खबर लहरिया – ग्रामीण भारतासाठी महिलांनी चालविलेले वर्तमानपत्र

कविता बुंदेलखंडी -

पुरुषी, शहरी, उच्चजातीय आणि उच्चवर्गीय जाळ्यात अडकलेली सध्याची बहुतांश माध्यमे ग्रामीण भारत, महिला, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या मूलभूत प्रश्नांवर पोटतिडकीने लिहिताना दिसणे, त्यांचे प्रश्न उचलणे व त्यावरून व्यवस्थेला प्रश्न विचारताना दिसणे सध्या विरळाच. जेव्हा प्रस्थापित माध्यमे ही भूमिका घेत नाहीत, तेव्हा पर्यायी माध्यमे तयार होतात, प्रश्न विचारतात, अडचणींवर मात करून नुसते टिकून राहत नाहीत तर वाढतात. बुंदेलखंड सारख्या तुलनेने मागास भागात जन्माला आलेले ‘खबर लहरीया’ हे वृत्तपत्र म्हणजे त्याचेच एक उदाहरण. पुरुषप्रधान माध्यमांमध्ये केवळ स्त्रियांनी चालवलेले, ग्रामीण प्रश्नांना वाहिलेले आणि वृत्तपत्रीय स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जाहिराती न स्वीकारणार्‍या यावृत्तपत्राच्या संपादक आहेत कविता बुंदेलखंडी. त्यांच्या या प्रवासाबद्दल, त्यांच्या समोर असलेल्या आव्हानाबद्दल आणि त्यांनी त्यातून काढलेल्या मार्गावर त्यांच्याशी संवाद साधला आहे.

बुंदेलखंडसारख्या मागास समजल्या जाणार्‍या भागात ‘खबर लहरीया’ या केवळ महिलांकडून चालवल्या जाणार्‍या वर्तमानपत्राशी आपण कधीपासून जोडल्या गेलात?

मी 2002 पासून ‘खबर लहरीया’सोबत जोडले गेले आहे आणि सध्या तेथे मी संपादक म्हणून काम बघते. बुंदेलखंडमधील चित्रकूटमध्ये ‘खबर लहरीया’ची सुरुवात आम्ही केली. उत्तर प्रदेश मधला हा जिल्हा आहे. इथे या कामाची सुरुवात करण्यामागे एक महत्त्वाचा उद्देश होता, तो म्हणजे तेथील ग्रामीण भागातील जनतेला कोणतेही वर्तमानपत्र वाचायला मिळत नव्हते. जगात काय चालू आहे, आपले हक्क आणि अधिकार कोणते, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोेचत नव्हती. तेवढेच नव्हे, तर त्यांच्या भागात काय चालू आहे, हे प्रस्थापित वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल बाहेर दाखवत नव्हते. आमची भूमिका स्पष्ट होती की, लोकशाहीमध्ये राहणार्‍या या लोकांना देखील बातम्या वाचणे किंवा त्यांच्या बातम्या बाहेरच्या जगाला सांगणे याचा पूर्ण अधिकार आहे. गाव, ग्रामीण जनता आणि तिथले प्रश्न या गोष्टी बाहेर येणे अत्यंत गरजेचे आहे. या भूमिकेतून ‘खबर लहरीया’ची सुरुवात झाली.

आपले वैशिष्ट्य म्हणजे हे वर्तमानपत्र पूर्णपणे महिलांमार्फत चालवले जाते. हा निर्णय का घेतला?

