पशुपालनातील अंधश्रद्धा व परिणाम

डॉ. व्यंकटराव घोरपडे - 9422042195

सुरुवातीच्या काळात पशुवैद्यांची, पशुवैद्यकीय दवाखान्यांची अपुरी संख्या; त्यामुळे विविध गावठी उपचार करणार्‍या लोकांवर पशुपालकांना अवलंबून राहावे लागत असे. शिक्षणाचा अपुरा प्रसार; त्यामुळे अशा गावठी उपचारावर, परंपरागत जुन्या चाली, रूढी, परंपरांवर विश्वास ठेवून पशुपालकास पुढे जावे लागत असे. सुरुवातीच्या काळात दुग्ध व्यवसाय, पशुपालन तसा जोडधंदा. कमी उत्पादनामुळे पशुधनाकडे तितकेसे लक्ष दिले जात नसे. मात्र होणारे नुकसान हे होतच असे. या सर्व अंधश्रद्धा पुढे विभागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या देखील पाहायला मिळाल्या. त्याला खतपाणी घालणारे, वाढवणारे अनेक घटक, व्यक्तीदेखील पाहायला मिळाल्या. पशुपालन, पशुउपचार आणि मानसिक गुलामगिरीच्या प्रत्येक पातळीवर अनेक अंधश्रद्धा पाहायला मिळाल्या.

कृत्रिम रेतन न करता नैसर्गिक पद्धतीनेच गायीम्हशीमध्ये गर्भधारणा व्हावी’ किंवा ‘कोंबड्यांना पिंजर्‍यात ठेवू नये.’ त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो, वगैरेवगैरेया बाबींचा प्रचार, प्रसार करताना देशातील एका मोठ्या समुदायावर ज्याची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो किंवा त्यांच्या उत्पन्नाचे साधन धोक्यात येऊ शकते, याबाबत कुठेही विचार होताना दिसत नाही, हे फार मोठे दुर्भाग्यपूर्ण आहे.

पशुपालनाचा इतिहास अत्यंत पुरातन आहे. रानटी अवस्थेतील प्राणी माणसाळविण्याचा प्रयत्न मध्य अश्मयुगात झाला. पण बरेचसे प्राणी नवपाषाण युगामध्ये; म्हणजे खिस्त पूर्व नऊ हजार ते आठ हजार वर्षांपूर्वी माणसाळविले गेले. खरंतर प्राणी मारून खाता- खाता हळूहळू पाळायला सुरुवात केली आणि आजमितीला अनेक कुटुंबांचा पशुपालन हा व्यवसाय आधारस्तंभ बनला. सर्वांत प्रथम कुत्रा नंतर मेंढी, गाय, घोडा, डुक्कर या क्रमाने प्राणी माणसाळविले गेले. सुरुवातीच्या काळात भटका आणि टोळ्या करून राहणारा मनुष्यप्राणी; शेती करता-करता त्याला पूर्ण स्थैर्य प्राप्त झालं आणि मग हरितक्रांती, श्वेतक्रांती, नीलक्रांतीच्या माध्यमातून प्रचंड प्रगती साधली.

आपल्या देशात आजही पशुपालन हा जोड व्यवसाय म्हणून केला जातो. आता हळूहळू अनेक तरुण पशुपालन हा मुख्य व्यवसाय म्हणून करत आहेत. येणार्‍या काळात पशुपालन हा अनेकांचा मुख्य व्यवसाय देखील होईल, यात शंका नाही. आज राज्यात जवळजवळ विसाव्या पशुगणनेनुसार एकूण ३३ दशलक्ष पशुधनापैकी राज्यातील एकूण २ कोटी ६६ लाख कुटुंबांपैकी फक्त ४६ लाख कुटुंबांकडे पशुधन आहे. सुरुवातीच्या काळापासून आजअखेर विविध स्थित्यंतरे घडत-घडत इथपर्यंत पोचलो आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात असलेल्या प्रचंड लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात सकस आहार म्हणून दूध पुरवण्यासाठी संकरित गोपैदासीचे धोरण स्वीकारले. परिणामी आज जगात आपण दुग्ध उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत. त्याचे सर्व श्रेय खरे तर भूमिहीन, अल्प, अत्यल्प भूधारक पशुपालक, पशुवैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ यांनाच द्यावे लागेल. या सर्वांनी घेतलेली प्रचंड मेहनत, योगदान यामुळेच हे शक्य झाले आहे.

