प्रभाकर नानावटी -

प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी टेलिपथीच्या पुनरुत्थानाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प म्हणजे संवादासाठीच्या नेटवर्किंगमध्ये झालेल्या प्रगतीचे वा त्याच्या अभूतपूर्व वेगाचे परिणाम नसून आपण आपली अस्मिता, आपले स्वत्व विसरून आपण पूर्णपणे बदलून या नेटवर्कचे एक सुटे भाग होणार आहोत की काय अशी शंका येऊ लागते. पुन्हा एकदा Natural व Super Natural यातील सीमारेषा धूसर होत आहेत. डिजिटलायजेशनमधून आपण काहीही करू शकतो एवढा आत्मविश्वास या स्ट्रीमिंग एजमधून व्यक्त होत आहे. या प्रकल्पात मनःशक्तीचे अल्गॉरिदम करणे तेवढेच बाकी राहिले आहे. एखाद्या उद्योगपतीने गुप्तपणे हे करायचे ठरविल्यास आपला मेंदू, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत की काय, असे वाटत आहे.
न्यूरॉलिंक
खनिज इंधनाऐवजी विद्युत बॅटरीवर चालणार्या प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणार्या कंपनीचे जनक, एलॉन मस्क यांनी २०१६ साली मेंदू व संगणक जाळे यांचे इंटरफेस (Brain-Computer Interface – BCI) करणार्या तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मेटा कंपनीचे वाट्सऍप, फेसबुक, सिलिकॉन व्हॅलीतील होऊ घातलेले इतर प्लॅटफॉर्म्स, गूगल, फेस रिकग्निशन अल्गॉरिदम्स इत्यादीतील माहिती या इंटरफेसमधून मेंदूद्वारे चेतापेशींना पोचविण्याचे महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञान या भांडवली पुरवठ्यामधून विकसित करावयाची योजना होती; परंतु एलॉन मस्कचे लक्ष टेस्ला कार्स व ट्वीटरची खरेदी यावर केंद्रित झाल्यामुळे हा प्रकल्प थोडासा मागे पडला; पण मे २०२३मध्ये न्यूरॉलिंक या इंटरफेसला मानवी मेंदूत रोपण करण्याची अनुमती मिळाली. २०२४मध्ये अर्धांगवायूमुळे दोन्ही हात व दोन्ही पाय निकामी झालेल्या नोलंड अर्बॉ या क्वाड्रिप्लॅजिक रुग्णाच्या मेंदूमध्ये शस्त्रक्रिया करून रोपण करण्यात आले. रोपणानंतर हा रुग्ण आपले विचार केंद्रित करून बुद्धीबळ व त्याला आवडत असलेले व्हिडिओ गेम्ससाठीच्या कर्सरची हालचाल करून इतर सामान्य लोकांसारखे खेळ खेळू लागला.
मस्क यांनी १०२४ सूक्ष्म इलेक्ट्रोड असलेल्या व मेंदूद्वारे चेतापेशींना सिग्नल्स पोचविणारे इंटरफेस एका अर्थाने टेलिपथी (परचित्तज्ञान) होती. मस्कच्या मते हे इंटरफेस सहमती (Consensual) टेलिपथीला जन्म देणारी असेल. प्रसारमाध्यमांनी अर्बॉच्या टेलिपथीच्या प्रयोगांना भरपूर प्रसिद्धी दिली. नंतरचे काही दिवस अर्बॉच्या टेलिपथीच्याच बातम्या सगळीकडे झळकत होत्या.

मस्कला सुचलेल्या रॉकेट्री, सॅटलाइट्स वा मंगळावर पृथ्वीवरील माणसांची वसाहत इत्यादी तंत्रज्ञानाविषयीच्या भन्नाट चित्रविचित्र कल्पनेमागे त्यांनी बालपणी वाचलेल्या वैज्ञानिक कादंबर्यांचा आधार असण्याची शक्यता आहे, असे तंत्रज्ञानातील निरीक्षकांना वाटते. १९४५च्या वैज्ञानिक कादंबर्यांतील कल्पनांचे विस्तारीकरण करून मिलिटरी- इंडस्ट्रीला बळकटी देणार्या युद्ध मशीन्सचे (war machine) उदात्तीकरण करण्याचा मस्कचा उद्देश असावा, असे अनेक तज्ज्ञांना वाटत आहे. ४०-५० च्या दशकातील विन्स्टन कँपबेल, आयझ्याक असिमोव्ह, आर्थर सी क्लार्क वा ए हॅन्लिनसारख्या विज्ञान लेखकांची पिढी फिजिक्स व अभियांत्रिकीचे सांधेजोड करत, व त्यातील नियमांची अप्रत्यक्षरीत्या मोडतोड करून त्यांचेच खरे वाटावे, असे बेमालूमपणे वाचकांच्या मनांचा ताबा घेत त्यांना एका वेगळ्या जगात नेऊन सोडत होते, भुरळ पाडत होते. यांच्याच वैज्ञानिक विश्वाचा भाग म्हणून टेलिपथीकडे बघता येईल.
टेलिपथी
ढोबळमानाने पाहिल्यास टेलिपथी हा एक साधा, सरळ, सोपा मनोवैज्ञानिक प्रस्ताव असून त्याच्या भोवती अद्भुततेचे व चमत्काराचे वलय आहे. कँपबेल व क्लार्क हे दोघेही टेलिपथीच्या अस्तित्वाचे खंदे पुरस्कर्ते होते. थोडेसे प्रयत्न केल्यास ते सर्वसामान्यापर्यंत पोचविणे शक्य आहे, असे त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते विश्वास बाळगून होते. टेलीपथीला वैज्ञानिक पुरावा आहे, अशी त्यांची खात्री होती व टेलिपथीसंबंधीचे काही मोजके प्रयोग केल्यानंतर त्याचे फायदे जगाला त्वरित मिळणार याबद्दल त्यांच्या मनात संशय नव्हता. तोच आशावाद मस्कच्या या विषयीच्या प्रस्तावात ठळकपणे अधोरेखित केलेला दिसेल. न्यूरोलिंकच्या यशस्वी प्रयोगानंतर मस्क यांनी याचाच पुनरुच्चार केला होता. विसाव्या शतकात पाश्चिमात्य देशातील अनेक वैज्ञानिक व ते काम करत असलेल्या प्रयोगशाळा या कल्पनेच्या अस्तित्वाच्या शोधाचा प्रयोग करत होते. त्यांच्या मते टेलीपथी एकदा हाती गवसल्यास तो मानवीमेंदूच्या उत्क्रांतीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरेल व जागतिक शस्त्रास्त्र स्पर्धेतील आघाडीचे शस्त्र ठरू शकेल.
