‘कोरोना’नंतरचे जग

प्रा. नागनाथ कोत्तापल्ले -

चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या देशासकट जगभर माजवलेला हाहाःकार आपण अनुभवत आहातच. या भयानक परिस्थितीने सर्वांना चिंतीत केलेले आहेच; अशा परिस्थितीत आपल्या मनात आपण काम करीत असलेल्या क्षेत्रासंदर्भात आजच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या विचारप्रक्रियेला आजची वास्तव स्थिती आणि कोरोनानंतरचे त्या क्षेत्राचे भवितव्य या सूत्रात शब्दबद्ध करण्याची विनंती आम्ही विविध क्षेत्रातील काही मान्यवर आणि ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना केली. त्याला प्रतिसाद देत लिहिलेले लेख

सध्या जगभर ‘कोरोना’नंतर जग बदललेले असेल, असे म्हटले जात आहे. ते कसे बदललेले असेल, त्याबद्दल अंदाज बांधले जात आहेत; म्हणजे शिक्षणात काय होईल, व्यापारात काय होईल, साहित्यात काय होईल इ. इ.

खरोखर काय बदल होईल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जगाचे सोडा; भारताचे काय होईल, याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे राहील. कारण भारत हा शक्यतोवर काही न शिकणारा, आपल्याच जातीच्या, धर्माच्या आणि अंधश्रद्धांच्या कोषात राहणारा देश आहे, असे म्हटले तरी काही लोकांना वाईट वाटेल. राग येईल; पण जरा वस्तुस्थितीही समजून घेऊ.

गेल्या सव्वाशे वर्षांत अनेक साथी आल्या आणि शेकड्यांनी माणसे मेली. ज्या साथीची खूपच चर्चा झाली आणि भारतीयांनी आपला विज्ञानविरोधी दृष्टिकोन प्रकट केला, ती प्लेगची साथ; ही ठळकपणे आठवणारी (त्यापूर्वी मानमोडीची साथ येऊन गेली होती, असे म्हणतात.) पहिली साथ. या साथीमध्ये इतकी माणसे मेली की, बैलगाडीतून प्रेतांचा ढीग वाहून नेला जात असे, असे हरिभाऊ आपटे यांनी आपल्या एका कथेत लिहिले आहे. याच साथीत रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले होते आणि याच साथीमध्ये लोकमान्य टिळकांनी धर्माचा कैवार घेऊन इंग्रजांवर टीका तर केलीच; पण आरोग्यासाठी सूचनांचे पालन करा, असे सांगणार्‍या गो. ग. आगरकर यांच्यावरही जहरी टीका केली होती; परिणामी पुण्याच्या आरोग्याची काळजी घेऊ इच्छिणार्‍या रँडचा खून झाला.

म्हणजे शेकड्यांनी माणसे मरताहेत आणि आमच्या परंपरांपर्यंत महार, मांग पोलीस बूट घालून येत आहेत, असे म्हणून प्रचंड राजकारण केले गेले. इंग्रजी सत्ता होती म्हणून हे राजकारण केले गेले, असे एकवेळ (इंग्रज नसले तरी) म्हणता येईल. पण आज सव्वाशे वर्षांनंतर काय चालू आहे? आता तर भारतीय माणसेच सत्ताधारी आहेत ना?

दिल्लीमध्ये भाजीपाला केवळ हिंदू गाडीवाल्यांकडून घ्यावयाचा; मुसलमानांकडून नाही, अशी मोहीम चालविली जात आहे. कारण ‘मरकज’मुळे या रोगाचा प्रसार अधिक वाढला, असा दावा केला गेला; मग इतरत्र जमलेल्या गर्दीचे काय? ज्या काळात ‘मरकज’ चालू होते, त्या काळात हिंदू मंदिरांच्या परिसरातही खूपच गर्दी होती. त्याच काळात योगी आदित्यनाथांनी रामाची मूर्ती नेऊन बसविली. त्याच काळात शिवराज सिंग चव्हाण यांचा शपथविधी झाला, म्हणजे अनेक ठिकाणी गर्दी होत होती… फक्त मुस्लिमांना बदनाम करण्याची संधी आम्ही कोरोनाच्या काळातही सोडली नाही. पालघरचेच प्रकरण घ्या. मुळात ते जे कोण साधू होते, ते आडमार्गाने म्हणजे नियम तोडून जात होते, हे कबूल न करता धर्माचे नाव पुढे करून प्रचंड गदारोळ सध्या चालू आहे. गेल्या सव्वाशे वर्षांत खरोखर आपण किती बदललो. मुळात बदललो का? या अनुभवातून काही धडा घेतला का? तर त्याचे उत्तर नाही, असे आहे.

प्लेगनंतर 1918-19 च्या दरम्यान एनफ्लुयंझाची साथ आली. त्यातून न्यूमोनिया पसरला, असे सांगतात. कॉलरा तर होताच आपल्याकडे. कॉलर्‍याची साथ आली की, गावागावांतून मृत्यूचे तांडव सुरू होई. मग लोक देवीला बोणे वाहायचे. बोणे वाहून घेता-घेता हगवण-उलटी होऊन मरायचे.

