आलोक राजीव देशपांडे -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी निगडित माझ्या आयुष्यातील सर्वांत पहिली आठवण कोणती असा प्रश्न जर मला कोणी विचारला, तर माझ्या ओठांवर पहिले शब्द येतील ते म्हणजे अंनिसचे शांतिवन, पनवेल येथील पहिले अभ्यास शिबिर.
त्या वेळेस वास्तविक मी केवळ चार वर्षांचा होतो आणि मला तेव्हाचे काहीही आठवत नाहीये. पण, घरात आई -बाबा आणि समितीमध्ये काम करणारे अनेक काका व मावशी यांच्याकडून त्या शिबिराबद्दल अनेक वेळा ऐकून-ऐकून मला तेव्हाची प्रत्येक घटना आत्ताच तर घडली आहे, अशा प्रकारे फिट्ट बसली आहे. त्यातील एक तर माझी फारच आवडीची. शिबिराची सांगता होत असताना, दाभोलकरांनी आभार प्रदर्शनाचे भाषण केले. त्यात शेवटी त्यांनी माझा विशेष उल्लेख केला. ‘मी न रडता, कोणाला त्रास न देता आणि शांतपणे शिबिरात बसल्याने सर्व वत्यांचे भाषण उपस्थितांना व्यवस्थित ऐकता आले’ म्हणून त्यांनी हसत-हसत माझे पण आभार मानले होते.
डोंबिवलीत समितीचे काम नव्यानेच सुरू झाले होते. तरुण कार्यकर्ते तर होतेच, पण त्यांना मार्गदर्शन करायला जबाबदार, विचारवंत होते आणि चळवळ म्हणजे रिकामपणाचे धंदे असली मानसिकता फारशी रुजली नव्हती. त्यामुळे, नोकरी सांभाळून, डोंबिवलीसारख्या नव्याने आकारास येणार्या मध्यमवर्गीय शहरात अंनिस तेव्हा जोमाने कामास लागली. आई, बाबा क्रियाशील सदस्य होतेच, पण एक नवी टीम तिथे तयार झाली आणि त्यातून सगळ्यांचे घरी येणे-जाणे, मीटिंग, कार्यक्रम, निदर्शने, पुस्तके, प्रवास सुरू झाला. केवळ अंनिस नव्हे, तर माझी आई रेखा – बाबा राजीव देशपांडे यांचे काम डावे राजकीय पक्ष आणि आंबेडकरी चळवळींसोबत देखील चालू होते. त्या क्षेत्रातील कार्यकर्ते देखील नियमित घरी यायचे. त्यांच्या गप्पा, चर्चा यातून देखील सामाजिक आणि वर्गीय जाणीव विकसित होत गेली. परिवर्तनाच्या चळवळीत काम करताना देखील एकांगीपणे विचार करण्याचा धोका अनेक वेळेस असतो. तो काही प्रमाणात तरी यातून दूर झाला. हे सगळे वयाच्या चार वर्षांपासून माझ्या डोळ्यांसमोर घडत होते आणि त्यातूनच माझी समज देखील घडत गेली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने दाभोलकर अनेक वेळा घरी येत, राहात आणि भरपूर गप्पा होत, ज्यात सर्वांचा सहभाग होता. घरातील केवळ पुरुष चळवळीत आणि बाई स्वयंपाकघरात असा प्रकार कधीच नसल्याने कामाची वाटणी, जबाबदारी ते वाद झाल्यास नवर्याच्या विरोधी भूमिका घेणे म्हणजे काही ‘पाप’ नाही अशा छोट्या वाटतील परंतु महत्त्वाच्या गोष्टी आपोआप समजत गेल्या. रस्त्यात उभे राहून पत्रक वाटणे, घोषणा देणे किंवा अगदी भाषण करणे, वगैरे गोष्टीतून भीड चेपली. पुढे विद्यार्थी चळवळीत भाग घेताना याचा पूर्ण उपयोग झाला.
आज पत्रकार म्हणून काम करताना एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे लहानपणापासून चळवळीचा भाग असल्याने काही गोष्टी आपसूक माझ्याकडे आल्या. एक म्हणजे, कोणीतरी सांगत आहे म्हणून त्यावर विश्वास न ठेवता, स्वत:चे डोके वापरून त्या गोष्टीची खात्री करून घेणे. दुसरी महत्त्वाची म्हणजे एखाद्या घटनेमागे असणारी सामाजिक आणि भौतिक परिस्थिती जाणून घेऊन त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज. अंनिसची चळवळ डोकं वापरायला शिकवते, ते हेच. कार्यकर्त्यांच्या घरात वाढल्याने याची शिकवण लहानपणापासूनच मला मिळत गेली.
