतो. बाबासाहेबांच्या लोकशाही मार्गानेच जावे असेच मला वाटत होते आणि त्यामुळे त्यातील अव्यवहार्यता लक्षात आल्यावर एखादी जहाल संघटना काढून या अत्याचारांना पायबंद घालावा, असा निर्णय आम्ही दोघांनी रस्त्यातच घेतला. संघटनेच्या नावात आगळेपण असावे, असे नामदेवचे मत होते. मग ‘हे नाव नको, ते नको’ असे करत ‘पँथर’ हे नाव नक्की केले. अक्राळ-विक्राळ, दहशत निर्माण करणारा, ज्याच्या शरीरावरील पिवळे ठिपके कधीच जात नाहीत, म्हणजेच त्याची ओळख कधीच नष्ट होत नाही, असा ‘पँथर!’ नुसत्या ‘पँथर’ या नावातून काहीच अर्थबोध होत नव्हता. मग मी त्यात ‘दलित’ हा शब्द जोडला. अशा रीतीने ‘दलित पँथर’ या संघटनेची आम्ही स्थापना केली. मग दलितांवरील अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी ‘दलित पँथर’ नावाच्या संघटनेची स्थापना अशी बातमी तयार करून त्या खाली माझी आणि नामदेवची सही करून आम्ही ती बातमी मुंबईतील वर्तमानपत्राकडे दिली. दुसर्‍या दिवशी ‘मराठा’, ‘नवाकाळ’, ‘संध्याकाळ’, ‘नवशक्ती’ यांसारख्या वर्तमानपत्रात कोपर्‍यात आलेल्या त्या बातमीकडे त्यावेळेस पोलिसांसकट कोणीच फारशा गांभीर्याने पाहिले नाही.

‘दलित पँथर’ या नावाला अर्थातच 1966 साली न्यूटन व बॉबी सील या काळ्या तरुणांनी अमेरिकेत स्थापन केलेल्या ‘ब्लॅक पँथर’ या लढाऊ संघटनेचा संदर्भ होता. त्या संघटनेने अगदी कमी कालखंडात गरीब आफ्रिकन-अमेरिकन लोकांना पोलिसी अत्याचारापासून संरक्षण देत आपले स्थान निर्माण केले होते. भारतातील वृत्तपत्रांमधून आणि ‘अस्मितादर्श’सारख्या मासिकातून त्यावर लेख येत. सिद्धार्थ विहार वसतिगृहात चर्चा होत. त्यामुळे आम्हाला त्या संघटनेची माहिती होतीच व त्याचाच प्रभाव ‘दलित पँथर’ हे नाव देताना पडला.

स्थापनेनंतर ‘दलित पँथर’ने केलेली आंदोलने आणि त्यांचा आंबेडकरी चळवळीसह एकूणच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणावर झालेल्या परिणामांसंदर्भात काय सांगाल?

‘दलित पँथर’ आम्ही दोघांनी स्थापन केली असली, तरी कोणतीही चळवळ अशी एकाकी उभारी धरू शकत नाही. तिचा प्रचार, प्रसारासाठी व पुढील कार्यक्रम ठरविण्यासाठी आम्ही 9 जुलै, 1972 ला पँथरचा पहिला जाहीर मेळावा मुंबईच्या कामाठीपुर्‍यातील सिद्धार्थनगर येथे घेतला. आमच्याकडे अत्यंत अपुरी साधने असूनही या मेळाव्याचा आम्ही मुंबईतील वस्त्या-वस्त्यांतून बराच प्रचार केला. मी स्टुलावर उभा राहून पेरुमल अहवालातील अत्याचारांबाबत माहिती देत असे. दलित संघटनांनी बावडा प्रकरण जोरदारपणे लावून धरल्यामुळे; तसेच विधानसभेत बावडा प्रकरणाचा निषेध करत दोन तरुणांनी फेकलेल्या जळत्या बोळ्यामुळे दलितांवरील अत्याचाराची चर्चा सगळीकडेच सुरू झाली होती. त्यामुळे त्या मेळाव्याला मुंबई व उपनगरातले तरुण मोठ्या संख्येने आले. त्या मेळाव्यात ‘दलित पँथर’ची भूमिका मी मांडली. प्रस्थापित रिपब्लिकन नेतृत्व आणि काँग्रेस सरकारचा तरुण निषेध करत होते, कार्यक्रम सुचवत होते. तेवढ्यात राजा ढाले यांनी येत्या स्वातंत्र्यदिनावर बहिष्कार टाकून हा स्वातंत्र्यदिन ‘काळा स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा कार्यक्रम सुचवला. सर्वांनी तो मान्य केला.

