अनिल चव्हाण -
‘आमची कोठेही शाखा नाही’ असा फलक उद्योगधंद्याच्या क्षेत्रात अनेक वेळा आढळून येतो. एखादा ‘प्रॉडक्ट’ चांगला चालला, त्याला गिर्हाईक भरपूर मिळाले आणि नफाही भरमसाठ मिळू लागला की, कंपनी अजून एक शाखा काढते; पण काही वेळा त्यांच्या नावावर दुसराच कोणी धंदा करतो, अशा वेळी दुकानदार फलक लावतात – ‘आमची कोठेही शाखा नाही.’
देवस्थानच्या शाखा
हा नियम अध्यात्माच्या व्यवसायातही आहे. दत्त हे लोकप्रिय दैवत झाल्यावर स्वत:ला दत्ताचे अवतार म्हणवणारे कित्येक महाराज जन्माला आले; आणि अजूनही होताहेत. साईबाबांच्या नंतर सत्यसाई, बालसाईंनी जन्म घेतला. त्यांच्या अनधिकृत शाखा वाढल्या.
बाळूमामा
असाच अनुभव आता आदमापूरचे बाळूमामा देवस्थान घेत आहे. बाळूमामांना पाहिलेले लोक अजूनही हयात आहेत. मेंढ्याचा कळप चारत, ते या परिसरात फिरत असत. त्यांचा पाऊसपाण्यासंबंधी अभ्यास दांडगा होता. मेंढ्या सांभाळायच्या तर ते आवश्यकच होते. अनुभवाच्या कसोटीवर तपासलेले ज्ञान ते शेतकर्यांना मुक्त हस्ताने वाटत.
“मामा, आभाळ भरून आलंय! पाऊस येनार वाटतं! खळ्यावरचं धान्य झाकाय पायजे, काय करावं?” एखादा शेतकरी सचिंत होऊन विचारी!
“आरं! न्हाई पाऊस येत! मावळतीचं वारं हाय! आता पांगत्यात बग ढग!” बाळूमामांचा अंदाज खरा ठरे!
भिजलेले गवत मेंढ्यांच्या ओठास इजा करते आणि चिखलात मेंढ्यांचे खूर कुजतात; म्हणून मेंढ्यांचे कळप पावसापासून सांभाळावे लागतात; मामा तर त्यांना जीवापाड जपत; त्यातून त्यांचा वातावरणाचा अभ्यास झाला होता.
मामांनी सहकारी मिळवून ‘भंडारा’ही चालू केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आदमापूरला बाळूमामा देवस्थान उभे राहिले. आज भव्य देवालय, धर्मशाळा आणि मेंढ्यांचे अनेक कळप देवस्थानच्या
मालकीचे आहेत.
बाळूमामांचा चरित्रग्रंथ
बाळूमामांचा चरित्रग्रंथ प्रसिद्ध आहे. ग्रंथकर्त्याने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांना चमत्काराचा मुलामा चढवला आहे. बाळूमामांचे ऐकल्यावर झालेला फायदा आणि न ऐकल्यास झालेले नुकसान यांची गुंफण सत्यनारायणाच्या पोथीप्रमाणे केली आहे. कॅसेट, सीडी, टीव्ही मालिका, सिनेमा अशा विविध मार्गांनी बाळूमामा देवस्थान भाविकांपर्यंत पोचले आहे.
जुळलेले ‘मार्केटिंग’
‘मार्केटिंग’चा ताळमेळ भाविकांच्या मानसिकतेशी आणि गावच्या अर्थकारणाशी बरोबर जुळला आहे. आता बोकडाला दूध द्यावे लागत नाही आणि मेंढ्यांचे कळप शेतात घुसले, म्हणून तक्रारीही येत नाहीत. नाही म्हणायला आदमापूरप्रमाणे मेतक्यातही बाळूमामांच्या पत्नीच्या नावाने देवस्थान उभे राहिले आहे; पण ते सुरुवातीच्याच काळात!
देवस्थानचा व्याप वाढला, भाविक हजारोंवरून लाखो झाले आणि मिळकत लाखांतून कोटी आणि अब्जावर गेली. त्यातून भाविकांना अनेक सोयी देण्याचे नियोजन देवस्थानाने केले. मिळकतीची भुरळ अनेकांना पडणे साहजिकच आहे, त्यातून काही देवालये उभी राहिली. नवे संयोजक तयार झाले.
