अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा ‘शतकवीर’, ‘आधारस्तंभ’ पुरस्कार वितरण पुस्तकाचे गाव भिलार येथे उत्साहात

अंनिवा -

अंधश्रध्दा निर्मूलनाचा विचार सोप्या लोकभाषेत मांडूया अभिनेता किरण माने

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ गेली 32 वर्षे अखंडपणे प्रकाशित होत आहे. हे मुखपत्र महाराष्ट्रातील शहरी भागात; तसेच खेड्यापाड्यात पोचविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अतिशय मेहनत घेत वर्गणीदार गोळा करत असतात, देणग्या, जाहिराती मिळवत असतात. कार्यकर्तेगेली 32 वर्षेहे अतिशय अवघड काम कोणताही मोबदला न घेता करत आले आहेत. संघटना अशा कार्यकर्त्यांचा ‘शतकवीर’ (वार्तापत्राचे शंभर वर्गणीदार करणारे कार्यकर्ते, ‘आधारस्तंभ’ (वार्तापत्रासाठी देणग्या, जाहिराती संकलित करणारे कार्यकर्ते) पुरस्कार देऊन दरवर्षी गौरव करत असते. कोविड साथीमुळे गेली तीन वर्षेहा पुरस्कार वितरण सोहळा होऊ शकला नव्हता. कोविड बंधने कमी झाल्याबरोबर हा सोहळा ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख असलेल्या महाबळेश्वर जवळील भिलार या गावी हिलरेंज शिक्षण संस्थेच्या विस्तीर्ण पटांगणावरील भव्य मंडपात 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या मंडपाच्या आतील बाजूला वार्तापत्राच्या आजवरच्या वाटचालीची झलक दाखविणारे पहिल्या अंकापासून आजवरच्या अंकांच्या मुखपृष्ठाचे प्रदर्शन लावण्यात आले होते; तर बाहेरच्या बाजूला डोंबिवलीचे चित्रकार उदय देशमुख यांचे डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या चारही शहिदांच्या विविध भावमुद्रा चितारणारे चित्रप्रदर्शन लावलेले होते. हे प्रदर्शन पाहण्याची; तसेच पुण्याच्या ग्रंथदिंडीसह वार्तापत्र आणि इतरांच्याही पुस्तकविक्रीच्या टेबलांसमोर कार्यकर्त्यांची पुस्तके विकत घेण्याची, वार्तापत्रांचे सभासद होण्याची लगबग चालू होती.

कोविड काळातील दोन वर्षांत संघटनेत आणि संघटनेबाहेर अनेक घटना घडून गेलेल्या आहेत. अनेक जवळचे ज्येष्ठ कार्यकर्ते, नातेवाईक कोविडच्या साथीत कायमचे सोडून गेले. हे दु:ख एक बाजूला; तर नागपूर, गोंदिया या महाराष्ट्राच्या एका टोकापासून बेळगाव, रत्नागिरीपर्यंतचे नवे-जुने कार्यकर्ते एकमेकांना बर्‍याच काळानंतर भेटत असल्यामुळे झालेला आनंद दुसर्‍या बाजूला. अशा या उत्साही वातावरणात उद्घाटन सत्राची वेळ होईपर्यंत कार्यकर्ते एकमेकांना भेटत ओळख करून घेत चर्चा करत होते, गप्पा मारत होते.

उद्घाटन सत्र

या ‘शतकवीर’ आणि ‘आधारस्तंभ’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक आणि वाई येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शंतनु अभ्यकर यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते किरण माने होते. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी भिलारच्या हिलरेंज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तेजस्विनी भिलारे या होत्या, तर विचारमंचावर भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे होते.

