निमित्त “हिजाब”चे : शोध धर्मनिरपेक्ष भूमीचा… मार्ग धर्मचिकित्सेचा

डॉ. हमीद दाभोलकर -

धर्म ही मानवी समूहाच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर प्रचंड प्रभाव टाकण्याची क्षमता बाळगणारी एक यंत्रणा आहे, हे वास्तव धर्मसंस्थेचे कठोर टीकाकार देखील नाकारू शकत नाहीत. आपल्या देशात सध्याचा कालखंड हा धर्मश्रद्धा आणि त्याभोवती गुंफलेले राजकारण यांनी मोठ्या प्रमाणात व्यापलेला आहे. एका बाजूला देशाच्या संविधानात असलेली धर्मनिरपेक्षता आणि दुसर्‍या बाजूला सार्वजनिक जीवनात व राजकारणात धर्माचा प्रभाव वाढवा, यासाठी चालू असलेले ‘नियोजनबद्ध’ प्रयत्न हे आजचे वास्तव आहे. या ताणांच्यामधून निर्माण होणार्‍या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रोजच आजूबाजूला झडत असल्याचे आपण पाहतो आहे. आपले वैयाक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन रोज नव्याने ढवळून निघत आहे. “हिजाब”च्या निमित्ताने होत असलेली चर्चा हे त्या वादाचे सध्याचे नवे रूप. एका बाजूला हिंदू धर्मातील कट्टरपंथीय आणि दुसर्‍या बाजूला मुस्लिम धर्मातील कट्टरपंथीय यांच्या लढाईमध्ये समाज म्हणून आपण सगळे भरडून निघत आहोत. ‘एक तर तुम्ही आमच्या बाजूला असाल, नाहीतर आमचे शत्रू असाल,’ अशा प्रकारे सगळे जग केवळ काळे किंवा पांढरे या दोनच रंगात रंगवण्याचा ‘सामाजिक आजार’ आपल्याला ग्रासत आहे. हिंदू कट्टरपंथीय लोकांचे हस्तक किंवा मुस्लिम कट्टरपंथीय लोकांचे हस्तक असणे यापलिकडे जणू काही दुसरी कोणती संयत, संतुलित आणि विवेकी भूमिका शिल्लकच नाही, असा एक आभास आपल्या आजूबाजूला उभा राहिला आहे. “हिजाब”च्या वादाच्या निमित्ताने ही हरवलेली धर्मनिरपेक्ष भूमी कोणती आणि ती शोधण्यासाठी विधायक संवादी धर्मचिकित्सेचा रस्ता कशी मदत करतो, याविषयी समजून घेणे अगत्याचे आहे, असे वाटते.

“हिजाब”वादाच्या मधले प्रमुख मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाळा किंवा महाविद्यालयाने एक पोशाख निश्चित केला असताना आपल्या धार्मिक, जातीय, पंथीय ओळखी वेगळ्या दाखवणारे पोशाख किंवा दृश्य खुणा आपल्या अंगावर ठेवू नयेत, हा मुद्दा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाच्या दृष्टीने योग्यच आहे. आज मुंबईसारख्या अनेक मोठ्या बहुभाषक आणि बहुसांस्कृतिक शहरात अनेक शाळा हे पथ्य पाळतात आणि त्यामध्ये यशस्वी देखील होतात. समाजाने तारतम्य पाळायचे ठरवले तर हे इतके सोपे होऊ शकते. भारतासारख्या विविध भाषा, प्रांत, धर्म असलेल्या देशात त्याचा फायदा सगळ्या समाजालाच होतो. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी सोडल्या, तर आपल्या सार्वजनिक जीवनात आपण धर्म आणू नये, या अर्थाने जेव्हा आपण धर्मनिरपेक्षता घेतो, त्या पार्श्वभूमीवर हे पथ्य समजून घेता येते. नेदरलँड्स, फ्रान्ससारखे देश देखील कायदा करून असे नियम पाळतात. केवळ एवढेच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी वावरताना देखील हे पथ्य पाळण्याविषयी कायदा करतात, हे पथ्य न पाळणार्‍या लोकांना शिक्षा देखील होते. हे झाले कठोर धर्मनिरपेक्षता राबवणारे मॉडेल. धर्मनिरपेक्षतेचे हे मॉडेल वापरताना वरील नियम समाजातील सगळ्या धर्मांना आणि सर्व प्रकारच्या सार्वजनिक व्यवहारात लावणे अपेक्षित आहे. केवळ शिकायला येणार्‍या मुस्लिम मुलींपुरता हा अपवाद करता येणार नाही. त्याच्याही पुढे जाऊन हा कायदा राबवणे हे शासनाच्या हातात असेल. दुसर्‍या धर्मातील लोक दंडेलशाही करून याची अंमलबजावणी करू लागली तर तो देखील गुन्हाच ठरेल.