1990 नंतर म्हणजे जागतिकीकरणानंतर तर बरेच साथीचे आजार आले. चिकन गुनिया, स्वाईन फ्लू एकापाठोपाठ आले. स्वाईन फ्लूने हजारो माणसे गेली. पुढे सार्स, मार्स अशा साथी आल्या. आता कोरोना. नित्याचे आजार आहेतच. मलेरिया, कॅन्सर आणि साध्या हगवणीने मरणार्‍यांची संख्या दरवर्षी लाखांच्या घरात असते. असे सगळे चालू आहे आणि साथी तर येतच आहेत; पण आमचा देश शहाणा झाला का? आता शहाणे होणे म्हणजे काय?

यासंबंधी अनेक गोष्टी सांगता येतील; पण फक्त तीनच नोंदवितो. एक म्हणजे सार्वजनिक आरोग्य सुविधा आपण वाढविल्या का? दोन गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणाची व्यवस्था वाढवून वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन दिले का? तिसरे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आपण समाज रुजविला का? भारतीय राज्यघटनेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची विशेष नोंद घेण्यात आलेली आहे. त्याची आपल्याला किती आठवण राहिलेली आहे?

या प्रश्नांची उत्तरे देताना आपल्या असे लक्षात येते की, जागतिकीकरणानंतर आपण सार्वजनिक सुविधांकडे दुर्लक्ष करावयास प्रारंभ केला. खरे म्हणजे रस्ते बांधणे हे सरकारचे काम असते. जुन्या काळापासून शासनसंस्थाच रस्ते बांधत असे; पण आता टोल वसूल केला जातो. आमच्या सार्वजनिक आरोग्य संस्थांचा विस्तार होणे गरजेचे होते. तसेच त्या बळकट होण्याची आवश्यकता होती. स्वातंत्र्यानंतर त्या दिशेने प्रयत्न झाले. मात्र पुढे इस्पितळांमधून डॉक्टरांच्या नेमणुका न करणे, इतर कर्मचारी न नेमणे, अत्यावश्यक यंत्रसामग्री न पुरविणे, असे प्रकार सुरू झले. वस्तुत: भारतासारख्या दरिद्री देशात पंचक्रोशीत एक याप्रमाणे अत्याधुनिक सुसज्ज इस्पितळ हवे. आता कोरोनासारखे संकट आले, तर औषध तर नाहीच; पण तपासणीच्या यंत्रणा नाहीत.

सार्वजनिक इस्पितळांची जी अवस्था तीच आमच्या वैद्यकीय शिक्षणाची. मोठ्या प्रमाणात खाजगी वैद्यकीय महाविद्यालये दिसतात खरी; परंतु भरमसाठ फी तर असतेच, पण तेथे सोयी किती असतात, हा महत्त्वाचा प्रश्न. शिवाय लाखो रुपये मोजून जे डॉक्टर होतात, ते पुढील काळात तो पैसा वसूल करायच्या नादात सामाजिक बांधिलकी, जनसेवा इत्यादी बाबी सहज विसरून जातात. त्यांच्याकडून गोरगरिबांनी काही अपेक्षा करण्याचे काही कारणच उरत नाही; शिवाय येथे दिल्या जाणार्‍या वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाचे काय? असा प्रश्न आहेच.

कुठल्याही शास्त्राचा विकास संशोधनातून होतो. दु:खाची गोष्ट अशी की, भारतामध्ये वैद्यकीय ज्ञानशाखेत होणारे संशोधन नगण्य आहे. आज ज्या ज्ञानाचा वापर होतो, त्यात भारतीय तज्ज्ञांनी किती भर घातली, असा प्रश्न केला, तर उत्तर शून्य असेल. तसेच ज्या औषधांचा वापर होतो, त्यातील बहुसंख्य औषधे बाहेरच्या तज्ज्ञांनी शोधलेली आहेत. साधी मलेरियाची ‘क्विनाइन’ ही गोळीही पाश्चात्यांनी शोधलेली, विकसित केलेली. म्हणजे वैद्यकशास्त्र असो की, औषधनिर्माणशास्त्र; भारतामध्ये त्या-त्या क्षेत्रात अगदीच नगण्य संशोधन होते.