फ्रेड्रिक मायर्स
मानवी पंचेंद्रियातील कुठलेही इंद्रिय न वापरता संवादाविना दूरस्थ मेंदूत काय चालले असेल हे समजण्याच्या ज्ञानाच्या संकल्पनेला परचित्तज्ञान वा टेलिपथी असे नाव देण्यात आले होते. जगभरातील अनेक संस्कृतीत अशा प्रकारच्या पुराणकथा/मिथ्यकथा ढिगाने सापडतील; परंतु पाश्चात्त्य जगतापुढे १८८२मध्ये टेलिपथीची संकल्पना मांडणारा फ्रेड्रिक मायर्स (१८४३-१९०१) हा एक अज्ञेयवादी, इंग्रजी कवी व होतकरू मनोवैज्ञानिक होता. त्याचे वडील एका चर्चचे प्रीस्ट होते. घरी अनेक कलाकार व विचारवंतांची मैफल जमत असे; परंतु तरुण फ्रेड्रिकला मात्र व्हिक्टोरियन क्रिश्चियन पारंपरिक श्रद्धेविषयी भरपूर तिटकारा होता. केंब्रिज युनिव्हर्सिटीतील हेन्री सिग्विक या अज्ञेयवादी तत्त्वज्ञाचा तो विद्यार्थी होता. हा तत्त्वज्ञ आपल्या धार्मिक व नैतिक भावनांबद्दलच्या अनिश्चिततेविषयी फार प्रामाणिक असल्यामुळे मायर्सचा आवडता प्रोफेसर होता. कट्टर अज्ञेयवादी असलेली जॉर्ज इलियटच्या संपर्कात आल्यामुळे मायर्सच्या उरल्या-सुरल्या आस्तिकतेलासुद्धा तडा गेला.
फ्रेडरिक मायर्स
१८७० च्या सुमारास अॅनी एलाइझा मार्शल या त्याच्या प्रेयसीच्या आत्महत्येमुळे मायर्स मृतात्म्याला बोलावून त्यांच्याशी संभाषण करणार्या त्याकाळच्या प्लॅन्चेट या स्पिरिच्युअल बैठकांमध्ये पूर्ण गुंतला होता. या बैठकांमध्ये टेबलाच्या भोवती बसलेल्या एखाद्याच्या माध्यमातून (बहुतेक वेळा महिलांचा) मृतात्मा काही वेळा टेबलावर आवाज करून, काही वेळा कागदावर आपोआप लिहून वा काही वेळा (अंधार असल्यास) धूसर आकृतीवरून स्वतःचे अस्तित्व प्रगट करून देत असे. ज्यांना धर्माच्या चांगुलपणावर संशय होता त्यांना या पुनर्जन्माच्या प्रत्यक्ष प्रमाणामुळे धर्मावरचा विश्वास वाढू लागला.

त्या काळी स्पिरिच्युआलिटीला (अध्यात्म नव्हे!) जनआंदोलन व जनसामान्यांचा धर्म असे स्वरूप आले होते. काही वैज्ञानिकांनीसुद्धा या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला होता. डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे सहसंशोधक, आल्फ्रेड रसेल वालेस यांनी तर या संकल्पनेला डोक्यावर उचलून धरले होते. चार्लस डार्विन मात्र या सर्व प्रकाराचे पक्के टीकाकार होते. इंग्लंड—अमेरिका यांच्यामध्ये असणार्या अट्लांटिक महासागराच्या खालून टेलिग्राफसाठी तारांची व्यवस्था उभारणारे टेलिग्राफ इंजिनीअर, क्रॉमवेल व्हॅर्ली तर याची दीक्षा घेतल्यासारखे वागत होते. त्या काळचे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ, ऑलिव्हर लॉज व लॉर्ड रॅली यांची या प्रकाराला सहानुभूती होती; परंतु या प्लॅन्चेटमधील नाटकीपणा, जादूसदृश प्रयोग, सामान्यांची उघड उघड होत असलेली तद्दन फसवणूक व हा सर्व प्रकार थोतांड वाटत असल्यामुळे मायर्सने स्वतः करत असलेल्या संशोधनाला प्रसिद्धी दिली नाही.
सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च
त्याऐवजी मायर्स यांनी प्रो सिग्विक व केंब्रिजमधील इतर सहाध्यायींच्या मदतीने १८८२मध्ये सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च (SPR) या मानसिक संशोधन विषयक संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे सर्वेसर्वा मायर्सच होते. मृतात्म्याकडून येणारे संदेश, भूताने पछाडलेली घरं, चित्र विचित्र स्वप्नातून मिळणार्या भविष्यासाठीच्या सूचना, दूरदृष्टीचे दावे, मंत्रमुग्ध करणारी ट्रान्स अवस्था, संमोहन इ.इ. तथाकथित अलौकिक व अतींद्रिय घटनांचा वेध घेत त्यांना विज्ञानाची मान्यता मिळू शकते का, याचा तपास घेणारी ही संस्था होती. ‘स्पिरिट गृहीतक’ यावर तेथील संशोधकांचा विश्वास नव्हता. म्हणून काही काळासाठी हे गृहीतक बाजूला ठेवण्यात आले. त्यासाठीचे प्रयोगातून पुरावे सापडल्याविना त्याला मान्यता देणे योग्य नाही, यावर संशोधकांचे एकमत होते. त्यामुळे ही संस्था व त्याचे सदस्य ‘स्पिरिच्युअल’ आंदोलनाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले. भूतांचे अस्तित्व वा मृतात्म्याबरोबरील संवाद या सारख्या अलौकिक घटनांना भौतिक वा neuropsychological सैद्धांतिक स्वरूपात मांडता येईल का यावर ते भर देत होते. भूत असे संबोधण्याऐवजी ‘प्रमाणित कल्पनारम्यता’ व भूताने पछाडलेले घर ऐवजी ‘कल्पनारम्यतेचे केंद्र’ (‘phantasmogenetic centres) असे म्हणता येईल का याची चाचणी ते करू लागले. वैज्ञानिकांना माहीत असलेल्या शक्तींव्यतिरिक्त इतर सर्व शक्तींना ते मनःशक्ती असे शब्द वापरू लागले.
