वाघेश साळुंखे -
एका साध्या प्रश्नाचे उत्तर द्या, पैसे देऊन जाहिरात कोण करते? फार विचार न करता झटकन उत्तर द्यायचे झाले तर बहुतांश लोकांच्या तोंडून एकच उत्तर येईल की व्यावसायिक लोक पैसे देऊन जाहिरात करतात. ज्याला आपले उत्पादन विकायचे आहे तो व्यावसायिक आपल्या उत्पादनाची जाहिरात करतो. (इथे उत्पादन हा शब्द सेवा आणि वस्तू या दोन्हींसाठी वापरला आहे.) थोडक्यात सांगायचे झाले, तर धंदा व्हावा म्हणून व्यावसायिकांकडून जाहिरात केली जाते. केवळ समाजसेवा म्हणून पैसे देऊन जाहिराती करणारे लोक खूप कमी आहेत. त्यातही बर्याच वेळा समाजसेवेच्या नावाखाली धंदा करणे हाच उद्देश असतो. सारांश इतकाच की, धंदा करण्यासाठी आणि धंदा वाढवण्यासाठी जाहिराती केल्या जातात. मग तुमच्यासाठी एक पुढचा प्रश्न आहे, जाहिराती अध्यात्माच्या असतील तर ती समाजसेवा असेल की धंदा असेल? इतका प्रचंड पैसा खर्च करून अध्यात्मिक पंथ, संप्रदाय, संस्था आणि व्यक्ती जाहिरातबाजी कशासाठी करत असतील?
तुम्ही फेसबुक स्क्रोल करत असताना अनेक स्पॉन्सर्ड मेसेज बघितले असतील. या जाहिराती असतात. मेटाला (फेसबुकची पॅरेंट कंपनी) पैसे देऊन या जाहिराती केल्या जातात. यालाच ‘फेसबुक अॅड्स’ असे म्हणतात. वेगवेगळे व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हल्ली पारंपरिक जाहिराती करण्याऐवजी फेसबुक अॅड्स, इन्स्टा अॅड्स, गुगल अॅड्स करण्याला प्राधान्य देतात. कारण, या जाहिराती व्यावसायिकाला योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येतात. उदाहरणार्थ, दागिन्यांची जाहिरात पुरुषांना दाखवणे उपयोगाचे नाही. ती केवळ महिलांनाच दाखवायला हवी. करिअरविषयक जाहिराती मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्तींना दाखवणे उपयोगाचे नाही. त्या तरुणांनाच दाखवायला हव्यात. असे करणे मेटा अॅड्स किंवा गुगल अॅड्स मध्ये शक्य आहे. या कंपन्यांकडे युजरचे वय, राहण्याचे ठिकाण, व्यवसाय, कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी यांची माहिती असते. तसेच त्याच्या वर्तनाचा data असतो. त्यातून त्याच्या आवडी-निवडी, विचारधारा इत्यादी गोष्टी या कंपन्यांना समजतात. या data चा उपयोग करून त्या युजरला कोणती जाहिरात दाखवायची याचा निर्णय घेतला जातो. अर्थात, हे सगळे कुणी व्यक्ती करत नाही. त्यासाठी सॉफ्टवेअर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केला जातो.
फेसबुक अॅड लायब्ररी
फेसबुकवर दररोज हजारो जाहिराती चालू असतात. या चालू असलेल्या सगळ्या जाहिराती आपणाला फेसबुक अॅड लायब्ररी (यालाच आता मेटा अॅड लायब्ररी असेही म्हटले जाते) मध्ये दिसतात. केवळ फेसबुकच नव्हे, तर इन्स्टाग्राम आणि मेसेंजरवर सुरू असलेल्या जाहिराती सुद्धा इथे दिसतात. इथे दिसणार्या सगळ्या जाहिराती मेटा कंपनीला पैसे देऊन केलेल्या असतात. https://www.facebook.com/ads/library या दुव्यावर आपण फेसबुक अॅड लायब्ररी पाहू शकतो. तिथल्या सर्च बॉक्स मध्ये तुम्ही कोणताही कीवर्ड टाकून सर्च करून त्या विषयाशी संबंधित सध्या चालू असलेल्या जाहिराती पाहू शकता. तिथे spiritual, religion, dharma, mantra, tantra, astrology इत्यादी शब्द टाकून सर्च करा. याशिवाय विशिष्ट धार्मिक/आध्यात्मिक संस्था, बाबा-बुवा, मंदिरे, दर्गे यांची नावे टाकूनही तुम्ही त्यांच्या जाहिराती पाहू शकता. तुम्हाला तिथे देवधर्म आणि अध्यात्माचा धंदा मांडलेल्या हजारो जाहिराती दिसतील. यातील बहुतांश जाहिरातींमध्ये आकर्षक ग्राफिक्स आणि व्हिडिओचा उपयोग केलेला असतो. त्यामुळे या जाहिरातींची परिणामकारता खूप चांगली असते.
