जॉर्ज फ्लॉइडच्या निमित्ताने… माणूस काय आहे?

अद्वैत पेडणेकर - 9619596925

गौरवर्णीय पोलिसांच्या अतिरेकी कारवाईत बळी गेलेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूने अमेरिकेतच नव्हे, तर ब्राझीलपासून, भारत ते इंडोनेशियापर्यंत आणि फ्रान्सपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत वर्णभेदविरोधी आंदोलनांना नवचेतना दिली. अमेरिका हा या सर्वांचा केंद्रबिंदू आहे. बहुतांश शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनात सर्वसामान्य अमेरिकन जनता वर्ण, वंश विसरून सहभागी होत आहे आणि यातच दडलाय एका सामाजिक स्थित्यंतराचा हुंकार. या पार्श्वभूमीवर स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित अ‍ॅमिस्टॅड(1997) या चित्रपटातील अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष (अमेरिकेचे सहावे अध्यक्ष) आणि वकील जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स यांच्या सुप्रीम कोर्टातील भाषणाची आठवण झाली. हा चित्रपट 1839मध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे.

जॉर्ज फ्लॉइड हा काही कोणी प्रसिद्ध व्यक्ती नव्हता. 46 वर्षांचा एक आफ्रिकन-अमेरिकन – कृष्णवर्णीय! तो 25 मे रोजी एका गौरवर्णीय पोलिसाच्या अतिरेकी कारवाईला कृतीला बळी पडला आणि त्याचा मृत्यू अवघ्या अमेरिकन जनतेला देशभर रस्त्यावर उतरवणार्‍या वर्णभेदविरोधी चळवळीचा प्रमुख आधार बनला. गौरवर्णीय पोलिसांच्या अतिरेकी कारवाईत बळी गेलेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूने अमेरिकेतच नव्हे, तर ब्राझीलपासून, भारत ते इंडोनेशियापर्यंत आणि फ्रान्सपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत वर्णभेदविरोधी आंदोलनांना नवचेतना दिली. अमेरिका हा या सर्वांचा केंद्रबिंदू आहे. बहुतांश शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनात सर्वसामान्य अमेरिकन जनता वर्ण, वंश विसरून सहभागी होत आहे आणि यातच दडलाय एका सामाजिक स्थित्यंतराचा हुंकार.

या पार्श्वभूमीवर स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित ‘अ‍ॅमिस्टॅड’ (1997) या चित्रपटातील अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष (अमेरिकेचे सहावे अध्यक्ष) आणि वकील जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स यांच्या सुप्रीम कोर्टातील भाषणाची आठवण झाली. हा चित्रपट 1839 मध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे.

‘अ‍ॅमिस्टॅड’ नावाचे एक स्पॅनिश जहाज काळ्या गुलामांच्या व्यापारात गुंतलेले. ‘अ‍ॅमिस्टॅड’ या शब्दाचा अर्थ ‘मैत्री.’ पण जहाज ठासून भरले आहे, गुलाम म्हणून विकण्यासाठी अपहरण करून आणलेल्या, साखळदंडांनी जखडलेल्या आफ्रिकेतील मेंडे जमातीच्या लोकांनी. जोसेफ सिंके हा त्यांच्यातला नेता. त्याच्या नेतृत्वाखाली अपहरण करून आणलेली ही आफ्रिकन कृष्णवर्णीय माणसं बंड करतात आणि कधी नव्हे ते यशस्वी होतात. जहाजाचा कॅप्टन मारला जातो. या आफ्रिकन लोकांना आपल्या घरी परतायचे आहे. त्यासाठी ते जहाज ताब्यात घेतात आणि परत जाण्यासाठी मदत म्हणून दोन स्पॅनिश नेव्हिगेटर्सना जिवंत ठेवतात. परंतु हे नेव्हिगेटर्स जहाज आफ्रिकेला नेण्याऐवजी अमेरिकेकडे नेतात. सिंके आणि त्याच्या बरोबरच्या सर्वांना अटकेत टाकले जाते आणि अमेरिकेच्या कोर्टात खटला उभा राहतो. खटल्यात स्पेनची राणी इजाबेलाच्या (दुसरी) वतीने प्रतिवादी म्हणून स्वतः अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष मार्टिन व्हॅन ब्युरेन कैदेत असलेले आफ्रिकन ही स्पेनची ‘मालमता’ आहे आणि ती त्यांना परत केली पाहिजे, असा दावा करतात; तर नौदलाच्या ज्या जहाजाने ‘अ‍ॅमिस्टॅड’ला पकडलेले असते, त्याचे दोन अमेरिकन नौदल अधिकारी खासगी नागरिक म्हणून त्या जहाजासह त्यावरील ‘माला’वर आपला दावा सांगतात. एवढेच नव्हे, तर ‘अ‍ॅमिस्टॅड’वरील दोन नेव्हिगेटर्स हे आमच्या मालकीचे गुलाम आहेत, असा दावा करतात. रॉजर बाल्डविन हा तरुण गौरवर्णीय वकील अपहृत आफ्रिकन लोकांची बाजू यशस्वीपणे मांडतो. ती ‘स्वतंत्र’ माणसे आहेत, हे सत्य कोर्टासमोर ठेवतो आणि खालचे कोर्ट आफ्रिकन लोकांना मुक्त करण्याचा आणि सन्मानाने आफ्रिकेला पाठवण्याचा निकाल देतं.