आमची भूमिका तुम्ही ऐकलीत; पण त्याच वेळेस भारतात बातम्यांचे जग हे महिलांचे म्हणून मानले जात नाही. पुरुषांचे पूर्ण वर्चस्व त्यावर आहे. त्यातही शहरी, उच्चजातीय, खूप शिकलेले आणि पूर्णपणे धंदेवाईक पुरुष या क्षेत्रावर वर्चस्व ठेवून आहेत. समाजात महिलांना मुळातच कमजोर मानले जाते; म्हणजे महिलांनी शिक्षिका व्हावे किंवा पापड-लोणच्याचा व्यवसाय करावा किंवा सकाळी 10 ते 5 नोकरी करून संध्याकाळी आपल्या घरी जाऊन कुटुंबाची काळजी घ्यावी. आम्हाला हा दृष्टिकोन तोडायचा होता. या भावनेतून आम्ही येथील महिलांना एकत्र आणले. या महिला ग्रामीण भागातील आहेत, वंचित समाजघटकातील म्हणजे दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आहेत. सध्या कोणत्याही नोकरीसाठी डिग्रीची मागणी केली जाते. पण जेव्हा आम्ही काम सुरू केले, तेव्हा आम्हाला डिग्री असलेल्या किंवा पत्रकारितेचा अभ्यास केलेल्या महिला मिळाल्या नाहीत. ते सोडा, आम्हाला आठवी पास महिला देखील मिळत नव्हत्या. गावोगावी फिरून आम्ही महिलांना भेटलो. त्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले. महिलांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आम्हाला एक कळले की, भले त्या शिकलेल्या नसतील; पण त्यांना उत्कृष्ट बोलता येते, विषयाची समज आहे, त्यांच्या आजूबाजूच्या परिसराची सखोल माहिती आहे. आम्हाला विश्वास वाटला की, महिला नक्कीच हे काम करू शकतील आणि तसेच झाले देखील. आमच्या महिला आणतात त्या मातीशी जोडलेल्या बातम्या असतात, कोणतीही बाजू न घेता पत्रकारिता करतात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुद्द्यांशी निगडित बातम्या असतात. असे मुद्दे जे मुख्य प्रवाहातील मीडियाच्या दृष्टीने अजिबात महत्त्वाचे नाहीत.

लोकांचा प्रतिसाद कसा होता?

जेव्हा 2002 मध्ये पेपर सुरू केला, तेव्हा तो केवळ दोन पानांचा होता. येथील बुंदेली या स्थानिक भाषेत. अगदी सोप्या शब्दात आम्ही लिहायचो. त्यावेळेस फॉन्ट आकारदेखील मोठा होता. यामागे कारण एकच होते, ते म्हणजे नवसाक्षर लोकांना देखील सहजतेने वाचता यावे. जेव्हा लोकांच्या हातात पेपर गेला, तेव्हा लोकांना त्यांच्या गावातील बातम्या वाचून खूपच आनंद झाला. जसजसा हा पेपर बाजारात पसरू लागला, तेव्हा देशी पेपर म्हणून त्याचे स्वागत झाले. आपल्या समस्यांना कुठेतरी वाचा फुटत आहे, अशी लोकांची भावना झाली. मागणी वाढू लागल्यावर आम्ही पानाची संख्या चार केली. शेजारच्या बांदा जिल्ह्यातील लोकांनी देखील मागणी केली की, आमची स्थानिक आवृत्ती देखील असावी. काही वर्षांतच आमच्या चित्रकूट, बांदा, महुआ आणि उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या बुंदेलखंडमधील जे भाग आहेत, तिथे सर्वत्र आम्ही काम करू लागलो. आज आमची वेबसाईट आहे, यू ट्यूब चॅनल आहे. लोकांनी जरूर त्याला भेट द्यावी.

जितक्या सहज आपण हा प्रवास सांगत आहात तितका सोपा होता का?