लांबून केलेला स्पर्श या अर्थाचा ‘टेली टु पॅथोस’ या ग्रीक शब्दावरून मायर्स यांनी ‘टेलिपथी’ हा शब्द वापरला. त्याच्या मते नेहमीची इंद्रिये न वापरता केलेला संवाद या अर्थाचा हा शब्द असून तो अगदी तटस्थ शब्द आहे. हा शब्द जाणीव नसलेल्याशी, लांब अंतरावरील दोन मने एकमेकांशी वा मृत व्यक्तींशी केलेला संवाद वा पाठविलेला संदेश सुचवतो. तो काळ असा होता की, विद्युत तंत्रज्ञानामुळे टेलिफोन, फोनोग्राफ व टेलिग्राफ या दूरस्थ ध्वनी व सांकेतिक ध्वनीच्या साधनांना नको तेवढी प्रसिद्धी मिळत होती. या साधनांमध्ये संभाषण करणारी व्यक्ती अदृश्य असूनसुद्धा केवळ ध्वनीचे प्रसारण होत होते. त्याच काळात चमत्कारसदृश क्ष किरणं व बिनतारी टेलिग्राफीच्या जादुई जगाने सर्वांना मोहित केले. अनेक इंजिनीयर-संशोधकांच्या मशीनद्वारे मनातील विचारांना कुठल्याही माध्यमाविना पोचविता येईल व तो काळ दूर नाही या आश्वासनावर लोकांचा विश्वास बसू लागला. थॉमस एडिसन व त्याच्या संशोधनांना आव्हान देणारा निकोला टेस्ला यांनासुद्धा दूरस्थ विद्युत संवादाचे दिवस फार लांब नाहीत असे वाटू लागले. १९०१ साली मायर्सचा मृत्यु झाला. १९०३ साली त्याच्या मृत्युपश्चात प्रकाशित झालेल्या त्याच्या Human Personality and its Survival of Bodily Death या पुस्तकातसुद्धा नजीकच्या काळात टेलिपथी या संकल्पनेचे प्रायोगिक पुरावे मिळतील, अशी आशा व्यक्त केलेली होती.
परामानसशास्त्र
मानसिक संशोधन हा विषय मुख्य प्रवाहातील विज्ञान म्हणून विज्ञान जगतात कधीच मान्यता मिळवू शकला नाही. हा विषय शेवटपर्यंत अकादमीय मानसशास्त्र म्हणून संशोधनांच्या काठा-काठावरच राहिलेला विषय होता. अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातील जे बी र्हाइन यांनी ‘परामानसशास्त्र’ (Parapsychology) असे त्याचे पुनर्नामकरण करून संख्याशास्त्रीय आधारावरून व इतर घटनांचा खोलपणे जाऊन अभ्यास करण्यास त्याच्या संशोधक टीमला प्रवृत्त केले. यासाठी त्यांनी मनातील गोष्टी ओळखण्यासाठी वापरात येत असलेल्या ‘झेनार’ कार्डचा उपयोग करून याविषयीचा डेटा गोळा करण्यास सांगितले. यासाठी विशेष प्रकारचे कार्ड तयार करून घेतले. त्यावर तारा, लाटा, क्रॉस, वर्तुळ व चौकोनाचे चित्र मुद्रित करून घेतले. मनःशक्तीचे दावे करणार्यासमोर चिन्ह दिसू नये म्हणून कार्ड पालथे टाकून कार्डवरील चित्र ओळखण्यास त्यांना सांगितले. र्हाइन यांनी संख्याशास्त्रीय चुका राहता कामा नये म्हणून जास्तीत जास्त वेळा कार्ड ओळखण्याच्या प्रयोगावर भर देत होता. ही प्रक्रिया कंटाळवाणी असली तरी, प्लॅन्चेटच्या प्रयोगातील séance च्या देखाव्याची पुनरावृत्ती त्याला करायची नव्हती. र्हाइन यांनी या संबंधातील लिहिलेले Extrasensory Perception (१९३४) या पुस्तकाला अमाप प्रसिद्धी मिळाली. एक्स्ट्रासेन्सरी पर्सेप्शन (अतींद्रिय दृष्टी – ESP) हा शब्द अभ्यासकांच्या तोंडी रुळला व परामानसशास्त्र हा शब्द विस्मरणात जाऊ वागला.

प्रसिद्ध विज्ञान-कथा लेखक, आर्थर सी क्लार्क यांच्या विज्ञान-कथा लेखनात मानवी उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून येऊ घातलेल्या टेलिपथिक संकल्पनांचा उल्लेख अनेक ठिकाणी सापडेल. १९५३ सालच्या Childhood’s End या त्यांच्या कादंबरीत परग्रहवासी ओव्हरलॉर्डस् पृथ्वीवरील मानव वंशाच्या संपर्कात आल्यावर येथील अण्वस्त्रासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे होणार्या विध्वंसापेक्षा येथे विकसित होत असलेल्या टेलिपथीच्या शक्तीमुळे या लहान ग्रहाचा समूळ नाश होणार याची त्यांना जास्त भीती वाटत होती, असे वर्णन केले आहे. परग्रहवासींचा संपर्क हा एक टेलिपथीच्या शक्तीप्रयोगाचा उत्क्रांतीतील टप्पा असून टेलिपथीचा विकास हा मानवी उत्क्रांतीचे प्रौढपणातील पदार्पणाचे द्योतक आहे, असे त्यांना वाटत असावे. याच विचाराची मांडणी स्टॅन्ली कुब्रिक याचे 2001: A Space Odyssey (१९६८) या गाजलेल्या चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात केले आहे. आर्थर सी क्लार्क या चित्रपटाचे पटकथा लेखक होते.
