बुद्धिवादाची ऐतिहासिक लढाई

प्रा. प. रा आर्डे -

मानवाने आजवर साधलेली प्रगती आपोआप, कोणत्याही दैवी, अमानवी शक्तीच्या आधारे नव्हे, तर मानवी बुद्धीच्या बळावर आहे. परंतु ही बुद्धी वापरण्यासाठी, विकसित करण्यासाठी बुध्दिवादी मानवाला अगदी मानवी जन्मापासून ते थेट आजतागायत मानवी विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रचंड संघर्षाला तोंड द्यावे लागले आहे. त्यातील आधुनिक विज्ञानाच्या टप्प्यात सॉक्रेटिस ते दाभोलकर या बुद्धिवाद्यांनी केलेल्या संघर्षाचा इतिहास या ‘बुद्धिवाद्यांचा संघर्ष’ या सदरातून सांगत आहेत, ‘अंनिवा’चे माजी संपादक प्रा. प्र. रा.आर्डे.

इ. स. पूर्व 500 पासून, म्हणजे जवळजवळ 2800 वर्षांपासून सृष्टीची रचना, म्हणजेच भौतिक जगाचे स्वरूप आणि मानवी समाजातील नीतीचे स्थान यावर विचार मांडला गेला आहे. ग्रीक कालापासून ते आजतागायत विवेकवादाच्या, म्हणजेच बुद्धिप्रामाण्याच्या पायावर विविध प्रकारचे तत्त्वज्ञान मांडले गेले. बुद्धिप्रामाण्यवादाला त्या-त्या काळात धर्मश्रद्धेच्या अंगाने मोठा विरोधही झाला. धार्मिक श्रद्धेची बंदिस्त रचना आणि बुद्धिप्रामाण्यातून आलेला मुक्तविचार यांच्यातील काही लढाया तर भीषण होत्या. कोत्या विचाराच्या अथेन्समधील न्यायव्यवस्थेने सॉक्रेटिसला विषाचा प्याला देऊन ठार केले. बर्ट्रांड रसेल या घटनेबद्दल लिहितात – ‘ज्या दिवशी सॉक्रेटिसला विषाचा प्याला दिला गेला, त्याच दिवशी मानवता मेली. पण राखेतून उठणार्‍या फूलझाडाप्रमाणे मानवतेचे अंश पुढील काळात बुद्धिवादाचा जयघोष करीत राहतील. त्याचा इतिहास मोठा रोमांचकारी; पण तितकाच वेदनादायी आहे. 16 व्या शतकातील ब्रुनोला जिवंत जाळणे आणि गॅलिलिओला नजरकैदेची शिक्षा देणे, येथपासून ते अलिकडच्या काळात संतांचा छळ करणे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे, एम. एम. कलबुर्गी ते गौरी लंकेश यांच्या हत्येपर्यंत धर्मांधांची बुद्धिवादाला रोखणारी दुष्ट परंपरा यांनी मन विषण्ण होते; पण श्रद्धेच्या अतिरेकाने बुद्धिवादाला संपविता आले नाही, असे इतिहास सांगतो. उलट तो झळाळून निघाला आणि अज्ञानाच्या अंध:कारातून समाजाला प्रगतीची दिशा दाखवण्याचे कार्य करत राहिला; पण इतिहासकाराने म्हटल्याप्रमाणे एकूणात बुद्धिवादामुळेच मानवी समाज उन्नत अवस्थेची वाटचाल करीत आहे. बुद्धिवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव म्हणून निग्रोंची गुलामगिरी संपली, भारतात अस्पृश्यतेला लगाम बसला. जुलमी राजसत्ता बुद्धिवादी तत्त्वज्ञांच्या प्रभावामुळे संपत आल्या. याची नांदी फ्रान्समध्ये 1789 मध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा जयघोष घेण्यात झाली. अमेरिकेत राज्यघटनेत या मूल्यांचा समावेश नंतर झाला. इंग्लंडमध्ये आणि युरोपातील इतर देशांत लोकशाहीची प्रस्थापना झाली. माणूस हे मूल्य महत्त्वपूर्ण बनले आणि ‘राजा हा देवाचा अवतार’ ही कल्पना संपुष्टात आली. बुद्धिप्रामाण्यवादाचा एक मोठा विजय म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक पद्धती यांचा 17 व्या शतकात युरोपमध्ये झालेला विजय. हे सगळं सरळ मार्गानं घडलं नाही. त्याचा इतिहास मुळातूनच समजून घ्यायला हवा.

सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर बुद्धिवादाची विवेकी परंपरा प्लेटोने पुढे चालवली. प्लेटोने एक सुंदर स्वप्न समाजापुढं ठेवलं. राज्यकर्ते हे तत्त्वज्ञ हवेत. (Rulers must be Philosopers) प्लेटोचं गुहेचं रूपक अजरामर आहे. अज्ञानात जखडलेला माणूस ज्ञानाच्या प्रकाशात मुक्त झाला पाहिजे, अशी ही कल्पना आहे. प्लेटोनंतर त्याचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल याने भौतिक जग आणि नैतिक जग याबद्दल आपले तात्त्विक विचार मांडले. पुढे, त्याच्या भौतिक विचारांना जे पुष्कळसे चुकीचे होते ख्रिस्ती धर्माने स्वीकृत केले. परंतु 17 व्या शतकातील विज्ञानाच्या प्रगतीवर त्याचा मोठा अडसर निर्माण झाला.

ग्रीकांची ज्ञान-विज्ञानाची परंपरा पुढे चालू राहिली ती हायपेशियाच्या मृत्यूपर्यंत. हायपेशिया ही नवप्लेटॉनिक तत्त्वज्ञानाची पुरस्कर्ती होती. तिच्या काळात रोमन सम्राटांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार जोरदारपणे चालू झाला होता. हायपेशिया ही ख्रिस्ती धर्म स्वीकारत नाही, ती विचारस्वातंत्र्याची पुरस्कर्ती आहे, याचा राग येऊन तिची ख्रिस्ती धर्मवेड्यांनी हत्या घडवून आणली. तिथून पुढे ज्ञान-विज्ञानाचा र्‍हास सुरू झाला. रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्माचे राज्य सुरू झाले. धर्माच्या बंदिस्त चौकटीतील जे आहे तेच खरे. विचारस्वातंत्र्यावर बंधने आली आणि अवघे युरोपीय जग अज्ञानाच्या अंध:कारात बुडून गेले, ते पुढे जवळजवळ 1000 वर्षेम्हणजे 15 व्या शतकापर्यंत.

झोपेतून जागे झाल्याप्रमाणे युरोपमध्ये विचारांचे नवजागरण सुरू झाले. ग्रीकांची ज्ञान-विज्ञानाची परंपरा गुप्तपणे का होईना अंधारयुगातून देखील पुढे जात होती. या विचारांचे महत्त्व लक्षात घेऊन युरोपात प्रबोधनाचा उदय झाला. या प्रबोधनकाळात धर्माला न जुमानता नवविचारांचा प्रसार हळूहळू सुरू झाला. फ्रान्सिस बेकन याच्या विचारात वैज्ञानिक पद्धतीचे सार होते, तरीसुद्धा नवविचार मांडणार्‍या लोकांना पाखंडी समजून देहांताच्या सजा दिल्या जात होत्या. त्याचा पहिला बळी ठरला ब्रुनो आणि नंतर गॅलिलिओ; पण नवजागरणाचा प्रभाव म्हणून फार दडपशाही योग्य नाही, असे धर्मसत्तेला वाटण्यासाठी त्यातून क्रूर शिक्षा कमी झाल्या; पण प्रत्येक नव्या विचाराला धर्मांचा तात्त्विक विरोध होतच राहिला.

17 व्या आणि 18 व्या शतकात युरोपमध्ये ‘एनलाईटनमेंट’ म्हणजे ज्ञानोदयाचा उदय आणि प्रसार होऊ लागला. अधिक धीटपणाने तत्त्वज्ञ धर्माचा पुनर्विचार करू लागला. राजा हा देवाचा अवतार आहे, यावर शंका निर्माण होऊ लागली. जॉन लॉक या तत्त्वज्ञानं प्रत्येक माणसाच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला. हळूहळू सत्तेवर सर्वसामान्य लोकांचा वचक हवा, हे लोकशाहीचे तत्त्व आकाराला येऊ लागले. फ्रान्समध्ये राजा आणि अमीर-उमराव यांच्या जुलमी सत्तेला आव्हान मिळाले आणि 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. राजेशाहीचा आणि धर्माचा सर्वंकष अधिकार संपुष्टात येऊन माणूस हे मूल्य प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. विज्ञानाचा विरोध मावळला. विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये सर्वंकष प्रगती सुरू झाली. जॉन लॉक, इम्युअल कान्ट, जॉन स्टुअर्ट मिल इत्यादी तत्त्वज्ञांच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारातून ज्ञानोदयाला बळ मिळाले.