दुसरा मुद्दा आहे, पुरुषसत्ताक मानसिकता आणि धर्मसत्ता यांच्या अभद्र युतीचा. सर्व धर्मातील मुलींना पुरुषसत्ता, जात आणि धर्मसत्ता यांच्या विरुद्ध लढाई लढतच शिक्षण घ्यावे लागत असते. मुस्लिम समाजात तर हे दमन अधिकच आहे. शिक्षण मिळवण्यासाठी त्या समाजातील कट्टरपंथीय लोकांच्या मोठ्या विरोधाला या मुलींना सामोरे जावे लागत असते. “हिजाब”वरील राजकारणात त्यांच्या शिक्षणाचा बळी दिला जाऊ नये एवढी संवेदनशीलता तरी आपण दाखवणार का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की, मुस्लिम समाजातील धर्मांध शक्तींना देखील हा प्रश्न आयते कोलीत हाती दिल्यासारखे आहे. त्या मधूनच ते ‘पहले ‘हिजाब’, फिर किताब’ ही आपल्याच समाजातील मुलींच्या शिक्षणाची जराही काळजी नसलेली घोषणा देतात. त्यामधून केवळ आपला धार्मिक वर्चस्ववादी अजेंडा रेटत राहतात. शेवटी स्वत:चा निर्णय घेण्याचे अत्यंत मर्यादित स्वातंत्र्य असलेल्या मुलींच्या शिक्षणाचा बळी दिला जातो.

सातत्याने धार्मिक प्रश्न चर्चेला उचलले जात आहेत. त्या मागची ठरलेली एक पद्धत आपण समजून घ्यायला पाहिजे. ‘लव्ह जिहाद’च्या नावाने आंतरधर्मीय विवाहांना विरोध, एका सोसायटीमध्ये हिंदूच किवा मुस्लिमच राहतील आणि मिश्रधर्मीय वस्त्या निर्माण होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणे. याचे पुढचे पाऊल म्हणजे धर्मनिहाय शिक्षण वेगवेगळे करणे, असे करत समाजाचे धर्मनिहाय ‘घेट्टो’ तयार करायचे, हा तो प्रयत्न आहे. त्याच्या माध्यमातून समाजाला सातत्याने धार्मिक तणावाच्या उंबरठ्यावर ठेवता येते. हे त्या मागचे साधे, सोपे गणित आहे. सामान्य नागरिक म्हणून आपण समजून घेण्याची गोष्ट ही की, निवडणुका तोंडावर आल्या की हे वाद बरोबर पुढे येतात. शिक्षण, आरोग्य, रोजगार हे सगळे प्रश्न एका झटक्यात बाजूला होतात. कोविडमुळे शिक्षणाची आणि आरोग्याची झालेली वाताहत विसरली जाते, बेरोजगारीने झालेल्या आत्महत्या विसरल्या जातात. नागरिक आणि मतदार म्हणून आपल्या सोबत परत-परत हा खेळ खेळला जातो आणि आपण देखील काहीही विचार न करता परत-परत याला बळी पडतो!

