‘महाराष्ट्र अंनिस’ची देखणी बालसाहित्याची पाच पुस्तके

नरेंद्र लांजेवार -

बालसाहित्याची सृष्टी, देईल विज्ञानाची दृष्टी…

बाल-कुमार वयोगटातील मुलांना कल्पनाशक्तीच्या भन्नाट जगामध्ये वावरायला आवडतं. ‘अस्संच का?’ या प्रश्नाचे तर्कबुद्धीला पटेल असे उत्तर शोधण्यासाठी ती उत्सुक असतात. त्यांची ही उत्सुकता शमविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशन विभागाने पाच देखणी पुस्तके प्रकाशित करून बालसाहित्य प्रकाशन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर हे समाज विवेकी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. ते नेहमी म्हणायचे, ‘आपण विज्ञानाची सृष्टी घेतली; पण विज्ञानाची दृष्टी नाही घेतली.’ विचारांचा हाच धागा पकडून बाल-कुमार वाचकांना आवडेल, त्यांना रूचेल, पटेल आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत, आर्ट पेपरवर रंगीत, सुबक छपाईमध्ये देखण्या स्वरुपात एकाचवेळी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी बालसाहित्याची पाच पुस्तके प्रकाशित केली आहेत. आजचे ‘तंत्रस्नेही’ बालवाचक स्वतः प्रयोग करत, शोध घेत नवीन तंत्रज्ञान शिकतात. त्यांना या पुस्तकांमध्ये त्यांच्यासारखीच मुले भेटतात, जी रोजच्या जगण्यात घडणार्‍या घटनांचा चौकस बुद्धीने मागोवा घेतात, प्रयोग करतात, बारकाईने निरीक्षण करून त्याची नोंद ठेवतात आणि तर्कबुद्धी वापरून उत्तरापर्यंत पोचतात.

मुलांनी सकस साहित्य भरपूर प्रमाणात वाचावं, असं प्रत्येक पालकाला आणि शिक्षकाला वाटतं, म्हणूनच शोधक बुद्धीला चालना देणारे विवेकी बालसाहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मुलांच्या सोबतीने पालक आणि शिक्षकदेखील या गोष्टींच्या पुस्तकात नक्की रमतील, यात शंका नाही.

बज्याचे चित्तथरारक शोध’ हा विज्ञानलेखक प. रा. आर्डे यांचा पाच कथांचा संग्रह आहे. यात चित्तथरारक प्रवासाची सुरुवात, आग्यावेताळ पकडला, मंचासुर पळाला, रघुची भानामती, कडू दुधाची-गोड कहाणी इत्यादी बालकथा आहेत. या बालकथांमधून आजही समाजात अनेक प्रकारच्या गैरसमजुती कशा चुकीच्या आहेत व या गैरसमजुतीमागील कार्यकारण भाव नेमका काय आहे, याची उकल लेखकाने मोठ्या उत्कंठावर्धक पध्दतीने करून दाखवली आहे. प्रत्येक कथेसाठी लेखकाने तयार केलेले उत्कंठावर्धक वातावरण बाल-कुमार वाचकांना पुढे काय घडणार, याची उत्सुकता ताणून ठेवते. ही उत्सुकता ताणून ठेवणे आणि त्या-त्या घटनेमागील वैज्ञानिक कारणमीमांसा हीच या कथासंग्रहाची फार मोठी जमेची बाजू आहे.

