संघर्ष परिवर्तनाचा : कार्यकर्त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा आलेख

राजीव देशपांडे -

कोकणातील वैभववाडी तालुक्यातील शांती नदीकाठावरच्या कोकिसरे नावाच्या छोट्याशा खेड्यात मोलमजुरी करणारी आई आणि मुंबईत एका कारखान्यात कामगार म्हणून काम करणारे वडील अशा गरीब आणि दलित (बौद्ध) समाजात जन्मलेल्या बी. एस. जाधव या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्याच्या दैनंदिन जगण्याच्या संघर्षातून होत असलेल्या जडणघडणीचा, वैचारिक प्रवासाचा आलेख ‘संघर्ष परिवर्तनाचा’ या लेखसंग्रहात चितारलेला आहे. मुंबईत कारखान्यातील नोकरीत हाताची तीन बोटे गमावल्यावर नोकरी गमावण्याची पाळी वडिलांवर आली. आईने पाच भावंडांसह सारे कुटुंब सावरण्याची पाळी बी. एस. यांच्यावर आल्यामुळे त्यांना मुंबईत यावे लागले. मुंबईत आल्यावर दिवसभर कष्टाच्या नोकर्‍या सांभाळत, झोपडपट्टीचे जीवन अनुभवत रात्रशाळेत शिकत असताना सत्तरच्या दशकात ‘दलित पँथर’च्या उदयाने दलित समाजातील घुसळणीचा प्रभाव साहजिकच बी. एस. यांच्यावर पडला आणि समाजात घडणार्‍या घटना चिकित्सकपणे जाणून घेण्याची आंच निर्माण झाली आणि त्यातूनच मग समविचारी मित्र मिळाले. त्यांच्याबरोबर सामाजिक-साहित्यिक सभा-संमेलने, वादविवाद, चर्चा झडू लागल्या. सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ललित कथा, कादंबर्‍या यांचे वाचन केले पाहिजे, याची जाणीव निर्माण झाली आणि मग पुस्तकांचा शोध घेताना ग्रंथालये, दुकाने पालथी पडू लागली. प्रचलित प्रस्थापित साहित्याकडून दलित, आंबेडकरी, कामगार साहित्याकडे वाटचाल चालू झाली आणि या साहित्याने लहानपणापासून त्यांनी जे-जे अनुभवले, भोगले, त्या अस्सल, खर्‍याखुर्‍या जीवनाचा परिचय करून दिला.

या लेखसंग्रहातील लेख म्हणजे बी. एस. जाधव यांनी त्यांना भिडलेल्या समाजातील विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक प्रश्न व चळवळींना आपले वाचन, अभ्यास, निरीक्षण व अनुभव याद्वारे दिलेला चिकित्सक प्रतिसाद आहे. या लेखसंग्रहातील सर्वांत महत्त्वाचे लेख आहेत – ‘माझी जडणघडण’ आणि ‘मी कम्युनिस्ट चळवळीकडे कसा वळलो?’ या दोन्ही लेखांत लेखकाने आपल्या वाचनप्रक्रियेतील विकासाबरोबर विचारप्रक्रियाही कशी विकसित होत गेली, याचे अतिशय चांगले वर्णन केले आहे. डॉ. रावसाहेब कसबे यांचे ‘आंबेडकर आणि मार्क्स’ हे पुस्तक वाचल्यानंतर जाती आणि वर्गव्यवस्थेतून जे प्रश्न निर्माण झाले आहेत, ते केवळ जाती, पक्ष, संघटनांतून सुटणार नाहीत; तर त्यासाठी व्यापक, पुरोगामी चळवळीशी जोडून घेतले पाहिजे, याची जाणीव झाली व त्यांनी आंबेडकरवादाबरोबर मार्क्सवादही समजून घेण्याचे प्रयत्न चालू केले. मग त्यांनी मार्क्सवादी साहित्याचे झपाट्याने वाचन केले. ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ एकदा नव्हे, तर अनेकदा वाचला. त्यामुळे मार्क्सवादाकडे पाहण्याचा लेखकाचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून ‘आंबेडकर आणि मार्क्स’ हे दोन्ही महामानव त्यांना आपलेसे वाटू लागले. त्यांच्या लक्षात आले की, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे दोन्ही मानवजातीला कलंक आहेत. हा कलंक नष्ट करण्यासाठी जातीत बंदिस्त असलेल्या वर्गाला जातीच्या जाणिवेतून प्रथम मुक्त करावे लागेल. त्यासाठी प्रथम जातनिर्मूलनाचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. त्याशिवाय येथील वर्गीय चळवळ उभी राहू शकणार नाही, अशी डॉ. बाबासाहेबांनी मांडलेली भूमिकाच योग्य असल्याचे मांडून दलितांनी आणि कम्युनिस्टांनीही डॉ. बाबासाहेबांची ही भूमिका नीट समजून न घेतल्याने “कम्युनिस्टांनी जातिनिर्मूलनाकडे पाठ फिरवून आपला वर्गीय लढा पुढे दामटविण्याचा प्रयत्न केला; तर दलितांनी वर्गीय लढ्याचे महत्त्व न ओळखता जातिव्यवस्था हाच आपला शत्रू आहे, असे मानून त्यावरच आपले सर्व लक्ष केंद्रित केले आणि भांडवली अर्थव्यवस्थेच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या दोन्ही परिवर्तनवादी लढ्यांचे नुकसान झाले आहे. दलित आणि श्रमिकांचे दोन्ही लढे एकत्रितपणे अथवा बरोबरीने लढवले गेले असते, तर कदाचित आज प्रतिगामी शक्ती सत्तेवर आल्या नसत्या” अशी मांडणी करत बुद्ध, मार्क्स आणि आंबेडकर हे समतेचेच विचार असून ते एकमेकांस पूरक असल्याची मांडणी बी. एस. जाधव यांनी आपल्या लेखात केली आहे.

