श्रीपाल ललवाणी -
१७ जून हा थोर बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने अं. नि. स., पुणे शहर शाखेतर्फे ज्येष्ठ कार्यकर्ता श्रीरंग मोहिते यांना आगरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड येथील कार्यकर्ता विजय सुर्वे यांना डॉ. दाभोलकर कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले. अंनिस, महाराष्ट्रचे विश्वस्त गणेश चिंचोले अध्यक्षस्थानी होते.
“अल्पशिक्षित साधा मजूर असूनही श्रीरंग मोहिते यांनी आयुष्यभर बुद्धिप्रामाण्यवादाची कास धरली. अंधश्रद्धा, व्यसन यांना विरोध केला. शिक्षणाचे महत्त्व ओळखून, आपल्या मुलांना सुशिक्षित बनवून, विकासाचा मार्ग दाखविला. त्यासाठी त्यांची आगरकर स्मृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली”, असे श्रीपाल ललवाणी यांनी प्रास्ताविकात सांगितले. पिंपरी-चिंचवड येथील कार्यकर्ता विजय सुर्वे यांचा परिचय करून देताना अनिल वेल्हाळ म्हणाले, “विजय सुर्वे हे न थकता, समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ता आहेत. डॉ. दाभोलकरांच्या विचारांनी ते भारावलेले आहेत.”
सन्मानाला उत्तर देताना श्रीरंग मोहिते म्हणाले, “मी व माझे कुटुंबीय आज जे काही आहोत ते डॉ. दाभोलकर व अंनिसमुळेच आहोत. डॉक्टरांनी माझ्या जीवनाला योग्य दिशा दिली.” आपले मनोगत व्यक्त करताना मोहिते यांचे पुत्र रवींद्र म्हणाले, “जागतिक पितृ दिनाच्या दिवशी माझ्या वडिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला याचा मला विशेष आनंद आहे.” सन्मानाला उत्तर देताना विजय सुर्वे म्हणाले, “आपल्या चळवळीत युवक सहभागी व्हावेत यासाठी आपण विशेष प्रयत्न करायला हवेत. युवकांच्या सहभागानेच चळवळ पुढे जाऊ शकते.”
मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “आर्थिक, राजकीय व सामाजिक लढा उभारणार्या गोपाळ गणेश आगरकर यांना महाराष्ट्र विसरला. त्यांची जयंती व पुण्यतिथी ही विशेष प्रमाणात साजरी केली जात नाही. त्यांचे विचार झाकले जात आहेत. त्यांना फारसे अनुयायी नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांचे खरे अनुयायी म्हणता येतील. ग्रंथप्रामाण्य नाकारणार्या बुद्धिप्रामाण्यवादी आगरकरांच्या नावाने अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुरस्कार देत आहे याचे मला कौतुक आहे व मी आपला आभारी आहे.” आपल्या अध्यक्षीय समारोपात, आपले चळवळीतील अनुभव सांगताना, आगरकर यांचे विचार पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन गणेश चिंचोले यांनी केले. मृणाल सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. वसंत कदम यांनी आगरकराविषयी अधिक माहिती सांगून आभार प्रदर्शन केले. दीपक गिरमे, तुलश्री रासकर, अरविंद पाखले, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव यांच्यासहित अनेक कार्यकर्ते व मोहिते कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते.
– श्रीपाल ललवाणी, पुणे अंनिस