भाविकांची गरज
सोलापूर जिल्ह्यातील उंदरगावीही भक्तांच्या सोयीसाठी मंदिर उभे राहिले. भाविक महाराष्ट्रभर पसरले आहेत. सर्वच भाविकांना इच्छा असूनही कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापूर या मूळ स्थानी जाता येत नाही. अशा वेळी भाविकांची सोय पाहणे गरजेचे होते. गरज भागवण्यासाठी मनोहरमामा पुढे आले. त्यांनी करमाळा-भिगवण रस्त्यावर उंदरगाव येथे आश्रम उभा केला. दीड एकरातला आश्रम! असा आश्रम काढायचा म्हणजे खर्च आहे. चालवायचा तर केवळ ‘आध्यात्मिक शक्ती’ किंवा लोकांच्या भोळेपणावर विसंबून धंदा चालत नाही. पैशांबरोबर पुढारी, प्रेस, सत्ता, धर्म, गुंडगिरी, सहकारी, स्थानिकांना हाताळण्याची यंत्रणा, अशा अनेक गोष्टींची गरज असते. सर्व बाबी व्यवस्थित जुळून आल्या, तर मात्र पैशांचा पाऊसच! थोडक्यात म्हणजे बाबांचे हात लांबवर पोचले पाहिजेत, पाय बळकट हवेत आणि डोके कार्यक्षम पाहिजे.
आश्रम उभा राहिला. आडबाजूला गाव असले, तरी भाविकांचा राबता वाढला. रोज पन्नास-साठ गाड्या, तर अमावस्येला त्याच्या दहापट गर्दी. प्रवेशस्थळी मार्गदर्शनासाठी रांगडे सहकारी, कोपर्यातल्या टेबलावर पावत्या फाडण्याची सोय. ‘पावती’च्या गर्दीला आवरणारे वेगळे. महाराजांच्या दर्शनासाठीच्या रांगा- त्यांच्या देणगीनुसार! सुरुवातच तीन हजारांपासून, तर व्हीआयपी पास एकवीस हजार!
रामबाण औषध
दूरदूरहून आलेले भाविक! कोणी टू व्हीलरवरून, तर कोणी फोर व्हीलर घेऊन! प्रत्येकांच्या गाड्या वेगळ्या, तसे प्रश्नही वेगळे, अडचणी वेगळ्या! पण उत्तर एकच! अंगार्याची पुडी! आणि पुन्हा-पुन्हा खेटे घालण्याचा उपाय! कोणी म्हणताहेत, रोजची उलाढाल लाखोंची आहे, तर अमावस्येला कोटींमध्ये!!
हा सर्व ‘विकास’ काही एका दिवसात होत नाही. आठ-दहा वर्षांपूर्वी छोटं रोपटं लावलंय; त्याचा आज मोठा वृक्ष झालाय! आणि आता त्याला लाख आणि कोटींची फळे येत राहिली. मग आठ-दहा वर्षे असेच बिनबोभाट सुरू आहे काय? कोणीच कशी तक्रार केली नाही?
तक्रार फार मोठी नसली, तरी लहान-मोठ्या कुरबुरी चालू होत्याच. पोलिसांपर्यंत तक्रारी गेल्याचेही काहीजण सांगताहेत. काही आपसांत मिटल्या, काही दाबल्या गेल्या; पण आता मात्र मोठा उठाव झालाच!
‘आत्मनिर्भर’ मामा
मनोहरमामा मूळचे इंदापूर तालुक्यातल्या ल्हासुर्णीचे! दोन दशकांपूर्वी उंदरगावात आले. डी. एड.पर्यंतचे शिक्षण घेतले. परीक्षेत अपयश आले; पण यश मिळाले असते, तरी उपयोग काय होता? राज्यात डी. एड्. बेरोजगार काही लाखांत आहेत. गेली दहा वर्षेभरती बंद आहे. युवकांना नोकर्या देण्यास आपण लायक नाही, असा शासनावर आक्षेप येऊ नये म्हणून अधूनमधून ‘टीईटी’ परीक्षेचे नाटक केले जाते. कपाळावर ‘ना-लायक’ म्हणून शिक्का मारला जातो. हताश युवक मग आपल्याच नशिबाला दोष देत दुसरा रस्ता धरतात.