बी. एस. जाधव हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत. (त्यांचे अनेक लेख ‘अंनिवा’तूनही प्रसिद्ध झाले आहेत.) त्यामुळे या पुस्तकात समाजाला धर्माची नव्हे, ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज’, ‘बौध्द धम्म आणि अंधश्रद्धा’, ‘कोकणातील अंधश्रद्धा’, ‘खगोलशास्त्र : एक आकलन’, ‘दुर्बिणीतून आकाशदर्शन आणि काही अनुभव’ या लेखांतून त्यांची अंधश्रद्धा निर्मूलनविषयक भूमिका स्पष्टपणे पुढे आलेली आहे. ‘कोकणातील अंधश्रद्धा’ या लेखात त्यांनी कोकणातील अंधश्रध्दांना अज्ञान आणि अशिक्षितपणा याबरोबरच तेथील भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती बरोबरच निसर्गही कसा कारणीभूत आहे, याचीही मांडणी केली आहे. त्याचबरोबर ‘बौद्ध धम्म आणि अंधश्रद्धा’ या लेखात धर्म आणि अंधश्रद्धा, कर्मकांड, चमत्कार, ईश्वर संकल्पना, पुरोहितशाही, बुवाबाजी, भाकडकथा यांची चर्चा करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणीत विज्ञानवादी बौद्ध धम्माचे इतर धर्मांपेक्षा वेगळेपण दाखवून दिलेले आहे. अशा धम्माचा स्वीकार करूनही आज बौद्धधर्मीय लोक अंधश्रद्धा, रूढी-परंपरांचे कसे बळी ठरत आहेत, याचे परखड विवेचन केलेले आहे व धम्मातील अशा प्रवृत्तीवर घणाघाती टीका करीत आंबेडकरप्रणीत विज्ञाननिष्ठ बौद्ध धम्माला लागलेल्या अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांसारख्या ग्रहणापासून बौद्ध धम्माची सुटका केली पाहिजे, असे प्रतिपादन या लेखात केले आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली 1956 मध्ये दलित समाजाने हिंदू धर्माचा त्याग केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पारंपरिक बौद्धांच्या पुढे डोळे मिटून बसलेल्या बुद्धाच्या प्रतिमेऐवजी जग बदलण्यासाठी गतिमान झालेल्या बुद्धाची प्रतिमा ठेवत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. या धर्मांतरामागचे प्रयोजन काय होते आणि त्याची फलश्रुती काय झाली, याची चर्चा करणारा ‘धर्मांतराचे प्रयोजन आणि फलश्रुती’ हा या संग्रहातील महत्त्वाचा लेख आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे धर्मांतर सामान्य नव्हते, तर इथल्या समाजकारणाला, धर्मकारणाला; एवढेच नव्हे, तर इथल्या अर्थकारणालाही क्रांतिकारक वळण लावणारा तो एक महान ऐतिहासिक प्रयोग होता,” असे प्रतिपादन करून लेखकाने चिकित्सकपणे धर्मांतराचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. बुद्ध केवळ जाती, वर्णव्यवस्थेच्या विरोधात नसून वर्गव्यवस्थेच्या विरोधातही होता, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथात दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे, याचीही चर्चा लेखकाने या लेखात केली आहे. 22 धम्मप्रतिज्ञा देत बौद्ध धम्माची आधुनिक मूल्यांच्या अंगाने नव्याने मांडणी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समाजाला बुद्धिवादी विवेकाच्या पायावर उभे करायचे होते. धर्मांतरानंतर बौद्ध समाजात सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक पातळीवर क्रांतिकारक बदल घडून आले. एका अंगाने ही धर्मांतराची सफलता असली तरी आज बौद्ध धार्मिक विधी, विपश्यना, भिक्खू यांचे जे स्तोम माजवले जात आहे, त्यावर परखड टीका करत लेखकाने हे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या क्रांतिकारक, बुद्धिप्रामाण्यवादी आणि तर्कसुसंगत बौद्ध धम्माशी विसंगत असल्याचे प्रतिपादन केले आहे.