मी स्वतः १९८२ मध्ये मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पदवीधर होऊन बाहेर पडलो. राज्याच्या पशुसंवर्धन विभागात ३७ वर्षे सेवा करून सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) म्हणून जुलै २०१८ मध्ये सेवानिवृत्त झालो. शेवटची चार वर्षे सोडली तर जवळजवळ ३३ वर्षे पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून काम केले. अनेक पशुपालकांशी संबंध आला. खरंतर बरे-वाईट म्हणणार नाही, बरे आणि चांगलेच अनुभव आले. अनेक ठिकाणी सहा-सात वर्षे एकाच ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हजारो कुटुंबांची प्रगती मला जवळून पाहता आली. त्यामध्ये ‘पशुसंवर्धना’चे योगदान हे मोठे असल्याने फार मोठे समाधान मला मिळत गेले. सेवाकालात पशुसंवर्धनातील विविध अंधश्रद्धा माझ्या कानावर येत होत्या. काही पाहता आल्या, काहींच्या खुमासदार चर्चांमध्ये दवाखान्यात निवांत वेळी सहभागी होता आले. त्याचवेळी त्यांचे शास्त्रीय विश्लेषण करून त्या थोपवण्याचा प्रयत्न देखील केला आणि त्यात बर्‍याच अंशी यश देखील मिळत गेले.

सुरुवातीच्या काळात पशुवैद्यांची, पशुवैद्यकीय दवाखान्यांची अपुरी संख्या; त्यामुळे विविध गावठी उपचार करणार्‍या लोकांवर पशुपालकांना अवलंबून राहावे लागत असे. शिक्षणाचा अपुरा प्रसार; त्यामुळे अशा गावठी उपचारांवर, परंपरागत जुन्या चाली, रूढी, परंपरांवर विश्वास ठेवून पशुपालकास पुढे जावे लागत असे. सुरुवातीच्या काळात दुग्ध व्यवसाय, पशुपालन तसा जोडधंदा. कमी उत्पादनामुळे पशुधनाकडे तितकेसे लक्ष दिले जात नसे. मात्र संभाव्य नुकसान होतच असे. या सर्व अंधश्रद्धा पुढे विभागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या देखील पाहायला मिळाल्या. त्याला खतपाणी घालणारे, वाढवणारे अनेक घटक, व्यक्तीदेखील पाहायला मिळाल्या. पशुपालन, पशुउपचार आणि मानसिक गुलामगिरीच्या प्रत्येक पातळीवर अनेक अंधश्रद्धा पाहायला मिळाल्या.

जनावर ‘वैरण खात नाही’ ही समस्या घेऊन पुष्कळ पशुपालक दवाखान्यात येत असतात. कोणत्याही आजाराचे ते प्रथम लक्षण असते. आजाराचे नेमके निदान न करता अनेक उपचार गावातील तथाकथित जाणकार करत असत व सुचवत असत. पैकी एक म्हणजे जिभेवर काटे आले असता तिथे चपलेने, शेणकुटांनी अथवा लोणच्याचा खार घासला तर वैरण खाते. मुळातच ते काटे असणे हे नैसर्गिक असते. मात्र ज्यावेळी वैरण खात नाही, अशावेळी पशुपालक तोंडात हात घालून पाहतो. त्याचवेळी त्याला ते जाणवते. मग अशावेळी तो वरील उपचार करतो. त्या चपलेमध्ये असलेल्या खिळ्या-मोळ्यांमुळे किंवा शेणकुटामध्ये काटा, दसाडी असेल तर जखम होण्याची शक्यता अधिक. मग ती जखम झाली की जनावर आणखी काही दिवस वैरण खाणे बंद करते. योग्य उपचारांनंतरही अनेक दिवस त्याच्या खाण्या-पिण्यावर बंधने येऊन उत्पादन घटू शकते. त्यामुळे नजीकच्या पशुवैद्याचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

