डॉ. लागू गेले त्या रात्री अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत घडलेली गोष्ट

मुक्ता दाभोलकर -

आठ दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र अंनिस’च्या मुंबई शाखा बैठकीच्या वेळी 8-10 तमिळ स्त्री-पुरुष, ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना भेटायला आले. त्यांच्या वस्तीतील मंदिरात एका अघोरी बाबाने ठाण मांडले होते. बाबा व त्याच्या चेल्यांकडून भूत उतरविण्याच्या नावे लहान मुलांना मारहाण, रात्री पांढरी वस्त्रे परिधान करून स्त्रियांना घुमायला लावणे, बाबाचा नाच इ. प्रकार चालू असल्याचे कळले. बाबाच्या या प्रकारांचे व्हिडीओ त्यांच्याकडे होते. हा प्रकार बंद व्हावा, यासाठी गेली सहा महिने ते वेगवेगळ्या यंत्रणांचे उंबरे झिजवत होते. त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रारअर्जही दिलेला होता; पण कारवाई होत नव्हती. अशात कोणीतरी त्यांना ‘अंनिस’ कडे जायला सांगितले. त्यानंतर ‘अंनिस’ च्या सुनीता देवलवार व सुदर्शन मोहिते यांनी पोलिसांना भेटून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणारे पत्र दिले, पाठपुरावा करण्यासाठी पीडित लोक काल परत पोलीस स्टेशनला गेले, तेव्हा या कायद्यांतर्गत नेमण्यात आलेल्या दक्षता अधिकार्‍यांशी मी फोनवर सविस्तर बोलले. मुले, महिला यांच्यावर अधिक अघोरी अत्याचार होण्याच्या आधीच, जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत या बाबावर कारवाई करावी, अशी मागणी केली. पोलिसांच्या मनात कायदेविषयक काही शंका होत्या. ‘अंनिस’ च्या कायदा विभागप्रमुख अ‍ॅड. तृप्ती पाटील यांच्याशी बोलून त्यांचे निराकरण केल्यानंतरही पोलिसांना procedrue विषयी नेमकी खात्री हवी होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कायदा विभागप्रमुख व ज्येष्ठ फौजदारी वकील अ‍ॅड. नीलेश पावसकर यांच्याशी बोलल्यावर पोलिसांची खात्री पटली आणि रात्री बाबाला अटक झाली.

एखाद्या प्रश्नाला भिडणे ही स्वतःची जबाबदारी आहे, त्यासाठी स्वतःच्या फायद्या- तोट्याच्या विचारापलिकडे गेले पाहिजे, असे समाजातल्या अनेक माणसांना जेव्हा वाटते, तेव्हाच त्या विचाराची चळवळ होऊ शकते. कालच्या केसमध्ये याचा अनुभव आला..

मुंबईच्या एक वस्तीत राहणारे तमिळ तक्रारदार, त्यांना ‘अंनिस’ पर्यंत आणून पोचवणारी कोणी व्यक्ती, केस सोडविण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर सहभाग देणारे कार्यकर्ते, एका फोनवर उपलब्ध असलेले अ‍ॅड. पावसकर यांच्यासारखे ज्येष्ठ वकील आणि पोलीस असे अनेक घटक एका भोंदूबाबाला पकडण्यासाठी आपापल्या ठिकाणी कार्यरत झाले, एकत्र आले.

डॉ. लागू यांच्या संदर्भात ही घटना का बघावीशी वाटते, ते आता सांगते.

एकदा माझी आई डॉ. शैला दाभोलकर ही डॉ. लागू व दीपाताईंना भेटायला त्यांच्या घरी गेली होती, तेव्हा ताहेरभाई पुनावाला व त्यांच्या पत्नी हे डॉ. लागू व दीपाताईंना केरळला फिरायला येण्याविषयी आग्रह करत होते. डॉ. लागू तयार नव्हते. ते म्हणाले, “आता मी चळवळीच्या कामासाठी लागेल तर फक्त फिरणार!” डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर, गरज पडेल तेथे, सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे डॉ. लागू चळवळीत सहभाग देत राहिले!

काल दाखल झालेली केस बघून मनात आले, डॉ. लागूंसारखी समाजाचे ‘आयकॉन’ असणारी माणसे चळवळीतील कार्यकर्ता बनतात, भूमिका घेतात, तेव्हा अनेकांच्या मनात विचारांचे बीज पेरले जाण्याची प्रक्रिया गतिमान होते, कोठेतरी पेरलेले बीज कोठेतरी अंकुरून आल्याचे दिसत राहते! अशा बीजाचे दर्शन हे एखादे मनोहर निसर्गदृश्य असावे, तितके मोहक वाटते माझ्या मनाला! We need many more like you Dr. Lagu!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]