शीतयुद्धाचा काळ
मुळात १९६०-७० चा तो काळ रशिया व अमेरिका यामधील शीतयुद्धाचा काळ होता. त्यामुळे कदाचित क्लार्क यांना या शतकाच्या आरंभीच्या काळात चर्चेत असलेल्या टेलिपथी या संकल्पनेला पुनर्जीवित करावेसे वाटले असेल. अमेरिका व रशिया या दोन्ही गटातील लष्करीयुद्ध साहित्याचे उत्पादन करणार्या उद्योग (Military-Industrial) विस्ताराला काही प्रमाणात थांबविण्यासाठी टेलिपथी या संकल्पनेने लक्ष वेधले असेल. या काळात या दोन्ही गटातील शस्त्रास्त्र स्पर्धा शिगेला पोचली होती व त्यापैकी कुणालाही आपल्याकडील अण्वस्त्र वापरणे या जगाचा विध्वंस करणार याची धास्ती होती. विकसित केलेली टेलिपथी हे नक्कीच अण्वस्त्र स्पर्धेचे गतिरोधक म्हणून काम करू शकेल, असे दोन्ही गटांना वाटले असेल. मनःशक्तीच्या नियंत्रणातून दूरस्थ दृष्टीचा वापर करत जागतिक युद्ध थांबवू शकणारी गुप्तहेर यंत्रणा दोन्ही गटांना हवी होती. म्हणूनच या तंत्रज्ञानाच्या संशोधनाला ‘psionics’ वा ‘psionics’ असे नामकरण करून टेलिपथीच्या नव्या युगाचा पाया रचला गेला.
१९६८ मध्ये ‘तांत्रिक परामानसशास्त्र’ या परिषदेसाठी जगभरातील मानसतज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ व जैविक अभियंता यांना बोलाविण्यात आले होते. गंमत म्हणजे ही परिषद मास्कोत भरविली गेली. जगभरातील तज्ज्ञ तेथे पोचल्यानंतर तेथील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने ही परिषद होऊ नये, यासाठी भरपूर प्रयत्न केले. शेवटी परवानगीविना ही परिषद भरविली गेली.
या परिषदेने जाहीरपणे प्रसिद्ध केलेल्या अहवालात सोव्हिएट युनियनमधील परामानसशास्त्रावरील संशोधनाविषयी विशेष माहिती होती. ऑक्टोबर १९१७च्या क्रांतीनंतर बोल्शेव्हिक सत्ताधारी वैज्ञानिकांनी ‘biological radio communication’ वर संशोधन करू लागले. हा शब्दसुद्धा त्याकाळचे रशियन विद्युत अभियंता बर्नार्ड काझिन्स्की यांनी पहिल्यांदा वापरला. त्याच्या मते मनातील माहितीचे दूरपर्यंत प्रेषण करण्यासाठी आपल्या शरीरातील मज्जातंतूच्या विद्युत-चुंबकीय यंत्रणेचे महत्त्वाचे काम आहे. त्यासाठी आतापर्यंत माहीत नसलेल्या रेडियो इंजिनीअरिंगला जैविक कम्युनिकेशनसाठी मानवी शरीरालाच साधन म्हणून वापरावे लागेल. मात्र स्टॅलिनच्या कालखंडात अशा प्रकारचे संशोधन कार्य थांबविण्यात आले; परंतु त्या काळातील प्रसिद्ध रशियन शरीरविज्ञानशास्त्रज्ञ, लिओनिड व्हॅसिलिएव्ह यांनी लेनिनग्राड विद्यापीठाच्या आवारात १९५९ साली एका प्रयोगशाळेची स्थापना केली. या प्रयोगशाळेत दूर दूर असलेल्या मनामधील सूचनांची चाचणी करण्यात येत होती. १९६३च्या सुमारास लेनिनग्राड ते १७०० किमी अंतरावरील सेवास्टापोल या दोन शहरांतून टेलिपथीद्वारा माहितीची देवाणघेवाण करण्यात ते यशस्वी झाले. याच प्रयोगशाळेत सायकोकायनॅटिक माध्यम म्हणून २० वर्षे काम केलेल्या निनेल मिखायलोवा यांच्या मनशक्तीच्या प्रयोगाचे फूटेज या परिषदेत सादर करण्यात आले. एडझच्या अभ्यासातून मशीन्समधून जैविक माहितीचे आदानप्रदान, नियंत्रण व चाचणी शक्य आहे, असा दावा त्या काळचे प्रमुख सोव्हिएत वैज्ञानिक, एड्वर्ड न्यूमोव्ह यांच्याकडून या परिषदेत करण्यात आला. या परिषदेच्या कामकाजाची माहिती Psychic Discoveries Behind the IronCurtain (1970) या नावाने पुस्तक स्वरूपात इंग्रजीमध्ये प्रकाशित करण्यात आली.