बिलकुल नाही. अनेक अडथळे आले, धमक्या आल्या. सर्वांत पहिला आक्षेप घेतला गेला की, महिला पत्रकार कशा काय होऊ शकतील, कारण हे काही त्यांचे क्षेत्र नाही. आम्ही ज्या महिलांना निवडले होते, त्यांना त्यांच्याच माहेर किंवा सासर असलेल्या गावात रिपोर्टिंग करायचे होते. त्यात जर महिला दलित किंवा मुस्लिम असेल तर आक्षेप होते की, या वर्गातील महिला प्रश्न कशा विचारणार किंवा सरकारी गोष्टीवर कसे काय बोलणार? आम्हाला सांगितले की, महिला काही पत्रकार होऊ शकणार नाहीत आणि आम्ही सांगितले की, आम्ही ते करून दाखवूच. सुरुवातीला आमच्याशी लोक बोलायचेच नाहीत, परत पाठवून द्यायचे. अधिकार्‍यांना जेव्हा प्रश्न विचारायचो, तेव्हा तेदेखील महिला कशा काय प्रश्न विचारू शकतात, असे बोलायचे व टाळायचे. कधी-कधी तर सांगायचे की, ‘संध्याकाळी घरी या, मग उत्तर देतो.’ आम्ही पण टिकून राहिलो. काहीवेळा तर खरोखर संध्याकाळी घरी जाऊन अधिकार्‍यांची मुलाखत घेऊन आलो. अशा ठिकाणी जाऊन बातम्या केल्या की, तिथे अधिकारी देखील कधी जायचा नाही. अनेक घटनांचा भांडाफोड केला. त्यावर जेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केले, तेव्हा अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी गेले आणि त्यांना त्या बातम्या खर्‍या असल्याचे दिसून आले.

हा विरोध आणि दबाव राजकीय होता की सामाजिक?

सुरुवातीचा दबाव सामाजिक होता. यात गावातील उच्चजातीय लोक होते. अधिकारी सुरुवातीला कोणत्याही महिलेच्या कामाकडे ज्याप्रकारे उदासीनतेने बघतात, तसेच आम्हाला वागवायचे. पण जेव्हा त्यांच्या हातात पेपर गेला, दर्जा लक्षात आला, तेव्हा मग ते व्यवस्थित वागू लागले. त्यात देखील असे झाले की, लोकांना असे वाटायचे कीआम्ही महिला आहोत म्हणजे आम्ही फक्त महिलांच्या प्रश्नाबद्दल लिहिणार. आम्ही सांगायचो की, आम्ही पत्रकार आहोत आणि त्यामुळे सर्व गोष्टींवर लिहिणार. मग ती एखाद्या गुन्ह्याची बातमी असो वा निवडणुकीची, प्रत्येक क्षेत्र आम्ही कव्हर करायचो आणि आजही करतो. अर्थात, जसजसा पेपर लोकांच्या हातात जाऊ लागला, तेव्हाच लोकांची याबाबत खात्री पटली.

नफा समोर ठेवून चालणारी मोठमोठी वर्तमानपत्रं आणि ‘खबर लहरीया’सारखे तुलनेने खूपच छोटे माध्यम यातील फरक आपण कसा बघता?

मुख्य प्रवाहातील पेपर व आमचा पेपर यातील मला जाणवणारा सर्वांत मोठा फरक म्हणजे त्यांना मिळणार्‍या मोठमोठ्या जाहिराती. ते झाल्यावर उरलेल्या जागेत कुठल्याशा राजकीय पक्षाची सभा, शेअर बाजार, शहरातील एखादा गुन्हा अशाच बातम्या असतात. ग्रामीण भागातील बातम्यांना तेथे अजिबात जागा मिळत नाही. कारण सर्व मोठी वर्तमानपत्रे सर्वप्रथम नफ्याचा विचार करतात. नफा मिळाल्यावर जागा उरली तर बातम्या दिसतात. आमच्याकडे आम्ही जाहिराती छापत नाही. आमचा विचार यामागे असा होता की, जाहिराती घेतल्या की तुम्ही विकले जाता. स्थानिक पातळीवर राजकीय नेत्यांच्या जाहिराती छापल्या जातात, मग तुमच्यावर त्यांच्या बाजूने बातम्या छापण्याचा दबाव येतो. अनेक आमदार व खासदार आम्हाला सांगायचे की, आम्ही तुमचा महिन्याचा पेपर घेऊ; पण बातम्या आमच्या बाजूने छापा. आम्हाला हे करायचे नव्हते. मग आम्ही कोणता सण आला तर काही वैयक्तिक शुभेच्छा एका पानावर छापायचो. जाहिरातींच्याबद्दल आम्ही धोरण ठरवले आहे की, जर त्या आम्ही घेणार असू तर ‘खबर लहरीया’च्या स्त्रीवादी भूमिकेला अनुसरूनच त्या घेऊ. म्हणजे सिंदूर, बंदुका, दारू असल्या गोष्टींची जाहिरात आम्ही घेणार नाही. आमचा खर्च चालवण्यासाठी आम्ही इतर मार्ग शोधले आहेत. आमच्या अंकाची सुरुवातीची किंमत दोन रुपये होती. नंतर पाच केली. त्यातून छपाईचा खर्च निघतो. पगारासाठी आम्ही लोकांकडून मिळणार्‍या देणग्या व इतर फंडिंगचा वापर करतो.

