कवी इंद्रजित भालेराव -
परभणी येथे डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त कवी इंद्रजित भालेराव यांनी केलेले भाषण…
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांना जाऊन २० ऑगस्ट २०२३ रोजी दहा वर्षे झाली. पण अजून त्यांची हत्या करणारे मारेकरी आपण शोधू शकलेलो नाहीये. काल दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिनी परभणीच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनेक उपक्रमांचं आयोजन केलेलं होतं. परभणीचे डॉ. मानवतकर यांनी दाभोलकरांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. अजूनही अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम ते करतात. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आणि दाभोलकरांच्या दहा पुस्तकांचं प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात आलं. असे प्रकाशन समारंभ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेले असावेत. यानिमित्तानं काही परखड गोष्टी आपण बोलाव्यात असं मला वाटलं. तिथं जे बोललो तेच इथं नोंदीच्या स्वरूपात मी देत आहे.
दाभोलकरांची याआधीही पुष्कळ पुस्तक प्रकाशित झालेली आहेत. ती सगळीच पुस्तकं मी वाचलेली आहेत. पण ही दहा पुस्तकं म्हणजे दाभोलकरांच्या विशाल लेखनसागरातून काढलेलं नवनीत आहे. वीस ते चाळीस पानांच्या या पुस्तकांच्या किमती केवळ वीस रुपये आहेत. निर्मितीही उत्तम आहे. दाभोलकरांच्या विचारांची सारसूत्र सांगणारी ही पुस्तकं प्रत्येकानं वाचावीत अशीच आहेत. ती कुणाच्याही खिशाला परवडणारी आहेत. दाभोलकरांचं लेखन अतिशय साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत असतं. लेखनाचे विषय अवघड असले तरी दाभोलकरांची समजून सांगण्याची लेखनशैली सोपी असते.
यानिमित्तानं बोलताना सुरुवातीला दाभोलकरांच्या काही आठवणी जाग्या झाल्या. दाभोलकर यांना मी प्रथम पाहिलं ते तीस वर्षांपूर्वी १९९३ साली सातार्याला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात. दाभोळकर संमेलनाच्या स्वागत कक्षात बसून आलेल्या साहित्यिकांची नोंद करत होते. त्यांना उपयुक्त अशा फायलींचं वितरण करत होते. याशिवाय काही मार्गदर्शन हवं असेल तर तेही करत होते. तेव्हा हा साधासुधा माणूस एवढा मोठा असेल याची कल्पना मला नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नुकतीच सुरुवात झालेली असावी. अजून तिचा विस्तार आणि गवगवा झालेला नव्हता. दाभोलकर अजून साधनाचे संपादकही झालेले नव्हते.
पुढं दाभोलकर साधनाचे संपादक झाले. आणि जवळजवळ चार-पाच पानीच निघणार्या, बंद पडायला आलेल्या साधना साप्ताहिकाला त्यांनी मोठी ऊर्जा प्राप्त करून दिली. त्यासाठी त्यांनी कितीतरी प्रयोग केले. साधनाचे वर्गणीदार पाचशे वरून पाच हजारावर नेले. साधनाची पृष्ठसंख्या दहा पानांवरून अठ्ठेचाळीस पानावर नेली. हे सगळं त्यांनी आर्थिक दृष्ट्याही यशस्वी करून दाखवलं. त्यासाठी ज्या कल्पकतेनं त्यांनी काम केलं तसं काम त्याआधी कित्येक दिवस कुणाला जमलेलं नव्हतं.
हे काम करताना आपल्यासोबत काही युवक असावेत म्हणून त्यांनी अरुणा ढेरे, राजन खान, राजन गवस आणि मी अशा आम्हा चौघांना युवासंपादक म्हणून सोबत घेतलेलं होतं. मी महाराष्ट्रभर कवितांचे कार्यक्रम करत फिरत होतो. माझ्या त्या लोकप्रियतेचा साधनाला उपयोग व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. मी ज्या महाविद्यालयात जाईन तिथं साधनाची माहिती सांगून, साधनाचं माहितीपत्रक देऊन, साधनाचे वर्गणीदार वाढवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली होती. मी माझ्या पद्धतीनं जमेल तसं हे काम केलं. संपादक मंडळाच्या काही बैठकांनाही गेलो. त्यानिमित्तानं ग. प्र. प्रधान यांच्यासारख्या थोर समाजवादी नेत्यासोबत दिवसभर राहता आलं. ऐंशी वर्ष वयाचे प्रधान सर अथक काम करायचे, हे पाहून माझी मलाच लाज वाटायची. ही संधी दाभोलकरांनी मला दोन वर्ष दिली. या निमित्तानं मला साधना परिवारात वावरता आलं याचा आनंद आयुष्यभर पुरेल इतका आहे.
