डॉ. शंतनु अभ्यंकर - 9822010349
कोरोनाने सगळ्या जगाला टेकीस आणले आहे. नाकातोंडाला मुसकी आली. ओंजळीत शुद्धोदकाचे तीर्थ आले (Sanitizer). अखंड हरताळ आले. भरवशाचे आधुनिक वैद्यक चक्क चाचपडू लागलेले पाहून अक्सिर इलाजाचे छातीठोक दावे करणारे छद्मोपचार उदंड झाले. आपण कोरोनाचा असा अनेकांगांनी सामना केला आहे.
पण आता लसीच्या निमित्ताने प्रथमच काही आशेचा किरण दिसायला लागला आहे. ब्रिटनच्या मार्गरेट कीनन या नव्वदीच्या वृद्धेला लसीचा पहिला डोस देण्यात आला. शक्यता अशी आहे की, या आजीबाई विज्ञानाच्या इतिहासात अमर होतील, बहुतेक. कारण त्यांना दिली गेली आहे ती ‘एम्-आरएनए’ प्रकारची लस.
कोरोनाविरुद्ध संभाव्य प्रतिबंध म्हणून नव्वदेक प्रकारच्या लसी शर्यतीत आहेत. हे तसं नेहमीचंच. कोणतंही नवं औषध शोधायला गेलं की, अनेक संभाव्य उमेदवार ‘मी-मी,’ म्हणत हात वर करतात. मग परीक्षेअंती या सार्यांतून सर्वांत सुयोग्य उमेदवाराची सरशी होते.
व्हायरस करतात तरी काय?
शरीरात शिरताच व्हायरसच्या अंगावरील प्रथिन-काटे (Spike proteins) कपड्याला चिकटगुंडा चिकटावा, तसे आपल्या पेशींना चिकटतात. मग व्हायरस पेशींत शिरतात. तिथल्या निर्मितिप्रक्रियेचे अपहरण करतात आणि आपल्या पेशींना, त्यांचे नेहमीचे काम सोडून, अधिक व्हायरस निर्माण करायला उद्युक्त करतात. व्हायरसची पिल्ले मग पेशीतून बाहेर पडतात आणि अन्य पेशींत हाच कार्यक्रम उरकू लागतात.
अर्थात, इतकं सगळं होईपर्यंत आपलं शरीर काही गप्प बसत नाही. आपल्या पेशी (Antigen presenting cells) मग व्हायरसना पकडून त्यांचा योग्य तो भाग ‘टी हेल्पर पेशीं’ना सादर करतात. चवताळलेल्या टी पेशी; मग व्हायरसने घर केलेल्या पेशी संपवून टाकतात. बी पेशी व्हायरसविरुद्ध रासायनिक अस्त्र (Antibodies) डागतात. बहुतेकदा आपला विजय होतो. लढाई संपते. या सार्याचा लेखाजोखा भावी संदर्भासाठी प्रतिकारशक्तीच्या स्मरणात नोंदला (Memory cells) जातो. यदा-कदाचित पुन्हा या व्हायरसने काही आगळीक केलीच, तर साहजिकच आपला प्रतिसाद अधिक जलद, अधिक जोरकस आणि अधिक प्रभावी असतो.
लस म्हणजे काय?
लस देणे म्हणजे या आपल्या प्रतिकारशक्तीला प्रशिक्षित करणे. हे करण्याचे अनेक मार्ग आहेत. यासाठी प्रत्यक्ष व्हायरसऐवजी प्रतिकारशक्तीला त्याचे अशक्त रूप तेवढे ‘नजर’ केले जाते. तापवून किंवा काही रसायने वापरून किंवा व्हायरसची गुणसूत्रे विस्कटून तो अशक्त करता येतो. ही शेवटची युक्ती वापरून ‘कोडाजेनीक्स-सीरम’ची लस पुण्यात बनत आहे किंवा दुसर्याच एखाद्या व्हायरसद्वारे (Viral vector) शत्रू-व्हायरसची; म्हणजे इथे कोरोनाची नेमकी गुणसूत्रे प्रतिकारशक्तीला ‘नजर’ केली जातात. उदाहरणार्थ ‘इबोला’विरुद्धच्या अशा लसीत गोवराचा अशक्त केलेला व्हायरस वापरला आहे. हा पेशींत शिरून प्रसवतोदेखील. त्यामुळे लसीचा परिणाम बराच वाढतो आणि बराच काळ टिकतोही किंवा व्हायरसच्या अंगावरची अनन्य प्रथिने ‘नजर’ केली जातात. कोरोनाच्या चित्रातले ते अतिपरिचित काटे म्हणजे एक प्रकारची प्रथिनेच आहेत. त्यांच्या सोबतच्या ‘एम-प्रथिनां’वरही प्रयोग चालू आहेत. अशा प्रकारच्या लसींच्या बरोबरीने काही (प्रतिकार) शक्तिवर्धके (Adjuvants) द्यावी लागतात. त्याशिवाय त्यांचा अपेक्षित परिणाम दिसत नाही.
