शंकर कणसे -
ऑनर किलिंगचे प्रकार रोखणे किंवा ऑनर किलिंग झालेल्या व्यतीच्या कुटुंबीयांना कायदेशीर मदत करणे. या विषयासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणार्या ‘चयन नेटवर्क’ या संघटनेच्या हैदराबाद येथील अधिवेशनासाठी सातारा येथे आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणार्या जोडप्यांसाठी ‘सेफ हाऊस’ उभारणारे शंकर कणसे व रोहिणी कणसे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्या अधिवेशनाचा अहवाल आणि सहभागी झालेल्या विविध राज्यांत काम करणार्या या संघटनांविषयी थोडक्यात माहिती…
आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणार्या जोडप्यांना शासनामार्फत केलेल्या विविध कायद्यांची माहिती देणे, कायदेशीर मार्गाने त्यांना संरक्षण मिळवून देणे, ऑनर किलिंगचे प्रकार रोखणे किंवा ऑनर किलिंग झालेल्या व्यतीच्या कुटुंबीयांना कायदेशीर मदत करणे. या विषयासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणार्या ‘चयन नेटवर्क’ या संघटनेची स्थापना विविध संघटनांच्या सहभागाने २४ नोव्हेंबर २०१२ रोजी दिल्ली येथे झाली होती.
पहिल्या टप्प्यात असोसिएशन फॉर अॅडवोकेसी अँड लीगल इन अॅक्टिव्हिटीज. AALI (लखनऊ-उत्तर प्रदेश) महिला स्वयंरोजगार संघ. MSS (बनारस- उत्तर प्रदेश) धनक (दिल्ली) निरंतर (दिल्ली), सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह दलित मीडिया CADAM.(दिल्ली) या संघटना सामील होत्या. तर दुसर्या टप्प्यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाराष्ट्र), मुस्लीम सत्यशोधक मंडळ, पुणे (महाराष्ट्र), नजरिया फाऊंडेशन (दिल्ली), प्रांतो कथा (कोलकाता), कुला निर्मूलन संगम, हैदराबाद (तेलंगणा), एस. एम.जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन, पुणे (महाराष्ट्र), इंडिया लव्ह प्रोजेक्ट (बेंगलोर), मानव विकास वेदिका कुलांतरा विवाहतुला समक्षेमा संगम (तेलंगणा), मानव विकास वेदिका विचार वेद, पुणे (महाराष्ट्र), ऊर्जा ट्रस्ट महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ-मासूम (महाराष्ट्र), विशाखा मदनम्मकला निर्मूलन संगम (तेलंगणा), मंजुला प्रदीप अहमदाबाद (गुजरात) या व्यक्ती व संघटना सहभागी झाल्या.
चयन नेटवर्क या संघटनेची उद्दिष्टे विवाह आणि नातेसंबंधात निवड करण्याच्या अधिकाराच्या मूल्यांवर काम करणार्या सामाजिक संस्था आणि व्यक्तींचे राष्ट्रीय नेटवर्क तयार करणे, विवाह नोंदणी, विवाह प्रोत्साहन, सुरक्षित घरे (सेफ हाऊस) आणि विशेष कक्षा संबंधित नवीनतम नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट करण्यासाठी मदत करणे. गरजू जोडप्यांना व्यक्तींना जोडीदार निवडीच्या अधिकाराशी संबंधित बातम्या आणि माहिती पोहोचवणे. राज्य आणि केंद्र सरकारशी बोलणी करण्यासाठी दबाव गट तयार करणे. ऑनर किलिंग सारख्या केसमधील कुटुंबीयांना कायदेशीर मदत करणे, राज्यपातळीवर आकडेवारी संकलित करून प्रकाशित करणे असे आहे.
या संघटनेमार्फत विविध राज्यांत परिषदा घेतल्या जातात. अशा पद्धतीची पाचवी राष्ट्रीय परिषद हैदराबाद येथे पार पडली. परिषदेचे नियोजन तेलंगणा राज्यातील जाती निर्मूलनासाठी काम करणार्या कुला निर्मूलन संगम या संघटनेने केले होते. राष्ट्रीय चयन नेटवर्क या संघटनेच्या विविध राज्यांतील एकूण २० संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळची परिषद तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील सुंदरैया विज्ञान केंद्र हैदराबाद येथे दि. ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पातळीवरील प्रोग्रेसिव्ह पॅरेंटिंग ट्रान्सेटिंग बाऊंडरीज विरुद्ध ऑनर बेस्ट या विषयावर पार पडली.
परिषदेपूर्वी सकाळी हैदराबाद शहरातून रॅली काढण्यात आली, त्या दरम्यान सर्व कार्यकर्त्यांच्या हातामध्ये विषयाशी अनुसरून संदेशपर बॅनर होते. रॅलीसमोर तेलंगणा राज्यातील सांस्कृतिक कला सादर करणारे महिला व पुरुषांचे समूह होते. त्यामध्ये विविध वाद्य व महिलांचे टिपरी नृत्य सादर करण्यात आले.