सायकोट्रॉनिक प्रारूप
१९७३ मध्ये सायकोट्रॉनिक संशोधन या विषयाला वाहिलेली एक आंतरराष्ट्रीय परिषद प्राग येथे भरली. माणसातील बायोनिक्समध्ये सुप्त अशी शक्ती असून त्याची क्षमता प्रचंड असू शकते व त्यावर अभ्यास करणे गरजेचे आहे, असे झेक टीमला वाटत असल्यामुळे सायकोट्रॉनिकची परिषद या टीमने भरविली होती. र्हाइनच्या पारमानसशास्त्रापेक्षा सायकोट्रॉनिक प्रारूप कमी उत्स्फूर्त, कमी विसंगत व अत्यंत रूक्ष होते. हे प्रारूप मुख्यत्वेकरून सायकिक शक्तीला केंद्रित ठेवून सक्रिय स्वयंप्रेरित तंत्रज्ञानातील सैद्धांतिक स्वरूपावर भर देणारी होती. सायकिक क्षमतेला शस्त्रास्त्रामध्ये कसे बदलता येईल यावर त्यांचा भर होता.
अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने सायकीकल अवस्थेसंबंधीचे काही प्रकल्प हाती घेतले. १९५३ ते १९७३ या कालखंडात सीआयए ही गुप्तचर यंत्रणा चघ-णश्रीींर झीेक्षशलीं द्वारे मेंदूचे नियंत्रण करणार्या ब्रेनवाशिंगबद्दल व मेंदूला बधिरावस्थेत पोचविणार्या निरनिराळ्या ड्रग्सबद्दल संशोधन करण्यास अर्थसाहाय्य करत होती. ड्रग्सच्या आहारी गेलेले व मुद्दामहून ड्रग्सच्या जालात फसवलेले अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांवरील परिणामांची चाचणी केली जात होती. जरी असे काही नव्हते, असे शासनातर्फे सांगितले जात असले तरी कुठे ना कुठेतरी हे संशोधन केले जात होते हे उघड गुपित होते.
१९७० मध्ये स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील रसेल टार्ग व हॅरॉल्ड पुथॉफ या भौतशास्त्रज्ञांनी गुन्हा घडत असताना त्या ठिकाणी दूरदर्शी अनुभवातून टेलिपथीद्वारे ती घटना प्रत्यक्ष ‘बघता’ येऊ शकेल का याबद्दल संशोधन करत होते. या संशोधन प्रकल्पामधून शीत युद्धातील शत्रु पक्षात सायकिक घुसखोरी करून पाळत ठेवणे शक्य झाले असते.

गंमत अशी होती की, अमेरिका व सोव्हिएट युनियन ही दोन्ही राष्ट्रे आपापले सायकिक संशोधनाचे निष्कर्ष ताबडतोब जाहीर करत होते. कदाचित शत्रुराष्ट्राला चकविण्यासाठी चुकीची माहिती प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्नही त्यात असेल. वा विज्ञान जगतात क्षुल्लक वाटणार्या या संशोधनाचाच शत्रुला नामोहरम करण्याचे शस्त्र म्हणून दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जात असेल.
१९७४ मध्ये नेचर या वैज्ञानिक साप्ताहिकात रसेल टार्ग व हॅरॉल्ड पुथॉफ यांचे संशोधनपर निबंध, ‘Information Transmission under Conditions of Sensory Shielding’ प्रसिद्ध झाले. (याबद्दल भरपूर आरडाओरडा झाल्यामुळे या निबंधाची peer-review न करता संपादकांनी प्रसिद्ध केली, असे नंतरच्या काळात कळले.) शोधनिबंधाच्या निष्कर्षात लेखकद्वयांनी दूरदूरपर्यंत माहितीच्या देवाणघेवाणसाठी जगामध्ये एक चॅनेल अस्तित्वात असून त्या चॅनेलचा वापर आपल्याला अजून अज्ञात असलेल्या संवेदनाक्षम पद्धतीतून करता येईल, असा उल्लेख केला होता.
युरी गेलर

रसेल टार्ग व हॅरॉल्ड पुथॉफ यांचे बहुतेक प्रयोग युरी गेलरच्या तथाकथित सायकिक क्षमतेचे वापर करून केले होते. ब्रिटिश टीव्हीच्या प्रेक्षकांना संमोहित करणारा हा टीव्हीस्टार लांब उभा राहून चमचांना हात न लावता केवळ मनशक्तीने चमचे वाकडे करून दाखविण्याचे शो करत होता. मुळात हा शोमन काही ट्रिक्स वापरून प्रेक्षकांना फसवत होता. १९७०च्या दशकात सर्व टीव्ही चॅनेल्सवर याच्या सायकिक शक्तीचे प्रयोग दाखविले जात होते. टॉकशोमध्येसुद्धा हा भाग घेत चॅनेलच्या टीआरपीत भर घालत होता. लहान मुलांच्या विज्ञानविषयीच्या कार्यक्रमातील त्याचा सहभाग टीव्हीच्या पडद्यासमोर बसलेल्या मुला-मुलींना पर्वणी वाटत होती. याचाच फायदा घेत स्टारट्रेक या टीव्ही चॅनेलने स्पॉक व्हल्कन याला भरपूर प्रशिक्षण दिल्यास दुसर्यांच्या मनात काय चालले आहे हे ओळखणे शक्य आहे या ‘mind meld’ कार्यक्रमाचे पुन्हा प्रसारण करू लागली. १९७३ ते १९७९ या काळात ब्रिटिश टीव्हीवर Tomorrow People नावाचा सायकिक विषयक कार्यक्रम प्रसारित होऊ लागला व तो लहान मुलांमध्ये भरपूर लोकप्रिय झाला. मुळात त्या काळी जॉन विंड्याम या विज्ञानकथा लेखकाचे The Chrysalids (१९५५) हे पुस्तक मोठ्या प्रमाणात ब्रिटिश मुलं वाचत होती. या पुस्तकात पृथ्वी प्रलयानंतरच्या उरल्या सुरल्या समाजातील टेलिपथीचे ज्ञान असलेल्या मुलांचे अतोनात हाल केले जातात असे वर्णन होते. त्यामुळे सायोनिक्सच्या शक्तीचा वापर शस्त्रास्त्र स्पर्धेत होईल की काय या विज्ञानकथाकारांची भीती बहुतेक वाचकांच्या मनात होती.
