एक संवाद : ग्रंथप्रेमी बाबासाहेबांसोबत…

नरेंद्र लांजेवार - 9422180451

“विश्वमानव, बॅरिस्टर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुमच्याशी संवाद साधताना हृदयाचे ठोके वाढताहेत बघा… वाढणारच! कारण एवढ्या मोठ्या ज्ञानपंडितासमोर आपण काय बोलणार? तस्संही… तुम्हाला विचारायचं होतं –

आमची लक्तरलेली आयुष्यं तुम्ही शिवलीत,

तो सुई-धागा तुम्ही कुठे ठेवलाय?

गांजलेल्या जन्मांना नरकातून ओढून पोटाशी घेतले,

ती माऊलीची माया तुम्ही कुणाजवळ ठेवलीत?

सगळ्या मापदंडांनी चरणरज व्हावे

असा तुमचा बुलंद आवाज

तुम्ही कुठे सेव्ह करून ठेवला?

– असे काही प्रश्न मला बाबासाहेब तुम्हाला विचारायचे होते; पण खरं सांगू का? बाबासाहेब, तुमच्या नावासमोरच्या तुम्ही घेतलेल्या सर्व पदव्या आहेत ना….त्या वाचतानाही धाप लागते हो…!!!

जे अनेकांना अनेक आयुष्यात साध्य होणार नाही, असे प्रचंड ज्ञान एकाच आयुष्यात तुम्ही कसे ग्रहण केले? अनेक युगांनी ज्ञानापासून दूर ठेवलेल्या सर्व पिढ्यांचे तुम्ही पांग फेडले, असे तुमच्या पदव्यांकडे बघून वाटते. पण एक विचारू का बाबासाहेब…. ही ज्ञानाची प्रचंड भूक तुम्हाला कशी हो लागली?

बाबासाहेब, तुमच्या नावासमोर सामाजिक, राजकीय, आर्थिक विचारवंत, घटनातज्ज्ञ, तत्त्वज्ञानी, प्रखर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, बोधिसत्व, अखंड मानवतावादी, बंधुत्वाचा- न्यायाचा- पुरस्कार करणारे, शोषित कष्टकरी बहुजनांचे लोकनेते, शिक्षणतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, साहित्यिक, पत्रकार, नामवंत वक्ते अशी अनेक गुणवैशिष्ट्ये सार्थपणे लावली, तरीही ग्रंथप्रेमी बाबासाहेब आंबेडकर! या एका शब्दापुढे सर्व विशेषणे फिकी पडतात…

बाबासाहेब… एकाच आयुष्यात माणसाने किती विविधांगी वाचन करावे, याबाबत तुमचे उदाहरण जगाच्या पाठीवर अद्वितीय आहे. अर्जुनराव केळुस्कर यांच्यासारखे वाचनप्रेमी शिक्षक तुम्हाला लाभले आणि केळुस्कर गुरुजींनी आपल्या जवळची काही पुस्तके तुम्हाला वाचायला दिली. त्यांनी स्वतः लिहिलेले भगवान बुद्धांचे चरित्र हे पुस्तक तुम्ही मॅट्रिकची परीक्षा पास झाले म्हणून तुम्हाला त्यांनी भेट दिले. या पुस्तकाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रचंड प्रभाव पडला.

उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्यावर तिथे मिळेल तो सर्व वेळ तुम्ही ग्रंथालयात बसून फक्त आणि फक्त ज्ञानग्रहण करण्यासाठीच सत्कारणी लावला. आपण लंडनमध्ये पोटाला चिमटा देऊन मोठ्या कष्टाने जमविलेली काही पुस्तके मोठ्या तीन पेट्यांमध्ये भरून ‘व्हिक्टरी ऑफ इंडिया’ या बोटीने मायदेशी पाठविली; परंतु ही बोट समुद्रातच बुडाल्याचे तुम्हाला समजताच तुम्ही प्रचंड कष्टी झालात.