या निकालाविरुद्ध अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष मार्टिन व्हॅन ब्युरेन सुप्रीम कोर्टात अपील करतात आणि सुरुवातीला अपहृत आफ्रिकन लोकांची बाजू लढवायला नकार देणारे जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स सुप्रीम कोर्टात मात्र त्यांची बाजू लढवतात आणि जिंकतात. त्यांनी आपल्या सुप्रीम कोर्टातील युक्तिवादाच्या भाषणात उपस्थित केलेले अत्यंत मूलभूत मुद्दे लक्षात घेऊन सुप्रीम कोर्ट अपहृत आफ्रिकन लोकांना मुक्त करण्याचा निकाल देते.

आपल्या युक्तिवादात जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स मांडतात

“न्यायाधीश महोदयहो, मला आनंद वाटतो आहे की माझे सहकारी, मि. बाल्डविन यांनी सारी केस इतक्या कुशल आणि समग्र पद्धतीने मांडली आहे की, माझ्यासाठी फारसं काही उरलेलं नाही, तरीही मी विचारतो, कशासाठी जमलो आहोत आपण? एका साध्या ‘संपत्ती’च्या मामल्याला इतका मोठा बहुमान कसा मिळाला की, सर्वोच्च न्यायालयात त्याची सुनावणी व्हावी लागली?

खालच्या कोर्टांनी आमच्या बाजूने निकाल देताना सत्य नजरेआड केलं म्हणून? की आपल्या यादवी युद्धाच्या भीतीमुळे आपण एक प्रतीकात्मकता लादत आहोत एका साध्या मामल्यावर? त्याच्या इच्छेविरुद्ध? आणि सांगितलं जातंय, नजरेआड करा सत्य, जे आपल्यासमोर स्पष्ट उभं आहे, उंच आणि भव्य. सत्य! सत्याला, या केसमध्ये गुलामाप्रमाणे फरफटत नेलंय कोरडे ओढत, या कोर्टातून त्या कोर्टात. बिचारं कर्मदरिद्री सत्य; आणि तेही प्रतिपक्षाच्या सशक्त युक्तिवादामुळे नाही, तर कार्यकारी शाखेच्या लांबलचक सत्ताधारी हातांमार्फत.

होय, हा केवळ ‘संपत्ती’चा खटला नाही. या न्यायालयासमोरचा आतापर्यंतचा हा सर्वांत महत्त्वाचा खटला आहे. कारण या खटल्यातला मूळ मुद्दा हा आहे की माणूस काय आहे?

या आहेत… पत्रव्यवहाराच्या प्रती. आपले गृहसचिव, जॉन फोर्साइथ आणि स्पेनची राणी इजाबेला (दुसरी) यांच्यातील.

माझी विनंती आहे की, या केसच्या संदर्भात त्यांचं वाचन करावं. धन्यवाद, सर.

मी फक्त लक्ष वेधू इच्छितो, त्यातल्या एका चमत्कारिक शब्दप्रयोगाकडे. राणीसाहेबा वारंवार उल्लेख करतात अकार्यक्षम न्यायालयांचा.

मला प्रश्न पडतो, त्यांना काय जास्त पसंत पडलं असतं? आफ्रिकनांविरुद्ध निकाल देणारं कोर्ट? नाही, तसं नाही.

आणि इथेच तर खरी मेख आहे. राणीसाहेबांना पाहिजेत कोर्टं, जी त्यांच्या देशातील कोर्टांसारखी वागतील. ज्या कोर्टांशी ही अकरा वर्षांची मुलगी खेळते आपल्या ‘स्पेन’ नावाच्या जादुई साम्राज्यामध्ये. असं कोर्ट, की जे सांगेल ते करेल. असं कोर्ट ज्याच्याशी बाहुलीसारखं खेळता येईल.