अर्थात, आपण चळवळीत आहोत म्हणजे आपले विस्तारित कुटुंब, पण आपल्याच विचारांचे असेलच असे नाही. अशा वेळेस संघर्षाचे प्रसंग येऊ शकतात. मात्र, त्या वेळेस आपली तत्त्वे न सोडता, इतरांना आपला मुद्दा कसा पटवून द्यायचा याचे शिक्षण देखील घरातच झाले. आमच्या शेजारी दरवर्षी गणपती बसायचे. मला कधीच पाया पडायला जाऊ नकोस असे आई-बाबाकडून सांगितले नाही. मी दरवर्षी जायचो, पाया पडायचो आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचायला देखील जायचो. थोडा मोठा झाल्यावर, उत्सवाचे बाजारीकरण होऊ लागण्याचे आणि समाजातील विविध वर्गांत वावरून कर्मकांडांचे स्वरूप लक्षात आल्यावर, माझाच उत्साह कमी झाला. यात माझ्यावर एका ठरावीक विचारानेच वाग अशी जबरदस्ती कधीच झाली नाही. माझ्यासमोर केवळ समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण याच्या चर्चा झाल्या, पुस्तके दिली गेली आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार ठेवला गेला. विद्यार्थी चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले. त्यातून माझे पुढचे विचार घडत गेले. हे केवळ चळवळीशी संबंधित घरांमध्येच होऊ शकते, असे मला वाटते.
मतभेद हे जिवंत लोकशाहीचे लक्षण असते. ऐकणे आणि ऐकवणे याची तयारी नसेल तर खुराड्यातील मेंढरे आणि माणूस यात फरक काय? ‘अंनिस’मध्ये काम करताना दाभोलकर आणि बाबा यांचे वैचारिक वाद कधी झाले नाहीत असे नाही. राजकीय भूमिका घेण्यावरून दुमत असायचे आणि मोठी चर्चा देखील व्हायची. तसे असून देखील, अंनिसचा व्यापक मुद्दा दोघांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. शेवटी लोकशाही मूल्यांचा आदर म्हणजे हेच तर आहे ना? संघटना कोणाच्या ताब्यात आहे यावर रणकंदन करण्यापेक्षा, संघटना योग्य काम करीत आहे ना यावर लक्ष ठेवणे कधीही योग्य. तसा समंजसपणा दाखवला तरच संघटना वाढू शकते, याचे शिक्षणही मला अंनिसच्या कामातूनच मिळत गेले.
लग्न अनेकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. माझ्या प्रेमविवाहाला घरून विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, लेखा-माझी पत्नी पारंपरिक घरातून येत असल्याने लग्न, रीतीरिवाज पाळत व्हावे अशी तिच्या घरातल्यांची इच्छा होती. ही कसोटीची वेळ असते. अख्खे आयुष्य इतरांना कर्मकांड करू नका सांगितल्यावर, स्वतःच्या मुलाच्या बाबतीत भावनिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता असते.
‘तुला पारंपरिक पद्धतीने विवाह करावाच लागला तर कर, पण मग आम्ही केवळ पाहुणे म्हणून तिथे असू’ हे स्पष्टपणे, न चिडता आई-बाबाने मला सांगितले. भावनिक न होता, स्वत:च्या मुलाला हे सांगण्याची ताकद, केवळ आणि केवळ विचारांना असलेल्या स्पष्टता आणि चळवळीप्रति असलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांना मिळाली असे मी मानतो.
अर्थात, ती वेळ कधी आलीच नाही. लेखा जरी पारंपरिक घरातून होती तरी महाविद्यालयीन काळात ती डाव्या, पुरोगामी विद्यार्थी संघटनेत कार्यरत होती. त्यामुळे तिने घेतलेली भूमिका तिच्या घरातल्यांना मान्य करावीच लागली आणि आम्ही दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या सगळ्यात एक सल कायमची राहील. ती म्हणजे, आमच्या लग्नाला तीन पैकी एक साक्षीदार म्हणून सही करायला दाभोलकर येणार होते. त्यांचे येणे नेमके काही कारणाने रद्द झाले. ते आले असते तर त्यांचा Autograph माझ्या संग्रही कायमचा राहिला असता.
आज मी पत्रकार आहे. लेखा तिचा व्यवसाय थाटण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या कमालीच्या धर्मांध, फॅसिस्ट आणि हुकूमशाही दिशेने जाणार्या राजकारण आणि समाजकारणात पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी जनता व कार्यकर्त्यांच्या जोडीला आम्ही दोघेही उभे आहोत, शक्य तेवढी मदत करत आहोत. ती केवळ चळवळीची नाही, तर आमची देखील गरज आहे. कारण या मूल्यांचा पराभव म्हणजे तो आपला पराभव असेल.
आमच्या मुलीचे नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हा, शक्यतो धर्मविरहित नाव ठेवावे असा विचार करत आम्ही तिचे नाव ‘झेलम’ असे ठेवले. तिने खेळ खेळावे, पुस्तके वाचावीत, अभ्यास करावा आणि नव्याचा शोध घ्यावा हीच आमची पण इच्छा आहे. पण हे करताना इथल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सत्याला न नाकारता त्याला सामोरे जाण्याची तिच्यात ताकद यावी व जमल्यास तिचा क्रियाशील सहभाग तिने नोंदवावा असाच आम्ही प्रयत्न करू. आणि याची प्रेरणा आहे आमचे चळवळीशी असलेले नाते, जे तयार झाले माझ्या घरामुळे.
(आलोक देशपांडे हे ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये स्पेशल करन्स्पॉडंट म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत.)