प्रॉजेक्ट स्टारगेट
१९७८ मध्ये अमेरिकेतील संरक्षण खात्याने मेरीलँड येथे सायकॉलॉजिकल ऑपरेशन्ससंबंधित इथपर्यंतच्या सर्व प्रायोगिक व सैद्धांतिक गोष्टींना एकत्र करून पुढील संशोधनासाठी प्रॉजेक्ट स्टारगेट नावाचा गुप्त प्रकल्प हाती घेतला व त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली. या साय-ऑप संशोधनात सायकिक प्रक्षेपण व अज्ञात गोष्टीत फेरफार करता येईल का, यावर संशोधन करण्याचा विचार होता. हा प्रकल्प म्हणजे आतापर्यत विज्ञानकथा लेखकांनी वर्णन केलेल्या अत्यंत विलक्षण व अकल्पित असे जे जे काही लिखित वा इतर स्वरूपात होते या सर्वांची एक सरमिसळ अशा स्वरूपाचा होता. या प्रकल्पामध्ये पुस्तकातील/चित्रपटातील सायकिक घटनांचा समावेश होता. हा संरक्षण प्रकल्प म्हणजे जॉन रॉन्सन या लेखकाच्या The Men Who Stare at Goats (२००४) या पुस्तकातील व्यंगार्थाने लिहिलेल्या गोष्टींची गंभीर आवृत्ती असे म्हणता येईल. या पुस्तकात सैनिकी प्रशिक्षणातून तावूनसुलाखून निघालेल्यांच्या मनःशक्तीचे किरण केंद्रित करून प्राणी हत्या केल्याच्या प्रयोगाचे वर्णन होते. रॉन्सनने मूर्खपणाचे व विवेकशून्यतेचे उदाहरण म्हणून याचा उल्लेख केला असला तरी, पुढील काळात अमेरिकन सैनिकाने इराक युद्धात केलेला मानसिक छळाचा क्रौर्यपणा कुणीही विसरू शकत नाहीत.
The Manchurian Candidate (१९६२) या चित्रपटात मानसिक छळ केल्यानंतर माणसं खुनी होताना दाखविले असून त्यांना संमोहित करून त्यांच्या मनात कुणाचा खून करायचे हे भरविले जाते.
प्रॉजेक्ट स्टारगेटची सर्वात मोठी फलश्रुती म्हणजे सोव्हिएट युनियनने परामानसशास्त्रावरील सर्व प्रकल्पांवर केलेली बंदी असे म्हणता येईल. खरे पाहता १९६८मध्येच मास्कोच्या परिषदेपासून याची सुरुवात झाली होती. पश्चिमेतील राष्ट्रामध्ये जाऊन भाषणाची फी घेतली म्हणून परामानसशास्त्रज्ञ न्यूमोव्ह यांची जेलमध्ये रवानगी झाली. शीतयुद्धाच्या काळातील सोव्हिएट युनियनचे मौनधारण ही गुप्तपणे चालू असलेल्या परामानसशास्त्राचे सैनिकीकरण अशी अफवा अमेरिकेकडून पसरविली जात होती. कारण हीच अमेरिका आपण करत असलेल्या हवाई सेनेसाठीच्या विविध एरोस्पेस प्रकल्पांची जाहीर वाच्यता होऊ नये, यासाठी जनतेचे दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी उडत्या तबकडींची चित्रमालिका प्रसारित करून परग्रहाकडून हल्ला होत आहे, अशी भीतीच्या वातावरणाची निर्मिती करत होती. या उडत्या तबकडीला शास्त्राचा दर्जा मिळाला. हे शास्त्र युफालॉजी (UFOlogy) या नावाने ओळखले जाऊ लागले.
काउंटर कल्चर
अमेरिकेतील सायकिकवरील संशोधन, विज्ञानकथांचे अद्भुतविश्व व युफालॉजी हे एकमेकांशी संबंधित असून या सर्वांनी टेलिपथीला केंद्रस्थानी ठेवलेले होते. एवढेच नव्हे तर त्या काळातील बदलत असलेल्या संस्कृतीत (counter culture) टेलिपथीचे दृश्य—अदृश्य परिणाम शोधता येतील. गंमत म्हणजे टेलिपथी हा शब्द फारच मोकळेपणाने व ढोबळमानाने वापरला जात होता. मनाशी संबंधित काहीही असले तरी त्याला टेलिपथीशी जोडले जात होते.
१९६०च्या हिप्पी कल्चरमध्ये टेलीपथीचा पुन्हा एकदा बोलबाला झाला. मुळात हिप्पी संस्कृती युद्धविरोधी होती. त्या काळचे अँग्री यंग मेन या सदरात मोडणारे स्टुअर्ट हॉलरॉयड (Emergence from Chaos) कॉलिन विल्सन (Outsider), बिल हॉपकिन्स, जॉन ऑस्बॉर्न, किंग्स्ले अमिस, इ लेखक, नाटककार, कवी माणसातील जाणीव, परामानसशास्त्र, मनशक्ती, टेलीपथी इत्यादी मानसिक विषयासंबंधी कथा, कादंबरी, नाटकं लिहीत होते. तो काळ न्यू एजचा काळ होता. रूढ अर्थाने जे काही आलेले होते त्यांना नाकारून भौतिक सुखापेक्षा वेगळे सुख शोधण्याचा व वेगळे काहीतरी स्थापन करण्याचा त्या काळाचा मानस होता. एका प्रकारे हा जाणिवेचा स्फोट होता व त्यांच्या या प्रयत्नात परामानसशास्त्र केंद्रस्थानी होते. यातील बहुतेक जण आपल्यातील गूढ अनुभवांना सामोरे जाण्याचा आग्रह धरत होते. हॉलरॉयडने तर काउंटरकल्चरचा संबंध परामानसशास्त्रावरील प्रायोगिक विज्ञानाशी जोडला होता. यांचाच कित्ता न्यू एज गुरुने गिरवला व त्यांच्याही शब्दसंग्रहात परामानसशास्त्र, टेलीपथी, जाणीव, मिस्टिसिजम इत्यादींची रेलचेल होती. त्यांच्या दृष्टीने टेलीपथी ही विस्तारित जाणीव होती. याच शब्दसंग्रहाच्या आधारावर भगवान रजनीश, महेश योगीसारख्या भारतीय गुरूंनी पाश्चात्त्य देशात चांगलाच जम बसविला. याच काळात अमेरिकेचा बॉबी फिशर व रशियाचा बोरिस स्पास्की यांच्यातील बुद्धिबळपटावरील स्पर्धासुद्धा एका प्रकारे शीतयुद्धाचाच भाग होता.