असं कोर्ट, ज्याचा आपले स्वत: प्रेसिडेंट मार्टिन व्हॅन ब्युरेन यांना अभिमान वाटेल. धन्यवाद.

हे प्रेसिडेंटच्या कार्यालयाचे एक प्रकाशन आहे. त्याला म्हटलंय, ‘कार्यकारी आढावा.’ प्रेसिडेंटना आशा असेल की तो तुम्ही वाचाल.

हा अगदी अलिकडचा आढावा आहे, ज्यात एक लेख आहे. तो लिहिला आहे दक्षिणेतील एक ‘तल्लख’ बुद्धी; कदाचित माझे भूतपूर्व व्हाईस-प्रेसिडेंट, जॉन कॅलहून असतील का?

ते म्हणतात, असा कोणताही सभ्य समाज नाही, जिथे समाजातील एक विभाग दुसर्‍या विभागाच्या श्रमावर जगत नाही.

जितक्या मागे आपण जाऊ, पार ‘बायबल’च्या काळापर्यंत इतिहास याचा साक्षी आहे.

‘इडन’मध्ये देखील; जिथे फक्त दोघांची निर्मिती झाली, तिथेही एकजण दुसर्‍याची बटीक झाली.

गुलामी नेहमीच आपल्यासोबत आहे, ती अनैतिकही नाही आणि पापही नाही; उलट ज्याप्रमाणे युद्ध आणि शत्रुत्व या माणसाच्या नैसर्गिक अवस्था आहेत, त्याचप्रमाणे गुलामीदेखील तितकीच नैसर्गिक आणि अपरिहार्य आहे. दक्षिणेकडील या ‘तल्लख’ बुद्धीशी मी सहमत नाही; आणि आपल्या प्रेसिडेंटशीही. त्याऐवजी मी असं सुचवेन की, माणसाची नैसर्गिक अवस्था; आणि ती वादग्रस्त कल्पना आहे, ती अवस्था आहे स्वातंत्र्याची, मुक्ततेची; आणि याचा पुरावा हा की ती हिरावली गेली तर माणसं, स्त्रिया आणि मुलं. ती परत मिळवण्यासाठी बेड्या मोडून काढतात, शत्रूंचा बीमोड करतात. ते प्रयत्न करत राहतात, सर्व प्रतिकूल परिस्थितीशी, पूर्वग्रहांशी झगडत राहतात, अगदी स्वगृही पोचेपर्यंत.

सिंके, तुम्ही जरा उभे राहता का? म्हणजे सर्वांना तुम्ही दिसाल.

हा माणूस काळा आहे. सगळ्यांना स्पष्ट दिसतंय; पण जे तितकंच स्पष्ट आहे ते दिसतं आहे का? की या कक्षात एक तोच खराखुरा हीरो आहे.

तो जर गोरा असता, तर त्याला कोर्टात उभं राहावं लागलं नसतं आपल्या जीवासाठी. जर तो गोरा असता आणि ब्रिटिशांचा गुलाम असता, तर त्याला उभं राहता आलं नसतं इतक्या वजनाची पदकं आणि सन्मान आपण त्याला दिले असते. त्याच्याबद्दल गाणी रचली गेली असती. महान लेखकांनी त्याच्यावर पुस्तकं लिहिली असती. त्याची कथा सांगितली गेली असती, पुन्हा पुन्हा आपल्या शाळांमध्ये. आणि आपल्या मुलांना, पॅट्रिक हेनरी (Give me liberty, or give me death! – 1775) इतकंच त्याचंही नाव माहीत झालं असतं.

अन् जर दक्षिणेचं बरोबर असेल तर आपण काय करायचं, या तापदायक दस्तावेजाचं, या स्वातंत्र्याच्या घोषणापत्राचं? त्यातल्या घमेंडीचं?

सर्व माणसे जन्माने समान आहेत, अहस्तांतरणीय हक्क, जगणं, स्वातंत्र्य आणि वगैरे, वगैरे, वगैरे?

आता काय करायचं या सगळ्यांचं?

माझी एक नम्र सूचना आहे. परवाच्या रात्री मी बोलत होतो, माझे मित्र, सिंके यांच्याशी. माझ्या घरी आम्ही ग्रीनहाऊसमध्ये बसलो होतो आणि ते मला सांगत होते, जेव्हा मेंडेंपैकी एखाद्याला – मेंडे म्हणजे त्यांचे लोक – जेव्हा एखाद्या मेंडेसमोर कुठलीही आशा उरत नाही, तेव्हा तो आपल्या पूर्वजांना हाक देतो. परंपरा.