गौरव सोहळ्याचे उद्घाटन अतिशय अभिनव पद्धतीने ‘पुस्तकाच्या गावा’ला आणि ‘अंनिस’च्या प्रबोधन परंपरेला साजेसे असे झाले. डॉ. शंतनु अभ्यकर यांनी‘धर्मचिकित्सेतून मानवतेकडे’ (‘अंनिवा’ वार्षिक 2008) आणि किरण माने यांनी ‘बुवाबाजीची भयानकता’ (‘अंनिवा’ वार्षिक 2000) या शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या लेखातील उतारे वाचले व या गौरव सोहळ्याचे उद्घाटन झाल्याचे डॉ. शंतनु अभ्यकर यांनी जाहीर केले. दोघेही कसलेले वक्ते, अभिनेते असल्याने डॉ. दाभोलकरांच्या लिखाणाचा आशय त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर अतिशय प्रभावीपणे पोचविला.

उद्घाटनानंतर केलेल्या आपल्या भाषणात डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी विज्ञानावर लिखाण करत असताना येणार्‍या अनुभवाबद्दलचे किस्से अतिशय खुमासदार पद्धतीने सांगत जग पूर्वीपेक्षा जास्त सायंटिफिक, रॅशनल आणि लिबरल होत असल्याचे प्रतिपादन करत आपले भाषण संपविले.

त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना अभिनेते किरण माने यांनी ‘अंनिस’च्या विचारपीठावर येऊन आपले विचार मांडण्याचे आपले स्वप्न होते, असे सांगितले. ते म्हणाले, संतपरंपरेपासून अंधश्रद्धेतून लोकांना जागे करण्याचे काम झालेले आहे. परंतु हे काम करताना अगदी तुकाराम महाराजांपासून दाभोलकर, पानसरे यांच्यापर्यंत त्याची किंमत चुकवावी लागली आहे. पण असे असले तरी अंधश्रद्धा निर्मूलनाचा, चिकित्सेचा विचार महत्त्वाचा असल्याने तो पुढे नेला पाहिजे. पण तो पुढे नेताना जहालपणा बाजूला ठेवत मनोरंजकपणे, लोकांच्या भाषेत मांडला, तरच लोक तो विचार स्वीकारतील.

आपल्या अध्यक्षीय भाषणात भिलारच्या हिलरेंज शिक्षण संस्थेच्या तेजस्विनी भिलारे यांनी आपल्या शाळेत घडलेल्या अंधश्रद्धांच्या घटनांचा मागोवा घेत अंधश्रद्धांचा आधार घेत लोक कसे फसवतात, यांचे वर्णन केले.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सल्लागार-संपादक प. रा. आर्डे व ज्येष्ठ शास्त्रज्ञ व ‘थॉट अँड अ‍ॅक्शन’ या ‘अंनिस’च्या इंग्रजी मुखपत्राचे संपादक प्रभाकर नानावटी यांची समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या मार्चच्या अंकाचे प्रकाशन विचारमंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘अंनिवा’चे सहसंपादक नरेंद्र लांजेवार यांच्या निधनाबद्दलचा शोक ठराव संपादक राजीव देशपांडे यांनी मांडला; तर आपल्या प्रास्ताविकात सहसंपादक मुक्ता दाभोलकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून; अगदी बेळगावपासून गोंदियापर्यंत आलेल्या ‘शतकवीर’, ‘आधारस्तंभ’ कार्यकर्त्यांचे स्वागत केले व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.

सहसंपादक अनिल चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला. पालघरचे अण्णा कडलास्कर यांनी स्वत: रचलेल्या ‘विवेकवादी जग हे सारे व्हावे…’ या गाण्याने सुरू झालेल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘अंनिवा’चे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी केले.

