ज्ञानदेवें रचिला पाया

ह.भ.प. देवदत्त परुळेकर -

संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी भागवत धर्माचा इतिहास एका अभंगात वर्णन केला आहे. तो सुप्रसिद्ध अभंग असा –

संतकृपा झाली | इमारत फळा आली ॥१॥

ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिलें देवालया ॥२॥

नामा तयाचा किंकर | तेणें केलासे विस्तार ॥३॥

जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ॥४॥

तुका झालासे कळस | भजन करा सावकाश ॥५॥

बहिणी म्हणे फडकती ध्वजा | निरूपणा केलें वोजा ॥६॥

अभंगाचा भावार्थ असा संतांच्या कृपेने भागवत धर्माच्या देवालयाची इमारत पूर्ण झाली. ज्ञानदेवांनी इमारतीचा पाया रचला. त्यांचे सेवक असलेल्या नामदेवरायांनी इमारतीचा विस्तार केला. जनार्दन स्वामींचे शिष्य असलेल्या एकनाथांनी ‘एकनाथी भागवता’ची रचना करून इमारतीला भक्कम खांब दिला. तुकाराम महाराज या मंदिराचे कळस झाले. भाविक जन हो, आता निश्चिंत होऊन या मंदिरात सावकाश भजन करा. बहिणाबाई स्वतः या मंदिरावरील फडकणारी ध्वजा झालेली असून तिने हे सुंदर वर्णन, निरूपण केले आहे.

या अभंगातील ‘ज्ञानदेवे रचला पाया आणि तुका झालासे कळस’ हे वर्णन आपण अनेक वेळा ऐकलेले असते. ‘ज्ञानोबा- तुकाराम’ या लोकप्रिय गजराची सुरुवात तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी केली, असे मानले जाते. विनोबा म्हणतात, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा मध्यम पदलोपी समास असून यामध्ये ज्ञानोबा माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंतची संतांची संपूर्ण मांदियाळी समाविष्ट आहे.

भागवत धर्माचा; म्हणजेच वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घातला, असे वर्णन बहिणाबाई अभंगात करतात. वास्तविक, ज्ञानदेवांच्या जन्माच्या आधीही कित्येक वर्षेवारकरी संप्रदाय अस्तित्वात होता. ज्ञानोबांचे वडील, आजेही पंढरीची वारी करत होते. असे असताना, ज्ञानदेवांनी भागवत धर्माचा पाया रचला, असे बहिणाबाई का म्हणतात? यासंदर्भात तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केलेले विवेचन खूप महत्त्वाचे आहे, ते असे – “ज्ञानेश्वरपूर्व काळापासून पंढरपूरचे श्री विठ्ठल हे दैवत, त्याची वारी नावाची उपासनापद्धती, यामुळे धर्मपंथाचे दोन आवश्यक घटक सिद्ध होते. परंतु जोपर्यंत पवित्र मानला जाणारा प्रमाणग्रंथ नसतो, तोपर्यंत तो धर्म लोकधर्माच्या पातळीवरच राहतो, त्याला धर्म म्हणून स्वतंत्र प्रतिष्ठा दिली जात नाही. वारकरी संप्रदायाची ही उणीव ज्ञानेश्वरांनी भरून काढली. त्यासाठी स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याऐवजी त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ मराठीतून विषद करणारा काव्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ लिहिला. आता दैवत, त्याची उपासनापद्धती व प्रमाणग्रंथ ही धर्माची त्रिपुटी समोर असल्याने वारकरी पंथ हा अधिकृतपणे धर्मपंथ झाला. ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, याचा अर्थ त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहून संप्रदायाला तात्त्विक अधिष्ठान दिले.”

ज्ञानदेवांनी हा ग्रंथ लिहून एका मोठ्या बंडाची ध्वजा उभारली. ज्ञानदेवांची ही बंडखोरी कोणत्या प्रकारची होती?