टेलिपथीचे उदात्तीकरण
टेलिपथीचे उदात्तीकरण फक्त कथा-कादंबरी-कविता यांच्यामधूनच नव्हे तर चित्रपट व्यवसायांनीसुद्धा केले. १९७०च्या काळात भयपटांनी उच्चांक गाठला. थरकाप उडविणार्या कथा कादंबर्यांवरून बेतलेल्या अनेक भयपटांनी मोठ्या प्रमाणात धंदा केला, खोर्याने पैसे कमविले. चित्रपटांच्या मायावी जगात काहीही घडविता येते. चित्रपटातील ट्रिक सीन्समुळे प्रेक्षकाला आभासी जग (काही काळ का होईना) खरेखुरे जग वाटू लागते. त्यामुळे भयपटातील चित्र विचित्र दृश्यांमुळे एक नवा प्रेक्षकवर्ग तयार होऊ लागला. रोमांचकारी, दातखीळ बसविणारी कथा व अशा कथांना पूरक असे पडद्यावरील दृश्य यामुळे प्रेक्षकांना आपण प्रत्यक्ष तेथे आहोत व आपल्यासमोर ते घडत आहे याचे आकर्षण वाटू लागले. भयपटांना मिळणार्या पाठिंब्यामुळे त्या प्रकारच्या कथा कादंबर्याही लिहिल्या गेल्या. निकोलस रोएगचा Don’t Look Now (१९७३) चित्रपट डाफ्ने ड्यू मारियरच्या १९७१ च्या कथेवर आधारित होता. ही कथा एका माणसाच्या असंवेदनशील वर्तणूक व त्याच्यातील सायकिक व टेलीपथिक क्षमतेमुळे त्याला आपल्या मृत्युची चाहूल ओळखता आली नाही, यावर बेतलेली होती. (याच लेखिकेच्या कथेवरून हिचकॉकने बर्ड चित्रपटाची निर्मिती केली होती). स्टीफन किंग या लेखकाचे सुरुवातीच्या कादंबर्या टेलीकायनेसिस व टेलीपथीच्या शक्तीशी संबंधित होत्या. Carrie (१९७४) या त्याच्या पहिल्या कादंबरीवर ब्रायन डी पामा यांनी १९७६ मध्ये याच नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली. यात पौगंडावस्थेतील सिस्सी स्पासेक सायकोकिनेसिसमुळे त्रस्त झालेली गोष्ट आहे. ७०च्या दशकात सायकोकिनेसिस हा सायकिक संशोधनातील महत्त्वाचा विषय होता. १९७७मधील स्टिफन किंगच्या अत्यंत गाजलेल्या The Shining या कादंबरीत एका शैशवावस्थेत असलेल्या मुलातील शक्तियुत टेलीपथिक क्षमतेतून एका जुनाट हॉटेलमधील निष्क्रीय व सुप्तावस्थेतील वर्णक्रमीय (spectra) शक्तींना जागे करतो. (हॉलिवुडच्या स्टॅन्ली कुब्रिक यांनी या कादंबरीवर चित्रपट काढला होता.) स्टीफन किंग यांनी आपल्या कादंबरीत शेर्ली जॅक्सनच्या The Haunting of Hill House (१९५९) कादंबरीतील अनेक प्रसंग शब्दबद्ध केले होते. जॅक्सनच्या कादंबरीत सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च या संस्थेनी १८९७साली एका हाँटेड हौसविषयी केलेल्या तपासातील वर्णनं होती.
डी पामाच्या The Fury (१९७८) या चित्रपटात लोकप्रिय असलेल्या सायकोट्रॉनिक्सने सुचविल्याप्रमाणे टेलिकायनेटिक व टेलिपथिक क्षमतेतून सायकिकल शक्तींचे शस्त्रास्त्रात परिवर्तन करता येते हे कथानक दाखवले होते. मार्क लेस्टरचा Firestarter (१९८४) हा चित्रपटसुद्धा स्टिफन किंगच्या अजून एका पुस्तकावर आधारलेला होता. त्यात सायकिक शक्ती वापरून एखाद्याला जाळून टाकण्याची (pyrokinetic) क्षमता असलेल्या एका तरुण मुलीलाच पाठलाग करत असलेल्या सुरक्षा यंत्रणेतील काळ्याकुट्ट शक्तीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करावा लागला, असे वर्णन आहे. डेव्हिड क्रोनेनबर्ग यांच्या Scanners (१९८१) चित्रपटात एका अज्ञात फार्मास्युटिकल कार्पोरेशनच्या अशा काळ्याकुट्ट विषयावरील संशोधन करण्याच्या कट कारस्थानाची उधळून लावण्याची कथा आहे. या कट कारस्थानात टेलिपथीची क्षमता असलेल्यांच्या एका टीमने वैद्यकीय चाचणीच्या वेळी टेलिपथिक प्रक्षेपण करून प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतल्याची कथा आहे. या प्रकारच्या अनेक चित्रपटांत टेलिपथीच्या शक्तीचे उदात्तीकरण करणार्या कार्पोरेट व शासनकर्त्यांच्या राक्षसी महात्त्वाकांक्षेचे चित्रण केले होते.
