राजीव देशपांडे -

या महिन्यात महाराष्ट्रात आर्थिक फसवणुकीच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या. त्यातील एक घटना म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कांता बनसोडे या सेवानिवृत्त कर्मचार्यास मांत्रिक मंगेश भागवत याने पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून ३६ लाख रुपयांची फसवणूक केली.(याची सविस्तर स्टोरी या अंकात आहे.)
देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईमध्ये ‘टोरेस’ या फर्जी कंपनीने मुंबईकरांची तब्बल हजारो कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. सातारकरांना फसवणारा हा दाढी, कफनीवाला बुवा होता, तर मुंबईकरांना फसवणारा सुटाबुटातील ठग भामटा होता. सध्या बुवा आणि ठग हे दोघं ‘आम्ही तुमचं भलं करतो’ म्हणून जनतेस लुटत आहेत.
आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस येऊनही माणसे का फसतात? तर, झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न माणसाला स्वार्थी, लालची बनवते. पैशापुढे लालची झालेला माणूस आपली चिकित्सक बुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन गहाण ठेवतो. एकदा माणसाची बुद्धी रिकामी झाली की, त्याला सहज फसवता येते. हाच फंडा वापरून अनेक बुवा, बाबा तंत्र-मंत्राने आम्ही पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून लोकांची फसवणूक करतात, तर सुटाबुटातील ठग, भामटे हे आम्ही तुमचे पैसे मोठ्या स्कीममध्ये गुंतवून तुम्हाला ते काही दिवसांत दुप्पट करून देतो म्हणून लोकांना लुबाडतात. झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी अनेक जण हातात आहे तेही गमावून बसतात. प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स म्हणतात की, ‘प्रत्येक प्राण्यांमध्ये स्वार्थी जीन (जनुक) असतो. मनुष्यप्राणीदेखील त्याला अपवाद नाही. या स्वार्थी जीनमुळेच तो काही वेळा मोठ्या जाळ्यात फसतो.’
या स्वार्थी जीनसोबतच सध्या देशात जे आर्थिक अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे, तेही लोकांच्या फसवणुकीसाठी कारणीभूत आहे. कोरोनानंतर देशात अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत, अनेकांचे धंदे चालत नाहीत, देशातील गरीब गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत अति श्रीमंत होत चालला आहे. हे श्रीमंत लोक काहीतरी मोठा अनोखा व्यापार करून किंवा तंत्र-मंत्राने श्रीमंत होत असतील असा (गैर)समज आजही लोकांच्या मनात आहे. याच गैरसमजाचा फायदा सुशिक्षित ठग, भामटे आणि मांत्रिक घेऊन लोकांना नवनव्या पद्धतीने फसवत असतात. यावर उपाय म्हणजे माणसाने आपली सदसद्विवेकबुद्धी, चिकित्सक बुद्धी नेहमी जागृत ठेवली पाहिजे. कष्ट न करता शॉर्टकटच्या मार्गाने पैसा मिळवता येतो, ही गोष्ट मनातून हद्दपार केली पाहिजे. ‘जोडूनिया धन, उत्तम व्यवहारे’ हा संत तुकारामांचा अभंग अखंड लक्षात ठेवला पाहिजे. ‘उत्तम व्यवहार करून धन जोडा’ हा तुकोबांचा विचार आपल्या डोक्यात असला की, आपण फसवणुकीपासून चार हात दूर राहू!