वरवर पाहता शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात ‘ड्रेस कोड’ पाळावा आणि “हिजाब” वापरू नये ही मागणी धर्मनिरपेक्षतेच्या दिशेने टाकलेले पाऊल वाटते. थोडे डोळे उघडून पहिले तर लक्षात येईल की, जे राजकीय पक्ष ही मागणी करत आहेत, त्यांनाच नाही तर त्यांच्या विरोधकांना देखील शासन आणि राजकीय पक्षांनी धर्मनिरपेक्ष असावे, याविषयी जराही ममत्व नाही! केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाची तर अधिकृत भूमिकाच धर्म आणि राजकारण यांच्या सरमिसळ करण्यातून निर्माण झाली आहे. ‘एमआयएम’ हा दुसर्‍या बाजूला असलेला पक्ष देखील याचमधून आपली राजकीय भूमिका घेतो. गंमत म्हणजे काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि सुरुवातीपासून धर्मनिरपेक्षतेविषयी आग्रही असणारे डावे पक्ष देखील याला आता अपवाद राहिले नाहीत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी मंदिर, आरत्या, दर्गेयांच्या भेटींचा सपाटा लावला आहे. अरविंद केजरीवाल सर्वधर्मीय लोकांना त्यांच्या-त्यांच्या धर्मस्थळांना फुकट भेट घडवून आणत आहेत. सध्याच्या समाजवादी आणि राष्ट्रीय जनता दलाच्या विषयी न बोललेच बरे; आणि राहता राहिला कम्युनिस्ट पक्ष, त्यांच्या जनसंघटनादेखील कृष्ण जन्माष्टमीसारखे सण सार्वजनिकरित्या साजरे करू लागल्या आहेत. या सगळ्यांमध्ये फरक पडला असेल तर तो एवढाच की, पूर्वी सत्तेत असलेले काँग्रेससारखे पक्ष अल्पसंख्याक समाजातील कट्टरपंथीय लोकांचे लांगुलचालन करत होते. आता सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्ष त्याला उत्तर म्हणून बहुसंख्य समाजातील कट्टरपंथीय लोकांचे लांगुलचालन करीत आहेत!

खरोखरच धर्मनिरपेक्षता आपल्या समाजात आणायची ठरवली तर काय करावे लागेल, याचा आपण विचार करून बघूया. हे करायचे म्हटले तर आपल्याला शासकीय कार्यालये ही कोणतेही धार्मिक सण आणि विधींपासून आपल्याला दूर ठेवावी लागतील. विविध धर्मांच्या देवदेवतांची नावे ही शाळा-कॉलेजला देणे बंद करावे लागेल. शासकीय कार्यालयातील सर्वधर्मीय देवदेवतांच्या तसबिरी दूर करायला लागतील. शाळेत साजरे होणारे धार्मिक सण, धार्मिक प्रार्थना अशा सर्व गोष्टी थांबवाव्या लागतील. “हिजाब”प्रमाणेच विविध धर्मांतील शरीरावर दर्शनी भागात वागवली जाणारी अनेक प्रतीके ही शासकीय अशा कोणत्याही कार्यालयात किंवा शिक्षण संस्थेमध्ये वापरणे टाळावे लागेल! ही यादी खूप वाढू शकते. केवळ एवढेच नाही तर राजकीय पक्षांना देखील सार्वजनिक जीवनात धर्माचा वापर टाळावा लागेल. निवडणुकांच्या प्रचारामध्ये देखील धर्म आणता येणार नाही! हे करताना आपण केवळ आणि केवळ समाजहित या व्यापक विचाराचे असू. त्यामागे कोणत्याही धर्मचा अवमान करण्याचा किंवा त्याला समाजजीवनात दुय्यम स्थानी ढकलून आपले वर्चस्व प्रस्थापित करणे असा अजेंडा नसेल. आज तरी आपल्या देशात हा धर्मनिरपेक्षतेचा प्रदेश हे दिवास्वप्न वाटते.केवळ एवढेच नाही, तर या दिशेच्या बरोबर उलट्या दिशेने अत्यंत वेगाने आपला प्रवास चालू आहे, हे देखील आपण रोजच्या जीवनात अनुभवतो आहे. दुसर्‍या बाजूला कठोर धर्मनिरपेक्षता राबवताना जी जोरजबरदस्ती होते, त्याचा मोठा धक्का हा सामाजिक सौहार्द्राला लागतो. फ्रान्समध्ये याचा अनुभव गेल्या काही वर्षांत अनेक वेळा आला आहे. मग यावर पर्याय म्हणून सर्वधर्मसमभाव हा मार्ग शोधला जातो. सगळ्या धर्मांच्या प्रार्थाना शाळेत घ्या, सगळ्या धर्मांचे सण शाळेत साजरे करा, सगळ्या धर्मांच्या लोकांना तीर्थयात्रेला शासनाच्या खर्चाने घेऊन जावा! असे आम आदमी पक्षाने सुरू केले तसे सर्वधर्मसमभाव मॉडेल सुरू होते. एकदा का धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ आपण सुरू केली की, आपल्या जगण्या-मारण्याच्या प्रश्नांवरून आपले लक्ष हटवणे राजकीय पक्षांना सहज शक्य होते. भारतासारख्या देशात तर हे अगदीच सोपे होते. याचे साधे कारण म्हणजे आपल्या धर्माशी लोकांच्या भावना खूप नाजूकपणे गुंतलेल्या असतात आणि त्यांचा गैरवापर करणे कायमच सोपे असते. सर्वधर्मसमभावाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर व्यापक भूमिका घेऊन असे म्हणता येऊ शकेल की, जी धर्मनिरपेक्ष भूमी आपण शोधू इच्छित आहोत, त्या दिशेने चालताना येणारा एक टप्पा म्हणून याकडे आपण बघू शकतो.

