परिचारिका – आरोग्यसेवेच्या आधारस्तंभ

प्रभाकर नानावटी - 9503334895

जागतिक परिचारिका दिन

12 मे हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणार्‍या परिचारिकांचं जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. पण अशातही स्वत:च्या आयुष्यातला काळोख विसरून रुग्णाच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. दरवर्षी 6 ते 12 मे हा आठवडा संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताह म्हणून साजरा केला जातो.

भारतात 17 व्या शतकापर्यंत तरी ‘परिचारिका’ या शब्दाचा परिचय नव्हता. बहुतेक खेड्यांमध्ये एखादी अनुभवी महिला वैयक्तिक पातळीवर औषधपाणी देणे, प्रसूती करणे, बाळंतपणात आई-बाळांची काळजी घेणे वा अपघातात सापडलेल्यांवर उपचार करणे इत्यादी कामं करत असे. त्यापासून काही तुरळक बिदागीही (व तोंडभरून कृतज्ञता!) तिला मिळत असावे. मुळात हे एक पुण्यकर्म असून दीन-दुबळ्यांची सेवा केल्यामुळे परमेश्वरी कृपा होऊन तिच्या कुटुंबाला सुख-शांती मिळेल, एवढीच धारणा त्यामागे होती.

17 व्या शतकात पोर्तुगीज सैन्याने स्थानिकरित्या उपलब्ध असलेल्या काही स्त्रियांना नर्स म्हणून सैन्यात भरती करून घेतली. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने 1664 साली त्यांच्या सैनिकांच्या रोगोपचारासाठी पाश्चिमात्य वैद्यकीय पद्धतीवर आधारित मद्रास येथे एक हॉस्पिटलची स्थापना केली व त्यात चतुर्थ श्रेणीतील कामगारांकडून नर्सिंग; तसेच तत्सम कामं करून घेतली जात होती. नंतर अशाच प्रकारचे मिलिटरी हॉस्पिटल्सची यंत्रणा कलकत्ता, कानपूरसारख्या ब्रिटीश सैनिकांच्या छावणी असलेल्या कित्येक शहरात राबवली गेली.

फ्लॉरेन्स नायटिंगेल या ब्रिटीश महिलेचा उल्लेख केल्याशिवाय नर्सिंगचा इतिहास लिहिता येणार नाही. युरोपमधील क्रिमिया युद्धात घायाळ झालेल्या सैनिकांवर उपचार करत असताना कित्येक सैनिक नाहक मृत्युमुखी पडत होते. फ्लॉरेन्स नायटिंगेलला रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी आपण घेतलेले कष्ट वाया जात आहेत की काय, असे वाटल्यामुळे आपले काय चुकत असेल याचा ती विचार करू लागली. तोपर्यंत नर्स म्हणजे सांगेल तेवढी काम निमूटपणे करणारी एक महिला, असेच डॉक्टर, कम्पाउंडरसकट असलेल्या पुरुषप्रधान उपचार यंत्रणेला वाटत असे. नर्स म्हणजे एक ओझ्याचा बैल नसून तिलाही जबाबदारी दिल्यास तीसुद्धा रोगोपचार यशस्वी करण्यात सहभागी होऊ शकते; फक्त तिला योग्य प्रशिक्षणाची गरज आहे, असे नायटिंगेलची मनोमन खात्री झाली व काही वर्षांत तिने काहीजणांना रोगोपचारात प्रशिक्षण दिले. ती व तिच्या सहकारी नर्सने आपली कर्तृत्वबुद्धी वापरून युद्धकाळात अनेक सैनिकांचा जीव वाचविला. तिने आखून दिलेल्या शुश्रुषा पद्धतीमुळे भारतातसुद्धा हजारोंचा जीव वाचला.

1871 साली मद्रास येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नर्सिंग व प्रसविकासंबंधीच्या (midwifery) प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली. त्यानंतर 18 व्या – 19 व्या शतकात भारतात ठिकठिकाणी नर्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू झाली. 1918 च्या सुमारास दिल्ली येथे आरोग्य प्रचारकांना (Health Visitors) तयार करणारी लेडी रीडिंग हेल्थ स्कूलची स्थापना झाली. 1946 मध्ये दिल्ली व वेल्लोर येथे नर्सिंगमध्ये पदवी शिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.