वारंवार पोट फुगणे, वैरण कमी खाणे, घट्ट शेण टाकणे, तब्येत न सुधारणे अशा लक्षणांची जनावरे दवाखान्यात येत असतात. पशुवैद्य हा अशा जनावरांच्या पोटाच्या हालचाली स्टेथस्कोपने तपासून अखाद्य वस्तू; जसे – तार, खिळा, मोळा, प्लास्टिक खाल्ल्याचे निदान करतो. एकदा निदान केले आणि शस्त्रक्रियेचा मार्ग सुचवला की मग परत घरी, शेजारी-पाजारी चर्चा होते. अनेक उपायांचा भडिमार केला जातो. पैकी एक लोहचुंबकचे पाणी पाजा, प्लास्टिक काढून टाकण्यासाठी वेगवेगळे तेल पाजा… एक ना अनेक. या वस्तू शस्त्रक्रिया करून बाहेर काढणे हाच एकमेव उपाय आहे. एका ठिकाणी एक महाभाग गुदद्वारात हात टाकून संबंधित वस्तू काढल्याचे भासवून मोठी ‘बिदागी’ घेत असे. मात्र काही चाणाक्ष पशुपालकांमुळे त्याची चलाखी उघडकीला आली. हे महाशय हातातच वस्तू लपवून, हात टाकून परत बाहेर काढून पूर्वीपासून लपवलेली वस्तू दाखवून लोकांना फसवत असे. या ठिकाणी ‘रुमीनाटॉमी’ या एकमेव शस्त्रक्रियेमुळे जनावराचा जीव वाचू शकतो. अलिकडे ही बाब आता अनेक पशुपालकांच्या पचनी पडली आहे.

राज्याच्या विविध भागात मुळातच जमिनीत कॅल्शियम, फॉस्फरस या घटकांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अशा जमिनीत उगवलेल्या वैरणीमध्ये या घटकांचे प्रमाण नगण्य राहते. अशी वैरण खाल्ल्यामुळे जनावरांत देखील कॅल्शियम, फॉस्फरसची कमतरता निर्माण होते. अशा वेळी जनावरे आखडून चालतात. त्याला ‘उरमोडी’ म्हणतात. अशा जनावरांना आहारातून, इंजेक्शनद्वारे योग्य प्रमाणात हे घटक जर पुरवले, तर जनावरे निश्चितपणे बरी होतात. मात्र अनेक ठिकाणी उकिरड्यावर, केळीच्या खुंटावर अशा जनावराला लोळवले जाते. त्यांच्या अंगावर नाचून ही ‘उरमोडी’ बरी करण्याच्या नादात पाय, बरगड्या मोडून टाकल्या जातात आणि मोठं नुकसान केलं जातं. हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे.

‘खिलार’सारख्या जनावरांत पुष्कळ वेळा डोळ्यांचा कर्करोग होतो, मांस वाढते. सुरुवातीला निदान झाल्यास, तात्काळ उपचार म्हणून हरभर्‍याएवढ्या आकाराची गाठ काढून टाकली तर डोळा वाचतो. पुष्कळ वेळा गावठी उपाय करत बसल्यामुळे, तिची वाढ होते आणि पूर्ण डोळा खराब होतो. अशावेळी डोळाच काढावा लागतो आणि मग जनावर वाचवावं लागतं. मात्र अनेक मंडळी तंबाखू खाऊन थुंकणे, मिठाचे पाणी मारणे, चहाच्या बशीच्या तुकड्यांची बारीक पावडर करून ती कुंकवासह डोळ्यात भरणे, हिंगणीच्या झाडाचा पाला चावून डोळ्यात थुंकणे असे विविध अघोरी उपाय करतात. त्याचा विपरीत परिणाम होऊन अंधत्व येते, डोळे खराब होऊन जातात. अनेक वेळा डोळ्यांशेजारी डागणे, रुईचा चीक घालणे असे प्रकार देखील केले जातात. हे सर्व करता कामा नये.

अनेक वेळा जड पाणी, ‘ऑक्झलेट’ जास्त असणार्‍या वनस्पती, मॅग्नेशियम जास्त असणारे खाद्य, जास्तीची पेंड खाऊ घालणे, कमी प्रमाणात पाणी पाजणे यामुळे जनावरांमध्ये मुतखडा होतो. लघवीचे प्रमाण कमी होते. थेंब-थेंब लघवी होते. लघवी तुंबल्यामुळे मूत्राशय भरून जाते. जनावर ऊठबस करते. अशावेळी टोबा मारणे, करट-फोड फोडणे अशा उपायांनी मूत्राशय फुटून संपूर्ण लघवी शरीरात पसरते. जनावर मृत्युमुखी पडते. त्यामुळे गावठी उपाय न करता निश्चितपणे शस्त्रक्रिया करवून घ्यावी व होणारे नुकसान टाळावे. जनावरांना सर्व मोसमात भरपूर पाणी पाजणे, थोडंसं मीठ पिण्याच्या पाण्यात टाकून मुतखडा होणे आपण थांबवू शकतो. त्यामुळे असे उपाय केल्यास मुतखडा होणार नाही, शस्त्रक्रियेची गरज देखील भासणार नाही.