परिषदेचे उद्घाटक तेलंगणा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती डॉ. जी. राधाराणी व प्रमुख पाहुण्या निवृत्त न्यायमूर्ती टी. रजनी या होत्या. अध्यक्षस्थानी ‘कुला निर्मूलन संगम’चे मोहम्मद वाहीद हे होते. सर्व संघटनांच्या वतीने शासनास द्यावयाच्या ठरावाचे वाचन मुस्लीम सत्यशोधक मंडळ, पुणेचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांनी केले. या परिषदेसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही (शंकर कणसे व रोहिणी कणसे) प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो. आम्ही या परिषदेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सातारा येथे सुरू केलेल्या सुरक्षा निवारा (सेफ हाऊस) संकल्पना व आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणार्या जोडप्यांना कार्यकर्ते करत असलेल्या मदतीविषयी माहिती दिली.
सदर कार्यक्रमावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले व नऊ ठराव प्रशासनापुढे मांडण्यात आले.
विविध राज्यांत काम करणार्या या संघटनांविषयी थोडक्यात…
कुला निर्मूलन संगम ही संस्था समाजातून जातीव्यवस्था नष्ट करण्याच्या उद्देशाने १९७२ मध्ये हैदराबाद येथे स्थापना झाली. डॉ. राम मनोहर लोहिया, डॉ. बी. आर. आंबेडकर आणि जाती विरहित आणि समान समाजाची कल्पना करणार्या उल्लेखनीय सुधारकांच्या प्रेरणा आणि वैचारिक मार्गदर्शनातून ही संघटना उदयास आली. या संघटनेच्या स्थापनेत सहभागी असलेल्या प्रमुख व्यतींमध्ये तत्कालीन कायदा सचिव आणि माझी लोकसेवा आयोग सदस्य जगरला- मुडी वीरस्वामी, प्रसिद्ध लेखक आणि विधानसभा समीक्षक सुरमौली, प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ आणि साहित्यिक विद्वान श्री. व्ही. नागेश्वर, माजी शहरी समुदाय विकास संचालक डी. जी. रामा राऊत, बद्री विशाल पिट्टी प्राध्यापक केशवराव जाधव, लवनम आणि इतर अनेक पुरोगामी विचारसरणीचे समाजसुधारक यांचा समावेश होता.
धनक (दिल्ली) : आम्ही अशा जगाची कल्पना करतो, जिथे प्रत्येक व्यतीला लिंग, श्रद्धा किंवा पार्श्वभूमी काहीही असो, हिंसाचार किंवा कौटुंबिक दबावाच्या भीतीशिवाय माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल. धनकचे ध्येय म्हणजे लिंग समानता वाढवणे सामाजिक धार्मिक विविधता स्वीकारणे आणि समाजात प्रेम आणि शांती जोपासणे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणार्या जोडप्यांना कायदेशीर मदत ही संस्था करत आहे.
‘इंडिया लव्ह प्रोजेक्ट” हा प्रामुख्याने instagram द्वारे चालवला जाणारा एक सोशल मीडिया उपक्रम आहे. जो श्रद्धा, जात, वंश आणि लिंगाच्या सीमांच्या पलीकडे जाऊन प्रेमाचा उत्सव साजरा करतो. हे एक इंस्टाग्राम अकाऊंट आहे जिथे लोकांना प्रेम आणि नातेसंबंधाच्या कथा सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाते जे सामाजिक नियमांना आव्हान देण्याचे धाडस करतात आणि धर्म, जात, वर्ग, वंश, वय आणि लैंगिकता या बेड्या तोडतात. ऑक्टोबर २०२० मध्ये तीन माजी पत्रकारांनी सुरू केलेले हे पेज साठ हजारांहून अधिक लोकांच्या समुदायात विकसित झाले आहे.
मानवी विकास मंचची स्थापना १२ सप्टेंबर २००४ रोजी तत्कालीन आंध्र प्रदेशात झाली. ही एक मानवतावादी ना-नफा स्वयंसेवी संस्था आहे जी विभाजनानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दोन राज्यांमध्ये कार्यरत आहे. मानवतावादी जागतिक दृष्टिकोन आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यकर्ते. जातिव्यवस्थांचे निर्मूलन धर्माशिवाय जीवन आणि धर्मनिरपेक्षतेचा प्रवास अशी यांची उद्दिष्टे आहेत.
कुलंथरा विवाहितुला संक्षेमा संगम
या संघटनेची स्थापना २०११ मध्ये केली गेली. तेलंगणा राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आले आहेत आणि संस्थेने आत्तापर्यंत पाचशेहून अधिक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना चालना दिली आहे. हाय प्रोफाईल मंथनी मधुकर पेरू मंडला प्रणय आणि अंबोजी नरेश हत्या प्रकरणानंतर झालेल्या निषेधांमध्ये त्यांनी एक मजबूत, तडजोड न करता भूमिका बजावली आणि पीडितांच्या कुटुंबीयांना पूर्ण पाठिंबा दिला.
‘जन विज्ञान वेदिका’ ही संस्था आंध्र प्रदेशमध्ये १९८८ मध्ये स्थापित झाली असून विज्ञान आणि समाज यांच्यातील दरी भरून काढण्याचे काम करते. सामाजिक विकास आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी वैज्ञानिक ज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देते.
प्रांतकथा या संस्थेची स्थापना २००६ मध्ये कोलकाता येथे झाली. ही एक तरुण नेतृत्वाखाली चालवली जाणारी संस्था आहे. लिंग, लैंगिकता, वर्ग, जात आणि प्रदेश या सर्व प्रकारच्या बहिष्कृत समुदायांमधील तरुणांची ओळख शोधण्यासाठी त्यांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून कृती करण्यासाठी सुरक्षित आणि चिंतनशील जागा निर्माण व्हावी यासाठी ही संस्था काम करते.
ऊर्जा ट्रस्टची स्थापना २०१२ मध्ये मुंबई येथे झाली. या संस्थेची महिलांच्या नेतृत्वाखालील पथके प्रमुख रेल्वे स्थानकावर पोलीस, फेरीवाले, दुकानदार यांच्याशी सहकार्य करत लैंगिक अत्याचारापासून तत्काळ संरक्षण प्रदान करण्याचे काम करतात. आणि त्यांना मार्गदर्शन करत त्या मुंबईतील तरुणींना सुरक्षित समावेशक आश्रयस्थाने प्रदान करण्याचे काम करतात. ‘नाझरिया फाउंडेशन’ (दिल्ली) हा एक समलैंगिक स्त्रीवादी संसाधन गट आहे ज्याची स्थापना २०१४ मध्ये झाली. समलैंगिक आणि ट्रान्स व्यक्तींच्या नेतृत्वाखाली नजरिया समलैंगिक आणि ट्रान्स जीवन दृश्यमान करण्यासाठी आणि LGBTQIA+ व्यक्तींना समान हक आणि संधी मिळू शकतील असे भेदभाव विरहित वातावरण निर्माण करण्यासाठी हा गट कार्य करतो.
विशाखा
ही एक स्वयंसेवी संस्था आहे. देवराला सती निषेधाच्या काळात विशाखा उदयास आली. तिची स्थापना १९९१ मध्ये झाली. विशाखाचे प्रमुख ध्येय म्हणजे मुली, महिलांची स्वतःच्या अधिकारात एक व्यती म्हणून ओळख पुन्हा प्रस्थापित करणे आणि त्यांच्या हकांचे संरक्षण करणे, त्यांच्यावरील हिंसाचाराला आव्हान देणे त्यांना विकास आणि कल्याणाच्या संधी मिळवून महिला, मुली, युवक आणि समुदायाच्या वैयतिक आणि सामूहिक सक्षमीकरणासाठी काम करणे त्यासाठी प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा २०१३ चा आधार घेतला जातो.
संवाद (कर्नाटक)
१९९२ मध्ये स्थापन झालेली संवाद ही संस्था कर्नाटकातील दुर्लक्षित समुदायातील तरुण-तरुणींना सामाजिकदृष्ट्या न्यायी आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी संवेदनशील आणि सक्षम बनवत आहे. ट्रान्स हक हे मानवी हक आहेत आणि प्रत्येकाला त्यांच्या खर्या स्वभावाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, असे त्यांचे म्हणणे असून त्यासाठी ते काम करतात.
राष्ट्रीय महिला नेत्यांची परिषद ही महिला मानवाधिकार रक्षक, तळागाळातील कार्यकर्ते आणि समुदाय नेत्यांची एक युती आहे, जी संपूर्ण भारतात लैंगिक न्याय आणि समानता वाढविण्यासाठी काम करते. दलित, आदिवासी, बहुजन, अल्पसंख्याक आणि समलैंगिक महिलांचा आवाज उठवते.
मुडनम्मकला निर्मूलन संगम-मनसे (कर्नाटक)
या संस्थेची स्थापना १७ सप्टेंबर २०२३ रोजी हैदराबाद येथे डॉ. बैरी नरेश यांनी केली आहे. ही संस्था तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशामध्ये सक्रिय आहे. बुद्ध, फुले, पेरियार आणि आंबेडकर यांच्या भावनेतून प्रेरणादायी प्रवास आणि शैक्षणिक दौरे आयोजित केले जातात.
– शंकर कणसे
(राज्य कार्यवाह, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्य केंद्र)
संपर्क : ९९२२३ ५५४३५