1947 साली ब्रिटिशांनी जेव्हा हा देश सोडला, त्यावेळी भारतातील सरकारी इस्पितळांची दयनीय अवस्था होती. इस्पितळात डॉक्टर्स, नर्सेस व इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांची संख्या कमी होती. नर्सिंगला अजूनही व्यावसायिक स्वरूप आले नव्हते, नर्सेसना राहायला क्वार्टर्स नव्हत्या, वेळेचे बंधन नव्हते. रात्री-अपरात्री तातडीच्या सेवेसाठी त्यांची झोपमोड करून ड्यूटीवर हजर होण्यास सांगितले जायचे. मुळात नर्सिंग म्हणजे फक्त स्त्रियांनीच करण्याचे काम असा अलिखित समज होता. (व आजही तीच अवस्था आहे!) 1950 च्या सुमारास तर नर्सिंगमध्ये सामाजिकरित्या खालच्या वर्गात असलेल्या स्त्रियांचा भरणा होता. कारण इतरांचे शी-शू स्वच्छ करण्यासारखी कामं करणे उच्चवर्णीय स्त्रिया कसे काय करू शकतील?

1950 नंतर नर्सिंगच्या बाबतीत परिस्थिती सुधारू लागली. भोरे व कर्तार आयोगाने पंचवार्षिक योजनेत आरोग्यासंबंधी अनेक सुधारणा सुचविल्या. त्या काळच्या सरकारने त्यांची अंमलबजावणी केली. नर्सेसची परिस्थिती सुधारू लागली. नर्सिंग व प्रसविका प्रशिक्षितांना चांगले दिवस आले. त्या काळी खेडोपाड्यात प्राथमिक आरोग्य केंद्रं आरोग्यविषयक कामं अतिशय आस्थेने व जोमाने काम करत होती. 1996 च्या सुमारास प्रत्येक केंद्रात किमान दोन तरी नर्सेस असावेत, या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात आली.

प्रशिक्षित नर्सेस बरोबरच आशा सेविकांचे (Credited Social Health ­Activists (C­SH­A) सेविकांचे जाळे देशभर पसरलेले असून तुटपुंज्या पगारावर त्या खेड्याचे आरोग्य संभाळत आहेत. ज्या खेड्या-पाड्यात व दुर्गम वस्तीत डॉक्टर्स जायला घाबरतात, तेथे नर्सेसच डॉक्टर्सची 90 टक्के काम करतात व अत्यंत गंभीर केस असल्यास नजीकच्या इस्पितळाशी संपर्क साधून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात.

पॅरामेडिकल प्रोफेशनल्स व विशेषकरून नर्सिंग व्यवसायाबद्दल अमेरिका व युरोपमधील कित्येक मोठमोठ्या डॉक्टरांनी, शल्यविशारदांनी फारच छान शब्दांत लिहिलेले आहे. कित्येक डॉक्टरांनी आपण लिहिलेली पुस्तकं नर्सेसना अर्पण केलेली आहेत. डॉ. लुई थॉमस या विख्यात सर्जन व वैज्ञानिकाने तर ‘दि यंगेस्ट सायन्स’ या त्याच्या पुस्तकात नर्सिंग प्रोफेशनवर एक पूर्ण प्रकरणच लिहिलेले आहे.

नर्सेस नेहमीच आपण करत असलेल्या कामाबद्दलची सर्व माहिती करून घेण्यास उत्सुक असतात. चुका केल्यामुळे होणार्‍या पुढील गंडांतराला ओळखून ती चूक वेळीच सुधारण्याचा ते प्रयत्न करत असतात. पेशंटच्या कॉटला अडकवलेल्या चार्टमध्ये जे काही लिहिलेले असते, त्याची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या कॉटवरील रुग्णाला – पेशंटला – एक माणूस म्हणून काही तासांतच ओळखू लागतात व नंतर काही दिवसांनी त्यांच्या नातलगांना व मित्रांनासुद्धा. पेशंटची स्थिती ओळखून त्याप्रमाणे आपल्यात बदल घडवत, पेशंटला एखाद्या लहान बाळासारखे वागवत, वेळप्रसंगी आवश्यक भासल्यास कठोर शब्द वापरून त्याची काळजी घेणे, ही एक फार मोठी अवघड कसरत असते व ते लीलया पार पाडत असतात. याच अनुभवाच्या शिदोरीवरच त्यांचे अस्तित्व टिकून आहे.

