डॉ. प्रसन्न दाभोलकर -

सर वर्गात येऊन बसले आणि म्हणाले, “विचारा प्रश्न. रक्तगट हा गुंतागुंतीचा विषय आहे. भरपूर प्रश्न असतील.”
धीट मैत्रेयी उभे राहून म्हणाली, “सर रक्तगट हा विषय खूप कठीण आहे. आम्हाला नीट समजला नाही. त्यामुळे नेमके प्रश्नही सुचले नाहीत. वेगवेगळे रक्तगट असतात, त्यांच्यात रिअॅक्शन होते एवढंच आम्हाला ठाऊक आहे. तुम्हीच आज सुरुवात करता का?”
“तुझं बरोबर आहे.” सर म्हणाले. रक्ताचे अनेक गट आहेत. कोणत्या गटाचं रक्त कोणत्या गटाला चालेल याचे काटेकोर नियम आहेत. अयोग्य गटाचं रक्त चुकून दिलं गेल्यास रक्त घेणार्या माणसाला त्रास होऊ शकतो. त्याचा जीवही जाऊ शकतो. रक्ताच्या गटांची नावं तुम्ही ऐकलीत का?”
“माझ्या दादाचं ड्रायव्हिंग लायसन्स काढलं तेव्हा त्याचा रक्तगट तपासला होता. तो ‘AB+’ होता. हे ‘AB+’ म्हणजे काय?” मृदुलाने हळूच विचारले.
“रक्ताचे गट करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील एक महत्त्वाची पद्धत म्हणजे A, B, AB आणि O हे चार रक्तगट.” सरांनी सांगायला सुरुवात केली. “तसंच, Rh + आणि Rh – असेही रक्ताचे दोन गट पडतात. या दोन्ही पद्धती एकत्र करून A +, A – ते O + व O – असे एकूण आठ महत्त्वाचे रक्तगट पडतात.”
“सर, नीट समजलं नाही.” वर्गातून एकच आवाज उठला.
“बरं, परत थोडक्यात समजावून सांगतो,” सर म्हणाले.
सरांनी फळ्यावर A, B, AB आणि O अशी चार अक्षरे लिहिली. ते म्हणाले, “आपल्या रक्तातल्या पेशींवर O किंवा B हे पदार्थ असतात किंवा नसतात. ज्या माणसाच्या रक्तात A हा पदार्थ असतो त्याचा रक्तगट A, ज्याच्यात B आहे त्याचा B, ज्याच्यात A आणि B दोन्ही आहेत त्यांचा AB आणि ज्याच्यात A आणि B दोन्हीही नाहीत अशा माणसाचा रक्तगट O, म्हणजे शून्य.”
मग फळ्यावर प्रत्येक रक्तगटाखाली सरांनी +ve आणि -ve अशा खुणा केल्या आणि ते बोलू लागले. Rh हा असाच दुसरा पदार्थ आहे. तो ज्याच्या रक्तात असतो तो Rh +ve आणि त्याच्यात नाही तो Rh -ve. अशा प्रकारे ए, बी, एबी, आणि ओ या प्रत्येक रक्तगटाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन उपगट पडतात आणि एकूण आठ रक्तगट तयार होतात.”
“हे गुंतागुंतीचं दिसतंय. कुठल्या गटाला कुठलं रक्त चालतं? का फक्त आपल्याच गटाचं रक्त आपल्याला चालतं?” करणने कुतूहलाने विचारलं.
“हे लक्षात येणं कठीण आहेच. त्यासाठी तुम्हाला शरीरशास्त्रामधील अँटीजेन आणि अँटीबॉडीज हा भाग नीट शिकावा लागेल. प्रत्येक गटाला आपल्याच गटाचं रक्त देतात; परंतु AB +ve ला कोणत्याही गटाचं रक्त चालू शकतं आणि ओ -ve गटाचं रक्त कोणालाही देता येतं; पण असं वेगळ्या गटाचं रक्त अगदी तातडीच्या वेळीच देतात. इतर वेळी आपल्याच गटाचं रक्त माणसाला दिलं जातं.”
“पण एवढी काळजी का घ्यावी लागते. सगळ्यांचं रक्त लालच तर असतं.” शकीलने विचारलं.
“दुसर्या गटाचं रक्त आपल्या शरीरात आल्यास आपलं शरीर त्या रक्तामधील पेशी मारून टाकतं. त्यामुळं रिअॅक्शन येऊ शकते.” सरांनी परत समजावले.
“मग माणसाचं रक्त एकच आहे असं का म्हणतात. माणसांत तर रक्तामुळे गट पडतात.” असीममधील आडवेपणा जागा झाला.
“बरं झालं हा प्रश्न विचारलास.” आनंदून सर म्हणाले. “अनेकांच्या मनात हा गोंधळ असतो. अरे, माणसाचं रक्त एक म्हणजे माणूस म्हणून आपण सगळे एक. स्त्री-पुरुष, त्वचेचा रंग, उंची, शरीराची ठेवण आणि वंश यांत जगभर वेगळेपणा आढळून येतो; पण माणसांमध्ये कितीही शारीरिक वेगळेपणा असला तरी मानव म्हणजे ‘होमो सेपिअन्स’ ही एकच जाती आहे.”