अनुभव कथन

उद्घाटन सत्रानंतर उपस्थित ‘शतकवीर’, ‘आधारस्तंभ’, हितचिंतक, कार्यकर्त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांच्या कथनाचा कार्यक्रम झाला. जवळजवळ दोन तास रंगलेल्या या कार्यक्रमात डॉ. संजय निटवे, मोहन भोईर, अनिल वेल्हाळ, श्रीपाल ललवाणी, निशा भोसले, धनंजय कोठावळे, उदय चव्हाण, वंदना शिंदे, उषा शहा, हेमंत शिंदे, आझाद सर, भगवान रणदिवे, संदेश गायकवाड, सीमा पाटील, मधुरा सलवारू, श्रीनिवास खुळे, लहाने सर, अशोक कदम, मधुकर गायकवाड, ब्रह्मानंद धडके, ओळेकर गुरुजी, मीना मोरे अशा 22 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यातील बहुतेकांनी बुवाबाजीचा भांडाफोड करताना, भानामतीची केस सोडवताना, विरोधकांच्या हिंसक प्रतिक्रियेशी सामना करताना, कुटुंबाला समजावताना, त्यांच्याशी व्यवहार करताना, ठिकठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम करताना, संघटनेचे उपक्रम राबवताना, वार्तापत्रासाठी देणग्या, वर्गणीदार गोळा करताना, ‘अंनिस’च्या विचारांशी संबंध आल्यावर आपल्या रूढी, परंपरा, समजुतीपासून फारकत घेत एका नव्या आयुष्याची सुरुवात करताना आलेल्या अनुभवांचे कथन केले. हे करताना डॉ. दाभोलकरांबरोबरच्या भेटीचा, चर्चाचा, सहवासाचा, सल्ल्याचा, व्याख्यानाचा, लिखाणाचा कसा फायदा झाला, यांचेही अनेकांनी वर्णन केले. स्वत:च्या जाती-पाती धर्म, कुटुंब, नातीगोती, सगेसोयरे, रूढी, परंपरा यांच्या पलिकडे जात आपल्या वैज्ञानिक, मानवतावादी दृष्टिकोनाचा निर्भयपणे वापर करत समाजाला संवैधानिक मूल्यांच्या दिशेने नेण्याची कळकळच प्रत्येक कार्यकर्त्याच्या अनुभवातून जाणवली. या सत्राचे संचलन वार्तापत्राच्या सहसंपादक मुक्ता दाभोलकर आणि अनिल चव्हाण यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रम

त्यानंतर पाचगणीतील रात्रीच्या थंडीत अण्णा कडलास्कर, सीमा पाटील, हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, गणेश चिंचोले, विजय पवार आणि इतर कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम रंगवला; तर संपूर्ण दोन दिवसांच्या कार्यक्रमातील सुरुवातीला चळवळीची गाणी गात उत्साही वातावरणनिर्मिती करण्याची जबाबदारी अण्णा कडलास्कर, वंदनाताई शिंदे, सीमा पाटील यांनी अतिशय सुरेखपणे पार पडली.

सांगलीच्या डॉ. संजय निटवे यांनी आणलेल्या दुर्बिणीतून हिलरेंज विद्यालयातील विद्यार्थी आणि ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उत्साहाने आकाशदर्शन घडविले.

रेस फॉर सेव्हन

27 फेब्रुवारीला ‘ऑर्गनायझेशन फॉर रेअर डिसिझेस इंडिया’ ही संस्था 7000 दुर्धर रोगांबाबत जाणीवजागृती मोहीम आयोजित करते. या मोहिमेअंतर्गत देशभरातील प्रत्येक गावात 7 किलोमीटरची सायकल फेरी या संस्थेने ठेवली होती. डॉ. संजय निटवे यांच्या नेतृत्वाखाली ‘अंनिस’चे कार्यकर्तेआणि समारंभाच्या प्रमुख पाहुण्या अलका धुपकर यांनीही त्यात सहभाग घेतला.

भिलार गाव भेट

त्यानंतर प्रशांत पोतदार व हौसेराव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी देशभरात प्रसिद्ध असलेल्या ‘पुस्तकाचे गाव’ भिलारला भेट दिली आणि संपूर्ण गाव फिरत त्या गावातील घरात विविध विषयांवर ठेवलेल्या पुस्तकांची पाहणी केली व पुन्हा सर्व कार्यकर्ते समारंभस्थळी उपस्थित झाले.

