-

कोरोनाच्या साथीचा विळखा जगभरात आणखीच घट्ट होत चाललेला आहे. हा लेख लिहित असताना कोरोनाबाधितांची जगभरातील संख्या 28 लाख 50 हजारांपर्यंत पोचली असून मृतांची संख्या 1 लाख 98 हजार 116 पर्यंत पोचली आहे. लेख प्रसिद्ध होईपर्यंत त्यात खूप वाढ होऊ नये, हीच सदिच्छा! अमेरिकेसारखा महाबलाढ्य आणि युरोपातील विकसित देश या साथीला परतावून लावताना मेटाकुटीला आले आहेत; पण संघर्ष जारी आहे. भारतातही काही वेगळी परिस्थिती आहे, अशातला भाग नाही. तुलनात्मकदृष्ट्या बाधितांची आणि मृत्यूची संख्या कमी आहे; पण हा त्वरेने पुकारलेल्या देशव्यापी टाळेबंदीचा परिणाम की चाचण्यांचे प्रमाणच कमी, याबाबत वेगवेगळी मते मांडली जात आहेत. पण एक मात्र खरे की, नवउदारवादी धोरणांमुळे मोडकळीस आणल्या गेलेल्या बँकिंग, आरोग्य, वितरण अशा विविध सार्वजनिक व्यवस्थांच्या व तुटपुंज्या साधनांच्या सहाय्याने सरकारी व्यवस्था जरी या साथीशी मुकाबला करण्याचा प्रयत्न करीत असली, तरी सर्व बाजूंनी सुरक्षित असलेला वर्ग सोडला तर गरीब, कष्टकरी, संघटित-असंघटित कामगार, स्थलांतरित कामगार या वर्गात आपल्या भवितव्याबाबत प्रचंड असुरक्षितता जाणवत आहे.
कोरोनाच्या साथीने एका बाजूला जीवाला धोका निर्माण केला आहे, तर दुसर्या बाजूला लाखो कष्टकर्यांच्या जीवनमानाला धोका निर्माण केला आहे. या दोन्ही धोक्यांच्या प्रतिकारावर सर्वांचेच लक्ष केंद्रित आहे; पण या लढाईच्या सावलीत वाढणार्या तिसर्या एका वाढत्या धोक्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसत आहे. हा तिसरा वाढता धोका आहे, स्त्रियांवरील वाढते अत्याचार! टाळेबंदीच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढत असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे म्हणणे आहे. केवळ भारतातच नव्हे; तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन आणि इतर अनेक पाश्चिमात्य देशांतही स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या मोठ्या संख्येने येत आहेत.
सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधलेली प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांतून अनेक खोट्या आणि धर्माधर्मांत द्वेष निर्माण करणारा प्रचार कोणताही विधिनिषेध न बाळगता केला जात आहे. दिल्लीतील मरकजचे प्रकरण असो अगर पालघर परिसरातील झुंडबळी; अशा प्रकरणांना धर्मांध रंग चढवत धर्माधर्मांत द्वेष पसरवत समाजातील दुफळीच्या वातावरणाला हातभारच लावला जात आहे आणि या सगळ्याला सत्ताधारी पक्षाकडून चाप लावण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही; उलट भाजपचे नेते, मंत्री गोमूत्र, मंत्रपठण याबाबत अवैज्ञानिक व अंधश्रद्धा पसरवणारे दावे करण्यात आघाडीवर आहेत.
अशा वेळी रोजगार नसलेले रिकामे हात, रिकामी डोकी, भवितव्याच्या भीतीने धास्तावलेले तरुण, दारूचा अंमल, पुरुषीपणा, प्रशासकीय व्यवस्थांवरील अविश्वास, कोरोना संसर्गाची भीती; तशात सोशल मीडिया आणि इतर प्रसारमाध्यमांतून राजकीय फायद्यासाठी होणारा धर्मांधतेचा व अंधश्रद्धेचा मारा, याच्या परिणामी निर्माण होणार्या असुरक्षित मानसिकतेतून येणार्या वैफल्यग्रस्ततेतून अफवा, अंधश्रद्धा, अविश्वासाच्या विळख्यात सापडलेल्या जनतेच्या कायदा-सुव्यवस्थेला न जुमानणार्या झुंडी बनतात आणि मग गडचिंचलीत झुंडबळीसारख्या निषेधार्ह घटना घडतात.
अशी अनेक आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय आव्हाने असली, तरी यातूनही या साथीच्या प्रतिकाराच्या लढ्याला सर्वसामान्य जनता सर्व संकटे सोसत अनेक वैज्ञानिक, संशोधक, व्यक्ती, संस्था, पोलीस, प्रशासकीय, आरोग्य व्यवस्था यांच्या सहाय्याने मोठ्या धैर्याने तोंड देत आहे. समाजात पसरलेल्या किंवा आपल्या हितसंबंधांना जपण्यासाठी पसरवलेली भीती, द्वेष, अविश्वास या भावनांवर मात करत जात-पात, धर्म, वंश, प्रांत, देश याला ओलांडून जात निखळ मानवतेच्या भावनेने एकमेकाला सहाय्य करीत या संकटावर मात करण्याचा पयत्न करीत आहे. या जनतेच्या संघटित प्रयत्नांना निश्चितच यश लाभेल, अशीच सदिच्छा महाराष्ट्राचा 60 वा वर्धापनदिन आणि कामगार दिनानिमित्त आम्ही व्यक्त करतो.
मार्चमध्ये कोरोनाच्या साथीची तीव्रता वाढू लागली आणि 23 मार्चच्या जनता संचारबंदीनंतर देशव्यापी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. एप्रिलच्या अंकाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती; पण प्रेस बंद असल्यामुळे वार्तापत्राचा अंक छापता येणार नाही व पोस्ट बंद असल्याने पाठवताही येणार नाही, हे तर स्पष्टच होते. त्यामुळे अंक ई-स्वरुपात काढण्याचे आव्हान सांगली येथील ‘अंनिवा’ कार्यालयातील सहकार्यांनी स्वीकारले व व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘वर्क फॉर्म होम’चा कोणताही पूर्वानुभव नसताना अनेक अडचणींना तोंड देत अत्यंत कमी काळात यशस्वीपणे ते पारही पाडले. बरोबर एक एप्रिलला नेहमीप्रमाणे हा अंक ई-स्वरुपात प्रसारित करण्यात आला. ही राहुल व सुहास पवार, सुहास यरोडकर, संदीप भोरे आणि दिनेश धनसरे या त्याच्या सहकार्यांसाठी अभिनंदनीयच बाब आहे. डॉक्टर असते तर त्यांना शाबासकी देत त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने नक्कीच म्हणाले असते, ग्रेट… ‘अंनिवा’चा या स्वरुपातील हा पहिलाच अंक होता. या अंकाचे स्वागत ‘सोशल मीडिया’वर कार्यकर्त्यांनी व इतरही वाचकांनी चांगलेच केले व या अंकाचा प्रसारही देशभर मोठ्या प्रमाणावर झाला. अनेक नवीन वर्गणीदार झाले. मेच्या या दुसर्या ‘ई-अंका’चेही वाचक स्वागत करतील व तो त्यांच्या पसंतीस पडेल, याची खात्री आहे. – संपादक मंडळ