‘व्हायरस’ म्हणजे बाहेर प्रथिनांचे फोलपट आणि आत ‘डीएनए’ किंवा ‘आरएनए’चा दाणा अशी रचना असते. अनेक लसींत निव्वळ प्रथिनांचे फोलपट (Virus like particle) सादर करूनच काम भागते किंवा फोलपटाऐवजी प्रतिकारशक्तीला त्यातील फक्त ‘डीएनए’ अथवा ‘आरएनए’ ‘नजर’ केले जातात. ‘डीएनए’ इलेक्ट्रॉपोरेशनने (विजेने छिद्रे पाडून) आणि ‘आरएनए’ मेदावगुंठीत (Lipid coat) स्वरुपात पेशींत सोडता येतो. हे ‘डीएनए’ किंवा ‘आरएनए’चे रेणु आपल्या पेशीत शिरतात. आपल्याच पेशींतील यंत्रणा वापरून तिथेच पिल्लावतात. त्यांचे अधिकाधिक रेणु तयार होतात. ते प्रतिकारशक्तीच्या नजरेस पडताच प्रतिबंधक शस्त्रास्त्रे निर्माण होतात. आपण म्हणतो, या लसीने प्रतिकारशक्ती निर्माण झाली बरं का.
एम्.- आर.एन.ए. लस
यातल्याच एम्. आरएनए (Messenger RNA) या प्रकारच्या लसीने सध्या वैद्यकविश्वात खळबळ माजवली आहे. एम्.- आरएनए लसीचा हा पहिलाच प्रयोग आहे. फायझर, मॉडर्ना वगैरे कंपन्यांनी ही विकसित केली आहे.
हे एम्.-आरएनए आपल्या पेशीपेशींत असतातच. अमुक एक प्रथिन बनवा, अशा निरोपाच्या चिठ्ठ्या आपल्या ‘डीएनए’कडून प्रथिननिर्मिती केंद्राकडे (Ribosome) घेऊन जाणारे हे क्षणभंगुर निरोपे. कीनन आज्जींना टोचलेली लस म्हणजे एक निरोपाची चिठ्ठीच आहे. यावर, ‘करोनाची अमुक-अमुक प्रथिने बनवा,’ असा निरोप लिहिलेला आहे. हुकुमाचा ताबेदार ‘रायबोसोम.’ तो हुकूम पेशीपेशींत अमलात आणणार आहे. कोरोनाची काही प्रथिने निर्माण होणार आहेत. ही प्रथिने म्हणजे संपूर्ण कोरोना व्हायरस नव्हे; कोरोनाची झलक मात्र आहे. पण चवताळून उठायला, प्रतिरोधक शस्त्रे-अस्त्रे तयार करायला तेवढे पुरते. तेव्हा ही दृष्टीस पडताच आजींची प्रतिकारशक्ती प्रतिबंधक शस्त्रास्त्रे निर्माण करणार आहे!
थेट आपल्या प्रथिननिर्मिती यंत्रणेलाच आदेश देणारा असा निरोप्या शरीरात सोडायचा, म्हणजे जरा धोक्याचंच वाटतं, नाही का? काही दगाफटका झाला तर…? पण अशी भीती अनाठायी आहे. हा निरोप आणि तो निरोप्या यांना मर्यादित आयुष्य आहे. क्षणभंगुर आहेत ते. काम झाले की ती चिठ्ठी फाडून टाकली जाते, निरोप्या नष्ट केला जातो.
अशा प्रकारच्या लसी आधीच आल्या असत्या; पण आपल्या प्रतिकारशक्तीचे पहारे चुकवून आत शिरेल, असा एम्. आरएनए, त्याला पांघरायला घोंगडी (Delivery vehicle) वगैरे बनवणे आजवर शक्य झाले नव्हते. आता कोरोनाकृपेकरून हे शक्य झालं आहे. या एम्.-आरएनएत ‘ध’चा ‘मा’ करून हे शक्य झाले आहे. युरिडिनच्या (Uridine) जागी छद्मयुरिडिनची (Pseudo Uridine) योजना केलेला एम्.-आरएनए आपल्या प्रतिकारशक्तीचे पहारे चुकवून बिनबोभाट आत शिरू शकतो.
हे शक्य होतंय, हे पाहून शास्त्रज्ञ मोहरून गेले आहेत. कारण हीच युक्ती वापरून उद्या इतरही अनेक लसी बनवता येतील. कोरोनाच्या जागी कोणी नवा कर्दनकाळ उभा ठाकला, तर ही झटपट, स्वस्त, सुरक्षित आणि सोपी युक्ती वापरून नवी लस बनवता येईल. भविष्यातील साथीच्या संभाव्य व्हायरसविरुद्ध आधीच लसीची बेगमी करता येईल. ‘सर्दी-जुकाम से परेशान’ होण्याऐवजी कदाचित लसच येईल. कदाचित कॅन्सररोधक संदेश धाडता येतील, कदाचित पार्किनसन्स, अल्झायमर्स आटोक्यात आणता येईल. कदाचित 2020 हे वर्ष इतिहासात कोरोनाच्या अशुभ कहराचे वर्ष म्हणून नोंदले जाईलच; पण कदाचित एम्. -आरएनए लसीच्या शुभारंभाचे वर्ष म्हणूनही नोंदले जाईल.
म्हणूनच, न भूतो; पण नक्कीच भविष्यवति अशा या लसीचे हार्दिक स्वागत!