हा स्वातंत्र्यदिन रौप्यमहोत्सवी होता. त्यामुळे तो धडाक्यात साजरा केला जाणार, असे सरकारने जाहीर केले होते. 14 ऑगस्टला मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन, सर्व राज्यांच्या विधिमंडळांची त्याच वेळेस विशेष अधिवेशने, असा धडाकेबाज कार्यक्रम होता. या मध्यरात्रीच्या अधिवेशनावर मोर्चा नेण्याचे ठरले, संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. त्यात समाजवादी युवक सभा, ‘युक्रांद’, ‘डीवायएफ’, मुस्लिम सत्यशोधक संघटना अशा बारा संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चा मोठा झाला. त्यात सर्वांत जास्त ‘दलित पँथर’चे तरुण होते. मोर्चा अडवल्यावर तेथेच पर्यायी विधानसभाही भरविण्यात आली. मी त्याचा सभापती होतो. 14 ऑगस्टचा मोर्चा यशस्वी झाल्यावर दुसर्‍या दिवशी (15 ऑगस्ट) काळ्या फिती लावून स्वातंत्र्याचा धिक्कार करीत नामदेवच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरी निघाली.

त्याच दिवशी ‘साधना’ साप्ताहिकाच्या ‘स्वातंत्र्यदिन’ विशेषांकात राजा ढालेचा ‘काळा स्वातंत्र्य दिन’ नावाचा लेख प्रसिद्ध झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली. त्यामुळे अनेक तरुण सर्वशक्तीनुसार ‘दलित पँथर’मध्ये सहभागी होऊ लागले. त्यांच्या बळावर आमची पुढची वाटचाल चालू झाली. दादासाहेब रुपवते, जगजीवनराम यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात प्रखर निदर्शने झाली, ज्यातून प्रस्थापित नेतृत्वाबद्दलचा असंतोष व्यक्त होत होता. आपली भूमिका लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जाहीर सभांचा धडाका ‘पँथर’ने लावला. मुंबईत वातावरणनिर्मिती करण्यासाठी या सभांचा खूपच उपयोग झाला. शहरातील छोटे-मोठे प्रश्न घेत ‘पँथर’चा लढा चालूच होता; तसेच गीतेत जातीयतेचे समर्थन आहे, म्हणून गीतादहन, ‘चांभार शिकला तरी देवपूजा करू शकत नाही,’ असे वक्तव्य केलेल्या शंकराचार्यांवर चप्पलफेक, कॅपिटेशन फी, बेरोजगारीविरोधातील आंदोलने, झोपडपट्टी विकास, मागासवर्गीय शिष्यवृत्ती, राखीव जागा अनुशेष, नवबौद्धांना सवलती यांसंदर्भातील आंदोलने, डॉ. आंबेडकरांच्या अप्रकाशित साहित्याचे प्रकाशन करण्यास शासनाला भाग पाडणारे आंदोलन, निवडणुकीवरचे बहिष्कार अशी आंदोलने चालूच होती. पण केवळ शहरात लक्ष केंद्रित न करता ‘पँथर’ने आपला मोहरा खेड्यांकडे वळविला.