आजकालच्या मोठमोठ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील पेशंट आत गेल्या-गेल्या भांबावून जातो, घाबराघुबरा होतो. कारण त्याला ओळखण्यासाठी फक्त कॉटला अडकविलेल्या चार्टशिवाय दुसरे काहीही नसते व तो कायम कुणीतरी मला चुकीच्या ठिकाणी ढकलत नेऊन गरज नसलेल्या चाचण्या करण्यास भाग पाडत आहेत किंवा महत्त्वाच्या चाचण्यांसाठी कुणीच पुढे येत नाहीत, याच धास्तीत जीव मुठीत धरून छताकडे डोळे लावून पडलेला असतो. काहीवेळा स्ट्रेचरवरून घेऊन जाताना कुठल्या तरी कोपर्‍यात थोडेसे कुजबुजल्यासारखे डॉक्टर्स दोन-चार प्रेमळ शब्द बोलतही असतील. परंतु विश्वासाने, स्वतःचे सर्व दुःख विसरून हसत-हसत सामोरे जाणार्‍या नर्सचे सांत्वनाचे, धैर्य देणारे चार शब्द ऐकल्यानंतर पेशंटला आपण अजूनही जगावे, असे वाटत असेल. पेशंटच्या खोलीतील प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवत कुठल्याही दुर्लक्षपणामुळे कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी नर्सेस घेत असल्यामुळे ही यंत्रणा अजूनही कोसळलेली नाही.

आताची आरोग्यसेवा यापूर्वीच्या आरोग्यव्यवस्थेपेक्षा फार वेगळी आहे. खरे पाहता, सक्षम आरोग्यसेवाच देशातील आरोग्य व्यवस्थेला व त्या देशातील शिक्षण व्यवस्थेला आकार देऊ शकते. दीर्घ आयुष्य, न परवडणारे हॉस्पिटल्स व औषधी खर्च, वैद्यकीय तंत्रज्ञानात होत असलेली प्रगती, समाजातील विषमता, जाती-जमातीत भेदभेव, दारिद्य्र, वर्गीय-जातीय-प्रादेशिक अस्मिता, हिंसा व सांस्कृतिक विविधता इत्यादीमुळे आरोग्यसेवेतील गुंतागुंत वाढत आहे व भारतीय समाजावर नको तितका ताण पडत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील डॉक्टरांची संख्या सात (7/10,000) असून जागतिक सरासरीपेक्षा (10/10,000) कमी आहे. डॉक्टर्सच्या बाबतीत आपल्या देशाचा क्रमांक 67 वा आहे. त्याचप्रमाणे नर्सेसची संख्या 17 (17/10,000) असून तीसुद्धा जागतिक सरासरी 25 पेक्षा (25/10,000) कमी आहे. हॉस्पिटलमधील खाटांच्या संख्येतही हीच कमतरता जाणवते. येथेही आपला क्रमांक 75 वा आहे. (भारतात 10/10,000 तर जागतिक सरासरी ः 35/10,000). आपल्या येथील डॉक्टर ः नर्स प्रमाण 1 :1 असून आंतरराष्ट्रीय प्रमाण 1:3 आहे. या देशाची आरोग्यसेवा सुधारण्यासाठी अजून 24 लाख नर्सेसची गरज आहे, असे एक अहवाल (FICCI report, 2016) नमूद करत आहे. नर्सेसच्या संख्येत वाढ केल्यास डॉक्टर्सना त्यांच्या कामाचा दर्जा वाढविण्यास लक्ष देता येईल.

चांगल्या प्रशिक्षित परिचारिका आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. शिवाय आपण आपल्या कामात चोख व गंभीर असायला हवे. आपण करत असलेल्या कामाचे वरचेवर पुनर्मूल्यांकन करायला हवे. वेळेत काम पूर्ण करणे, उद्दिष्ट पूर्ण करणे, आळस न करणे व काम क्षुल्लक आहे, असा समज करून न घेणे या गोष्टीकडे कटाक्ष असावे.

आपत्ती, संकट केव्हा कोसळेल, याची लक्षणं ओळखता यायला हवीत. अशा प्रसंगी दुसरे कुणीतरी बघून घेतील म्हणून बेसावध राहू नये.