‘वर्षाला एक वेत’ हे यशस्वी दुग्ध व्यवसायाचे लक्षण आहे. मात्र अनेकविध कारणांमुळे वर्षाला एक वेत मिळेलच असे नाही. कृत्रिम रेतन करून देखील जनावर दोन-चार वेळा उलटते. मात्र काही महाभाग अशा चार-पाच वेळा उलटलेल्या जनावरावर नेमका उपाय करून घेण्याऐवजी अगदी गर्भाशयाची ‘अ ब क ड’ माहीत नसलेल्या वैदूंकडून गर्भाशयात हात घालून जखमा करणे, ओरबडणे असे प्रकार करतात. त्यामुळे जनावरास कायमचे वंध्यत्व येऊ शकते आणि मग जनावर मातीमोल किमतीत विकावे लागते. अनेक वेळा माजावर आलेल्या जनावरास चारा-पाणी न देता, कृत्रिम रेतनानंतर त्याला बसू न देता टांगून ठेवले जाते. त्यामुळे गर्भधारणा होण्याचे प्रमाण खूप कमी होते. तसेच कृत्रिम रेतनानंतर दोन ते तीन महिन्यांनी गर्भधारणा तपासणी केल्यास पशुपालकांना पुढील नियोजन करता येते. मात्र ते तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून वेळेत तपासून न घेता डोक्यावरचे केस गेलेत, लघवीला फेस येतो किंवा अतिआत्मविश्वासामुळे आपले जनावर गाभण आहे, अशी खात्री बाळगली जाते. मात्र प्रत्यक्षात जनावर गाभण नसल्याने एक पूर्ण वेतसुद्धा बुडून गेलेले पाहिले आहे. त्यामुळे असे गाभण गेलेले जनावर गाभण असल्याची खात्री तज्ज्ञ पशुवैद्याकडून करून घ्यावी व पुढील नियोजन करावे. जास्तीचा खुराक देण्याबाबत योग्य नियोजन केल्यास वेत वाचून जास्तीचे दूध उत्पादन देखील मिळू शकते.

जनावर व्याल्यानंतर त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. साधारणपणे जनावरे ही रात्री किंवा पहाटे वितात. अशावेळी बारीक लक्ष ठेवून त्यांना पूर्ण प्रायव्हसी, एकांतपणा देऊन त्यांचे बाळंतपण उरकून घ्यावे, गरज पडली तरच थोडी मदत करावी व वासरू बाहेर पडू द्यायला मदत करावी. जर जनावर अडलं तर तज्ज्ञ पशुवैद्याची मदत घ्यावी. अडलेली गाय, म्हैस, शेळी सोडवणारी गावात अनेक मंडळी असतात. मात्र शास्त्रीय ज्ञान नसल्यामुळे अशा लोकांकडून जनावर जर सोडवले गेले, तर अपघाताने जनावर, वासरू किंवा दोन्हीही दगावू शकतात. वेळ पडल्यास सिजेरियन शस्त्रक्रिया करावी लागली तर त्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्याची मदत नेहमीच फायदेशीर ठरते. अनेक वेळा जनावर व्याल्यानंतर वार अडकते. अनेक कारणांमुळे ते घडते. तेव्हा अनेक मंडळी ते पडण्यासाठी घरातील जुनी चप्पल, केरसुणी त्या वारीस बांधतात. त्याच्या ओझ्यामुळे वार पडायचे सोडून अंग बाहेर पडण्याची शक्यता वाढते आणि जनावराच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशा वेळी तज्ज्ञ पशुवैद्याच्या सल्ल्याने उपचार करावा. इतर लोकांकडून वार काढणे, अंग बसवणे असे प्रकार केव्हाही करू नयेत. बाहेर पडलेले अंग, ‘मायांग’ बसवताना ते जर व्यवस्थित बसवले नाही, त्याला जखमा केल्या, ते फाटले गेले तर जीवावर बेतू शकते. त्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्याकडून ते ‘मायांग’ योग्य ठिकाणी बसवून घेणे आवश्यक ठरते. त्यानंतर अनेकविध औषधोपचारांची गरज असते. तेव्हा अशा वेळी तज्ज्ञ पशुवैद्याचा सल्लाच उपयोगी पडतो, अन्यथा ते जनावर वाचले तरी कायमचे त्याला वंध्यत्व येऊ शकते.