पुणे जिल्ह्यातील आसखेड या गावातील विठू दगडू मोरे याची जमीन गावगुंड लिंबुरे याने बळकावली. मोरे मुंबईत आले. त्यांचा आमच्याशी संपर्क झाला. ‘हाडकी-हाडवळी’ची ती जमीन असल्याने ‘पँथर’चे 92 तरुण त्या गावात गेले आणि त्यांनी लिंबुरे याना जमीन परत करावयास लावली. अकोला जिल्ह्यातील धाकली येथील गवई बंधूंचे डोळे काढण्याचे प्रकरण आम्ही त्यावेळेस थेट त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत नेले. धाकली गावातील बब्रुवाहन गवई याची मुलगी शेतात काम करत असताना त्या गावच्या पाटलाच्या पोराने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला, तिला दिवस गेले. बब्रुवाहन गवई आणि त्याचा बंधू पाटलाकडे गेले व त्यांनी पाटलाला सर्व सांगून पोराचे लग्न आपल्या मुलीबरोबर लावून देण्यास सांगितले. पण याचा पाटलाला राग आला आणि त्याने अतिशय निर्घृणपणे गवई बंधूंचे डोळे काढले. पण नंतर खूप दिवसांनंतर अशी विकृत बातमी प्रकाशित झाली की, गवई बंधू या गुंडांचे गावकर्‍यांनी डोळे काढून त्यांना त्यांच्या गुंडगिरीची शिक्षा दिली. ते प्रकरण जेव्हा माझ्याकडे आले, तेव्हा मी त्यांना घेऊन त्यावेळचे गृह राज्यमंत्री रत्नाप्पा कुंभार यांच्याकडे गेलो. त्या मंत्र्याने त्या सार्‍या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले. मुंबईतील एका वार्ताहर परिषदेत मी गवई बंधूंना सर्व घटना सांगावयास लावली. दुसर्‍या दिवशी, 26 जानेवारी, 1975 ला गवई बंधूंच्या फोटोसकट सर्वच मराठी, इंग्रजी पेपरमध्ये गवई बंधू प्रकरणाचे वृत्त मुखपृष्ठावर प्रकाशित झाले. त्याचवेळेस जयप्रकाश नारायण यांची सभा शिवाजी पार्कवर होती. त्यांनी आपल्या भाषणात माझ्या नावाचा उल्लेख करत या गंभीर प्रकरणावरून सरकारवर टीका केली. हे सर्व चालू असताना त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईत येणार होत्या. मी ही संधी साधायची ठरविली आणि पत्रक काढले. गवई बंधू इंदिरा गांधींच्या मोटारीखाली जीव देणार. पोलिसांची धावपळ सुरू झाली, त्यांनी मला गाठले आणि कबूल केले की, ‘आम्ही गवई बंधूंची पंतप्रधानांबरोबर भेट घालून देतो; पण तुम्ही पंतप्रधानांची गाडी अडवण्याचे कृत्य करू नका.’ पंतप्रधान आल्या, अनेक शिष्टमंडळे त्यांना भेटायला आली होती. मी, राजा ढाले आणि गवई बंधू अशा चौघांनाच पोलिसांनी आत नेले. इंदिरा गांधींना बघताच मी ताडकन म्हणालो, “देखो तुम्हारे राजमें किस प्रकारका अंध:कार है?” त्यावर इंदिरा गांधी चिडून बोलल्या, “क्या ये आपका राज नहीं?” मी प्रत्युत्तर दिले, “ये हमारा राज नहीं, आपकाही राज है, आपके राजमेंही ऐसा अंधा कानून चलता है।” सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी, मुख्यमंत्री वसंतराव नाईक सर्वच स्तीमित झाले. मग मी निवेदन त्यांच्या पी. ए.कडे दिले. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली. आरोपींना अटक झाली व गवई बंधूंना न्याय मिळवून देण्यात मी यशस्वी झालो, याचे मला समाधान आहे.