20 व्या शतकात ज्ञान-विज्ञानाची तेजस्वी परंपरा गतिमान झाली. धर्माशिवाय नीतिमत्ता आणि वैज्ञानिक विचारपद्धती यांचे तत्त्वज्ञान अनेक विचारवंतांनी मांडले. त्यामध्ये ब्रिटनच्या बर्ट्रांड रसेल सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ होता. इंग्रजांच्या सत्तेमुळं वसाहतीतील राष्ट्रांमध्ये आणि भारतामध्ये हा ज्ञानोदयाचा म्हणजे विचार स्वातंत्र्याचा विचार प्रस्तुत होत राहिला. अमेरिकेमध्ये धर्मनिरपेक्ष, नैतिक, वैज्ञानिक विचारांचा प्रसार करणारे ‘सेंटर फॉर इन्क्वायरी’ या संस्थेची स्थापना पॉल कूर्त्झ या तत्त्वज्ञाच्या अधिपत्याखाली झाली. या संस्थेत जेम्स रँडी, मार्टीन गार्डनर, कार्ल सेगन, आयझॅक अ‍ॅसिमॉव्ह यांसारखे नामवंत बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञानवादाचा प्रसार करत राहिले. धार्मिक अंधश्रद्धांना आव्हान करू लागले. इकड,े ब्रिटनमध्ये रिचर्ड डॉकिन्स निरिश्वरवादाचा जोरदार प्रचार करू लागला.

भारतातील इंग्रजी सत्तेच्या काळात इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीत बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्वज्ञानाचा समावेश होता. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर आदी विचारवंतांनी जागतिक पातळीवरील धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञानाचा आणि विज्ञानाचा आशय लक्षात घेऊन महाराष्ट्रात धर्मसुधारणेची चळवळ सुरू केली. पेशवाईच्या काळातील अंधश्रद्धांच्या अतिरेकांना त्यांनी आव्हान दिले आणि धार्मिक गुलामगिरीतून बुद्धिप्रामाण्यवादी विचारसामर्थ्याने त्यांनी संघर्ष केला. हे केवळ महाराष्ट्रातच घडले नाही, तर भारताच्या विविध राज्यांतही हे घडत होते. तमिळनाडूमध्ये पेरियार, केरळमध्ये बी. प्रेमानंद, आंध्रमध्ये गोरा आणि पंजाबमधील तर्कशील सोसायटी या संघटना बुद्धिवादाची तेजस्वी परंपरा पुढे नेत होत्या. महाराष्ट्रात समाजसुधारकांची आणि संतांची बुद्धिवादी परंपरा पुढे नेण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकांना संघटित करत राहिले. बुद्धिवादाला विरोध असणार्‍या धार्मिक वेड्यांनी त्यांना मारले. विचारस्वातंत्र्यांचा पुरस्कार करणारे पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांनाही धर्मांधांनी संपवले. निष्कर्ष असा की, आजही धार्मिक श्रद्धेतून आलेला वेडेपणा आणि बुद्धिप्रामाण्यवादातून निर्माण होणारे नवजागरण यांच्यातील संघर्ष संपलेला नाही. युरोपीय राज्यात आणि अमेरिकेत धार्मिक अतिरेक संपलेला आहे; पण आशिया खंडात इस्लामी राष्ट्र आणि भारत यांच्यात धार्मिक अतिरेकचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. अशावेळी आपल्याकडील बुद्धिवादाची चळवळ अधिक तेज व्हायला हवी.

‘बुद्धिवाद्यांचा संघर्ष : सॉक्रेटिक ते दाभोलकर’ या विषयावरील मालिका अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात दरमहा क्रमश: प्रसिद्ध होत राहील.

लेखक संपर्क : 98226 79546


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]