वळूचे खच्चीकरण योग्य वेळी, योग्य वयात केल्यामुळे अनेक फायदे होतात. दवाखान्यात योग्य पद्धतीने ‘बर्डीझो’ चिमटा वापरून कमीत कमी त्रास आणि ताणविरहित खच्चीकरण केले जाते. अत्यंत कमी वेदना होतात. अजूनही काही दूरच्या ग्रामीण भागात अत्यंत अघोरी पद्धतीने अंडाशय बडवतात. काही वेळा बडवताना ते फुटू शकते. गुंतागुंत वाढून जीवावर बेतू शकते.

अनेक वेळा शेपटीला गँगरिन होऊन शेपूट टोकाकडून वाळायला सुरुवात होते. केस गळतात, शेपटी वाळून कडक होते. शेवटी शेपूट गळून पडते. त्यामुळे जनावर विद्रुप दिसते. त्यासाठी योग्य उपचार, शस्त्रक्रिया करता येतात. मात्र ते न करता शेपटी उकळत्या तेलात बुडवणे, तोडणे असे पीडादायक उपचार केले जातात. ते करता कामा नयेत.

अनेक वेळा जनावरांना जखमा होतात. त्यात अळ्या पडतात. अशा वेळी विविध अघोरी उपाय केले जातात. त्यामध्ये तंबाखू भरणे, रॉकेल, पेट्रोल, फिनाईल ओतणे, डांबर गोळी भरणे, राख लावणे, अनेक वेळा शेण देखील त्याच्यावर लिपले जाते. त्यामुळे जखम बरी होण्याऐवजी चिघळते. जनावरांना त्रास होतो. त्यासाठी योग्य पद्धतीने त्याचे ड्रेसिंग करून योग्य औषधे वापरली तर जखमा तात्काळ बर्‍या होतात.

जनावरांना एक ‘तिवा’ नावाचा विषाणूजन्य आजार होतो. त्याला ‘इफीमिरल फीवर’ असे इंग्रजीमध्ये म्हणतात. जनावराची प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर तीन दिवसांत हा आजार बरा होतो. मात्र त्यावरही उपाय करणारे ‘बहाद्दर’ आहेत. एकाच नावाच्या तीन-पाच स्त्रियांना एकत्र बोलवून ‘तिवा उतरवणे’ म्हणून तव्यामध्ये गरम कोळसा घालून तो त्याच्यावरून ओवाळला जातो आणि बरे होण्याची वाट पाहिली जाते. काही वेळा संकरित जनावरांना त्रास होऊ शकतो. गाभण जनावरांत गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे योग्य उपचार पशुवैद्यांच्या सल्ल्याने करणे हे केव्हाही चांगले असते.

राज्यात एका ट्रस्टच्या मालकीची ७०० ते ८०० मेंढरे चरायला बाहेर पडतात. स्थलांतर करत असताना अनेक ठिकाणी उभ्या पिकांत चरतात. शेतकर्‍यांचे नुकसान करतात. मात्र देवाचा कोप होईल, या भीतीपोटी कोणी विरोध करत नाही. तथापि, त्याबाबतची संबंधितांनी काळजी घेणे हे महत्त्वाचं आहे. ‘बोकड दूध देतो’ अशा प्रकारच्या बातम्या आपण अनेक वेळा माध्यमातून फोटोसह वाचतो. शरीरातील संप्रेरकांचे संतुलन बिघडल्यामुळे असे प्रकार घडतात. विशिष्ट वनस्पती खाण्यात आली तर अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यांना प्रसिद्धी मिळते आणि त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते.

आजकाल अशा प्रकारच्या घटना, प्रकार कमी प्रमाणात आढळून येतात. एकंदरीतच, जनावरांच्या दवाखान्यांची, पशुवैद्यांची वाढलेली संख्या, सोबत पशुपालकांचे प्रबोधन आणि प्रशिक्षणामुळे असे प्रकार अलिकडे कमी झाले आहेत. मात्र अजूनही काही ठिकाणी आढळतात, हे देखील तितकेच खरे आहे.