जातिव्यवस्था आणि अंधश्रद्धा यांचा प्रचंड पगडा असलेल्या अशा भागात तुम्ही काम करता, जेथे शिक्षणाचा प्रसार अत्यंत कमी झाला आहे. अशा भागात एवढे आधुनिक व पुरोगामी विचार घेऊन काम करणे तुम्हाला अवघड जात नाही का?

या जगात अशक्य असे काही नाही. एकदा का ठरवलं की, करायचं तर ते करायचंच, असं मी ठरवलं होतं. जेव्हा ‘खबर लहरीया’शी मी जोडले गेले; म्हणजे 2002 मध्ये सुरुवात केल्यावर आज 2020 मध्ये आम्ही महिला ‘डिजिटल एडिशन’ देखील प्रकाशित करत आहोत. दळणवळणाची साधने नसताना 10-10 किलोमीटर पायी जाऊन आम्ही पत्रकारिता केली. तेव्हा परिस्थिती अशी होती की, अख्खा गाव आम्हाला बघायला लोटायचा. कारण तिथे अधिकारी सोडा; साधा पत्रकार देखील कधी पोचला नव्हता. आम्ही विरोधी पक्षाची नाही तर सत्याची बातमी दाखवायची, हे धोरण पहिल्यापासून ठेवल्याने बातमी करू नये, म्हणून बराच दबाव देखील यायचा. आता तर डिजिटल जमाना असल्याने धमक्या मिळण्याची पद्धत बदलली आहे, एवढेच.

पत्रकारितेचे मूळ आहे जमिनीवर उतरून बातमी लिहिणे, जे तुम्ही करता; पण सध्याच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ संदेश आणि ‘फेक न्यूज’च्या जमान्यात तुम्हाला पत्रकारिता करताना याचा त्रास झाला आहे का?

असे खूपच प्रकार घडतात. मध्यंतरी आमच्या भागात एक व्हिडिओ पसरला, ज्यात एक पांढरी साडी घातलेली महिला चालत होती व ती चुडैल आहे, असे म्हटले गेले. बुंदेलखंड हा देशातला कदाचित सर्वांत जास्त अंधश्रध्दांवर विश्वास ठेवणारा भाग असावा. हा व्हिडिओ इतका पसरला की, घबराटीचे वातावरण तयार झाले. अगदी मीडियामध्ये काम करणार्‍या लोकांकडून देखील तो पसरवला गेला; पण कोणीही त्याच्याशी मुळाशी जाऊन त्यामागचे सत्य खोदून काढण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही केला व त्यातला फोलपणा सगळ्यांसमोर आणला. असे अनेक मेसेज आणि व्हिडिओ आमच्याकडे येत असतात, ज्याला आम्ही आमच्या ताकदीनुसार तोंड द्यायचा प्रयत्न करतो.

तुम्ही उत्तर प्रदेशमधील सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून असणार्‍या एक पत्रकार आहात. अकलाखच्या ‘लिंचिंग’पासून ते हाथरसच्या बलात्काराच्या घटनेपर्यंत समाजाचा नैतिक र्‍हास आपण बघत आहोत. माध्यमांची यातील भूमिका आपण कशा प्रकारे बघता?