आमच्या चेहर्यावरील गोंधळ सरांना दिसत होता. ते परत शांतपणे समजावून सांगू लागले, “असं बघा, रक्ताचे गट, आणि आपण माणसांमध्ये लिंग, जात, धर्म, प्रांत, देश, खंड यामुळे आपण जो अयोग्य भेदभाव करतो त्याचा एकमेकांशी संबंध नाही. फळ्यावर लिहिलेले रक्ताचे आठ गट जगभर सर्व ठिकाणच्या माणसांमध्ये आढळून येतात. आई-वडिलांचा रक्तगट हाच मुलाचा रक्तगट असेल असे नाही. रक्तगटांचा वापर फक्त माणसाला रक्त देण्याच्या वेळी करण्यात येतो. इतर कुठल्याही गोष्टीशी त्याचा संबंध नाही.”
“सर, रक्तगटाचा आणि लग्नाचा संबंध असतो?” गार्गी तावातवाने बोलू लागली. “माझी मावस बहीण शास्त्रात PHD करीत आहे. ती तिच्या आईला सांगत होती, ‘माझ्या लग्नाच्या वेळी मी रक्तगट नक्की बघणार’, म्हणजे काहीतरी संबंध असेल ना?”
किंचित हसून सर म्हणाले, “मलाही एकेकाळी असंच वाटायचं. आई आणि वडिलांचा रक्तगट एक नसेल तर मुलांच्या जन्माच्या वेळी अडचण येते ही गैरसमजूत अनेकदा आढळून येते. मातापित्याच्या रक्तगटाचा आणि मुले होण्याचा काही संबंध नाही.”
“पण सर, माझ्या वहिनीच्या गरोदरपणात तिचा आणि माझ्या दादाचा रक्तगट डॉक्टरनी तपासला होता. तो का?” गार्गी मागे हटायला तयार नव्हती.
“असं आहे गार्गी,” सर प्रेमाने समजावून सांगू लागले, “आई-वडिलांचा रक्तगट वेगवेगळा असेल तर मुलाचा रक्तगट आईपेक्षा वेगळा असण्याची शक्यता असते. अशावेळी काही मुलांना जन्मजात काविळीचा त्रास होऊ शकतो. परंतु हे टाळण्याचे काही मार्ग आहेत. अशी कवीळ बाळाला झाली तर त्यावर उपचार आहेत. ती खबरदारी घेण्यासाठी डॉक्टर दोघांचेही रक्तगट तपासतात. परंतु हा तपास लग्न ठरवायच्या वेळी नाही तर पहिल्या गरोदरपणात करायचा असतो. ही माहिती मी माझ्या डॉक्टर मित्रांशी बोलून मिळवली.”
गार्गीकडे बघत सर बोलू लागले, “गार्गीने विज्ञान शिकणार्या तिच्या बहिणीवर विश्वास ठेवला. आपले बहुसंख्य ज्ञान आपण मोठी माणसे, पाठ्यपुस्तके, इतर पुस्तके, वर्तमानपत्रे, गुगलवरील माहिती यांच्याकडून मिळवलेली असते. काही वेळा ते चूक असू शकते किंवा नवीन शोध लागल्यामुळे ते जुने व निरुपयोगी होते. त्यामुळे गरज पडल्यास आपले ज्ञान तपासून घेण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे.”
“सर रक्ताचे एवढेच प्रकार आहेत, का आणखीही प्रकार असतात?” अभ्यासू सुबुद्धीने विचारले.
“अनेक प्रकारचे रक्तगट आहेत. पण आपण बघितलेले आठ प्रकार हे दैनंदिन जीवनात महत्त्वाचे असतात. त्यामुळे रक्तगट म्हटलं की, साधारणपणे हेच आपल्या नजरेसमोर येतात. ड्रायव्हिंग लायसन्स काढताना आपला रक्तगट विचारतात. पण लायसन्सवर आपला रक्तगट लिहिलेला नसतो. ड्रायव्हिंग लायसन्सवर रक्तगट का असला पाहिजे? कोण सांगेल?” सरांनी प्रश्न केला.
“मी सांगतो सर.” विक्रांत बोलू लागला, “अपघात झालं की खूप रक्त जातं. तातडीनं रक्त द्यावं लागतं. त्यामुळं रक्तगट आधीच माहिती असणं सोयीचं असतं. त्यामुळं लायसन्सवर रक्तगट असला पाहिजे.”
“एकदम बरोबर.” कोणाला आणखी काही प्रश्न?” सरांनी विचारले.
“सर, रक्तगटाचा आणि एका माणसाचे किडनीसारखे अवयव दुसर्याला बसवतात त्याचा संबंध असतो का?” तेजस्विनीने विचारले.
“वा! छान प्रश्न.” सर खुशीत येऊन म्हणाले. “महत्त्वाचा संबंध असतो. अवयव देणारा आणि घेणारा यांचे रक्तगट एक असले तर तो अवयव नवीन शरीरात नीट काम करू शकतो. अर्थात यासाठी इतरही काही चाचण्या कराव्या लागतात आणि अशा ऑपरेशननंतर दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात.”
एवढे बोलून सर थांबले. वर्गाकडे बघत त्यांनी विचारले, “आज बरीच गहन चर्चा झाली. या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे कोण एकत्र करून सांगेल?”
“सर बरसचं डोक्यावरून गेलं.” अमेय म्हणाला.
कौतुकाने सर म्हणाले, “शाब्बास, खरं बोललास. हे सारं समजून घेणं कठीण आहे. एखाद्या रविवारी आपण रक्तपेढीला भेट देऊ या. तिथले डॉक्टर आपल्याला सर्व नीट समजावून सांगतील. तिथलं काम तुम्हाला प्रत्यक्ष बघता येईल. अनेक नवीन सुधारणा रक्तदानाच्या क्षेत्रात होत आहेत, त्याही ठाऊक होतील. चालेल?”
“नक्की सर!” सारा वर्ग एका सुरात उद्गारला.
डॉ. प्रसन्न दाभोलकर