मनोहरमामांनीही हेच केलं. ते ‘आत्मनिर्भर’ बनले. काही दिवस प्रामाणिकपणे सुके बोंबील विकून पाहिले; पण सुक्या बोंबीलापेक्षा लोकांना ताजे अध्यात्म जास्त आवडते, हे त्यांनी हेरले. मग सुरू झाला हा बुवाबाजीचा प्रवास! समाजाची गरज भागवणारा. प्रत्येक बुवा समाजाची एखादी गरज भागवत असतो.
नव्या ‘आर्थिक’ धोरणापासून आर्थिक अस्थिरता वाढती आहे. पारंपरिक उद्योग कधी बंद पडेल, नोकरी जाईल की राहील, पोरांचे भवितव्य, महाग झालेली आणि विश्वास गमावलेली वैद्यकीय सेवा, प्रत्येक बाबतीतली जीवघेणी स्पर्धा यातून निर्माण झालेले असंख्य प्रश्न! यावरचा मानसिक आधार मिळवण्याचा सोपा मार्ग आहे अध्यात्म!
अध्यात्माची गाडी
मनोहरमामांनी सुरुवातीला काही चिल्लर चमत्कार दाखवल्याचे भक्त सांगतात. पण अध्यात्म कळू लागल्यावर त्यांनी मंत्र-तंत्र, चमत्कार बाजूला ठेवले. गाडी स्टार्ट झाली की, त्याची गरजही लागत नाही. गर्दी बघून लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही मठात येऊ लागले. गाड्या लावायला मठाची जागा अपुरी पडू लागली. पुराचे पाणी शेतात घुसावे, तसे गाड्या शेजारच्या वावरात घुसू लागल्या. तिथे पार्किंगची ‘कणसे’ उगवू लागली. पाचचे पन्नास आणि पन्नासचे तासाला दोनशे झाले. पाखरं राखण्यापेक्षा गाड्या राखणे फायद्याचे बनले.
पोटाची भूक शमते. कारण त्याची लांबी-रुंदी ठरलेली आहे; पण पैशांची भूक शमत नाही, ती नेहमी वाढतच राहते. सरकारचा खासगीकरणाचा सपाटा बघितला की, त्याची प्रचिती येते. हळूहळू जवळचे नातेवाईक, शेजारी, गावकर्यांना मठाचा ‘उपद्रव’ होऊ लागला. त्यांनी तक्रारी सुरू केल्या. तक्रारींच्या ठिणग्या उडू लागल्या. एकटा माणूस किती विझवणार? शेवटी सुक्या बोंबीलाने आग पकडली.
आदमापूरच्या सरपंचांपासून उंदरगावच्या ग्रामपंचायतीपर्यंत आणि उंदरगावच्या ग्रामस्थांपासून सोलापूरच्या मीडियापर्यंत सर्वजण एका सुरात बोलायला लागले.
मनोहरमामावर घेतलेले आक्षेप (लोकमत, 1 सप्टेंबर, 2021)
सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमधून मामांच्या विरोधकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतले आहेत. ते पुढीलप्रमाणे –
1) देवाच्या नावावर ट्रस्ट उभारून उंदरगावच्या आश्रमात कोट्यवधी रुपये गोळा केले.
2) पत्नी, आई आणि छोट्या लेकराच्या नावे प्रचंड इस्टेट गोळा केली.
3) फिल्म प्रोड्युसरसोबत भागीदरीत ‘मनोहरमामा हायलँड एल. एल. पी.’ नावाची कंपनी कार्यरत केली.
4) पत्नीच्या नावे घोटी, ता. करमाळा येथे कोट्यवधी रुपयांची 27 एकर जमीन विकत घेतली. आई आणि मुलाच्या नावेही जमीन घेतली.
5) स्वत:स बाळूमामाचा अवतार असल्याचे भासवून भूत काढणे, भविष्य पाहणे आदी अघोरी प्रकार करून असाह्य लोकांना फसवले.
6) भेटीला आलेले भक्त शेजारच्या बागायती शेतीतून वाहने नेतात.
7) तक्रार केली, तर दहशत पसरवतात व धमकावतात.
8) एका भाविकाची उपचारांच्या नावाखाली होमहवन व पूजा करण्यासाठी त्याच्याकडून एक लाख एकवीस हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
9) आश्रमात चक्क आकडा टाकून वीज वापरली जाते.
पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये मनोहरमामाने आपल्यावरील आक्षेपांना वार्ताहर परिषदेत उत्तरे दिली, तीही दि. 1 सप्टेंबर 2021 च्या ‘लोकमत’ने छापली; शिवाय ‘यू-ट्यूब’वरही उपलब्ध आहेत. ती पुढीलप्रमाणे –
1) आपण कोणत्याही व्यक्तीकडे एक रुपयाचीही मागणी केली नाही. भक्तगण त्यांच्या स्वेच्छेने ‘शिवसिद्धी’ संचलित ‘श्री मामा संस्थे’कडे देणगी देतात. ही देणगी केवळ मंदिर बांधकाम; तसेच भक्तनिवासासाठी वापरली जाते. याचे ऑडिट होते. लोक स्वेच्छेने पैसे देतात.
2) आपले इतरही व्यवसाय आहेत. त्यातून मिळालेल्या पैशांतून इस्टेट खरेदी केली आहे.
3) बाळूमामांचे कार्य घराघरांत जावे म्हणून मालिकेसाठी कथा पुरवली. त्याच्या नोंदणीसाठी ‘मनोहरमामा हायलँड एलएलपी’ ही कंपनी स्थापन केली. त्यात कोणताही व्यवहार झालेला नाही. सुरुवातीला दाखवला जाणारा मनोहरमामांचा फोटो काढायचा की ठेवायचा, हे निर्माता ठरवेल.
4) पत्नीच्या नावे खरेदी केलेली जमीन इतकी महाग नाही. सरकारी दर पाहावा.
5) मनोहर भोसले यांनी सांगितले की, “ना मी कोणाचा अवतार आहे, ना कोणता बाबा, ना कोणता महाराज आहे. बाळूमामांचा वंशज, वारस, अवतार असल्याचे म्हटलेले नाही. मी केवळ बाळूमामांचा निस्सीम भक्त आहे.” आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला असून त्यानुसार धार्मिक सल्ले आणि पारायणाचे सल्ले देतो.
6) मंदिरात दर्शनासाठी येणार्या लोकांच्या गाड्यांच्या पार्किंगवरून स्थानिक लोकांच्या मनात राग आहे.
7) पार्किंगच्या कारणावरून स्थानिक व भक्त यांच्यामध्ये वाद झाले आहेत. पार्किंग जागेबाबत भावकीत वाद आहेत; त्यांनी रस्ते अडवले, त्यातून मारहाण झाली.
8) बारामती येथे गुन्हा दाखल करणारा आपला भक्त आहे. त्याने 2015 च्या घटनेची कोणाच्या सांगण्यावरून तक्रार केली आहे, कोणास ठाऊक! इतकी वर्षे तो का गप्प होता?
9) उंदरगावच्या मठात रीतसर मीटर घेऊन वीज घेतली आहे. ‘सोलर प्लँट’द्वारे इथे विजेचा वापर केला जातो.
मामा पुढे म्हणतात, काहीजण आपल्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागत असून ‘पैसे दिले नाही, तर तुमचा आसाराम बापू करू’ अशी धमकी देत आहेत. बदनामी करणार्या विरोधी आपण 100 कोटींचा दावा ठोकणार आहोत. धमकीसंबंधी आपण करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
मनोहरमामा खास वकील घेऊन मैदानात उतरलेत. वकिलांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा किस काढून त्यात मनोहरमामा सापडत नाहीत, हे दाखवून दिले. ते म्हणता – मनोहरमामा ज्योतिष सांगतात, ती कायद्यानुसार बुवाबाजी नाही, त्यावर कायद्याने बॅन नाही. त्याशिवाय
1) वास्तुशास्त्रानुसार जोशी, ज्योतिषी, नंदीबैलवाले व इतर ज्योतिषी यांच्याकडून दिला जाणारा सल्ला.
2) जमिनीखालील पाणी सांगण्याचा सल्ला.
3) हरिपाठ, कीर्तने, प्रवचने, इतर धार्मिक पारंपरिक शास्त्रांचे शिक्षण, प्रचार व प्रसार इत्यादींवर कायद्याने बॅन नाही.
2016 साली आदमापूरच्या देवस्थानाने पालखी काढण्याबाबत पत्र दिले असल्याचा दावा मामांनी केला.
आजपावेतो मनोहरमामांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. एक बारामतीमध्ये आणि दुसरा इंदापूरमध्ये. सहा सप्टेंबरला शशिकांत खरात यांनी मनोहरमामांनी आर्थिक फसवणूक केली, अशी तक्रार केली आहे. करमाळा पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक शोषणाचा गुन्हा एका पीडितेने दाखल केला आहे.