अनिल चव्हाण -
सोनू सारखी रडू लागली. मम्मीने थोपटून बघितलं, डॉक्टरांकडून औषध आणलं. तेवढ्यापुरतं तासभर शांत बसली; पण पुन्हा तिचे रडणे चालूच. पप्पांनी खांद्यावर घेऊन घरातून दोन फेर्या मारल्या… पण रडणे काही थांबले नाही. तिचा आवाज ऐकून पलीकडच्या सखुबाई घरात आल्या.
“काय ग मोने, पोरगी सारखी रडती का?”
“अहो काय सांगू आत्याबाई! काल लग्नाला जाऊन आले; तेव्हापासून सोनी सारखी रडती आहे. रात्री डॉक्टरकडून औषध आणलं; पण थांबली नाही; सकाळपासून पुन्हा रडायला लागलीय. काय करायचं? काय बी कळना!”
“त्यात काय करायचं! पोरगी तरतरीत आहे, त्यातून नटवलीस. तवाच मला वाटलं होतं काहीतरी गडबड होणार. आणि तसंच झालं!”
“सगळ्यांची नजर काय सारखी असते काय? कुणाची तरी तिला नजर लागली.”
“मीठ मिरची ओवाळून टाक, आता थांबल, तिची किरकिर!”
एवढे बोलून आत्याबाई काय गप बसल्या नाहीत, त्या स्वतःच उठल्या, कोपर्यातल्या पिशवीतून वाळलेल्या मिरच्या आणि बरणीतलं चिमूटभर मीठ मुठीत घेतले आणि मूठ सोनीच्या अंगावरून पाच वेळा ओवाळली, तशीच पेटत्या चुलीत मोकळी केली. मीठ तडतड वाजले आणि मिरच्यांची खाट सगळ्यांच्या नाकात शिरली. प्रत्येक जण शिंकू लागला, खोकू लागला. तेव्हा म्हणाल्या ,”पोरीला नजरच लागली होती! आता थांबल रडायची!”
हे सगळं विचित्र नजरेने सोनी पाहत होती, तिला पण खोकला आला. आत्याबाई तिला समजावू लागली; फिरवू लागली आणि खरेच पाच दहा मिनिटात तिचे रडे थांबले.
“हे बघ मोनी, मिरची नसली तर, मोहरी ओवाळून टाकली तरी चालती; आणि बाहेर जाताना पोराला काजळाचं तीट लावायला विसरू नकोस.”
मिरचीची खाट आसपासच्या घरात पसरली तसं समोरच्या आजी आणि शेजारच्या काकू बाहेर आल्या. त्यांनी दीर्घ श्वास घेत कानोसा घेतला. त्यांच्या लक्षात आलं ही खाट सोनीच्या घरातून येत आहे.
“अग मोने, भाजी करपली वाटतं, कसली खाट उठली आहे?” असे म्हणत, खोकत खोकतच त्या घरात शिरल्या.
“आत्याबाई हाय होय! म्हणजे कोणाची दृष्ट काढली वाटतं!” त्यांचा अंदाज बरोबर ठरला.
“मिरच्या कशाला घेतेस आत्याबाई? त्यापेक्षा नुसत्या मिठानं दृष्ट निघते! दृष्ट काढायची आणि मीठ घागरीत सोडायचं!” आजी म्हणाली.
काकूनं तिला दुजोरा दिला. “होय आम्ही बी मिठानेच काढतो बरं! आमच्याकडे चूल कुठे आहे? गॅसवर काय मिरची टाकता येत नाही!”
त्यांनी अडचणही सांगितली.
पुढे म्हणाली, “आमच्या माहेरात असलं काही नाही बघा. आम्ही पोर लहान असतानाच चिट्टी बांधून आणतोय.”
” चिठ्ठी कसली हो काकू?” मोनीने विचारले.
“आमच्या माहेरात भगताकडे गेलं, की तो चिट्टी देतोय. शिवाय ती तावीजात घालून बी देतोय. तावीज गळ्यात बांधला की, पोरगं रडायचं थांबलं पाहिजे.
एकेकाची नजर लय वाईट असते. नुसतं म्हटलं ‘ही साडी चांगली दिसते,’ की दुसर्या दिवशी साडीला खोबारा लागलेला आहेच.”
“गेल्या वर्षी शाम्यानं घर बांधलं! चांगलं रंगीवलं; पण कुणाची नजर लागली, आणि एक महिन्याच्या आत भिंत चिरली.” आत्याबाई म्हणाल्या. “तेवढ्यासाठी काळी बाहुली नाहीतर कोहळा बांधतात. वाईट शक्ती, काळी जादू, वाईट नजर, ओढून घेऊन कोहळा वर्षाच्या आत कुजतो.”
“होते बरं असं! आमच्या माहेरात दामू शेठचा वाढलेला धंदा अचानक खाली आला, सगळी म्हणायला लागली, त्याच्या धंद्याला कुणाची तरी दृष्ट लागली.” काकूचे माहेरचे पुराण सुरू झाले.
संस्कृतीचा फाजील अभिमान असणारे भक्त जसे, “जगात लावला जाणारा प्रत्येक शोध, पूर्वीच आम्ही लावलेला आहे;” असे सांगत असतात. तसं जगातल्या प्रत्येक घटनेची सुरुवात आपल्या माहेरात झाली, त्याचे पुरावे सांगायची खोड काकूंना आहे.