माध्यमांनी ज्या प्रकारे या घटना कव्हर केल्या, त्या शैलीमध्ये संवेदनशीलता कमी आणि सनसनी अधिक होती. याचा खूप मोठा प्रभाव पडतो. मी स्वतः हाथरसमध्ये होते. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मीडिया होता; अगदी ‘पिपली लाईव्ह’सारखा. मी माध्यमे तिथे का गेले, याच्या विरोधात नाही, तर मीडिया कसा वागतो, त्यावर बोलत आहे; म्हणजे आपण इतके संवेदनाहीन का होतो की, ज्यामुळे समोरच्याचे दुःखच आपण विसरून जातो. पीडितेचे कुटुंब विनवण्या करीत होते की, ते आता बोलू शकत नाहीत, ते धड जेवले देखील नाहीत आणि तरीदेखील ज्या प्रकारे त्यांना कॅमेर्‍यासमोर आणण्यासाठी अगदी एकमेकांच्या अंगावर माध्यमकर्मी पडत होते, जबरदस्ती करत होते, त्या कुटुंबासमोर स्वतः जेवत होते, चहा पित होते. मला हे कधीच पटलं नाही. सध्याच्या काळात पत्रकारांची संख्या नक्कीच वाढली आहे. मात्र ज्या प्रमाणात जमिनीवर जाऊन पत्रकारिता झाली पाहिजे, ती अजूनही होत नाहीये. मोठमोठ्या वाहिन्यांवर लोक अजूनही विश्वास ठेवतात. मात्र ज्या प्रकारची आर्थिक परिस्थिती देशात आली आहे, बेरोजगारी वाढत आहे, ग्रामीण प्रश्न आ वासून उभे आहेत, महिलांचे प्रश्न आहेत; पण कोणीही थेट त्यांच्याकडे जाऊन त्यांना काही विचारतच नाही, त्यावर रिपोर्ट लिहीतच नाही. असं बघा की, जेव्हापासून बुंदेलखंड मध्ये ट्रेन बंद झाल्या आहेत, तेव्हापासून इथले आदिवासी जे इथून लाकूड न्यायचे आणि ते विकून 100-200 रुपये मिळवायचे, त्यांची कमाईच बंद झाली आहे आणि आज तो अक्षरश: भुकेने तडफडत आहे; पण मुख्य प्रवाहातील कोणतीही माध्यमे हे दाखवत नाहीयेत.

मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या न्यूजरूममध्ये असलेले उच्चवर्णीय व उच्चवर्गीय वर्चस्व, समाजातील खालच्या थरातील वस्तुस्थिती समोर आणण्यापासून रोखते, असे तुम्हाला वाटते का?

हे तर स्पष्ट आहे की, प्रत्येक न्यूजरूममधून त्यांच्या हिताच्या बातम्या दाखवल्या जातात. सध्या तर बहुतांश बातम्या सरकारच्या बाजूच्या असतात. तुमच्या माध्यमात कोण काम करते, त्यांची पार्श्वभूमी काय, याचा मोठा परिणाम ते दाखवत असलेल्या बातम्यांवर पडतो. मी लगेच ‘विकाऊ मीडिया’ असा शब्द नाही वापरणार; पण हे तर सत्यच आहे की, ते काही विशिष्ट बातम्याच दाखवतात. आता आमच्यासारख्या ग्रामीण प्रश्न मांडणार्‍या माध्यमाला हे मोठे लोक बघत असतीलच ना? नसतील तर त्यांनी बघावे. हे प्रश्न उचलावेत. मीडिया परिस्थिती बदलवू शकतो, सत्ता बदलवू शकतो. त्यांना जर केवळ व्यवसायच करायचा आहे, तर माध्यमांमध्ये कशाला यावे? इतर अनेक व्यवसाय आहेत, ते करावेत. जर आमच्यासारखे अजून एक-दोन जरी तयार झाले तरी खूप मोठा बदल घडू शकतो.

काय केले पाहिजे एक वैविध्यपूर्ण आणि लोकशाही माध्यम उभारण्यासाठी?

सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे लोक कोण आहेत; जसे – लोक तुम्ही निवडाल तसे तुमचे काम असेल. सर्वच उच्चजातीय, शहरी, श्रीमंत लोक तुमच्याकडे असतील तर कदाचित दलितांच्या वस्तीत जाऊन बातम्या करणे, त्या रस्त्याने जाणे त्यांना जमणार नाही. तेथील बातम्या त्यांना समजणार नाहीत. तिथला दुर्गंध त्यांना जाणवणार नाही. तुम्हाला समाजातील प्रत्येक वर्गाला तुमच्या न्यूज रूममध्ये सामील करून घ्यावे लागेल. जेव्हा बातम्यांचे प्लॅनिंग असते, त्यात त्यांना सामील करून घेतलेच पाहिजे. हे ठरवले पाहिजे की, पाच राजकीय बातम्या केल्या की, पाच ग्रामीण किंवा जमिनीवरच्या बातम्या आल्याचं पाहिजेत. मी कोण्या धर्माच्या विरोधात नाही; पण अकलाख सारख्या माणसाला जमाव धर्माचे नाव घेऊन मारून टाकतो आणि मीडिया काही बोलत नाही, तर आपण नक्की चाललोय कुठे, याचा विचार करावाच लागणार ना? माध्यमांमध्ये सर्वच ठाकूर आणि पंडित असतील तर इच्छा भले असली तरी ते इतरांच्या दबावामुळे अशा प्रवृत्तीच्या विरोधात बोलू शकतील का? त्याचवेळेस मी माझ्या एखाद्या शो मध्ये जेव्हा ‘करवा चौथ’च्या विरोधात बोलते किंवा ‘राम मंदिर’ नको असे बोलते, तेव्हा माझ्या विरोधात मोठा जमाव चालून येतो, शिव्या देतात. भले मला वैयक्तिक काही फरक पडत नाही त्याने; पण मीडियाने निर्भीड होऊन बोलणे, निष्पक्ष होऊन बोलणे हे का गरजेचे आहे, हे त्यातून समजून येते.

हे काम करणे सध्या अवघड होत चालले असतानाच तुम्ही बुंदेलखंडसारख्या तुलनेने मागास भागात हे जोमाने काम करत आहात. तुम्ही काही अनुभव सांगू शकता का तुम्हाला झालेल्या विरोधाचे?

माझ्या टीममध्ये जवळपास सर्वच महिला संघर्ष करून इथवर पोचल्या आहेत. तो संघर्ष त्यांच्या परिवाराशी आहे, समाजाशी आहे. त्या लढल्या आहेत. पुरुषांच्या जगात पत्रकार म्हणून त्यांच्यासोबत ऊठबस करायची आहे, गप्पा मारायच्या आहेत, चहा प्यायचा आहे, प्रश्न विचारायचे आहेत आणि ठराविक वेळेचे बंधन या नोकरीला नाही. अशा वेळेस महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणे, ही सर्वांत सोपी गोष्ट आहे. हे सर्वांनाच सहन करावे लागले आहे. मी स्वतः यातून गेले आहे. माझे पूर्ण कुटुंब अशिक्षित होते. मोठी झाल्यावर मी शिकले. तेव्हा देखील मला त्रास झाला. मला तर पत्रकार म्हणजे काय हे देखील माहीत नव्हते. यातूनच मी शिकत गेले. कदाचित दुसर्‍या मुलाखतीत मी ते सगळं सांगेन; पण आता एवढेच सांगेन की, माझ्याप्रमाणेच जवळपास प्रत्येक महिला संघर्ष करून येथे आली आहे. आमच्याकडे घुंघट प्रथा आहे, महिलांना पुरुषांसमोर बोलू दिले जात नाही, एकटे फिरू दिले जात नाही. या परिस्थितीत महिला काम करतात. सर्वांत पहिलं म्हणजे घुंघट सोडून सलवार-कमीज घालून त्या बाहेर फिरू लागल्या आहेत. त्या अँकरिंग करतात, रिपोर्टिंग करतात. सुरुवातीला पेपरमध्ये चेहरे दिसायचे नाहीत; पण आता डिजिटल माध्यमात सार्‍याजणी लोकांपुढे आल्या आहेत. आज त्या स्वतःच्या बळावर जगतात, स्वतःचे घर चालवतात. एक मोठा टप्पा संघर्ष करूनच आम्ही गाठला आहे.

खबर लहरियाला इथे संपर्क करावा. : https://khabarlahariya.org/


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]