मुख्य पुरस्कार वितरण सोहळा

बुवाबाजीच्या बाजारात प्रश्न विचारण्याचा अधिकार अबाधित ठेवा

पद्मश्री अरविंद गुप्ता

सकाळी बरोबर 10 वाजता प्रत्यक्ष पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील आयुका या विज्ञान संस्थेतील निवृत्त प्राध्यापक शास्त्रज्ञ व मुलांसाठी शेकडो वैज्ञानिक खेळणी बनवत, पुस्तके लिहून त्यातून लहान मुलांच्यात वैज्ञानिक संकल्पना रुजविण्याचे; पर्यायाने विज्ञानप्रसाराचे काम करणारे पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्या हस्ते आणि कोणत्याही धमक्यांना न घाबरता सनातन्यांच्या कारवाया बेडरपणे उघडकीस आणणार्‍या प्रसिद्ध पत्रकार अलका धुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. शैलाताई दाभोलकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विदर्भातील गोंदियापासून कर्नाटकातील बेळगावपर्यंत विविध जिल्ह्यांतून आलेल्या ‘शतकवीरां’ना अरविंद गुप्ता यांच्या हस्ते; तर ‘आधारस्तंभां’ना अलका धुपकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येऊन गौरवण्यात आले.

‘शतकवीर’ कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन झाल्यावर केलेल्या अरविंद गुप्ता यांनी भाषणात सुरुवातीलाच या पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यात सहभागी होणे हे खूपच गौरवास्पद वाटत असल्याचे सांगितले. ‘आपल्या पूर्वजांनी सांगितले, आपल्या गुरूने सांगितले, आपल्या ग्रंथांनी सांगितले म्हणून तुम्ही आंधळेपणाने मान्य करू नका. त्याला प्रश्न विचारा, चिकित्सा करा आणि सत्य वाटले, जनहिताचे वाटले तरच मान्य करा,’ हे दीड हजार वर्षांपूर्वीचे बुद्धाचे वचन सांगत ते म्हणाले, सभोवार बुवाबाजीचा प्रचंड बाजार फुललेला आहे, त्याला पूरक असणारी ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’, त्यात अडकलेला युवक वर्ग, त्याला पाठिंबा देणारे सत्ताधारी या सगळ्यांमुळे आपल्या समाजाला अंध:कारात ढकलले जात आहे. अशा वेळेस कोणी कितीही मोठा सत्ताधीश असो वा महंत; त्याला प्रश्न विचारण्याचा आपला हक्क अबाधित ठेवला पाहिजे. त्यासाठी मुलांमधील, युवकांमधील वैज्ञानिक वृत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि हे प्रयत्न शाळा-कॉलेजातून होणे जरुरीचे आहे. कारण ही शाळा-कॉलेजची जमीन फारच कोरडी आहे. त्यात बी पेरायचे तर ती सुपीक बनविली पाहिजे आणि त्यासाठी शक्य त्याने न घाबरता चिमूटभर माती त्या जमिनीवर टाकली पाहिजे, तरच ते बी रूजेल आणि त्या जमिनीतून काहीतरी उगवेल; आणि ही एक चिमूट माती टाकण्याचे काम तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांसह आज अनेकजण करत आहेत. त्या सर्वांना ‘अनसंग हिरोज’च्या पदवीने गौरवत अरविंद गुप्ता यांनी आपले भाषण संपविले.

