सर्पमैत्रीण वनिता बोराडे

नरेंद्र लांजेवार -

महिलांचं विश्व ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतंच सीमित आहे, असं कालपर्यंत म्हटलं जायचे. परंतु आता प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहेत. ही खरं तर स्वागतार्ह बाब आहे. कालपर्यंत घर-संसाराची जबाबदारी सांभाळणार्‍या महिला चार भिंतीच्या बाहेर आत्मविश्वासाने वावरू लागल्या, तरी काही महिला साध्या झुरळाला सुद्धा भितात. घरामध्ये एखादी पाल दिसली, सरडा दिसला तरीसुद्धा किंचाळतात. त्यांना या सरपटणार्‍या प्राण्यांपासून भीती वाटते आणि घरात जर साप निघाला तर भल्याभल्यांची भंबेरी उडते. पण अशी एक महिला आहे, जिला साप दिसला की आनंद होतो आणि साहजिकच तिचे हात सापाच्या डोक्यावरून प्रेमाने फिरू लागतात… जणू सापाचे व तिचे जन्मो-जन्मीचे ऋणानुबंध आहेत की काय, असे बघणार्‍याला वाटते.

तसं बघितलं तर साप पकडण्याच्या क्षेत्रात पुरुषांचीच मक्तेदारी राहिली आहे. परंतु आता याही क्षेत्रात महिला आता मागे नाहीत, हे वनीता बोराडे यांनी महत्प्रयासाने सिध्द केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख या गावी 25 जुलै 1975 रोजी वनीता बोराडे यांचा जन्म झाला. त्यांच्या गावातील आदिवासी शेतकरी नदीकाठावर मासेमारी करत. जाळ्यामध्ये माशांसोबत कधी साप सुद्धा येत. मासे पकडणारे सापांना हातात धरून पाण्यामध्ये फेकून देत. मासे पकडणार्‍यांना सापांची भीती वाटत नाही, हे बघून वनिता बोराडे यांनी बालवयात त्यांच्याकडून एक-दोनदा हातामध्ये साप धरून पाहिला आणि त्यांची सापाबद्दलची भीती दूर झाली. वनिताताई यांच्या परिसरामध्ये, शेतात मोठ्या प्रमाणावर मांडव (मांडूळ) जातीचा साप निघायचा. हे साप दोन तोंडाचे साप म्हणून लोक ओळखत असत. या सापांबद्दल अनेक गैरसमज होते. बालवयातच वनिताताईंनी सापांच्या विविध जातींतील बराच अभ्यास केला. ‘ही लहान मुलगी बघा कशी साप पकडते,’ यावर गावोगावी लोक कुतुहलाने बोलू लागले. तिला गावोगावी साप पकडण्यासाठीचे निमंत्रण येऊ लागले. एक मुलगी साप पकडते म्हटल्यावर लोकांच्याही मनातील सापांबद्दलचे गैरसमज हळूहळू दूर होऊ लागले. दहावीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर वनिताताईंचा भास्कर डवंगे यांच्यासोबत विवाह झाला. विवाहानंतर तर या काही वर्षे नाशिकला राहिल्या. तेथे त्यांनी 8 मार्च 2000 ला सर्पसंस्था, नाशिक या नावाची संस्था काढली. पर्यावरणाचे अनेक उपक्रम त्यांनी नाशिकमध्ये राबविले. पुढे घरगुती कारणास्तव बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर गावात त्या परत आल्या. गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून वनिताताई ‘सर्पमित्र’ म्हणून काम करतात आज रोजी दोन मुले, एक मुलगी व त्यांचे पती भास्कर डवंगे हेसुद्धा या कामात त्यांना सतत मदत करतात. सर्पमित्र सौ. वनिता बोराडे यांनी आतापर्यंत पन्नास हजारांपेक्षा जास्त सापांना जीवदान दिले आहे. अनेक वर्षांपासून त्या सफाईदारपणे साप पकडतात. त्या दिसल्या म्हणजे साप जणू त्यांच्यासमोर अक्षरश: शरणागती पत्कारतो की काय, असं वाटतं. बालपणापासूनच साप पकडण्याचे एक वेगळे धाडस त्या करतात. भारतात सापांच्या अनेक जाती आहेत. पण त्यातल्या काही जाती विषारी आहेत; बाकी अनेक जाती विषारी नाहीत. वनिताताईंच्या मते महाराष्ट्रात 52 जातींचे साप आढळतात. त्यातील 12 जातीचे साप विषारी व चाळीस जातींचे साप हे बिनविषारी आहेत. घोणस, फुरसे, नाग आणि मण्यार हे जास्त विषारी आहेत.