कुणाला कोणतं काम सांगावं हे माणसं ओळखून दाभोलकर नेमकेपणानं ठरवायचे. त्या माणसाची क्षमता आणि त्याची आवड-निवड लक्षात घेतली की तो माणूस ते काम आनंदानं करतो. पण कुणावरही कोणतंही काम सोपवलं तर ते काम होणारच नाही याची खात्री असते. त्याप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि साधना साप्ताहिक यासाठी लागणारी माणसं महाराष्ट्रभर फिरताना त्यांनी बरोबर हेरली. कोणता माणूस कुणीकडं कामाला लावावा हे ते बरोबर ओळखायचे. खर्या अर्थानं सामाजिक नेतृत्वाचे गुण त्यांच्यामध्ये होते. म्हणून या दोन्ही चळवळी त्यांनी कमालीच्या यशस्वी करून दाखवल्या. माझी निवड त्यांनी साधनाच्या मदतीसाठी केली होती याचा मला आनंद वाटला.
हसत-खेळत अविरत कठोर परिश्रम कसे करावेत याचं जिवंत उदाहरण म्हणजे दाभोलकर होते. सतत काम करत राहणं आणि ते करताना सतत प्रसन्न राहणं, हे एक वेगळंच कौशल्य असतं. ते दाभोलकरांना साध्य झालेलं होतं. आपला विचार कधीच सोडायचा नाही पण समोरच्याच्या विचाराचाही आदर करायचा, हे धोरण त्यांनी सातत्यानं ठेवलं. त्यामुळं मी देव मानत नसलो तरी माझ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं देव मानू नये, असा आग्रह मी करणार नाही, त्याला पटेल तेव्हा त्यानं माझा विचार स्वीकारावा, तोपर्यंत त्याचा विचार घेऊन त्यानं माझ्यासोबत काम करायला हरकत नाही, असं ते म्हणायचे. दाभोलकरांचं मन असं निर्मळ होतं.
दाभोलकर एका बाजूला साधना वाढवत होते आणि दुसर्या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन समितीही वाढवत होते. साधनेत त्यांनी कधीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विषय येऊ दिला नाही आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीत त्यांनी कधीही समाजवादी पक्ष आणला नाही. त्यामुळं हा माणूस ही दोन कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात कसा यशस्वी करू शकला याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामानिमित्तानं दाभोलकर परभणीतही अनेकदा यायचे. तेव्हा नटराज रंगमंदिरमध्ये होणार्या त्यांच्या भाषणांना सभागृहाच्या शेवटी बसून मी आवर्जून दाद द्यायचो. त्यावेळी दाभोलकर जे बोलायचे, ज्या तर्कशुद्ध पद्धतीनं युक्तिवाद करून ते वैज्ञानिक दृष्टिकोन मांडायचे, ते ऐकून समोरच्या कुणाही माणसाचं परिवर्तन व्हावं अशी ती विवेचन शैली होती. त्यासाठी दाभोलकरांनी खूप अभ्यासही केलेला होता आणि खूप निरीक्षणही केलेलं होतं.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा म्हणून त्यांनी चिकाटीनं सरकारकडं चिकाटीने तो विषय लावून धरला म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला. त्यामुळं बुवाबाजी करणारे सगळेच दाभोलकरांवर चिडले. कारण त्यांची दुकानं बंद झालेली होती आणि त्यांच्या दुकानदारीवर चालणार्यांचं राजकारणही धोक्यात आलेलं होतं. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. दाभोलकरांची हत्या होऊन आता दहा वर्षे झालेली आहेत पण अजून त्यांचे खुनी शोधण्यात आपला समाज, आपलं सरकार, आपले राज्यकर्ते आणि आपली प्रशासनयंत्रणा अयशस्वी झालेली आहे.
