मत्सर आणि अंधश्रद्धा यांचा संबंध

डॉ. हमीद दाभोलकर -

मत्सर ही मानवी मनातील एक नैसर्गिक आणि गुंतागुंतीची भावना आहे. प्रेम, स्पर्धा, तुलना आणि असुरक्षितता अशा अनेकविध सकारात्मक तसेच नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भावनांशी तिचा जवळचा संबंध आहे. आपण कोणापेक्षा कमी पडतो आहोत असे वाटणे, आपल्या जवळचे नाते दुसर्‍याकडे झुकते आहे, अशी भीती वाटणे किंवा इतरांच्या यशामुळे स्वतःची किंमत कमी झाल्याची भावना निर्माण होणे‡यातून मत्सर जन्म घेतो. मानसशास्त्राच्या दृष्टीने मत्सर समजून घेतला, तर तो फक्त नकारात्मक भावना नसून आत्मपरीक्षणाची संधी देखील असू शकते.

मत्सर म्हणजे नक्की काय?

मानसशास्त्रात मत्सर (Jealousy) आणि ईर्ष्या (Envy) यांच्यात थोडा फरक केला जातो. ईर्ष्या म्हणजे दुसर्‍याकडे असलेल्या गोष्टीची इच्छा‡उदा. मित्राकडे मोठी गाडी आहे आणि मला ती हवी आहे यामध्ये दुसर्‍याकडे एखादी गोष्ट जास्त असल्याने त्याच्याशी स्पर्धा असते, पण त्यामुळे जळफळाट होणे नसते. मत्सरामध्ये आपल्याकडे नसलेली गोष्ट दुसर्‍याला मिळाल्याने स्वतःला त्याचा त्रास होणे आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीकडून ती गोष्ट कशी काढून घेता येऊ शकेल किंवा त्याला, तिला त्या गोष्टीचा फायदा घेता येणार नाही, असे काही करावे वाटणे यागोष्टी देखील येतात.

मत्सर ही भावना काही प्रमुख घटकांनी बनलेली असते. यामध्ये भीती आपल्याकडचे काहीतरी हिरावले जाईल ही भावना, राग त्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल चीड येणे. त्या व्यक्तीसोबतची तुलना आणि आपल्याला हवी ती गोष्ट न मिळाल्याचे दु:ख अशा अनेक भावना यांचे मिश्रण असते.

मानसशास्त्रीयदृष्ट्या मत्सराचे मूळ असुरक्षिततेत असते. लहानपणी जर मुलाला पुरेसे प्रेम, कौतुक किंवा स्थैर्य मिळाले नाही, तर मोठेपणी त्याला सतत तुलना आणि स्पर्धेची जाणीव होते. अशावेळी इतरांचे यश त्याला धोका वाटतो. उदाहरणार्थ, दोन भावंडे असतील. मोठ्या मुलाला वाटते की आई-वडील लहान भावाकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे त्याच्या मनात मत्सर निर्माण होतो. तो भावावर राग काढू शकतो किंवा स्वतःला कमी लेखू लागतो. हीच भावना पुढे आयुष्यात मैत्री, प्रेमसंबंध किंवा कामाच्या ठिकाणीही दिसू शकते. मत्सर अति झाला तर संशय, तणाव आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो.

मत्सर आणि अंधश्रद्धा यांचा संबंध

मत्सराची भावना अनेकदा अंधश्रद्धेशी जोडली जाते. कारण जेव्हा माणूस असुरक्षित आणि घाबरलेला असतो, तेव्हा तो परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काहीतरी बाह्य कारण शोधतो. हीच मानसिक गरज अंधश्रद्धेला खतपाणी घालते.

आपल्या समाजात एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला खूप कौतुक मिळाले की नजर लागेल, असे म्हटले जाते. सुंदर बाळाच्या गालावर काळा ठिपका लावण्याची प्रथा आहे. यामागे वैज्ञानिक आधार नसला तरी मानसिक आधार आहे. लोकांना वाटते की दुसर्‍याच्या मत्सरामुळे आपले नुकसान होऊ शकते. इथे प्रत्यक्षात काय घडते? लोकांना दुसर्‍याच्या मत्सराची भीती वाटते म्हणून ते अंधश्रद्धेचा आधार घेतात. म्हणजेच, मत्सर ही भावना आणि त्यातून निर्माण झालेली भीती अंधश्रद्धेला जन्म देते.