या परिस्थितीमध्ये धर्माचा संबंध हा केवळ वैयक्तिक आयुष्याच्या पुरता मर्यादित असावा आणि बाकीच्या सार्वजनिक आणि राजकीय गोष्टी या धर्मापासून दूर ठेवाव्यात, असे वाटणार्‍या लोकांच्या पुढे काय पर्याय उरतात, हा लाखमोलाचा प्रश्न झालेला आहे. त्याचे उत्तर शोधण्यासाठी, ही धर्मनिरपेक्ष भूमी कशी आकार घेऊ शकते, याचे विधायक, संवादी, कृतिशील, धर्मचिकित्सेमधून धर्मनिरपेक्षतेकडे जाणारे मॉडेल समजून घ्यावे लागेल.

‘शतकानुशतकांच्या धर्मभावना बदलण्यासाठी काही दशकांचे तरी विधायक, जोरकस तरीही संवादी प्रबोधन लागते’ आणि धर्मनिरपेक्ष समाजमन तयार करण्याचा रस्ता हा अशा संवादी धर्मचिकित्सेच्या पोटातूनच जातो, ही त्यामागची दोन महत्त्वाची सूत्रे आहेत. धर्मचिकित्सेला देखील तयार नसलेल्या समाज आपोआप धर्मनिरपेक्षतेच्या रस्त्यावर चालू लागेल, अशी आशा करणे म्हणजे बालवाडीमधील मुलाने, मधील कोणत्याच वर्षाचा अभ्यास न करता एकदम दहावीची परीक्षा देऊन पास होण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

हे केवळ एक वैचारिक प्रारूप नाही तर कुठल्याही जोर-जबरदस्तीपेक्षा सातत्यपूर्ण, विधायक, संवादी आणि कृतिशील धर्मचिकित्सा हे सूत्र खूप उपयोगी पडते, असा गेल्या अनेक वर्षांतील ‘महाराष्ट्र अंनिस’च्या कामातील अनुभव आहे. डॉ नरेद्र दाभोलकरांनी त्यांच्या कार्यातून आणि लेखनातून अनेक ठिकाणी ही दिशा आपल्याला दाखवलेली आहे. त्याची काही उदाहरणे देतो, म्हणजे या परिस्थितीला कसे सामोरे जाता येऊ शकेल, याचा अंदाज येऊ शकेल.

सुरुवात होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या देव आणि धर्मविषयक भूमिकेपासून. त्या भूमिकेनुसार ‘अंनिस’मध्ये सहभागी होण्यासाठी देव आणि धर्म नाकारणे आवश्यक नाही. भारतीय संविधानाने दिलेला देव आणि धर्म मानण्याच्या अधिकाराचा आम्ही सन्मान करतो. असे असले तरी, जिथे-जिथे धर्माच्या नावावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शोषण होत असते, त्याला मात्र विरोध करणे हे आम्ही आपले कर्तव्य समजतो. आपल्या श्रद्धांची चिकित्सा केल्याशिवाय शोषण होते की नाही, हे ठरवणे अशक्य आहे. त्यामुळे समाजातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी आपापल्या श्रद्धा तपासून घेण्याचा प्रयत्न करावा असा ‘अंनिस’चा आग्रह असतो. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून आपल्या श्रद्धांचा कोणी गैरफायदा तर घेत नाही ना, याविषयी सतत संवाद साधत राहणे, ही ती कार्यपद्धती असते. आपला देव आणि धर्म ही केवळ वैयक्तिक बाब आहे आणि त्याचा दुसर्‍याला त्रास होईल, अशी अभिव्यक्ती करू नये. त्यामधून दुसर्‍या व्यक्तीचे शोषण तर अजिबात होऊ देऊ नये, हा विचार धर्मचिकित्सेशिवाय पुढे येऊ शकत नाही आणि या विचारांशिवाय धर्मनिरपेक्ष समाजमन तयार होणे हे दुरापास्त आहे.