ग्रंथांना, पुस्तकांना आपला मित्र – गुरू समजणारे बाबासाहेब कोणत्या पुस्तकात, कोणत्या पानावर काय महत्त्वाचं लिहून ठेवले आहे, हे पुस्तक न उघडताच तुम्ही सांगू शकत होता… बाबासाहेब, खरोखरच वाचनातून तुम्हाला तिसरा डोळाच लाभला होता…

ज्ञानाची लालसा काय असू शकते, याचे प्रतीक म्हणजे बाबासाहेब तुमची वाचननिष्ठा! “ महाविद्यालयीन विद्यार्थीदशेत अहोरात्र वाचन, चिंतन करणारा असा अद्वितीय विद्यार्थी आम्ही आमच्या आयुष्यात पाहिला नाही,” असे गौरवोद्गार, अभिमानपूर्वक तुमचे शिक्षक-प्राध्यापक तुमच्याबद्दल आठवणी सांगताना काढतात, तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो.

बाबासाहेब… तुमच्या वाचनप्रेमाबद्दल अनेक जण आजही सांगतात की, तुम्ही एकदा पुस्तक वाचायला बसले म्हणजे तुम्हाला कशाचेच भान राहत नसे. तुम्ही एकाग्रचित्ताने ग्रंथांचे वाचन करत. रात्र-रात्रभर एकाच बैठकीत संपूर्ण पुस्तक तुम्ही वाचून काढत…. आयुष्यभर पुस्तकांच्या संगतीत वावरलेले तुम्ही, स्वतःचे मुंबईत घर बांधतानाही, “मला माझ्या खासगी पुस्तकांसाठी घर बांधायचे आहे,” असे म्हणून त्या दृष्टीनेच तुम्ही घराची उभारणी केली. तुम्ही पुस्तकांसाठी टूमदार घर बांधले. तुमच्या ग्रंथसंग्रहात जागतिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ दर्जाच्या कलाकृती होत्या, तुमच्या संग्रहात इतिहास, सर्व धर्मांची पुस्तके, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आदी विषयांवरील 44000 पुस्तके तुमच्या खासगी मालकीची होती. जगाच्या पाठीवर एवढे मोठे व्यक्तिगत ग्रंथालय स्वतःसाठी उभारणारे तुम्ही एकमेव ग्रंथप्रेमी व्यक्ती आहात!

बाबासाहेब, आयुष्याच्या उत्तररात्री तुम्ही चित्रकला, संगीत, गायन आदी कला शिकायला सुरुवात केली होती. चंदनासारखे झिजून तुम्ही भारतीय संविधानाची निर्मिती केली. प्रत्येक व्यक्तीला समान न्याय देण्याच्या दृष्टीने तुम्ही समान मताधिकार बहाल केले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून, हिंदू धर्मातील स्त्रियांना आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळावा, यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुम्ही मोकळे झालात. भारतातील सर्व धर्मांतील स्त्रियांवर तुमचे… हो, बाबासाहेब तुमचेच अनंत उपकार आहेत.

बाबासाहेब, तुम्ही कामगारांसाठी केलेल्या सुख-सुविधा, शेतीमध्ये सुचवलेले पर्याय, अर्थविषयक धोरणे, पर्यावरण किंवा परराष्ट्र धोरणविषयक व्यक्त केलेली मते आज महत्त्वपूर्ण ठरत आहेत. तुम्ही अर्थतज्ज्ञ म्हणून रिझर्व्ह बँकेच्या स्वरुपात देशाला दिलेली भेट खरोखरच अर्थव्यवस्थेचा कणा मोडू न देणारी बाब आहे.

बाबासाहेब, जे..जे सार्वजनिक उद्योग तुम्ही सुचविले होते, ते सर्वच आता आम्ही विक्रीला काढत आहोत.. म्हणून म्हणतोय, बाबासाहेब आमची लक्तरं असलेली आयुष्यं शिवली तो सुई-धागा कुठे ठेवलाय तुम्ही?

बाबासाहेब ज्या संसदेत बसून तुम्ही प्रजासत्ताक भारताची निर्मिती केली, ती संसदच आम्ही पाडून आमची नवी संसद उभी करीत आहोत… आम्ही नवी घटनाच लागू करू पाहत आहोत….