मेंडें समजतात की जर पूर्वजांचा आत्मा बोलवू शकलो, तर ते गेलेलेच नसतात आणि त्यांचा शहाणपणा, शक्ती आणि स्फूर्ती आपल्या मदतीला येते.

जेम्स मॅडिसन, अ‍ॅलेक्झॅन्डर हॅमिल्टन, बेंजामिन फ्रॅन्कलिन, थॉमस जेफरसन, जॉर्ज वॉशिंग्टन, जॉन अ‍ॅडम्स. आम्ही फार काळ तुमचं मार्गदर्शन टाळत आलो. कदचित, आम्हाला भीती वाटली की मग आम्हाला मान्य करावं लागेल की, आमचं व्यक्तित्व पूर्णपणे आमचं नाही.

कदाचित आम्हाला भीती वाटली की, तुम्हाला बोलवणं म्हणजे आमची कमजोरी कबूल करणं. पण आता आम्हाला समजलंय की असं नाहीय. आम्हाला आता समजलंय, आम्हाला समजून दिलं गेलंय आणि आम्ही समजून घेतलंय की आम्ही कोण आहोत, हे आम्ही कोण होतो, यात दडलेलं आहे. आम्हाला तुमच्या शहाणपणाची तातडीने गरज आहे. आमच्या भीतींवर, पूर्वग्रहांवर, स्वत:वर मात करण्यासाठी. जे बरोबर आहे ते करण्याचं आम्हाला धैर्य द्या.

जर त्याचा अर्थ यादवी युद्ध असेल, तर ते होऊ द्या आणि जर ते झालं, तर आशा करूया की ती अमेरिकन क्रांतीची शेवटची लढाई असेल. यापेक्षा जास्त मला काही सांगायचं नाहीय.”

सुप्रीम कोर्टात हा खटला नऊ न्यायाधीशांच्या पीठासमोर चालला. त्यापैकी सात न्यायाधीश हे अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांतील बडे मालक होते, ज्यांच्यासाठी ‘गुलामगिरी’ असणे महत्त्वाचे होते. असे असूनदेखील या खटल्याचा निकाल अपहृत आफिकन लोकांच्या बाजूने लागला. हे चित्र आज भारतातदेखील दुर्मिळ होऊ लागले आहे.

भारतात केंद्रातील भाजपच्या गेल्या सहा वर्षांच्या सत्ताकाळात अल्पसंख्याक आणि दलितांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या. लोक आणि पर्यावरणविरोधी जागतिकीकरण, वाढत चाललेली भयानक विषमता, वित्त भांडवलशाही आणि सत्ताधारी उजव्या शक्तींची युती यांचे हे एक फलित. त्यातच भारतात सामाजिक माध्यमांचा वापर करून जातीय तेढ सतत वाढवण्यासाठी भरपगारी नेमलेल्या आणि फोफावलेल्या उच्चवर्णीय, शिक्षित, हिंदुत्ववादी ‘ट्रोल्स’च्या टोळ्या.

जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या घटनेनंतर त्याविरोधात अमेरिकेतील सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरला; पण अल्पसंख्याक, दलितांवरील अत्याचारांच्या घटना घडल्यानंतर असे चित्र भारतात दिसले नाही. न्यायालयीन निर्णयांबद्दल तर अनेक प्रश्न उभे राहत आहेत. पोलिसी यंत्रणा सत्ताधार्‍यांच्या हातातील बाहुलं झाली आहे, असे चित्र आहे.

अशा परिस्थितीत जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स यांच्या अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टातील भाषणाचा केंद्रीय मुद्दा अमेरिकेसाठीच नव्हे, तर सर्व देशांनाही, अगदी भारतासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आहे – ‘माणसाची नैसर्गिक अवस्था आणि ती वादग्रस्त कल्पना आहे, ती अवस्था आहे स्वातंत्र्याची, मुक्ततेची आणि ती हिरावली गेली तर माणसं, स्त्रिया आणि मुलं; ती परत मिळवण्यासाठी बेड्या तोडून काढतात, शत्रूंचा बीमोड करतात. ते प्रयत्न करत राहतात, सर्व प्रतिकूल परिस्थितीशी, पूर्वग्रहांशी झगडत राहतात.

जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या घटनेमुळे नवचेतना मिळालेले अमेरिकेतील वर्णभेदविरोधी आंदोलन हे जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स यांच्या म्हणण्याप्रमाणे खर्‍या अर्थाने अमेरिकन क्रांतीची शेवटची लढाई ठरेल का?


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]