‘आधारस्तंभ’ कार्यकर्त्यांना पुरस्कार दिल्यावर केलेल्या आपल्या भाषणात प्रसिद्ध पत्रकार अलका धुपकर यांनी आजचा तरुण वर्ग सोशल मीडियावरील ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘इन्स्टाग्राम’ यांच्या विळख्यात पूर्णत: सापडला आहे. त्यांच्याबरोबरच धोरण ठरवणारा, उच्चभ्रू वर्ग यांचा आजच्या सामाजिक वास्तवाशी संबंधच तुटलेला आहे. अशा वर्गाशी, लोकांशी चळवळ कशी जोडून घेणार आहे, असा प्रश्न उपस्थित करत जर आपण यात कमी पडलो तर पुरोगामी, विवेकवादी, धर्मनिरपेक्ष या मूल्यांना मानणार्‍या भारतीयत्वाच्या संकल्पनेला विरोध असणार्‍यांचे फावणार आहे. याचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या, सनातन्यांनी ‘धार्मिक आचरण म्हणजे काय?’ अशी पुस्तके प्रसिद्ध केली आहेत व ती मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील प्रशासकीय अधिकार्‍यांना ते भेट देत आहेत. मोठ्या वर्तमानपत्रांतून त्याची माहिती येत आहे. ही पुस्तके शाळा-कॉलेजातून वाटली जावीत, अशा कल्पना हे प्रशासकीय अधिकारी व्यक्त करू लागले आहेत. ते आता हिंदू धर्मावर आधारित राष्ट्राची स्वप्ने पाहू लागले आहेत व हे फार मोठे आव्हान आपल्यासमोर आहे व हे आव्हान आपण कसे पेलणार? त्यासाठी आपण आपले वर्तुळ भेदून बाहेर आले पाहिजे व कौटुंबिक, सामाजिक पातळ्यांवर आधुनिक आयुधे वापरत संघर्ष करायला पाहिजे, हे सांगताना त्या म्हणाल्या, ही लढाई एका दिवसाची किंवा येणार्‍या निवडणुकांपुरतीही नाही. लढाईचे रण तर खूप मोठे आहे, हे एक ‘कल्चरल वॉर’ आहे. त्यामुळे अंधश्रद्धेशी लढत असताना या सगळ्याकडे तुम्ही कानाडोळा करणार नाही, असा आशावाद व्यक्त करत त्यांनी आपले भाषण संपविले.

त्यानंतर सर्व पुरस्कारार्थींच्या वतीने ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते, भोरचे डॉ. अरुण बुरांडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी वर्गणीदार करताना व देणग्या, जाहिराती संकलित करताना येणार्‍या अनुभवांचे मार्मिक वर्णन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र ट्रस्टचे सचिव दीपक गिरमे यांचेही समयोचित भाषण झाले. शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. शैलाताई दाभोलकर यांनी अंकाचे वर्गणीदार करणे हे किती अवघड काम आहे, याबद्दल स्वत:चा अनुभव सांगत ‘शतकवीरां’चे अभिनंदन केले व यापुढे हे अवघड काम सातत्याने करत राहू, असा निश्चय येथून जाताना करा, असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक वार्तापत्रांचे संपादक राजीव देशपांडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख वार्तापत्राच्या सहसंपादक मुक्ता दाभोलकर यांनी करून दिली. आभार प्रदर्शन फारूक गवंडी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पोतदार व उदय चव्हाण यांनी केले. अखेरीस या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे अतिशय सुरेख व काटेकोर नियोजन करणार्‍या वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात व त्यांना साथ देणार्‍या सुहास यरोडकर व सुहास पवार यांचे; तसेच दोन्ही दिवस कार्यकर्त्यांच्या भोजन-निवासासाठी झटणार्‍या हिलरेंज शाळेच्या स्टाफचे सर्व कार्यकर्त्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत अभिनंदन केले. नंतर सर्व उपस्थित 200 साथींनी एकमेकांच्या हातात हात गुंफत ‘हम होंगे कामयाब’ हे गीत एकसुरात गात दोन दिवसांच्या या ‘शतकवीर’ आणि ‘आधारस्तंभ’ पुरस्कार सोहळ्याची सांगता केली.

जवळजवळ तीन वेळा सर्व नियोजन होऊनही पुढे ढकलावा लागलेला हा ‘शतकवीर’ आणि ‘आधारस्तंभ’ पुरस्कार वितरण सोहळा त्याच्या उत्तम नियोजनामुळे, निमंत्रितांच्या सकारात्मक भाषणांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविणारा आणि मधला कोरोनाचा खडतर कालखंड विसरून पुन्हा जोमाने काम करायला ऊर्जा देणारा ठरला आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]