स्वतःहून कृती करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. कुठलीही गोष्ट गंभीरपणे घेण्याची सवय जडायला हवी. धैर्याने परिस्थितीचा सामना करण्याची मानसिकता हवी. कामाचा ताण घेऊ नये. शक्य असेल तेव्हा विश्रांती घ्यावी. ‘आऊट ऑफ दि बॉक्स’ विचार करता येईल का पाहावे. काही नवीन कल्पना लढवता येतील का, याचा विचार करावा. या संकट काळाचा सामना आपण एकटेच करणार आहोत, अशीच मनाची तयारी करावी. इतरांच्यावर टीका-टिप्पणी न करता आपल्या हातातील काम तडीस न्यावे. स्वतः कोशात अडकवून न घेता स्पष्टपणे काहीही झाकून न ठेवता सांगावे वा करावे. अशी कितीतरी पथ्ये ते पाळत असतात.

रुग्णाची सेवा कोण करतं, असा प्रश्न केल्यानंतर डॉक्टरआधी नाव येईल ते परिचारिकेचं. रुग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम या परिचारिका करतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते, स्वतःच्या सुख-दुःखाची. वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रुग्णसेवेत गुंतलेल्या असतात. या रुग्णसेवेला खर्‍या अर्थानं सुरुवात केली ती फ्लॉरेन्स नायटिंगेल या परिचारिकेनं. 12 मे 1820 ला फ्लॉरेन्स यांचा जन्म झाला. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी फ्लॉरेन्स यांनी जखमी सैनिकांची शुश्रुषा केली आणि संपूर्ण जगाला त्यांनी रुग्णसेवेचा पायंडा घालून दिला. यातूनच आपल्यातल्या काही भगिनींना रोजगाराची संधी मिळेल, या उद्देशानं 1860 साली लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कूलची स्थापना केली. दिवा घेतलेली ‘स्त्री’ असंही फ्लॉरेन्स यांच्याबाबतीत म्हटलं जातं. त्यांनी सुरू केलेल्या नर्सिंग स्कूलमुळेच आज जगभरात परिचारिकांना महत्त्व प्राप्त झालं. फक्त महाराष्ट्रातच सुमारे अडीच लाखांहून अधिक परिचारिका आहेत. मात्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा डोलारा केवळ 23 हजार नर्सेसच्याच खांद्यावर आहे. 80 टक्के खासगी रुग्णालयात रुग्णसेवेचं व्रत सांभाळण्याची जबाबदारी अप्रशिक्षित नर्सेस पार पाडतात.

बदलत्या काळानुसार या नर्सेसना भेडसावणार्‍या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अजून किमान वेतन कायदा लागू नसल्यानं तुटपुंज्या पगारात नर्सेसना काम करावं लागतंय. नर्सेसना कायद्याचं संरक्षण अद्याप नाही. नोंदणीकृत अर्हता नसल्यानं त्यांना इतरांप्रमाणे मान-सन्मान मिळत नाही. कामाच्या ठिकाणी डॉक्टर, कपांऊंडर, कधी कधी रूग्णांकडूनही शाररिक, मानसिक त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं. याशिवाय ग्रामीण भागात त्यांच्यावर लसीकरण, प्रसूती, कुटुंबकल्याण यांसारख्या कामांचा बोजा टाकला जातो. एकूणच, रुग्णसेवेला सुखापेक्षा दुःखाची झालर अधिक आहे. असं असतानाही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत. स्वत:चं दु:ख विसरून रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणार्‍या या परिचारिकांचा सलाम!

सौजन्य झी 24 तास

संकट काळी तर परिचारिकांचा कस लागतो. यावेळी संवाद महत्त्वाचा असतो. त्यामुळे गोष्टी स्वतःजवळ ठेवून न घेता योग्य व्यक्तीपर्यंत पोचवण्याची व्यवस्था त्यांना करावी लागते. अशावेळी अफवा पसरणार नाहीत, चुकीची माहिती दिली जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. अशा प्रसंगी व्यवस्थेवर, यंत्रणेवर व काम करणार्‍या सहकार्‍यावर व/वा त्या गटावर संपूर्ण विश्वास ठेवावा लागतो. दुसर्‍यांच्या चुका काढण्यात वा सुधारण्यात वेळ घालवता येत नाही. परिस्थितीचा गैरफायदा घेता येत नाही. मुळात अशावेळी घाबरून जाऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. जात-पात, धर्म, लिंग, वय, उत्पन्न यांचा विचार न करता प्रत्येकाला योग्य वागणूक द्यावी लागते व चांगल्या नर्सेस या गोष्टी बिनबोभाटपणे करत असतात.