काही नमुना जाहिराती
यात सगळ्या अंधश्रद्धांच्या प्रकारांच्या जाहिराती तुम्हाला सापडतील. प्रार्थनास्थळांच्या जाहिराती, फलज्योतिष, विविध यंत्रे, तोडगे, मंत्र-तंत्र, धार्मिक कार्यक्रम, बुवा-बाबांचे दरबार, धार्मिक पुस्तके, आध्यात्मिक पंथांचा प्रचार, विविध प्रकारचे आध्यात्मिक उपचार, छद्मविज्ञान… अशा अनेक प्रकारच्या जाहिराती तुम्हाला इथे दिसतील. त्यातीलच काही नमुने इथे देत आहे. त्यांची अप्रत्यक्ष जाहिरात होऊ नये म्हणून या जाहिरातींमधील नावे, संपर्क क्रमांक, यूजर आयडी इत्यादी गोष्टी लपवल्या आहेत.
या बाबाने १५ फेब्रुवारीला होणार्या आपल्या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमासाठी रीतसर ४९९ रुपयांचा पास ऑनलाईन विक्रीसाठी ठेवला आहे.
हा टीव्ही आणि इतर माध्यमांतून प्रचंड जाहिरातबाजी करून आणि paid पॉडकास्ट्स करून प्रसिद्धीस आलेला एक बंडलबाज ज्योतिषी आणि वास्तुशास्त्री आहे. तो या जाहिरातीतून म्हणतोय की गर्भधारणा होण्यासाठी केवळ IVF तंत्रज्ञान उपयोगाचे नाही; तर तुमच्या घराची ऊर्जा देखील तेवढीच महत्त्वाची आहे. सांगलीत अंनिसच्या प्रश्नांपासून पळ काढणारा हा वास्तुशास्त्री सोशल मिडियात प्रचंड जाहिराती करून आपला धंदा करतो.

इतर प्लॅटफॉर्मवर सुद्धा अमाप जाहिराती
फेसबूक अॅड्स प्रमाणे गुगल अॅड्स ट्रान्सपरन्सी सेंटरवर सुद्धा अशाच अंधश्रद्धा पसरवणार्या जाहिराती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. इथल्या जाहिराती प्रामुख्याने यू ट्यूब, ब्लॉग्ज आणि विविध वेबसाईट्सवर दिसतात. याशिवाय टिकटॉक क्रिएटिव्ह सेंटर, लिंक्ड इन अॅड लायब्ररी, एक्स (ट्विटर) अॅड्स डिपॉझिटरी या ठिकाणी सुद्धा अशा जाहिराती दिसतील. पण भारतात प्रामुख्याने फेसबुक अॅड्स आणि गुगल अॅड्स यांचाच जास्त वापर केला जातो.
जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाईस पात्र जाहिराती
यातील काही जाहिराती अतिशय हुशारीने केलेल्या असतात. या जाहिराती कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. पण मोठ्या प्रमाणात जाहिराती अशा आहेत की ज्या स्पष्टपणे जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन करतात. काही जाहिराती अन्य कायद्यांचे उल्लंघन करतात. खरे तर पोलिसांनी आणि सरकारने स्वतःहून अशा जाहिरातींची दखल घेऊन त्यांवर कारवाई करायला हवी; पण या जाहिरातींवर कोणतीही कारवाई होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
-वाघेश साळुंखे
लेखक अंनिस सोशल मिडिया विभागाचे राज्य कार्यवाह आहेत.