पर्यवरणपूरक गणपती, फटाकेमुक्त दिवाळी आणि नववर्ष, जादूटोणाविरोधी कायदा, होळी लहान करा-पोळी दान करा, बकरी ईदला पशुबळी देण्याऐवजी रक्ताची अथवा आर्थिक कुर्बानी देणे, हे ‘अंनिस’च्या पुढाकाराने सुरू झालेले उपक्रम आहेत. यामधले अनेक उपक्रम तर आज शासन आणि समाजमान्य झाले आहेत. या स्वरुपाच्या धर्मचिकित्सेसाठी असलेली चार फार महत्त्वाची पथ्ये आहेत, ती खालीलप्रमाणे वरील सर्व गोष्टींना ते लावले तर –

1. विधायकता : आपल्याला सहज लक्षात येते की पर्यवरणपूरक सण करणे ही मुळातूनच विधायक आहे, हा विचार हळूहळू का होईना समाजाला मान्य होणारी गोष्ट आहे.

2. कृतिशीलता : अशा स्वरुपाच्या सुधारणा घडवून आणायच्या असतील तर केवळ ‘बोलके’ सुधारक होणे पुरेसे होत नाही, त्यासाठी लोकशाही मार्गाने समाजमनाला साद घालणार्‍या छोट्या-छोट्या कृती करायला लागतात; जसे की, गेली कित्येक वर्षे प्रत्येक वर्षी दिवाळी, गणपती आणि होळीच्या वेळी ‘अंनिस’ कार्यकर्तेशाळा-शाळांमध्ये जाऊन मुलांना याचे महत्त्व समजून सांगत आणि आजमितीला काही कट्टरपंथीय संघटना सोडल्या तर अनेक गणपती मंडळे, धार्मिक संघटना देखील यामध्ये सहभागी होतात. अनेक कार्यकर्तेबकरी ईदला मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत स्वत: रक्तदान करतात. ही झाली कृतिशीलता. यामधली कोणतीही कृती स्वत: म्हणून खूप मोठी नाही. पण अनेक लोक जेव्हा विचार समजून ती कृती करू लागतात, तेव्हा समाजमनावर त्याचा परिणाम पडू लागतो.

3. संवाद : या स्वरुपाच्या धर्मसुधारणा जबरदस्तीने लादून कधीच साध्य होत नाहीत. फ्रान्ससारख्या देशाने कठोर पद्धतीने कायद्याचा धाक दाखवून धर्मनिरपेक्ष समाज निर्माण करण्याच्या प्रयत्नात समाजातील सौहार्द्र मोठ्या प्रमाणात कमी झाले, हे आपण जग म्हणून बघितले आहे आणि इराणसारख्या देशात “हिजाब” घेणार नाही म्हणून महिला रस्त्यावर उतरल्याची घटना फार जुनी नाही. हे घडण्यासाठी समाजमनाशी सातत्याने संवाद साधण्याची तयारी ठेवावी लागते, अनेक वेळा माघार घ्यावी लागते.

4. सातत्य : विधायक, कृतिशील, संवादी धर्मचिकित्सेचे प्रयत्न करताना सातत्याने आपल्या उद्दिष्टांविषयी शंका घेतली जाते. आपल्याला धर्मद्रोही ठरवले जाते, टिंगल-टवाळी, ढीेश्रश्रळपस यांनी पण तुम्ही थांबला नाहीत, तर जीवावर देखील बेतू शकते. या सगळ्यासकट जर आपण सतत विधायक, संवादी आणि कृतिशील धर्मचिकित्सा करत राहिलो तर हळूहळू का होईना काही लोकांना याचे महत्त्व पटू लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोकांची देव आणि धर्म मानण्याची भावना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न न करता, ‘ईश्वरकेंद्री धर्म अधिकाधिक मानवकेंद्री करण्याचा प्रयत्न करता येतो.