‘गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या?’ किंवा ‘चाफा बोलेना, चाफा चालेना’ अशा अतिशय तरल, भावपूर्ण कविता लिहिणारे कवी ‘बी’ म्हणजेच कै. नारायण मुरलीधर गुप्ते यांनी मोजक्या; पण आशयपूर्ण सामाजिक कविता लिहिल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची कविता ‘डंका.’ या कवितेत सामाजिक अवनतीचे प्रभावी चित्रण आले असून अशा प्रतिकूल स्थितीत संत ज्ञानेश्वरांनी केलेल्या लोकोत्तर कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे. बी उत्कट आदराने लिहितात –

त्या बड्या बंडवाल्यांत

ज्ञानेश्वर’ मानें पहिला; मोठ्यांच्या सिद्धांताचा

घेतला पुरा पडताळा, डांगोरा फोलकटाचा

पिटविला अलम् दुनियेला; झजोनि देवां दैत्यां

अमृतामधिं न्हाणी जनता; उजळिला मराठी माथा;

सत्तेचे प्रत्यय आले! तेजाचे तारे तुटले!

प्रेमाच्या पायावर समतेची इमारत रचणारा आणि समाजात शांततापूर्ण मार्गाने उत्क्रांती घडवून आणणारा ज्ञानेश्वर हा बी यांना पहिला बंडखोर, विद्रोही वाटतो.

ज्ञानदेवांची बंडखोरी जाणून घ्यायची असेल तर ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली, त्या वेळेची सामाजिक परिस्थिती कशी होती, हे सर्वप्रथम आठवले पाहिजे. महाराष्ट्राच्या इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे या काळाचे वर्णन करतात ते असे –

“ज्ञानेश्वरांचा उदय ज्या यादव काळात झाला, तो यादव काळ ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली गेली, तेव्हा सुवर्णकाळ होता, असे दिसते; परंतु ही झाली एक बाजू. दुसर्‍या बाजूने राज्याच्या विनाशाची बीजेही याच वेळी पेरली जात होती. उत्तरेकडे आलेल्या परकीय आक्रमणाच्या संकटाची यत्किंचितही दखल न घेता यादव राजांच्या दरबारातील नित्याचे व्यवहार ‘आपण त्या गावाचेच नाहीत’ अशा थाटात चालू होते. एका बाजूला ब्राह्मण, क्षत्रिय व दुसर्‍या बाजूला इतर सामान्य जन अशी समाजाची विभागणी झाली होती. कर्मकांडप्रधान वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन हे या काळाचे वैशिष्ट्य सांगता येईल. रामदेवराय यादवाचा प्रधान हेमाद्री या काळाचा प्रतिनिधी होय. संस्कृत भाषेचे स्तोम, व्रतवैकल्ये व उद्यापने यांची रेलचेल, धर्मशास्त्रातील विषमतेचा पुरस्कार करणार्‍या भागाची काटेकोर अंमलबजावणी, जनसामान्यांविषयी तुच्छता बुद्धी व त्यामुळे त्यांना वाटणारी सर्वक्षेत्रीय असुरक्षितता इत्यादी ठळक बाबी या काळाचा अभ्यास करणार्‍या कोणालाही जाणवाव्यात.

या प्रवाहाविरुद्धच्या प्रतिक्रियाही; अर्थात तितक्याच जोरदार होत्या. अवैदिक बौद्ध धर्म संपुष्टातच आला होता. जैन धर्म त्याच्या मोजक्या अनुयायांत तग धरून होता. वैदिक हिंदू धर्मातूनच उमटलेल्या दोन तीव्र प्रतिक्रिया म्हणजे लिंगायत आणि महानुभाव पंथ; पैकी पहिल्याचा विचार येथे फारसा प्रस्तुत नाही. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांनी यादवकालीन धर्ममार्तंडांची झोप उडवली. वेदप्रामाण्य पार झुगारून देऊन चक्रधरांनी जणू कोंडी फोडली, असंतोषाला वाट मोकळी करून दिली. त्यात परत भर पडली ती चक्रधरांच्या वेधक व्यक्तिमत्त्वाची. अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. या आकर्षणाचे लोण थेट राजसभेत पोचले. सत्ताधार्‍यांच्या घरातही गेले. याचा परिणाम शेवटी व्हायचा तोच झाला. पद्धतशीर कट करून चक्रधरांना संपवण्यात आले. महानुभाव पंथाची वाताहत होऊ लागली.