त्याचबरोबर या लेखसंग्रहात असलेला ‘इस्लाम : एक शोध’ हा लेखही लेखकाचा अभ्यासूपणा दाखवणारा आहे. हा लेख म्हणजे डॉ. परुळेकर यांच्या याच शीर्षकाच्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत त्यांनी इस्लाम आणि दहशतवाद, मुसलमान आणि दंगल, कुराणातील इस्लामचा चेहरा आणि व्यवहारातील इस्लाम, हिंदू-मुस्लिम संघर्ष यावर आपली मते मांडली आहेत. भारतातील हिंदू-मुस्लिम संघर्षाबद्दल लिहिताना बी. एस. जाधव यांनी भारतातील हिंदू-मुस्लिम संघर्षाचे स्वरूप वेगळे आहे. हा संघर्ष धार्मिक नसून जमातवादी आहे आणि हा जमातवाद धार्मिक नसून राजकीय आहे. याची मुळे इंग्रजांच्या कुटिल नीतीत असल्याचे आपले मत नोंदवले आहे. डॉ. परुळेकर यांच्या ग्रंथातील विसंगतीवरही बोट ठेवत त्यांनी लिहिले आहे – “इस्लामच्या उदयाच्या वेळच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीचा विस्तृत आढावा घेतला असता तर डॉ. परुळेकरांचे संशोधन अधिक प्रभावी ठरले असते.” तसेच धर्मनिरपेक्षतेबद्दल डॉ. परुळेकर यांनी केलेल्या शेरेबाजीबद्दल बी. एस. जाधव यांनी स्पष्ट शब्दांत असहमती व नाराजी व्यक्त केली आहे.

या पुस्तकातील व्यक्तिविशेष या विभागात लेखकाला भावलेले, त्याच्या आयुष्यावर परिणाम करणारे प्रा. विजय जामसांडेकर, जनीकुमार कांबळे व लेखकाची कॅन्सरने अकाली गेलेली पत्नी मंगला यांच्यावरील लेखही त्यांच्या गुणवैशिष्ट्याची ओळख करून देणारे आहेत. त्याचबरोबर ‘दलित पँथर’विषयीच्या त्यांच्या लेखात त्यांनी पँथर चळवळीच्या यशापयशाचा अभ्यासू आढावा घेतला आहे. तसेच संघर्ष तत्त्वासाठी असला पाहिजे; व्यक्तीशी किंवा जातीशी असता कामा नये, अशी विवेकी भूमिका घेत लिहिलेला ‘विरोध कुणाला : ब्राह्मणांना की ब्राह्मणी मानसिकतेला?’ हा लेखही लेखकाची विवेकी भूमिका स्पष्ट करणारा आहे. या पुस्तकातील सर्वांत मोठा लेख आहे, नेल्सन मंडेला यांच्यावरचा ‘दक्षिण आफ्रिकेचा स्वातंत्र्ययोद्धा ः डॉ. नेल्सन मंडेला.’ यात लेखकाने नेल्सन मंडेला यांच्या बालपणापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या संघर्षाचा आलेख अतिशय रोचकपणे मांडला आहे. भारतातील जातिव्यवस्थेविरोधातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा आणि नेल्सन मंडेला यांचा दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरोधातील लढा यातील साम्यस्थळे याबाबत लेखकाने आपली अभ्यासू मते नोंदविली आहेत.

बी. एस. जाधव ना मोठे अधिकारी आहेत ना, ना प्रसिद्ध लेखक, विचारवंत. आंबेडकरी, डाव्या व पुरोगामी चळवळी एकमेकांना पूरक असून त्यांनी एकत्रितपणे ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही विरोधात संघर्ष करायला हवा, अशी भूमिका घेत निरलसपणे काम करणारे साधे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते मित्र भेटले, त्यांच्याबरोबरच्या संवादाने वाचनाचा नादाने आयुष्याची दिशाच बदलून गेली. अशा व्यक्तीच्या लेखांच्या 263 पानी पुस्तकाची सुरेख निर्मिती कोणताही बाजारू विचार न करता करणार्‍या धनाजी जाधव आणि मित्रमंडळींना सलामच करायला हवा.

पुस्तकाचे नाव : संघर्ष परिवर्तनाचा

लेखक: बी. एस. जाधव

प्रकाशक : धनाजी जाधव

2/18, ए शिवम कॉम्प्लेक्स, राजाजी पथ, तिसरा क्रॉस रस्ता, डोंबिवली(पूर्व), पिन -421201

मोबाईल : 9987622078

राजीव देशपांडे


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]