दाभोलकर काय करत होते? तर दाभोलकर समाजाला पुढं नेत होते. संपूर्ण समाज वैज्ञानिक दृष्टिकोनावर चालावा, कुणीही कुणाचीही फसवणूक करू नये आणि नव्या युगाचा नवा माणूस नव्या ताकतीनं उभा राहावा, देश खूप खूप पुढं जावा यासाठी ते ही चळवळ करत होते. ते असं करत असताना त्यांचा खून करण्यात आला. खून करणार्यांना नक्कीच आपला देश पुढं जावा असं वाटत नसणार. कारण तसं असतं तर त्यांनी दाभोलकरांची हत्या केलीच नसती. माणसं पुढं जाण्याला का भितात? पुढं जायला काही माणसांना का आवडत नाही? पुढं जाण्याची भीती माणसाला का वाटते? नव्या विचारांची भीती माणसाला का वाटते? त्याचं कारण त्याचं कमकुवत, आजारी मन. त्या माणसाचं मन हे सगळं नवं स्वीकारण्यासाठी सज्ज नसतं. त्याला या नव्याची भीती वाटत असते. जी माणसं मनानं आजारी आहेत ती माणसं नव्या विचारांची भीती वाटून मागे सरतात. उलट्या दिशेनं चालू लागतात. ती एकटी उलट्या दिशेनं चालली तर एकवेळ हरकतही नाही. पण त्या माणसांना जेव्हा असं वाटतं की सगळा समाजच उलट्या दिशेनं चालावा तेव्हा ती माणसं भयंकर क्रूर होतात. त्या क्रौर्यातूनच त्यांच्या हातून अशा हत्या होत असतात.
या गोष्टींचा विचार करताना आज असं वाटायला लागतं की सगळा समाजच असा मनोरुग्ण झालाय का? आपणाला पुढं जाण्याची अजिबातच इच्छा नाही का? संपूर्ण समाजालाच पुढं जायचं नाही आहे का? वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलेल्या घटनेवर चालणार्या सरकारलाही पुढं चालायला नको वाटतं का? सरकार, राजकारणीही मागं जाऊ इच्छितात का? असे कितीतरी प्रश्न या निमित्तानं मला पडले. असं जर नसेल तर मग आपण दाभोलकरांचे हत्यारे अजून का शोधू शकलो नाहीत? इंग्रजांच्या काळात यापेक्षा कितीतरी कठोर विचार मांडणारे राजा राममोहन राय, महात्मा फुले, पेरियार स्वामी, लोकहितवादी, आगरकर असे समाजसुधारक होऊन गेले. त्यांची कुणाचीही हत्या त्या काळातल्या प्रखर प्रतिगामी मंडळींनी देखील केली नाही. कारण इंग्रज सरकारच्या काळात कायद्याची दहशतच अशी होती की असल्या गोष्टी कोणी करू शकत नव्हतं. मग इंग्रज सरकार आजच्या आपल्या सरकारांपेक्षा चांगलं होतं असं म्हणायचं का? खरंतर असं म्हणण्याची, असा विचार करण्याची वेळ आपल्यावर यायला नाही पाहिजे होती. पण निजाम राजवट पाहिलेले आणि मुक्तिसंग्रामानंतरची आपली राजवट पाहिलेल्या लोकांनी जेव्हा आपल्या लोकशाहीतली अंदाधुंदी पाहिली तेव्हा ते ‘याच्यापेक्षा मोगलाई बरी होती,’ असं म्हणायला लागले. मोगलाई खरंच बरी होती का? नाही. इंग्रज खरंच बरे होते का? नाही. पण त्यांच्या प्रशासन आणि न्यायालय यंत्रणा कडक आणि कठोर होत्या. त्यामुळं तुलनात्मकदृष्ट्या लोकांना त्यांची आठवण होते. हे असं होऊ द्यायचं नसेल तर वर्तमान समाज, राजकारणी आणि प्रशासन यंत्रणेनं तत्परतेनं दाभोलकरांचे खुनी शोधायला हवेत, दाभोलकरांना न्याय द्यायला हवा, असं प्रत्येक विवेकवादी माणसाला वाटतं.
एवढी सगळी दहशत असताना अजूनही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक काम करतात. मरणाला भीत नाहीत. ही गोष्ट क्रांतिकारकच आहे. पारतंत्र्याच्या काळात देशावर प्रेम असणारी मंडळी अशी मरणाला न भिता सरकार विरोधात काम करत होती. तसेच हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक मरणाला न भिता काम करत आहेत. त्यांना सलामच करायला हवा.
काल दाभोलकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ झालेल्या कार्यक्रमासाठी माझा विद्यार्थीमित्र प्रल्हाद मोरे आणि माझे आणखी एक प्राध्यापक मित्र नवनाथ सिंगापुरे सर यांनी आवर्जून मला नेलं. त्यानिमित्तानं मला दाभोलकरांना आदरांजली वाहता आली. त्यांच्या आठवणींचं स्मरण करता आलं. कार्यक्रमानंतर जमा झालेल्या परभणी शहरातल्या डॉक्टर मंडळीशी खूप छान चर्चा झाली. खूप विषयावर चर्चा झाली. दाभोलकरांच्या विचारांवर चर्चा झाली. दाभोलकरांच्या आठवणी निघाल्या. या सगळ्या गोष्टीचा मला खूप आनंद वाटला. त्यासाठी या सगळ्यांचे आभारच मानायला हवेत. त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.