भुताने लावली लाईट’ या कथासंग्रहात कुमार मंडपे या जागृत व जिज्ञासू शिक्षकाने वर्गातील मुलांशी संवाद साधत हे का? हे कसे? असे प्रश्न विचारून मुलांना पडणार्‍या प्रश्नांची उत्तर शोधण्यास मुलांना प्रवृत्त केले. यातूनच नजरेची फिरकी आणि उदबत्तीची गिरकी, आजोबांना भ्रांत पडे, झाले दुधात खडे, मातीत गडप चेटकावर झडप, भुताने लावली लाईट, मुले पळविणारी टोळी, दत्तूवर आली पाळी, भुताने घेरला-सोमाजी डरला, संचार देवीचा- गोंधळ शाळेचा, माझं ठरल्यालं लगीन मोडलं गं, बुरुज, मंत्र टाकले – न् सर्प थांबले… इत्यादी अंधश्रद्धांचा वेध घेणार्‍या कथांचा हा देखणा संग्रह आहे. या कथा वाचून बाल-कुमार वाचक आयुष्यात अंधश्रद्धेला बळी पडणार नाहीत, इतका आत्मविश्वास मुलांमध्ये निश्चितच येणार आहे. अशा कथा वाचून मुलं अधिक चौकस बनतील.

बिल्लोरी कवडसे’ हा नीलम माणगावे या जयसिंगपूरच्या बालसाहित्यिकेचा पाच कथांचा देखणा संग्रह आहे. यामध्ये बिलोरी कवडसे, दिवाळी भेट, का?आणि कशासाठी?, आंबट आवळ्याची गोष्ट, सूर्य देव आणि माणूस.. या सर्व कथा बालमनाची उत्सुकता आणि त्यांच्यातील जिज्ञासा वृत्तीला प्रेरित करणार्‍या आहेत. या पुस्तकाला अतिशय देखणी अशी ओंकार मरकाळे या सुप्रसिद्ध चित्रकाराची बोलकी चित्रे लाभली आहे. या देखण्या चित्रांमुळे या सर्व पुस्तकांना एक वेगळीच श्रीमंती प्राप्त झाली आहे. बाल-कुमार वाचक या अशा पुस्तकाच्या प्रेमात नक्की पडशील, यात शंका नाही.

‘…आणि माठ हसला’ हा चार बालगोष्टींचा संग्रह नीलम माणगावे यांचा कथासंग्रह आहे. यात …आणि माठ हसला, बंडू माझा गुरू, चिंगी आणि मंगी, सापाची हुशारी इत्यादी गोष्टींमधून मुलांना पडणार्‍या प्रश्नांना कथास्वरुपात उत्तर देण्याचा चांगला प्रयत्न नीलम माणगावे यांनी केला आहे. रात्री नखे का काढायची नाहीत? साप कात का टाकतो? मांजर आडवे गेले की काय होते? माठात पाणी का थंड होते? या प्रश्नांमागील शास्त्रीय कारण उत्कंठावर्धक पद्धतीने, विविध पात्रांच्या माध्यमातून सुंदर संवादशैलीने या सर्व प्रश्नांची उकल लेखिकेने या संग्रहात केली आहे. या संग्रहाला बोलकी चित्रं लाभल्याने पुस्तकाची आकर्षकता वाढली आहे.

न्यूटन आणि कविता’ हा मुंबईच्या आय.आय.टी.मधील सेवानिवृत्त प्रा. चंद्रसेन टिळेकर यांचा देखणा बालकविता संग्रह आहे. या संग्रहाला बालसाहित्यिका ज्योती कपिले व विज्ञानलेखक प.रा.आर्डे यांची प्रस्तावना लाभली आहे. या संग्रहात असे हे गाडगेबाबा, विचारी न्यूटन, आजीच्या गोष्टी, जेम्स वॅट, वाफेची कहाणी, प्रश्नांचे पडणे, अशा विविध विषयांवर आणि काही महनीय व्यक्तीच्या जीवनावरील एकूण 16 कविता या छोट्या संग्रहात आहेत. बाल-कुमार वाचकांच्या भावविश्वाला योग्य आकार आणि संस्कार देण्याच्या दृष्टीने या विज्ञानविषयक रूची वाढविणार्‍या कविता खरोखरच उपयुक्त आहेत. यातील काही कविता खरं तर शालेय पाठ्यपुस्तकात अभ्यासण्यासाठी याव्यात, एवढ्या त्या योग्यतेच्या निश्चित आहेत.

नरेंद्र लांजेवार, बुलडाणा


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]