बाबासाहेब, उठता-बसता तुमचे नाव घेतले म्हणजे पुरोगामित्व सिद्ध होत नाही. तुम्ही दिलेल्या संवैधानिक मूल्यांचा पदोपदी अवमान केला जात आहे. बाबासाहेब… तुम्ही आज असता तर हातामध्ये लेखणीसोबत महात्मा फुल्यांचा आसूड सुद्धा घेतला असता. तसेही कबीर, तुकाराम, बुद्ध आणि महात्मा फुले हे तुमच्या प्रेरणेचे ऊर्जास्रोत होते. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,’ हा तुमचा मूलमंत्र आम्ही विसरत चाललोय… बाबासाहेब, तुमचा आम्ही फक्त राजकारणासाठी उदो-उदो करीत गेलो. तुमची शिक्षणनीती, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, तुमची राष्ट्रीयत्वाची भावना आमच्यामध्ये भिनलीच नाही…ही कटू शोकांतिका आहे. बाबासाहेब… ‘खाउजा’च्या काळात आपल्या देशात खूप बदल झाले. संवैधानिक मार्गाने रस्त्यावर बसून न्याय मिळत नाही आणि न्यायालयात दिला जातो तो न्याय नाही… असं आपल्याच देशाचे सर्वोच्च न्यायाधीश सांगत आहेत..याचा अर्थ आपल्या देशाची वाटचाल ही लोकशाही मार्गाने हुकुमशाहीकडे होत आहे? तुम्हीच सांगा बाबासाहेब… लोकशाहीच्या चारही खांबांना आता उधळी लागली आहे. तुम्ही पत्रकार, संपादक असल्याने ज्यावर तुमचा प्रचंड विश्वास होता, ती माध्यमे कधीचीच सत्ताधार्‍यांच्या मांडीवर जाऊन बसली आहेत. बाबासाहेब, तुम्ही आम्हाला ठणकावून सांगितले होते, “संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे लोक कसे आहेत, यावर संविधानाची अंमलबजावणी अवलंबून असते.”

बाबासाहेब, तुम्ही आम्हाला मताधिकार दिला; पण आम्ही त्यालाही खरेदी-विक्रीचे मूल्य प्राप्त करून दिले… खरं तर भारतातील प्रत्येक समस्येचे निराकरण भारतीय संविधानात तुम्ही दूरदृष्टीने नोंदवून ठेवले आहे; गरज होती फक्त तिची कडक अंमलबजावणी करण्याची! संविधानाची मुळापासून अंमलबजावणी करण्याची मानसिकताच आमच्या राज्यकर्त्यांमध्ये दिसत नाही, हीच खरी शोकांतिका आहे…. तसेही बाबासाहेब आपल्या देशात अनेक शोकांतिका आहेत… कोणकोणत्या शोकांतिकांवर बोलत बसायचं? बाबासाहेब, तुमच्यासारखा ग्रंथप्रेमी, महाज्ञानी आमच्या देशात; त्यातही महाराष्ट्र आणि महत्त्वाचे म्हणजे मराठी कुटुंबात जन्माला आला, याचा खरंच आम्ही अभिमान बाळगला पाहिजे…

तुमच्यापासून आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याचा आणि तुमचं वाचनव्रत अंगीकारून आयुष्यभर विद्यार्थी राहण्याचा संकल्प यानिमित्त मी करीत आहे… आणि हो, लोकशाही जीवनप्रणाली आम्ही स्वीकारलेली असल्याने तुमचे भारतीय संविधान हाच आमचा प्राण आहे.. आम्ही भारतीय प्राणपणाने या संविधानाचे जतन करून देशात निकोप लोकशाही निर्माण करू, याबाबत बाबासाहेब तुम्ही निश्चिंत राहावे…

बाबासाहेब तुमच्या कार्यकर्तृत्वाला सलाम!!!”

तुमचा चाहता

नरेंद्र लांजेवार, बुलडाणा

संपर्क : 9422180451


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]