१८८० चा काळ
मागे वळून पाहिल्यास त्या काळात टेलिपथीबद्दल लोकांमध्ये भलताच उत्साह होता, असे म्हणता येईल. मायर्स व त्याच्या बरोबरचे इतर सायकिकल संशोधकांनी १८८०च्या सुमारास या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली. मुळात तो काळ विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या उत्क्रांतीचा काळ होता. अनेक गोष्टींची उलथापालथ झाली. दृश्य व अदृश्य यांची सरमिसळ झाली. नैसर्गिक (natural) व अलौकिक (supernatural) यांच्यातील सीमारेषा पुसट झाल्या. ध्वनी प्रक्षेपणाचे, दृश्य प्रक्षेपणाचे नवीन तंत्र उपलब्ध झाल्यामुळे सामान्य भांबावून गेले. सर्व जग चमत्काराने भरल्यासारखे वाटू लागले. तबकडीवरील गाणे, कड-कट्ट आवाजातील संदेश वहन, टेलिफोनच्या तारांमधून केलेला संवाद, चित्रपटांचे जादुई जग, पेटी (टीव्ही) च्या पडद्यावरून जगातील घडामोडींचे दर्शन, घरबसल्या मिळू लागलेले मनोरंजन, इत्यादी गोष्टींचा अनुभव त्या काळाने घेतला. १९७०च्या सुमारास टेलिपथी नवीन नावं घेऊन, नवीन परिस्थितीला सामोरे जात समाजात वावरू लागली. शीतयुद्धाच्या काळातील शस्त्रास्त्र स्पर्धेला वेसण घालण्यासाठी मानसिक नियंत्रणाच्या अद्भुतरम्य तंत्रज्ञानाचा शोध घेऊ लागली. मनःशक्ती, ब्रेन वाशिंग, सायकोसिस, सायकोकिनेसिस, सायकोट्रॉनिक, ESP इ.इ नावांनी टेलिपथी वावरू लागली. जरी या गोष्टीत वेडसरपणाच्या खुणा असल्या तरी, यातून काही तरी हाती लागेल या आशेवर टेलिपथी संकल्पना जिवंत राहिली.
१९७० चा काळ
समाजशास्त्रज्ञांच्या मते १९७०चा हा काळ एका वेगळ्या व कदाचित नव्या जागतिक व्यवस्थेला जन्म देणारा काळ होता. याच काळात जुन्या संस्कृती ढासळून पडल्या. संपूर्ण जग नेटवर्किंगमुळे जवळ येऊ लागले. परस्परावलंबी झाले. सॅटेलाइट कम्युनिकेशनमुळे संवाद सुलभ झाला. संपूर्ण जग हे एक जागतिक खेड्यासारखे भासू लागले. कट-कारस्थाने, एकमेकांच्या विरुद्धातील शड्यंत्र, गुप्तपणे विकसित होत असलेले तंत्रज्ञान, गूढ नेटवर्किंग इत्यादींची एक नवी संस्कृती उदयास आली. स्पर्धात्मक जगात सत्तेला नको तितके महत्त्व आले. त्यासाठी शड्यंत्र शिजू लागले. अलन पकुलाचे All the President’s Men (१९७६) वा फ्रान्सिस फोर्ड कोप्पोलाचे The Conversation (१९७४) सारख्या चित्रपटांमधून सत्ता कशी राबवली जाते व त्यासाठी माध्यमं, नेटवर्किंग तंत्रज्ञान इत्यादींचा वापर कसा केला जातो याचे नग्न दर्शन होते. दिवसे न दिवस हे सर्व समजण्याच्या पलीकडचे वाटू लागते. कदाचित टेलिपथी हे नवीन तंत्रज्ञानाच्या वितरणाचा नवीन मार्ग ठरणार आहे का?१९७०चा काळ जागतिक संवादासाठी लागणार्या नेटवर्किंगसाठी टेलिपथीकडे बघता होता का?
टेलिपथीचे पुनरुत्थान
आताच्या एलॉन मस्कच्या टेलिपथीच्या पुनरुत्थानाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा विचार केल्यास गेल्या दोन-चार दशकातील डिजिटल उत्क्रांतीचा संदर्भ त्याला असेल. हे केवळ संवादासाठीच्या नेटवर्किंगमध्ये झालेल्या प्रगतीचे वा त्याच्या अभूतपूर्व वेगाचे परिणाम नसून आपण आपली अस्मिता, आपले स्वत्व विसरून आपण पूर्णपणे बदलून या नेटवर्कचे एक सुटे भाग होणार आहोत की काय अशी शंका येऊ लागते. पुन्हा एकदा natural व super natural यातील सीमारेषा धूसर होत आहेत. डिजिटलायजेशनमधून आपण काहीही करू शकतो एवढा आत्मविश्वास या स्ट्रीमिंग एजमधून व्यक्त होत आहे. मनःशक्तीचे अल्गॉरिदम करणे तेवढेच बाकी राहिले आहे. एखाद्या कार्पोरेशनने गुप्तपणे हे करायचे ठरविल्यास आपला मेंदू, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत की काय असे वाटत आहे. टेलिपथीतून मनकवडेपणा, सर्व प्रकारच्या (बिनडोक) कामासाठी रोबोटिक्स, कौशल्ययुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या युतीतून आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा जगाची निर्मिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टेलिपथीच्या संकल्पनेने मस्कला खरोखरच प्रभावित केले आहे. टेलिपथीचा इतिहास, आतापर्यंतची त्याची वाटचाल, कुठल्या परिस्थितीतून तिने झेप घेतली, त्याच्या वेगवेगळ्या स्तरांचा अर्थ, त्याच्याबद्दलच्या आख्यायिका यांचा प्रभाव त्याच्यावर नक्कीच पडला असेल. मात्र न्यूरोलिंकमुळे टेलिपथी फक्त काही पावलावर आहे असे वाटत असले तरी ती आपल्याला चकवत असून अजूनही ती क्षितिजाच्या पलीकडे आहे याची आठवण इतिहास करून देत आहे.
-प्रभाकर नानावटी
लेखक संपर्क : ९५०३३ ३४८९५
(संदर्भः Aeon Weekly)