“कुस्ती जिंकून आल्यावर बाळू पैलवान उघड्या अंगानं गावभर फिरला, तेव्हा त्याला नजर लागली आणि ढाळ लागले; रामू दुधात अंड फेसून सर्वांसमोर प्यायचा, तेव्हा त्याच्या पोटात दुखू लागलं; सकाळ संध्याकाळ दोन लिटर दूध देणारी गंगुबाईची म्हस, नजर लागल्यावर कडू दूध द्यायला लागली; गणप्याच्या गाडीचं कौतुक झालं, आणि दुसर्या दिवशी त्याला अपघात झाला; याचे कारण नजर लागली होती” अशी अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली.
मध्येच त्यांनी सोनीला उचललं आणि “काय ग बाई कुणाची नजर लागली असेल!” अशी हळहळ व्यक्त केली, पण मगासपासून शांत असलेली सोनी पुन्हा हात पाय झाडून रडू लागली.
एवढ्यात दारातून आवाज आला, “का रडत्या ओ पोरगी?”
मोनीने पाहिलं आणि म्हणाली, “बरं झालं शीस्टरीन बाई, तुम्ही देवावानी आलासा बघा.”
“अगं त्यास्नी आत तरी बलिव की.”
“अहो सिस्टरीनबाई, आत या की!”
सर्वांचा आग्रह झाल्यामुळे आशाताई घरात आल्या. आशाताई म्हणजे आशा कर्मचारी! त्यांना गावात मोठा मान! कोणी सिस्टर म्हणते, कोणी सिस्टरइन बाई, कोणी मॅडम, तर कोणी आशाताई!
“बघा हो! पोरगी कालपासून रडायला लागलीया. चार वेळा दृष्ट काढली तरी काय उपयोग नाही!”
रडणार्या सोनीला त्यांनी आशाताईंच्या हवाली केले.
आशाताईंनी अंगावरून हात फिरवला. त्यांच्या लक्षात आले झबल्याला ठरावीक ठिकाणी हात लागला की, सोनीचे रडे वाढते. त्यांनी झबले काढले आणि पाहिले, पाठीवरती काही भाग लालसर झाला होता. “उगी उगी” करून त्यांनी सोनीचे रडे थांबवले आणि म्हणाली ” हे झबले घालू नका. त्याचे बटन पाठीला रुतते आहे.”
“टोचत असेल, थंडी वाजत असेल, उकडत असेल, पोट दुखत असेल, भूक तहान लागली असेल, कपडे ओले झाले असतील, अशा वेळी पोरं रडतात. आपला त्रास तुमच्या कानावर घालायला त्यांच्याकडे एवढा एकच मार्ग असतो. त्याची कारणे समजून घ्या. मीठ मिरचीने या अडचणी दूर होऊ शकत नाहीत!” एका दमात त्यांनी दृष्ट लागण्यावर बोळा फिरवला.
मोनीने सोनीला आपल्याकडे घेतले, पोटाशी धरले, तिला आपली चूक कळून आली. बटन नसलेले नाडीचे झबले अंगात घातले आणि म्हणाली,
“म्हणजे दृष्ट लागत नाही म्हणताय?”
शेजारची वीरा हे सर्व ऐकत होती. शाळेत नुकतेच डोळ्यांच्या रचनेविषयी शिकवले होते. ती म्हणाली, “डोळ्यांच्या बाहुलीमधून प्रकाशकिरण डोळ्यात जातात, पडद्यावर पडतात; त्यामुळे आपल्याला वस्तू दिसतात. पडद्यावरच्या पेशी ज्ञानतंतू मार्गे माहिती मेंदूला पाठवतात. मेंदूमधल्या पेशी त्या प्रकाशाचा अर्थ लावू शकतात!
डोळ्यामध्ये बाहुलीतून प्रकाशकिरण आत घेण्याची सोय आहे; पण प्रकाशकिरण किंवा आणखी कोणते किरण तयार करून ते बाहेर पाठवण्याची सोय डोळ्यात नसते. हाताने एखाद्याला दगड मारता येतो, दगडाने जखम झाल्याची दाखवता येते; तसे डोळ्यातून बाहेर टाकण्यासाठी कोणतेच किरण नसल्यामुळे, अशी काही इजा, नजर लागल्याने होणे शक्य नाही.”
“राफेल का काय ती इमान इकत घ्यायचे आधी, संरक्षण मंत्र्यांनी फ्रान्समध्ये जाऊन तेच्या चाकाखाली लिंबू ठेवला होता! माहिती हाय नवं! कुणाची दृष्ट लागाय नको म्हणूनच हे केलं होतं!” सखुबाई म्हणाली. “म्हणजे तुला काय म्हणायचं हाय? कडपासन चालू हाय हे काय खोटं हाय?” काकूंना राग आला.
“आणि जगात सगळीकडे असंच आहे. दृष्ट काढण्याची पद्धत सर्वत्र आहे. काही भागात निळ्या डोळ्याचं चित्र सोबत ठेवतात.”
“मावशी तसं नाही. पूर्वी एवढे शोध लागले नव्हते. बर्याचशा आजाराची कारणे माहिती नव्हती, घटना का घडतात कळत नव्हतं, तेव्हा लोकांनी अंदाज केले. त्यांचं काही चूक नाही; पण आता शोध लागल्यावर आपण बदलायला पाहिजे!”
“असा नजर लावणारा, दृष्ट लावणारा, कोणी ताकतवान असेल, तर त्याच्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २५ लाखाचे बक्षीस ठेवले. अजूनपर्यंत ते घ्यायला कुणी आलेलं नाही.” वीराने पुढची माहिती दिली.
” आणि मोठा माणूस सांगतोय म्हणजे ते खरं असलं पाहिजे असं काही नाही. आपण डोकं वापरून तपासू शकतो!” स्वराने भर घातली.
“आता बसा सगळेच चहा टाकते!” मोनीने सोनीला वीराकडे दिले आणि चुलीवर चहाचे पातेले ठेवले.