आरोग्य सेवेतील नर्सिंगची कामं व त्यांच्या जबाबदारीत फार मोठे बदल घडत आहेत. नर्सेस आजारांचे प्राथमिक निदान करू शकतात, रुग्णांच्या शुश्रुषेत सुधारणा घडवून आणू शकतात, त्यांची गुणवत्ता वाढवू शकतात, सामान्यांना परवडेल असे उपचार देऊ शकतात. कुणालाही आरोग्यसेवेपासून वंचित ठेवत नाहीत. पूर्ण प्रशिक्षित असलेल्या नर्सेस आरोग्य सेवेचे स्थानिक, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील ध्येय-धोरणं ठरविण्यात सहभागी होऊ शकतात. अत्यंत तातडीच्या रुग्णाच्या सेवेसाठी विशेष प्रशिक्षित नर्सेसना प्रचंड मागणी आहे. भारतातील आरोग्यसेवेच्या क्षेत्रात काम करणार्‍यांमध्ये सुमारे 75 टक्के नर्सेस आहेत. त्यामुळे आरोग्यसेवेत सुधारणा घडवून आणण्यात, रोगनिदान करण्यात व रुग्णांचे मानसिक स्थैर्य राखण्यात नर्सेसचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे, हे आपण नाकारू शकत नाही. तरीसुद्धा यांच्या कामांची कदर केली जात नाही, हेही वास्तव आपण विसरू शकत नाही.

जागतिकीकरणानंतरच्या 21 व्या शतकातील या जगात आरोग्य म्हणजे सामान्यपणे वैयक्तिक आरोग्य असेच समजले जात आहे. सर्दी-पडशापासून अतीव रक्तदाब, कर्करोग वा मधुमेह अशा दुर्धर रोगापर्यंत कुठल्याही आजारापासून बरे होण्यासाठी आपण नेहमीच दवाखान्यात जातो व डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेऊन सांगतील तेवढे बिल भरून (व तोंडभर आशीर्वाद देत) घरी परततो. आधुनिक वैद्यक पद्धतीमुळे सांसर्गिक रोगांचा पूर्णपणे नायनाट झाला आहे, याची खात्री झालेली असते व सरकारला करण्यासारखे काहीही नाही, असे आपण समजत असतो. लसीकरणामुळे अशा प्रकारचे रोग उद्भवणारच नाहीत, अशीच आपली मानसिकता असते. एवढेच नव्हे, तर आपल्या राज्यकर्त्यांची ध्येय-धोरणं त्याच मानसिकतेला पुष्टी देणारी असतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची मोडतोड करून आरोग्य सेवेचे खाजगीकरण करण्याकडे कल वाढत आहे. लाखोंनी फी भरल्यानंतरच शिक्षण देणारे खाजगी मेडिकल कॉलेज, टोलेजंग इमारतीचे खाजगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स व खाजगी औषधी कंपन्या व हॉस्पिटल्सबरोबर संगनमताने भरमसाठ फी लादणार्‍या आरोग्य विमा कंपन्या इत्यादींचे पेव फुटले आहे व त्यांना नफा कमावण्यासाठी मोकळे रान सापडले आहे. सरकारच्या नियंत्रणात असलेली सार्वजनिक व्यवस्था नावापुरती कशीतरी तग धरून आहे.

परंतु या सर्व गदारोळात दोन गोष्टी पूर्णपणे विसरले जात आहेत. एक, परिणामकारक आरोग्य सेवा म्हणजे आजार होऊ नये, यासाठी स्वच्छ पाणी, प्रदूषणविरहित हवा, प्रतिबंधात्मक प्रतिजैविकांसारख्या औषधांची मुबलक प्रमाणात उपलब्धता व लसीकरण या गोष्टी वैयक्तिक नसून त्या सार्वजनिक असतात व याची जबाबदारी त्या-त्या देशातील सरकारची असते. दोन, सांसर्गिक साथ कशी, केव्हा व कुठून येते, याचा नेम नाही; त्यांना फार फार तर दूर ठेवता येते; परंतु पूर्णपणे विसरता येत नाही. त्यांना कुठलाही पर्याय नाही व अशा प्रकारचे संकट कोसळल्यास खाजगीकरणाकडे बोट दाखवता येत नाही व या आपत्कालीन परिस्थितीला त्या-त्या देशालाच जबाबदारी स्वीकारून योग्यरित्या आपत्तीचा सामना करावा लागतो व त्यासाठी सक्षम आरोग्य सेवा असावी लागते.