ही झाली सर्वसामान्य सामाजिक-राजकीय-धार्मिक परिस्थिती. धर्म ही मध्ययुगातील अत्यंत महत्त्वाची प्रेरणा होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. या परिस्थितीचा प्रत्यक्ष फटका खुद्द ज्ञानेश्वर व त्यांचे कुटुंबीय यांना बसला होता. एकदा संन्यास घेतल्यानंतर परत प्रपंच करण्याचे पातक विठ्ठलपंतांकडून घडले. त्यामुळे त्यांना स्वत:ला तर देहत्याग करायला लागलाच; पण धर्मशास्त्रानुसार त्याची झळ त्यांच्या मुलांनाही पोचली. संन्याशाची मुले म्हणजे धर्मशास्त्रानुसार आरूढपतितांची संतती. ती वर्णबाह्य होत. धर्मशास्त्रानुसारच त्यांचा दर्जा ब्राह्मण हा नसून ‘दोल’ किंवा ‘वोट’ हा होय व त्यांचे काम ‘वापीकूप खणणादी’ होय. ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे यांना अशा प्रकारे जन्मापासूनच धार्मिक छळाला तोंड द्यावे लागले.”

केवळ सहानुभूती अनुभूतीची जागा घेऊ शकत नाही. ज्ञानदेवादी भावंडांना अस्पृश्याचे भयानक जिणे प्रत्यक्ष जगायला लागले होते. ज्ञानदेवांची, भावंडांची मुंज करायला ब्रह्मवृंदांनी परवानगी नाकारली होती. त्यांना वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता. त्यांची कधीही मुंज झाली नाही. अर्थात, त्या वेळच्या सामाजिक, धार्मिक चौकटीत ज्ञानदेव अखेरपर्यंत अस्पृश्यच होते. त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’ हा एका वर्णबाह्य अस्पृश्याने सांगितलेला धर्मविचार आहे, हे कधीही विसरून चालणार नाही. हे पुरोहितशाही विरुद्ध उघड-उघड बंड होते. त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ स्त्रिया, अस्पृश्य व बहुजनांना आपला उद्धारक ग्रंथ वाटला. संतांनी ‘ज्ञानेश्वरी’बद्दल गौरवाद्गार काढले आहेत.

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी |

एक तरी ओवी अनुभवावी ॥

हे नामदेवरायांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. तर संत जनाबाई म्हणतात –

वाचावी ज्ञानेश्वरी | डोळा पहावी पंढरी ॥१॥

ज्ञान होय अज्ञानासी | ऐसा वर त्या टीकेसी ॥२॥

ज्ञान होय मुढा | अति मूर्ख त्या दगडा ॥३॥

वाचील जो कोणी | जनी त्यासी लोटांगणी ॥४॥

संत चोखोबा म्हणतात –

चोखा म्हणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ |

वाचिता सनाथ जीव होती ॥

तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी तर ज्ञानेश्वरीची आरती लिहिली आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण रचना अशी –

जय माये ज्ञानदेवी शब्दरत्नजान्हवी |

प्राशितां तोय तुझें सुख होतसे जीवीं ॥१॥

अनर्ध्य साररत्नें सिंधु मंथुनी गीता |

काढिली भूषणासी वैराग्यभाग्यवंता ॥२॥

अमृतसार ओवीं शुद्ध सवीतां जीवीं |

जीवच ब्रह्म होती अर्थ ऐकतां तेही ॥३॥

नव्हती अक्षर हे निजनिर्गणभूजा |

बहेणी क्षेम देवी अर्थ ऐकतां वोजा ॥ ४॥

लेखक संपर्क ः ९४२२०५५२२१

(क्रमशः)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]