अर्थात, दुसर्‍या ज्ञानशाखांमध्ये होणारे संशोधनही काही फार होते, असे नाही. भारतामध्ये फारसे संशोधन न होण्यामागील कारणे कोणती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शासकीय पातळीवरून किंवा बाहेरून संशोधनासाठी पुरेसा अर्थ पुरवठा होत नाही. (कधी तो झालाच तर त्याचा दुरुपयोगही केला जातो, हा भाग वेगळा) परंतु याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय माणूस अधिक दैववादी आहे. स्वत:ला मोठे समजणारे काही शास्त्रज्ञ कधी-कधी मंदिरांच्या रांगेत उभे राहताना दिसतात. ‘दैव’ आणि ‘देव’ हे त्याचे परवलीचे शब्द असतात. त्यामुळे बालपणापासून त्याची जिज्ञासा मारून टाकली जाते. लहान मूल जेव्हा काही प्रश्न विचारते, तेव्हा त्याचे आई-वडील कधी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. कधी-कधी तेही देवाकडे, दैवाकडे बोट दाखवतात. अगदी बालपणापासून भारतीय पालक आपल्या मुलांवर जातीचे, धर्माचे, अंधश्रद्धेचे, देव आणि दैवाचे संस्कार करतात; मग त्यांच्या मनात प्रश्न कसे निर्माण होतील? (तसेच जातीबाहेरील, धर्माबाहेरील माणसांबद्दल प्रेम कसे वाटेल?)

आता तिसरा मुद्दाही महत्त्वाचा आहे. तो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करण्याचा. विद्यापीठांमधून शस्त्रपूजा म्हणून प्रयोगशाळांमधील उपकरणांची पूजा केली जात असेल, तर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन कसा विकसित होईल? आज जे काही आधुनिक विज्ञान आहे, ते पूर्वी आमच्याकडे होतेच, असे दावे केले जात असतील, तर लोक अंधश्रद्ध होणारच. गेल्या पाच-सात वर्षांत अनेकांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. भारतामध्ये प्लास्टिक सर्जरी होती, इंटरनेट होते, विमान होते (सायन्स काँग्रेसमध्ये एका महाभागाने तसा निबंध वाचला होता!) असल्या थापा मारणं सुरू आहे. याशिवाय गोमूत्र, गायीचे शेण आणि असल्याच गोष्टींचे समर्थन खुलेआम सुरू झाले, तर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित व्हावा? अधून-मधून यज्ञाचे महत्त्व सांगितले जाते, मंत्राचे महत्त्व सांगितले जाते, अग्निहोत्राचे महत्त्व सांगितले जाते… असल्या गोष्टींची जिथे जाहीरपणे चर्चा आणि समर्थन केले जाते, त्या देशाला काही भवितव्य आहे, असे म्हणता येईल, असे वाटत नाही.

म्हणजे इतक्या साथी पाहिल्या, अनुभवल्यानंतर भारतीय माणूस बदललाच नाही. अनुभवातून तो काही शिकलाच नाही आणि शिकतही नाही. तो राहतो झकपक. पंधरा-पंधरा लाखांचा सूट घालतो; पण मनाने मात्र तो मध्ययुगातच राहत असतो. वेद, पुराणे, रामायण, महाभारत असल्या ग्रंथांच्या बाहेर शक्यतो येतच नाही.

अशा मध्ययुगात राहणार्‍या माणसाचे राजकारणही मध्ययुगाला साजेसे असेच असते. रोज जगभर कोरोनाने मरणार्‍यांच्या आकड्यांमध्ये वाढ होते आहे. लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्याकडे काय होते आहे? तर कायम हिंदू-मुस्लिम तेढ कशी वाढेल, या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. विशेषत: ‘दूरचित्रवाहिन्या’सारखी माध्यमे, वर्तमानपत्रे सध्या सत्य सांगायचे नाही, अशाच अविर्भावात वावरत आहेत.

आमची अर्थव्यवस्था आधीच मोडकळीस आलेली. आता लॉकडाऊनमुळे ती प्रचंड संकटात सापडेल, हे सांगायला कुणा अर्थतज्ज्ञाची गरज नाही. पण याचे भान आमच्या कर्त्या-धर्त्यांना किती आहे? एकदम लॉकडाऊन सुरू केल्यानंतर लाखो लोक हवालदिल झाले. रोज कमवून खाणारे लोक आपल्या देशात किमान साठ ते सत्तर टक्के असतील. त्यांच्याकडे दोन-तीन दिवसांपेक्षा अधिक जगण्यासाठी हवा असणारा पैसासुद्धा नसतो. म्हणजे मग त्यांच्यापुढे पर्याय काय? एक तर कोरोनाने मरा किंवा उपाशीपोटी मरा! शासनाने आणि काही संस्थांनी अशा लोकांच्या जेवणाची सोय केली आहे; पण तेथेही प्रश्न आहेतच. पण ती चांगलीच गोष्ट आहे. अशा अपवादात्मक गोष्टी सोडल्या, तर आमच्या कर्त्या-धर्त्या लोकांना परिस्थितीचे फारसे भान नाही, असेच म्हणावे लागते; उलट दंगली कशा उसळतील याचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे! या सगळ्यांचा अर्थ काय? कोरोनानंतर जग बदलेल; पण भारत मात्र बदलणार नाही. उलट तो आतापर्यंत जसे काहीच शिकला नाही, तसेच आताही काही शिकेल असे वाटत नाही.

उद्या कोरोनाचे संकट टळले की, इथली माणसे भरभरून मंदिरांमध्ये गर्दी करतील. ‘देवा तुझ्यामुळे वाचलो,’ म्हणून (डॉक्टर गेले उडत!) पेढे वाटतील.

(लेखक हे अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]