निधीच्या कमतरतेमुळे मोडकळीस आलेली मरणप्राय सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व तेथील तुटपुंज्या प्रमाणात असलेले डॉक्टर्स, परिचारिका व इस्पितळातील पॅरामेडिकल कर्मचारीच अशा संकटकालीन आणीबाणीत देशाची धुरा संभाळत आहेत व नाहक जीवितहानी थांबविण्याचा प्रयत्न करतात. परिस्थिती हाताळण्यासाठी निवृत्त झालेल्यांना पुन्हा कामाला जुंपण्यात येत आहे. या संकट काळात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेसुद्धा मदतीचा हात पुढे करत आहेत. सर्व यंत्रणा विश्रांती न घेता (जीवाची पर्वा न करता) दिवसाचे अनेक तास या ‘कोविड-19’च्या विरोधात काम करत आहेत. परंतु आपल्या जीवाची काळजी वाहणार्‍यांबद्दल कोरड्या सहानुभूतीशिवाय (व फक्त काही टाळ्याशिवाय!) आणखी काहीही त्यांना मिळत नाही. एवढेच नव्हे, तर आपत्तीचा काळ सरल्यानंतर, व्यक्ती वा एक संस्था म्हणून केलेल्या सर्वांना विस्मृतीत ढकलले जाते. पुन्हा त्यांची आठवण पुढील साथीच्या वेळीच! छिन्न-विच्छिन्नावस्थेतील जगभरातील समाज वा सत्तेत असलेले राजकारणी त्यांनी केलेल्या कामाची कधीच कदर करणार नाहीत. म्हणूनच बँकर्स व कॉर्पोरेट मॅनेजर्सनी भरलेल्या या जगाऐवजी परिचारिकांनी भरलेले जग लाखपटीने बरे, असे म्हणावेसे वाटते.

रोगाची साथ आणि त्यातील मृत्यू ही गोष्ट अगदी आधुनिक जगालाही नवी नाही. रोगाची साथ म्हणजे देवदेवतांचा प्रकोप, काळी जादू, कोणी केलेले चेटूक ते संबंध नसणारे प्राणी यांच्यामुळे येते, अशा अनेक गैरसमजुती आणि अंधश्रद्धा यांच्यातून बाहेर पडून रोगाच्या साथी या सूक्ष्मजंतूंमुळे येतात, या वैज्ञानिक सत्यापर्यंत पोचण्यास जगाला काही हजार वर्षेलागली. त्यामुळे जगाने साथ थांबण्यासाठी काय-काय केले असेल, किती अत्याचार केले असतील, याची नुसती कल्पनाही शहारे आणते. ‘स्पॅनिश फ्लू’ साथीच्या काळात लोकांनी कापूर गळ्यात बांधणे, वाफ घेणे, कापूरची इंजेक्शन्स देणे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, रोगप्रतिकारक शक्तीसाठी रोज ‘व्हिटॅमिन सी’युक्त संत्री खाणे, रस्त्यांवर फवारे मारणे असे अनेक प्रकार केले. ‘फ्लू’ घालवणारी नाकाला लावायची यंत्रेही काहींनी तयार केली. अर्थात, ‘फ्लू’चा जंतू यापूर्वीच शोधला गेला होता. सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्याची कल्पना याच काळात आली. पण सार्वजनिक विलगीकरणाचे (क्वारंटाईन) महत्त्व मात्र माहीत नसल्याने प्रसार वेगाने झाला.

फ्लॉरेन्स नायटिंगेल या ब्रिटीश परिचारिकेने 1854 च्या क्रिमिअन युद्धात मित्र आणि शत्रू या दोन्हींच्या सैनिकांच्या शुश्रुषेचे अतुलनीय असे काम केले. हात धुण्याचे रोगप्रसारातील महत्त्व पटवून देणारी ती पहिली व्यक्ती होती. आज आपण त्याच मार्गाचा वापर करीत आहोत. सूक्ष्म जंतूंचे प्रकार, त्यांच्या संसर्गाचे मार्ग, आजारांची निश्चित लक्षणे, निदान चाचण्या, औषधे आणि लसी हा टप्पा त्यामानाने लवकर म्हणजे शे-दोनशे वर्षांत गाठला गेला. आता आपण वर्ष आणि महिने अशी भाषा वापरू लागलो आहोत. परिणामकारक लसींमुळे देवी, कॉलरा, गोवर, कांजिण्या असे अनेक आजार जवळपास नाहीसे झाले. डास नियंत्रण केल्यावर मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया आटोक्यात येऊ शकतात. डासांचे अस्तित्व सार्वजनिक स्वच्छतेशी निगडित असते. प्रगत जगात हे घडले आहे.

