अॅड. गोविंद पाटील - 9822955059

बुवाबाजीविरुद्धची लढाई ही ‘महाराष्ट्र अंनिस’मधील एक मोठे कुतूहल व आकर्षण राहिलेले आहे. बुवाबाजी तशी अनेक प्रकारची चालू असे. कथित बाबा-बुवा, स्वामी-महाराज, मांत्रिक, देवऋषी, संत-महंत अशी अनेक नावे धारण करून स्वत:च्या दैवी शक्तीचा, दैवी चमत्काराचा कधी उघड, तर कधी छुप्या पद्धतीने प्रसार करत जनतेची दिशाभूल व फसवणूक करीत धंदा करीत असतात. या प्रत्येकाचे मंत्र-तंत्र, गिर्हाईक, कार्यपद्धती वेगवेगळी असते. यापैकी चमत्काराशी जोडलेली बुवाबाजी ही एक लोकांवर भुरळ पाडणारी आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीमुळे व बुवाबाजीविरुद्धच्या संघर्षामुळे; तसेच जादूटोणाविरोधी कायद्यामुळे महाराष्ट्रभर चमत्काराबद्दल मोठी जनजागृती झाली. याचा परिणाम महाराष्ट्रात चमत्काराचा दावा करून बुवाबाजी करणारे बुवा-बाबा आता तुलनेने कमी झाले आहेत.
तथापि, 21 सप्टेंबर 1995 रोजी गणपती दुग्धप्राशन घटनेमुळे आपल्या देशाच्या लोकांच्या, चमत्काराला शरण जाणार्या मानसिकतेची चुणूक दाखवून गेली. यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हा दिवस ‘चमत्कार सत्यशोधन दिन’ म्हणून पाळते. चमत्कारावर विश्वास ठेवणारी मानसिकता अधिक घातक असते. कारण त्यातून स्वत:च्या कर्तृत्वावरचा विश्वास गमावून बसतो. चमत्कारावर विश्वास ठेवणे म्हणजे विज्ञानाचा पायाच नाकारण्यासारखे आहे, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मूल्य नाकारणे होय. चमत्काराबद्दल अब्राहम कोवूर म्हणतात, ‘जगात कोणीही चमत्कार करू शकत नाही. चमत्कार करण्याचा दावा करणारे बदमाष असतात. चमत्कारावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात. चमत्काराला विरोध न करणारे भ्याड असतात.’
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरुवातीपासूनच अशा सर्वदूर पसरलेल्या बुवाबाजीपासून लोकांची फसवणूक व शोषण होऊ नये; तसेच अज्ञानावर आधारलेल्या अनिष्ट व दुष्ट प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने; तसेच समाजातील सर्वसामान्यांचे शोषण व फसवणूक होण्यापासून रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मागणी करून जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. पुढे 1995 साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असताना आमदार पी. जी. दस्तूरकर यांनी कायद्याबाबतचा अशासकीय ठराव 7 जुलै 1995 ला विधानपरिषदेमध्ये मांडला. तो 26 विरुद्ध 7 मतांनी मंजूरही झाला; परंतु पुढे काहीही झाले नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली निरंतर, सतत कायद्याचा पाठपुरावा व त्यासंबंधी अनेक वेळा विविध प्रकारची आंदोलने, धरणे, मोर्चेअसा संघर्ष चालूच ठेवला. शेवटी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील दबावाखाली 18 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कायदा मंजूर झाला; परंतु त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा बळी गेला. या कायद्याच्या मसुद्यामध्ये अनेक तरतुदी सुरुवातीला होत्या; परंतु नंतर शेवटी बर्याच तरतुदी कमी केल्या गेल्या. शेवटी कायदा होणे, हे महत्त्वाचे होते.
या कायद्याचे नाव ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013’ असे आहे. या कायद्यास ‘जादूटोणाविरोधी कायदा’ असेही म्हणतात. हा कायदा झाल्यानंतर चमत्काराचे दावे करणारे बाबा-बुवा आज जवळजवळ बंद झाले आहेत. कायदा होण्यापूर्वी काही बाबा-बुवा असे चमत्काराचे दावे करीत होते. परंतु ‘अंनिस’ने त्यांच्या दाव्यांचा भांडाफोड करून; तसेच त्यांना चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान देऊन त्यांचे दावे फोल ठरविलेले आहेत. आजही ‘अंनिस’ने चमत्कार सिद्ध करणार्यास 25 लाखांचे जाहीर आवाहन केले आहे. परंतु आजपर्यंत कोणीही चमत्काराचे आव्हान स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे आज चमत्काराच्या आधारे बुवाबाजी करणारे थांबले आहेत. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे वेगवेगळे फंडे वापरून बुवाबाजीचे वेगळे प्रकार मात्र आजही चालू आहेत. जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये एकूण 12 तरतुदी आहेत. जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये चमत्कारासंबंधी एक तरतूद आहे. ती अनुसूची (2) अंतर्गत अशी आहे की, एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्काराचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रसार व प्रचार करून लोकांना फसविणे, ठकविणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे, असे आहे. त्यामध्ये विशेष अलौकिक शक्तीचा किंवा दैवी शक्तीचा दावा करून फसवणारे बाबा-बुवा किंवा कोणीही असा दावा करीत असतील, तर त्यांच्यावर या कायद्याखाली गुन्हा दाखल होऊ शकतो, सिद्ध झाल्यास सजाही होऊ शकते. या कायद्याचा प्रभावीपणे वापर करून चमत्कारांच्या घटना आपण बंद करू शकतो.