ब्राह्मणगाव, पिसेगाव, भूगाव, संगमनेर, पेठ, आसखेड, येणेरे, गोनवडी अशा ज्या गावात जातीय अत्याचार घडेल, त्या गावी प्रत्यक्ष जाणे, अत्याचारी शक्तींना ठेचणे, दलितांना संरक्षण देणे अशा मोहिमांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात ‘पँथर’ पोचली. पुणे जिल्ह्यातील ‘हाडकी-हाडवळा’च्या गावगुंडांनी बळकावलेल्या जमिनी परत मिळवून देण्याची मोहीमच दलित ‘पँथर’ने उघडली आणि जमिनी मिळवून दिल्याही.

दलित पँथर’ला मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबरोबरच प्रखर विरोधालाही तोंड द्यावे लागले

या झंझावातामुळे जशी ‘दलित पँथर’ची लोकप्रियता वाढू लागली, तशी काँग्रेस, शिवसेना व रिपब्लिकन पक्ष यांच्यात अस्वस्थता वाढू लागली. त्याचदरम्यान 1974 साली मध्य मुंबईतील लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. काँग्रेसतर्फे रामराव आदिक व कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉ. रोझा देशपांडे उभ्या होत्या. अशा चुरशीच्या लढतीत ‘दलित पँथर’ने ‘खेड्यातील दलितांवर बहिष्कार टाकणार्‍यावर शहरातील दलितांचा बहिष्कार’ अशा मथळ्याचे पत्रक प्रसिद्ध करून निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केली. त्यामुळे सत्ताधार्‍यांचे धाबे दणाणले व हमखास मिळणारी दलितांची मते गमावण्याची भीती निर्माण झाली आणि त्यातूनच वरळीतील सेना-काँग्रेसच्या जातीयवादी गुंडांनी 5 जानेवारी, 1974 च्या ‘दलित पँथर’च्या जाहीर सभेवर तुफान दगडफेक करून सभा उधळली व पोलिसांनी गुंडांना आवरण्याऐवजी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली; आणि उलट पोलिसांनी राजा ढालेंसह इतर नेत्यांना बेदम मारहाण करत तुरुंगात डांबले. त्याचे पडसाद मुंबईतील इतर दलित वस्त्यांत उमटले व वरळी, नायगावमध्ये दंगल उसळली. त्यानंतर दंगलीच्या निषेधार्थ 10 जानेवारी रोजी निघालेल्या मोर्चावर शिवसेनेने केलेल्या हल्ल्यात भागवत जाधव हा ‘पँथर’ शहीद झाला. या वरळीच्या दंगलीनंतरच ‘पँथर’ महाराष्ट्राभर पसरली.

इतक्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या संघटनेच्या फाटाफुटीची कारणं काय असावीत, असे तुम्हाला वाटते; सत्ताधार्‍यांचा राजकीय हस्तक्षेप, नेतृत्वातील हेवेदावेमहत्त्वाकांक्षा की सैद्धांतिक मतभेद?

‘पँथर’वर सत्ताधारी तर टपूनच होते. वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी नेत्यांवर खटले भरत सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत होतेच; पण इतक्या अल्पावधीत मिळालेल्या प्रसिद्धीमुळे नेत्यांच्याही महत्त्वाकांक्षा वाढल्या होत्याच. त्यात कमी शिकलेला नामदेव कवी म्हणून लोकप्रिय होत होता, त्याच्या भाषणांना तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. मनुष्यस्वभावच असा आहे की, दुसर्‍याला मिळणार्‍या प्रसिद्धीमुळे असूया निर्माण होते. त्यात राजा ढाले यांनी एका व्याख्यानमालेत नव्या संघटनेची घोषणा केली; तर नामदेव ढसाळ यांनी वरळीच्या एका सभेत ‘मी हाडाचा कम्युनिस्ट आहे,’ अशी वल्गना केली. त्यानंतर संघटनांतर्गत धुसफूस वाढू लागली. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. माझी भूमिका नेहमीच समन्वयाची राहिली; पण कोणीच ऐकायला तयार नव्हते. मी त्यांना समजविण्यात अपयशी ठरलो. ज्या रिपब्लिकन नेतृत्वाच्या दुष्प्रवृत्तीवर आम्ही सडकून टीका करायचो, त्याच दुष्प्रवृत्तीची लागण आमच्यातही होऊ लागली. मग कम्युनिस्ट वगैरे सैध्दांतिक कारणे पुढे केली गेली. खरे तर आमचे सगळे खटले कम्युनिस्ट वकीलच चालवायचे. कॉ. जी. एल. रेड्डी, कॉ. सुंदर नवलकर यांची आम्हाला भूमिगत असताना खूपच मदत झाली होती.