या पार्श्वभूमीवर ‘कोव्हिड-19‘च्या महासाथीचा विचार केला पाहिजे. 2019 डिसेंबरमध्ये चीनमधून आजच्या मितीला 210 देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे होणार्‍या ‘कोव्हिड-19‘ या आजाराचा पावणेसतरा लाख लोकांना संसर्ग झाला आहे. मृत्यूने लाखाचा आकडा पार केला आहे. ही साथ वेगाने पसरत आहे….

सौजन्य – पुरोगामी जनगर्जना

रोगनिदानातील व्याप्तीमुळे शुश्रुषा, प्रशिक्षण व प्रशासकीय व्यवस्थेत फार मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. आरोग्यसेवेचे आधारस्तंभ असलेल्या परिचारकांना या आव्हांनाना सामोरे जात आपले वैशिष्ट्य सिद्ध करावे लागणार आहे. दिवसेंदिवस बदलत असलेले तंत्रज्ञान, तरुणाईच्या जोषातील विक्षिप्त मागण्या, जीवनशैलीतील गुंतागुंत, शहरी भागातील दिवसेंदिवस वाढत असलेली झोपडपट्टी, हवामानबदल, जल व वायुप्रदूषण व त्यामुळे पारंपरिक उपचारांना दाद न देणार्‍या आजारांचा प्रादुर्भाव, वाढती जनसंख्या, ज्येष्ठ नागरिकांचे सुदीर्घ आयुष्य व त्यांच्या चित्र-विचित्र मागण्या इत्यादींमुळे नर्सिंग व्यवसायावर व त्यांच्या संसाधनावर ताण पडत आहे. हे आव्हान स्वीकारून परिचारिकांना पुढील वाटचाल करावी लागणार आहे.

इतिहास काळातील आदिमानवापासून आजपर्यंतच्या प्रगत मानवापर्यंतच्या एकूण एक सर्व पिढ्या कुठल्या ना कुठल्या तरी भूकंप, ज्वालामुखी, महायुद्ध, सांसर्गिक साथीसारख्या भयंकर संकटांचा सामना करत-करत आताच्या अवस्थेपर्यंत पोचल्या आहेत. दुःख पचविण्याची त्यांची ताकद फार मोठी आहे. परंतु जेव्हा-जेव्हा संकटं कोसळली, तेव्हा-तेव्हा महिला- आई, बहीण वा नर्स या स्वरुपात – समाजाला एकत्रित ठेवण्यास धावून आल्या. आजच्या कोरोना महामारीच्या साथीतसुद्धा परिचारिका हेच काम करतात. समाज त्यांच्या ऋणात राहील, हेच आपण त्यांना या जागतिक परिचारिका दिवशी आवर्जून सांगण्याची गरज आहे.

17 व्या शतकापर्यंत आपल्या देशातील शुश्रुषेचा सर्व भार गावातील दायी किंवा मूल जन्मायच्या वेळी गर्भिणीला मदत करणारी सुईण यांच्यावरच होती. 17 व्या शतकात पोर्तुगीज सैन्याधिकार्‍यांनी आताच्या नर्सिंगच्या जवळपास जाणार्‍या मिलिटरी नर्सिंगची सोय केली.1664 साली ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास येथे इस्पितळ उभारले गेले. 1797 ला मद्रास येथेच पहिल्या प्रसूतिगृहाची स्थापना झाली. कलकत्ता येथे 1708 मध्ये, मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल 1843 मध्ये, नेय्यूरमधील लंडन मिशन हॉस्पिटल 1838 मध्ये, 1853 मध्ये आग्रा येथे, दिल्ली येथील होली फॅमिली हॉस्पिटल 1855 मध्ये, अमृतसर येथे 1860 मध्ये, मिरज मेडिकल हॉस्पिटल 1892 मध्ये व बेंगलोर येथे बौरिंग हॉस्पिटल अशा प्रकारे भारतात मोठमोठे हॉस्पिटल्स आरोग्य व्यवस्था सांभाळत होते.