विषारी साप ओळखायचा कसा आणि बिनविषारी ओळखायचा कसा, याबद्दलची जनजागृती करून वनिताताई पकडलेले साप वनविभागाच्या स्वाधीन करतात किंवा दूर जंगलामध्ये सोडून देतात. आतापर्यंत त्यांनी हजारोंच्या संख्येने सापांना जीवदान दिले आहे.

आजही साप दिसला की काही लोक त्याला मारून टाकतात. साप हा विषारीच प्राणी आहे, तो आपल्याला चावणारच, असे अनेकांना वाटत असते. सापांबद्दलच्या अंधश्रद्धा, गैरसमज दूर व्हाव्यात, यासाठी वनिताताई बोराडेंचा जनजागृती करण्यावर भर असतो. त्या साप पकडतात आणि ग्रामस्थांना सापांबद्दलची सविस्तर माहिती देऊन साप हा आपला मित्र आहे; तो आपला शत्रू नाही. साप शेतकर्‍यांचा मित्र आहे. शेतीमध्ये साप उंदीर, घुशी, पाली, सरडे, किडे खाण्यासाठी येता; परिणामी शेतीला त्याचा लाभ होतो. परंतु साप दिसला की अनेकांच्या मनामध्ये भीती उभी राहते आणि या भीतीपोटीच काही अतिउत्साही सापाला मारून टाकतात. सापांना मारू नये याविषयी बोराडेताई प्रबोधन करतात.

सापांचे संरक्षण, त्यांचे संवर्धन व सापांवर संशोधन करण्यासाठी, सापांविषयीचे गैरसमज दूर करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सापांचे महत्त्व लोकांना सांगणे, सर्पदंशबाधित व्यक्तींना प्रथमोपचार उपलब्ध करून देणे, प्रतिबंधात्मक औषधोपचारांचा सल्ला देण्याचेही काम वनिताताई करीत असतात. वनिताताईंच्या या सर्पप्रेमाची महती मेनका गांधी आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत पोचली आहे. त्यांच्या कार्याची दखल या दोन्ही मोठ्या व्यक्तींनी घेतलेली आहे; तसेच समाजसुधारक डॉ. प्रकाश आमटे यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. अनेक छोटे-मोठे पुरस्कार तथा मानसन्मान वनिताताईंना मिळाले आहेत. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सापांबद्दलचे प्रेम असंच जिवंत राहून पर्यावरणरक्षणासाठी आपल्या आयुष्य खर्ची व्हावं, असं वनिता यांना वाटत असते.

नागपंचमीला अनेक गारुडी ग्रामीण भागातील भोळ्या-भाबड्या गरीब जनतेला लुबाडतात. सापांबद्दल अंधश्रद्धा पसरतात व साप दूध पितो, सापाला दूध पाजा, त्याची पूजा करा, असे सांगून ही देवता आहे, ही तुमचे भले करेल. त्यासाठी दानधर्म करा, असं म्हणून अनेक लोक भीतीपोटी पैसे देतात. नागपंचमीला पूजा करण्यासाठी अनेक लोक साप पकडतात. काहींच्या कुंडलीत ‘नागबळी’ आहे, त्याची शांती करा सांगितलेले असते. मुळात साप हा मांसाहारी प्राणी आहे, हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. ते नागपंचमीला नागाची पूजा करताना त्याला दूध, लाह्या, फुटाणे, नारळ, पेढे देतात. गारूडी लोक सापांना उपाशी ठेवतात. सापांचे टाईम बेटाईम प्रदर्शन करताना त्यांना ईजा करतात. त्यांना बरण्यांमध्ये बंद करून ठेवतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर साप मरून जातात. कधी विषारी साप ओळखता न आल्यामुळे सुद्धा मोठे अपघात होतात.

अशा सापांबद्दल जनजागृती करण्याचा वसा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्म असणार्‍या या बुलडाणा जिल्ह्यात, एका सावित्रीच्या लेकीने हाती घेऊन सापाच्या बाबतीत प्रबोधनाची व संवर्धनाची जी मोहीम सुरू केली आहे, तिच्या धाडस आणि जिद्दीच्या कार्याला आपण सलाम केला पाहिजे. सापाबद्दलची जिज्ञासा समजून घेऊन, सापाबद्दलचे गैरसमज दूर करूया आणि शक्य असेल तर आपल्याही घरातील स्त्रीवर्गाला वनिता बोराडे यांच्यासारखी जिगरबाज ‘सर्पमित्र’ किंवा ‘सर्पदीदी’ बनण्यासाठी प्रोत्साहन देऊया.

वनिता बोराडे संपर्क – 97679 23271


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]