कालानुरूप ‘पंचगव्य’ उत्पादनाबाबत सुद्धा देशात अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन त्याबाबत पुन्हा संशोधन सुरू केले आहे. पूर्वीच्या काळी असणारी शेती, मातीचा स्तर, त्या काळातील वनस्पती, चारा, वैरण; त्यातून देशी गायीचे दूध, दही, तूप, शेण, लघवी यामधून उत्सर्जित होणारे घटक आणि त्याचे त्या काळातील होणारे परिणाम हे सद्यःस्थितीत प्रदूषण, वाढते तापमान, रासायनिक खतांचा वापर आणि इतर सर्व परिस्थितीनुरूप सिद्ध हवेत. ती करण्याची जबाबदारी अनेक संस्थांनी उचलली आहे. ते सप्रमाण सिद्ध झाले तर निश्चितच त्याचा फायदा समाजाला होऊ शकतो; फक्त आधुनिक शास्त्राच्या अनुषंगाने हे सिद्ध व्हावे, इतकेच.

आजकाल जग खूप जवळ आले आहे. अनेक घटना, बाबी यांची देवाणघेवाण वेगाने होत असते. जे लोक नेहमी अशा घटनांचा मागोवा घेत असतात, त्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडत असते. मात्र त्या बाबी जशाच्या तशा उचलणे आणि इतर भागात लागू करणे, हे थोडे धाडसाचे ठरते; किंबहुना त्याचा दूरगामी परिणाम हा संबंधित भागात होऊ शकतो. उदाहरणार्थ – ‘ए वन’, ‘ए-टू’ दुधावर कुठेतरी, न्यूझीलंडसारख्या देशात संशोधन झाले आणि त्याचे तेथील लोकांवरील, मुलांवरील परिणाम जर आपल्या, दूरवर असलेल्या देशात लागू करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम देशातील दुग्ध व्यवसायावर होऊ शकतो. आपल्या देशातील ९८ टक्के दूध हे‘ ए-टू’ प्रकारचे आहे. त्यामुळे ‘ए-वन’ प्रकारच्या दुधाची भीती किंवा होणारे नुकसान आपल्याकडे चर्चिले जाणे, हे सामान्य जनतेच्या दृष्टीने नुकसानीचे ठरू शकते. असे प्रकार घडताना संबंधितांनी त्या विरोधात बोलणं आवश्यक आहे. सोबतच ऑगस्ट २०२२ मध्ये ‘देशी अंड्यांमध्ये शिशाचे प्रमाण जास्त असते, ती खाऊ नयेत’ अशी बातमी झळकली. पण कोठे..? तर ते ऑस्ट्रेलियामध्ये! तेथील एका भागात, ज्या भागातील जमिनीमध्ये शिशाचे प्रमाण जास्त होते, त्या भागातील परसातील कुक्कुटपालनातून उत्पादित अंड्यांमध्ये शिसे आढळले. ती घटना, बातमी आपल्याकडे जर आपण सांगितली, बोलली गेली किंवा लिहिली गेली तर इथल्या देशी अंडी उत्पादनावर व्यवसायावर काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार होताना दिसत नाही.

अशा विविध बाबी आता समोर येत आहेत. ‘कृत्रिम रेतन न करता नैसर्गिक पद्धतीनेच गायी-म्हशीमध्ये गर्भधारणा व्हावी’ किंवा ‘कोंबड्यांना पिंजर्‍यात ठेवू नये.’ त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो, वगैरे…वगैरे… या बाबींचा प्रचार, प्रसार करताना देशातील एका मोठ्या समुदायावर ज्याची रोजी-रोटी त्यावर अवलंबून आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो किंवा त्यांच्या उत्पन्नाचे साधन धोक्यात येऊ शकते, याबाबत कुठेही विचार होताना दिसत नाही, हे फार मोठे दुर्भाग्यपूर्ण आहे.

एकंदरीत, विविध बाबी शास्त्रीय कसोटीवर तपासून घ्याव्यात. आता शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. अनेक जण प्रत्येक गोष्ट पडताळून पाहू लागलेत. त्यामुळे अंधश्रद्धेचे प्रमाण निश्चित कमी होऊ लागले आहे. निरनिराळ्या माध्यमांचा देखील त्यामध्ये सहभाग आहे. संबंधित मंडळींनी अशा गैरलागू बाबी, अंधश्रद्धा याबाबतीत समाज माध्यमात पुढे येऊन थेट बोलायला हवे आणि त्याचवेळी त्या बाबींविषयी सर्व काही चर्चा, शास्त्रीय बाजू जाहीरपणे जर मांडली गेली, तर अशा बाबींचा प्रचार आणि प्रसार चांगल्या प्रकारे रोखता येऊ शकेल, यात शंका नाही.

डॉ. व्यंकटराव घोरपडे (सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, सांगली)

लेखक संपर्क ः ९४२२० ४२१९५


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]