तुरुंगातील पाखरे

झिंदाबाद मुर्दाबादचा जयघोष करत

आगीचा लोळ आता पुढे येतोय

अटकाव करू पाहणार्‍या

समुद्रातही वडवानल जन्म घेतोय.

आता अटकाव कसला:

धमणीधमणीने ज्वालामुखी व्हायचे

इंचाइंचागणिक

खंदक खणत जायचे

कारागृहाची भीती कुणाला?

उभं आयुष्य तुरुंग समजून सहनलं

हे ही बरंच झालं :

तुरुंगाच्या पायथ्याशी सुरूंग पेरणं शक्य झालं

किती जेल्स्…. किती बरॅक्स्….

याचा एकदा हिशोब करा

उधाणलेल्या समुद्राला बांधणार कसं

याचं एकदा गणित मांडा

समतेचं वारं प्यालेली पाखरं…

त्यांना असं डांबू नका

तुरुंगासह ती उडू जाणार नाहीतच

अशा भ्रमात राहू नका.

. वि.

दलित पँथर’चे संस्थापक म्हणून आजच्या तरुणाईला तुम्ही काय सांगाल?

‘दलित पँथर’चा लढा केवळ कोणाची जमीन मिळवून देणे एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता; हा लढा घटनात्मक अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी होता. समतेची प्रस्थापना, स्वातंत्र्याचे मोल, बंधुभाव जपण्यासाठी होता, माणसाला माणूसपण बहाल करून माणसामाणसांमधील दरी मिटविण्यासाठी होता. वर्णवर्चस्वाचा डोलारा उद्ध्वस्त करण्यासाठी होता. तो होता भयग्रस्तांना आणि अभावग्रस्तांना मुक्त करण्यासाठी, श्रमाला आणि घामाला प्रतिष्ठा देण्यासाठी. त्यासाठी अनेक तरुणांनी त्याग केला, तुरुंगवास भोगला, अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. त्यांच्यामुळे आंबेडकरी चळवळीला उजाळा मिळाला. तिचा काळ छोटा असला तरी भारतीय राजकारणावर, समाजव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा इतिहासातील तो अविस्मरणीय कालखंड ठरला.

आजही देशात व महाराष्ट्रात ‘रमाबाई कॉलनी हत्याकांड’, ‘खैरलांजी’, ‘हाथरस’सारख्या अमानुष अत्याचाराच्या घटना घडत आहेत, ‘भीमा-कोरेगाव’सारख्या दलितांवरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत पण त्यातील भिडे-एकबोटेंसारख्यांना अटक करण्याऐवजी दलित-आदिवासी-सामाजिक कार्यकर्ते, विचारवंतांना अटक करून मुस्कटदाबी केली जात आहे. ब्राह्मणी फॅसिस्ट शक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची मूल्ये रोज पायदळी तुडवत आहेत. अशा काळात तरुणांनी ‘दलित पँथर’सारख्या संघटनेच्या विचार-कृतीतून प्रेरणा घेत तो वैचारिक वारसा पुढे नेण्याची आज नितांत गरज आहे.

मुलाखत – राजीव देशपांडे, सुबोध मोरे


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]