दुष्काळ निवारण्यासाठी प्रार्थना आणि एन. डी. सर

कुमार मंडपे -

जुलै 1993 चा प्रसंग आहे. महाराष्ट्रात भयंकर मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी फतवा काढला – ‘आजच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व जनतेने बरोबर अकरा वाजता आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडावा, म्हणून परमेश्वराची प्रार्थना करा. तुम्ही कार्यालयात असा, शैक्षणिक संस्थांमध्ये असा, शेतात असा, रस्त्यात असा अथवा वाहनात असा; पावसासाठी प्रार्थना करा.’

शिक्षणाधिकार्‍यांच्या कार्यालयातून फोनवरून आदेश आला. ज्येष्ठ शिक्षिकेने तो आदेश कागदावर लिहून घेतला. त्यानंतर मी शाळेत पोचलो. माझ्यानंतर मुख्याध्यापक व्ही. वाय. पाटील शाळेत आले. त्यांना तो कागद मिळताच त्यांनी मला बोलावून घेतले. माझ्यापुढे आदेशाची चिठ्ठी ठेवत ते म्हणाले.

“पावसासाठी परमेश्वराची प्रार्थना करा, असा राज्यपालांचा आदेश आहे. आता आपण काय करायचे, ते बोला!”

“खरे म्हणजे पावसाच्या पडणार्‍या प्रत्येक थेंबाचे नियोजन राज्यकर्त्यांनी करण्याचे अपेक्षित असताना राज्य शासनाचे प्रमुख, राज्यपाल सांगतात, ‘महाराष्ट्रात मोठा दुष्काळ आहे. पाऊस पडावा म्हणून, तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा,’ हे सर्व मला हास्यास्पद वाटते. म्हणून माझा या प्रार्थनेला विरोध आहे. एवढे सारे एका दमात सांगून,” मी पुढे म्हणालो, “पाऊस पडावा म्हणून प्रार्थना केल्याने पाऊस पडतो, यामध्ये मला कोणताही कार्यकारणभाव दिसत नाही. यासाठी राज्यपालांचा आदेश मानला नाही, म्हणून जी कोणती शिक्षा होईल, ती मी भोगण्यास तयार आहे.”

माझ्या उत्तराने आमच्या शाळेचे मुख्याध्यापक उत्साहित झाले आणि आम्ही सर्वजण प्रार्थनेसाठी क्रीडांगणावर पोचलो.राष्ट्रगीत, प्रतिज्ञा व मूल्यशिक्षणाचा परिपाठ पार पडला. खेळाच्या शिक्षकाने पावसाच्या प्रार्थनेची आठवण केली. हेड सरांनी आदेश दिला – “पावसासाठी वेगळी प्रार्थना घ्यायची गरज नाही, मुले वर्गात सोडा.”

सर्व मुले वर्गात ओळीने जाऊ लागली. मुख्याध्यापकांनी प्रार्थना टाळली, हे ज्येष्ठ शिक्षिकेच्या लक्षात आले. त्या पळतच मुख्याध्यापकांच्या जवळ गेल्या आणि रागातच म्हणाल्या, “पावसासाठी प्रार्थना केली असती तर काय बिघडले असते? काही नुकसान तरी झाले नसते?” मुख्याध्यापक क्षणभर विचारात पडले, दुसर्‍याच क्षणी ते सावरले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ग्राऊंडवर पुन्हा बोलावून घेतले. माईक हातात घेतला आणि म्हणाले, “मुलांनो आणि अध्यापक बंधू-भगिनींनो, पावसाने यावर्षी खूपच ताणून धरलेले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पावसाला सुरुवात होते. आता जुलै संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांचा आदेश आह – ‘आज सकाळी अकरा वाजता जेथे असाल तेथे सर्वांनी पाऊस पडावा म्हणून परमेश्वराची प्रार्थना करा.’ परंतु मुलांनो, परमेश्वराची प्रार्थना केल्याने पाऊस पडतो. यावर माझा अजिबात विश्वास नाही. प्रार्थना करणे आणि पाऊस पडणे यामध्ये अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. आपल्या शाळेच्या पश्चिमेला अजिंक्यतारा हा किल्ला आहे. प्रार्थना केली, म्हणून अजिंक्यतार्‍यावर न पडणारा पाऊस आपल्या शाळेवर पडेल, हे होणे शक्य नाही आणि आपण सर्वांनी आपल्या शाळेमध्ये पावसाची प्रार्थना केली नाही, म्हणून अजिंक्यतार्‍यावर पडणारा पाऊस आपली शाळा टाळून पुढे जाणे शक्य नाही.”

शिक्षकांकडे पाहून मुख्याध्यापक उदगारले, “आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांवर दैववादी संस्कार होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.” यानंतर सर्व मुले वर्गात सोडण्यात आली.

त्यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. त्यांनी आमच्या – रयत शिक्षण संस्थेच्या – मध्य विभागातील सर्व मुख्याध्यापकांच्या सभेत सर्वांना प्रश्न केला, “आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशाप्रमाणे आपापल्या शाळेमध्ये ज्यांनी पाऊस पडावा म्हणून प्रार्थना केली नाही, त्यांनी जागेवर उभे राहा.” सभागृहात एकदम नीरव शांतता पसरली.

सभागृहाच्या मध्यावर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व्ही. वाय.पाटील एकटे उभे राहिले. सभेत कुजबूज सुरू झाली. आता पाटील सरांची काही धडगत नाही. कोणत्या शब्दांत एन. डी. सर पाटलांची खरडपट्टी काढतील, हे ऐकण्यासाठी सर्वांनी कान टवकारले. उभ्या राहिलेल्या व्ही. वाय. पाटील यांच्याकडे रोखून पाहत एन. डी. सर उद्गारले, “शाब्बास रे पठ्ठ्या! पाटील!! या ‘रयते’च्या चेअरमनला तुझा अभिमान वाटतो आहे.” पुढे सर्वांच्याकडे पाहत एन. डी. सर उद्गारले, “अरे खुळ्यांनो, प्रार्थना केल्याने कधी पाऊस पडतो का? या विज्ञान युगात जरा विचार करायला शिका आणि आपल्या विद्यार्थ्यांना पण शिकवा. जे सत्य असेल त्याच्या बाजूने हिमतीने उभे राहा. आपले विद्यार्थी दैववादी न बनता प्रयत्नवादी बनतील, विज्ञानवादी होतील, यासाठी प्रयत्न करत राहा.”

उपस्थित मुख्याध्यापक हे व्ही. वाय. पाटील यांच्याकडे आनंदमिश्रित कुतुहलाने पाहत राहिले.

संपर्क : 95030 24860


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]