जसे सर्व धर्मांतील कट्टरपंथीय हे एकमेकांशी सकृत्दर्शनी भांडताना दिसत असले, तरी अंतिमत: कट्टरपंथीय असण्याला बळ देत असतात. तसेच विविध धर्मांतील सत्प्रवृत्तीचे लोक आणि वैयक्तिक जीवनात देव आणि धर्म न मानणारे लोक देखील याबाबतीत एकमेकांना बळ देऊ शकतात. यासारख्या विचारांतूनच मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि ‘महाराष्ट्र अंनिस’सोबत येऊन ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ असे बकरी ईदला बोकडबळी देण्याऐवजी रक्तदानाचा उपक्रम राबवतात. वसईसारख्या ख्रिश्चन लोकसंख्या जास्त असलेल्या एका भागात ‘विवेक मंच’ नावाचा ख्रिश्चन बांधवांचा एक विज्ञानवादी गट तयार होतो आणि मोठ्या धीराने चर्चमधील चुकीच्या गोष्टींना प्रश्न विचारू लागतो. यामधील कोणालाही धर्माच्या नावाने राजकारण करून मते मिळवायची नसतात. ते देव आणि धर्म मनात असतील किंवा नसतील, ती त्यांची पूर्णपणे खासगी बाब असते. त्याचा गैरवापर करून राजकारण आणि समाजकारण करू इच्छिणार्‍या लोकांच्या सत्ताकांक्षी प्रेरणांविषयी ते जागरूक असतात. क्रोधापेक्षा करुणा आणि उपहासापेक्षा आपुलकी हे तत्त्व राखून ते पुढे जाऊ इच्छितात. जेव्हा आपल्या देशातील बहुतांश राजकीय पक्षांनी या धर्मनिरपेक्ष समाजमन घडण्याच्या लढाईमधून काढते पाऊल घेतले आहे, तेव्हा ती लढाई आपल्याला विधायक, कृतिशील, सातत्यपूर्ण धर्मचिकित्सेचे छोटे-छोटे वैयक्तिक आणि सामाजिक लढे लढूनच टिकवावी लागणार आहे. धीर देणारी बाब म्हणजे अजून तरी आपली राज्यघटना आणि या देशातील समाजसुधारकांची परंपरा देखील आपल्या बाजूला आहे.

आपल्या देशातील कोणताही राजकीय पक्ष हा नजीकच्या काळात राज्य शासन आणि धर्म यांची फारकत असावी, अशी भूमिका घेण्याची कोणतीही शक्यता दिसत नसताना “हिजाब”चा वाद हे केवळ एक निमित्त आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. असे अनंत वाद येत्या कालखंडात पुढे येणार आहेत, मुद्दाम पुढे आणले जाणार आहेत. या परिस्थितीला सामोरे जायचे असेल तर आपल्या दैनंदिन जीवनातील देव आणि धर्मविषयक संकल्पनांची विधायक चिकित्सा करायला तयार राहावे लागेल. ही चिकित्सेची सुरुवात आपला जन्म झाला त्या धर्मातून करावी लागेल. देव आणि धर्म यांच्या नावावर होणारे शोषण नाकारावे लागेल आणि आपला धर्म ही अत्यंत खासगी बाब आहे, त्याला सार्वजनिक जीवनात न आणण्याचे प्रयत्न करावे लागतील. आपल्या कुटुंबात हे बोलावे लागेल. थोडासा धोका पत्करून शक्य तिथे समाजात हे बोलावे लागेल. धर्मनिरपेक्ष समाजमन घडवायचे असेल तर याला पर्याय नाही. हे जर आपण करू शकलो, तरच त्यामधूनच धार्मिक कट्टरपंथीय आणि पुरुषसत्ताक मानसिकतेच्या ताकदीला तोंड देऊन शिक्षणासाठी रस्त्यावर उतरणार्‍या उद्याच्या सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख जन्म घेतील. सध्याची कोंडी फोडण्याची तीच एक दिशा आज समोर दिसत आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]