काही वेळा एखादी व्यक्ती आयुष्यात प्रगती करू लागली, व्यवसाय वाढू लागला किंवा मुलांच्या शिक्षणात यश मिळू लागले की, आसपासच्या लोकांमध्ये मत्सर निर्माण होतो. उदाहरणार्थ, एखाद्या गावात एका कुटुंबातील मुलगा सतत अभ्यासात यश मिळवत असतो. त्याला शिष्यवृत्ती मिळते, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होतो. त्यानंतर त्या कुटुंबातील आईला असे वाटू लागते की, शेजार्‍यांना हे पाहवत नाही. मुलगा आजारी पडला किंवा अभ्यासात थोडी घसरण झाली की लगेच शंका येते. कोणीतरी करणी केली असावी, दृष्ट लागली असावी. प्रत्यक्षात मुलगा ताण, थकवा किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे आजारी पडलेला असू शकतो. पण आधीपासून मनात असलेली मत्सराची भावना अंधश्रद्धेला खतपाणी घालते. जेव्हा आपण मानतो की, दुसर्‍याला आपले यश पाहवत नाही, तेव्हा कोणतीही अडचण ही करणी, जादूटोणा किंवा दृष्ट यांच्याशी जोडली जाते. अशा वेळी तर्कशुद्ध विचार करण्याऐवजी भीती आणि संशय वाढतात.

मत्सर ही मानवी भावना आहे; पण तिचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले की सामाजिक संबंध बिघडतात. शेजार्‍यांवर विनाकारण आरोप होतात, अविश्वास वाढतो आणि मानसिक ताण निर्माण होतो. अनेकदा लोक उपचार, समुपदेशन किंवा प्रत्यक्ष उपाय न करता भोंदूंच्या सल्ल्याला बळी पडतात.

अंधश्रद्धा आणि मत्सर यांचा संबंध असा की, मत्सरातून निर्माण झालेली असुरक्षितता आणि भीती व्यक्तीला तर्कशुद्धतेपासून दूर नेतात. त्यामुळे साध्या घटनांनाही अलौकिक कारणे दिली जातात. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, संवाद आणि भावनांचे योग्य व्यवस्थापन वाढवले तर अशा भीती कमी होऊ शकतात.

काही समाजांमध्ये एखाद्याचे अपयश किंवा आजार हे शेजार्‍याच्या मत्सरामुळे केलेल्या जादूटोण्यामुळे झाले असे मानले जाते. इथे मनातील असुरक्षितता आणि भीती अंधश्रद्धेला बळ देते. खरंतर, मानसशास्त्र सांगते की, जेव्हा आपल्याला एखाद्या घटनेचे तर्कशुद्ध कारण समजत नाही, तेव्हा आपण अलौकिक कारणांकडे वळतो. समजा, एका विद्यार्थ्याला वर्गात पहिला क्रमांक मिळाला. दुसर्‍या विद्यार्थ्याला वाईट वाटले. त्याने अभ्यासात कमीपणा असल्याचे मान्य करण्याऐवजी असे म्हणणे सोपे जाते‡त्याला शिक्षकांचा पक्षपात आहे किंवा त्याच्या घरचे काहीतरी पूजा करतात म्हणून त्याला यश मिळते. इथे स्वतःच्या कमीपणाचा स्वीकार टाळण्यासाठी अंधश्रद्धा किंवा बाह्य कारणांचा आधार घेतला जातो. मत्सरामुळे वास्तव स्वीकारणे कठीण जाते. मत्सराच्या भावनेचे अनेक मानसिक दुष्परिणाम होतात. सतत तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो, संशयी स्वभाव तयार होतो, नात्यांमध्ये अविश्वास वाढतो आयुष्यात चिंता आणि तणाव वाढतो. मत्सर दाबून ठेवला तर तो रागाच्या स्वरूपात बाहेर पडतो. त्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

मत्सरावर कशी मात करावी?

समाजात अंधश्रद्धा टिकून राहण्याचे एक कारण म्हणजे भावनिक असुरक्षितता. मत्सर ही त्यातील प्रमुख भावना आहे. जेव्हा लोकांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो, तेव्हा ते इतरांच्या यशाला अलौकिक कारणे देतात. त्यामुळे अंधश्रद्धा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रश्न नसून ती मानसिकतेशी संबंधित असते. शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि भावनिक परिपक्वता वाढली की मत्सराचे रूपांतर प्रेरणेत होऊ शकते. इतरांच्या यशातून शिकण्याची वृत्ती निर्माण झाली तर अंधश्रद्धेला जागा राहत नाही.

मत्सर ही भावना मानवी स्वभावाचा नैसर्गिक भाग आहे. ती पूर्णपणे नष्ट करणे शक्य नाही, पण तिचे स्वरूप बदलता येते. असुरक्षिततेतून जन्मलेला मत्सर अंधश्रद्धेला पोषक ठरतो, कारण मनाला नियंत्रणाची आणि स्पष्टीकरणाची गरज असते. परंतु आत्मजागरूकता, संवाद आणि तर्कशुद्ध विचार याद्वारे आपण मत्सराला सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित करू शकतो.

अखेर, दुसर्‍याच्या यशामुळे अस्वस्थ होण्याऐवजी त्यातून प्रेरणा घेणे हेच मानसिक आरोग्याचे लक्षण आहे. मत्सरावर नियंत्रण मिळवले की, अंधश्रद्धेची साखळी आपोआप तुटते आणि व्यक्ती अधिक स्वावलंबी, विवेकी आणि आत्मविश्वासू बनते.

– डॉ. हमीद दाभोलकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ]